व्यवस्थापकीय कौशल्यात एक कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे निर्णयक्षमता. वेळेत निर्णय घेणे याचं महत्व हे वादातीत आहे. बऱ्याचदा असं लक्षात आलं आहे की लोक "बरोबर निर्णय" घेण्याची वाट बघतात आणि त्या वाट बघण्यात अनेक महत्त्वाच्या संधी हातातून निघून जातात.
"योग्य निर्णय" घेण्याची सवय मनाला, मेंदूला लावावी लागते. गंमत अशी आहे की त्याची सुरुवात निर्णय घेण्यापासून होते. सुरुवातीला योग्य/अयोग्य अशी त्याची वर्गवारी करण्यात वेळ घालवू नये या मतापर्यंत मी एव्हाना आलो आहे. सुरुवातीला काही निर्णय बरोबर येतील तर काही चुकतील. क्रिकेट मध्ये एखादा फलंदाज नवीन चेंडू समोर जसा चाचपडत खेळतो तसं या निर्णयाच्या बाबतीत होतं. सुरुवातीला परिस्थिती चकवा देते. एखादा निर्णय चुकतो. पण जसं जीवदान मिळाल्यावर फलंदाज हळूहळू खेळपट्टीवर उभा राहतो आणि मग येणारा प्रत्येक बॉल त्याच्या बॅटच्या मधोमध बसू लागतो, त्याप्रमाणे या येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करत ठाम पणे उभं राहिलं की हळू हळू निर्णय ठोकताळ्यांच्या आधारावर बरोबर घेऊ लागतात. लौकिकार्थाने अशा लोकांना मग समाज "यशस्वी" हे बिरुद लावतात. इथे आणि "जो जिता वोही सिकंदर" हा न्याय पण लागू होतो. पण त्याने किंवा तिने सिकंदर बनण्याआधी अनेक चुकीच्या निर्णयाचा सामना केलेला असतो, त्यातून झालेलं नुकसान सहन केलं असतं, मग ते मानसिक असो, आर्थिक असो वा शारीरिक हे लोकांच्या लक्षात येत नाही. पण ते नुकसान झालेलं असतं. मर्त्य मानव जात ते टाळू शकत नाही. फक्त आपल्या हातात तितकंच उरतं की चुकीचा निर्णय जरी घेतला असतील तरी त्यावर काम करून एक नवीन अनुभव घेणे आणि पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवली तर दुसरा कुठला तरी मार्ग स्वीकारून आता नव्याने त्या प्रश्नाची उकल करणे. मार्ग थोडा अवघड आहे पण त्याशिवाय दुसरा कुठला सोपा मार्ग नाही आहे.
ज्याला समाज "अपयश" म्हणतो, त्याकडे जर डोळसतेने बघितलं तर एक लक्षात येईल की नियती एका प्रश्नाची अनेक उत्तरं आपल्यासमोर ठेवत असते. आपण जर सातत्याने चुकीच्या निर्णयाचा मार्ग निवडला की अपयश पदरी पडतं आणि याउलट जर योग्य निर्णयाची निवड केली तर तो मार्ग यशाकडे घेऊन जातो. इथं एक शब्द महत्वाचा आहे आणि तो म्हणजे "सातत्य". एकदा चुकीचा मार्ग निवडला तर काही हरकत नाही. पण ते लक्षात आल्यावर त्या निर्णयाचा नाद सोडून दुसरा मार्ग निवडून त्यावर वाटचाल करणे हे संयुक्तिक असतं. दुर्दैवाने काही लोक सतत निवड चुकीची करतात आणि मग तथाकथित अपयशाचे धनी होतात.
काही मॅनेजमेंट कोट्स इंटरनेटच्या विश्वात प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे "मी आधी निर्णय घेतो, आणि मग तो बरोबर ठरेल असं वागतो." माझ्यामते हे ही एक दिशाभूल करणारं वाक्य आहे. त्यातील खरा अर्थ असा आहे की निर्णय चुकीचा असेलही पण तो कशामुळे चुकला आहे यावर सखोल अभ्यास करून पुन्हा नव्याने त्या प्रश्नाकडे बघेल आणि मग नवीन उत्तरं शोधेल. ती एक प्रोसेस आहे. कुणास ठाऊक पण कधी तो प्रश्न सोडवण्याचा अट्टाहास सोडून पण द्यावा लागेल. असं करावं लागलं म्हणजे आभाळ कोसळत नाही. कारण नवनवीन संधी येत असतात, मार्ग दिसत असतात. त्या सर्वावर साकल्याने विचार करत परिस्थितीचा गुंता सोडवण्यात शहाणपण आहे.
सकाळ लेख क्र ५