ऍथलेटिक च्या खेळामध्ये मला सगळ्यात जास्त आकर्षित करणारा खेळ म्हणजे, रिले रेस. कसला भारी प्रकार असतो तो.
चार जणांची टीम. त्यातल्या प्रत्येक खेळाडूला सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स देण्याची गरज. त्यात कुणाचीही सुटका नाहीच. तुम्ही कोणत्याही नंबर वर असा, ढिलं पडून चालतच नाही. तुमच्या एकट्याच्या परफॉर्मरन्स वर चार जणांचं मेडल अवलंबून असतं, वर ते मर्यादित वेळेत.
त्यातील सगळ्यात आवडणारा क्षण म्हणजे साला तो बॅटन दुसऱ्याला पास व करण्याचा क्षण. काय नसतं त्या वेळात. पहिल्या खेळाडूला माहिती असतं की बॅटन आपल्या हातून आता दुसऱ्याच्या हातात सोपवायचा आहे. थोडक्यात मला ही जबाबदारी दुसऱ्याच्या हातात द्यायची आहे तरी माझं अस्तित्व तो/ती कसं पळणार यावर अवलंबून आहे. मनात तो ही विश्वास ठेवावा लागतो की समोरचा माणूस तितक्याच ताकदीचा आहे, तो ही तितक्याच निष्ठेने आणि आत्मीयतेने पुढच्या खेळाडूला बॅटन द्यायला पळणार आहे. हे सगळं होताना तो बॅटन सुद्धा हातातून पडू द्यायचा नाही आहे, नाहीतर सगळाच गोंधळ. वर परत बॅटन घेणाऱ्याची मानसिकता. तो/ती ही वाट बघत असतो/ते, कधी ती जबाबदारी आपण आपल्या खांदयावर घेतो आहे ते. कमालीचा उत्सुक असतो. त्याची घालमेल तेव्हा बघण्यासारखी असते. पावलं त्याची थिरकत असतात आणि त्याचं सर्वांग आर्ततेने ते आधीच्या खेळाडूला सांगत असतं की "मित्रा, तू तुझं काम चोख पार केलं आहेस. आता ही माझी जबाबदारी आहे. तू बिनधास्त माझ्यावर विश्वास ठेव. मी जीव तोडून पळेल आणि हा बॅटन समोर पास ऑन करेल."
आणि मग तो मोमेंट ज्यावेळी तो बॅटन एका हातातून दुसऱ्या हातात विसावतो. त्यावेळी बॅटन पास झाल्यावर देणाऱ्याच्या तोंडावर येणारे निश्चिन्ततेचे भाव. त्यात सुटकेची भावना नसते तर एक आनंद असतो त्याच्या तोंडावर की माझं काम जीव तोडून केलं आहे आणि त्याच बरोबर समोरच्या बद्दल दुर्दम्य विश्वास. आय बेट, कुठल्याही अभिनेत्याला ते भाव जसेच्या तसे दाखवता येणार नाही. उफ्फ.... साला मी त्यावेळी माझा राहत नाही. मी तो बॅटन समोरच्याच्या हातात देणारा खेळाडू बनतो.
No comments:
Post a Comment