Wednesday, 15 July 2020

लाफिंग स्मायली

२०१२ साली जेव्हा सेटको बरोबर आमचं जॉईंट व्हेंचर झालं. करारावर सह्या झाल्यावर आर्ट मिलर, जे त्यावेळेस आमच्या बोर्ड चे चेअरमन होते, त्यांनी मला विचारलं "या जॉईंट व्हेंचर मधून तुला काय मिळवायचं आहे?"

मी म्हणालो "प्रोफेशनल फ्रंट ला काय मिळायचं ते मिळेल, पण पर्सनल फ्रंट ला मला माझ्या आयुष्यातून हरवलेला सेन्स ऑफ ह्युमर परत मिळवायचा आहे." माझं उत्तर अनपेक्षित होतं. त्यांनी मला अर्थ विचारला. त्याला उत्तर म्हणून मी जे सांगितलं ते मला वाटतं की बऱ्याच व्यासायिकांची व्यथा आहे. मी म्हणालो "एक वेळ होती की माझा सेन्स ऑफ ह्युमर चांगला होता, पण या बिझिनेस च्या प्रेशर मुळे तो हद्दपार झाला आहे. बिझिनेस चा फॉरमॅट या जेव्ही द्वारे असा करून द्या, की थोडी लाईट मानसिकता होईल."

असो. हसण्याचं थोडं वावडं आहेच. टीव्हीवर हंगामा किंवा गोलमाल चालू असेल तर नील आणि वैभवी हसून लोटपोट होताना मी मख्खसारखा बसून असतो. एखाद्या ग्रुप मध्ये हसी मजाक चालू असेल तर मला तितकं हसू येत नाही.

इथे फेसबुकवर मला अनेक मित्रांनी दाखवून दिलं की मी बऱ्याचदा पोस्टवर हसरी स्मायली देत नाही. मी हे मुद्दामून करत नाही किंवा पोस्टमधील विनोद दर्जेदार नाही असेही मला वाटत नाही. पण कदाचित ती मानसिकता झाली असेल. पोस्ट वाचत असलो तरी मनात दुसरं काही चालू असेल त्यामुळे यांत्रिक पणे लाईक देत असेल.

अर्थात हसऱ्या स्मायलीचा पूर्ण दुष्काळ असतो असं ही नाही. थोडं राशनिंग होतं हे खरं.

सांगायचा मुद्दा हा की स्मायली न देण्यात माज नाही. कदाचित माझीच आकलनशक्ती कमी पडत असेल. सुधारेल ती ही हळूहळू. पण तो पर्यंत तुम्ही हसत आणि हसवत रहा.




No comments:

Post a Comment