Tuesday 16 April 2019

गोली वडा पाव

गेले काही दिवस लो फील होत होतं. अगदी वाद नाही पण अमेरिकन बोर्ड मेंबर्स चे काही मुद्दे पटत नव्हते. एक चांगल्या माणसाने बारा वर्षानंतर कंपनीला बाय केलं. काही कास्टमर्स कामाच्या पद्धतीवरून नाराज झाले.एकंदरीत झोल झाला होता रात्रीचा. झोपेचं पूर्ण खोबरं.

आणि मग काल त्यांना ऐकलं, याची देही याची डोळा. ते म्हणाले "Entrepreneurship is celebration" ते असंही म्हणाले "ड्रीम आणि डेस्टिनेशन च्या मध्ये ऊर्जा आणि उत्साह नाही असं कधीही होऊ देऊ नका"

कॉर्पोरेट फायनान्स ची दणदणीत पगाराची नोकरी सोडून त्यांनी चालू केलं, एक अत्यंत लो कोस्ट खाण्याचा पदार्थ, वडा पाव. कल्याण रेल्वे स्टेशनच्या समोर चालू केलेल्या एका छोट्या दुकानापासून चालू झालेला प्रवास आज वीस राज्यातील शंभर गावांच्या तीनशे स्टोअर्स पर्यंत येऊन पोहोचला आहे, पण स्थिरावला नाही आहे. स्वप्नं आजही पाहतात ते.

प्रवास खडतर होता. पैसे, लोकल स्पर्धा, एका दाक्षिणात्य माणसाने वडा पाव विकण्यासाठी वापर केलेला आरे डेअरी बूथ आणि त्यावरून दोन राजकीय पक्षात झालेल्या फुटीवरून झालेली परवड. इथपासून ते मॅक्डोनाल्ड चे सप्लायर हीच माझी सप्लाय चेन, लो कॉस्ट मशिनरी, हटके मार्केटिंग कॅम्पेन, मुंबई ची जान असणारा वडा पाव वेगळ्या रेसिपीच्या मदतीने पूर्ण भारतात क्षुधा शमवतो आणि दहा वर्षानंतर च्या अथक प्रयत्नानंतर इंटरनॅशनल इन्व्हेस्टर यांच्या धंद्याला बॅक अप देईपर्यंतचा प्रवास ऐकताना विस्मयचकित होऊन गेलो.

वेंकटेश अय्यर, गोली वडा पाव चे प्रवर्तक, एक धडाडीचे उद्योजक, उत्कृष्ट वक्ता आणि आकाशाला गवसणी घातल्यावर सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर घट्ट रोवले आहेत असा मॉडेस्ट, हंबल समाजवादी माणूस. काल त्यांना दुसऱ्यांदा ऐकलं. पाहिल्यावेळी ऐकलं तेव्हाही रोमांचित झालो होतो, कालही झालो. थरमॅक्सच्या अनु आगा एकदा म्हणाल्या होत्या की कुणाचं बोलणं ऐकल्यावर स्टँडिंग ओव्हेशन द्या हे सांगायला लागलं नाही पाहिजे. पहिल्यावेळी ऐकलं तेव्हा साडेतीनशे आणि काल दीडशे लोक कधी आपल्या पायावर उभे राहिले आणि टाळ्यांचा कडकडाट करत राहिले हे कळलं ही नाही.

आज सकाळी उठलोय. मनावरचं मळभ पूर्ण दूर झालं आहे. नैराश्य कालच्या टाळ्यांमध्ये विरून गेलं आहे.

एखाद्या आर्थिक वर्षाची सुरुवात इतक्या जोरकस पद्धतीने झालेली माझ्या आठवणीत नाही.

वेंकटेश सर, टेक अ बो!

No comments:

Post a Comment