पहिल्या लेखात उल्लेख केला होता की उद्योजक आणि व्यावसायिक हे बऱ्याचदा समानार्थी शब्द म्हणून ओळखले जातात. त्या दोघात काय फरक आहे ते जाणून घेऊ.
मुळात Entrepreneur(उद्योजक) हे नाम नाही आहे ते विशेषण आहे. तो एक गुण आहे. त्यामुळे उद्योजकता ही जितकी व्यावसायिकाच्या अंगात असते तितकीच नोकरी करणाऱ्या माणसाच्या अंगात असू शकते. उद्योजक आणि व्यावसायिक हे समानार्थी शब्द नसून ते फार तर एकमेकांना पूरक शब्द आहेत.काय फरक आहे उद्योजक आणि व्यवसायिक मध्ये.
तर उद्योजक हा बिझिनेस चा पूर्ण पणे नवीन मार्ग दाखवतो. मग ते प्रोडक्ट च्या संदर्भात असेल नाही तर व्यवसाय करण्याच्या पद्धतीत असेल. व्यावसायिक मात्र मार्केट मध्ये अस्तित्वात असलेला मार्ग चोखाळतो. असे अनेक उद्योग आपल्याला दिसतील की ते येण्यापूर्वी त्यांच्या पद्धतीने व्यवसाय करता येतील हे जगाला माहीतच नव्हतं. ओला किंवा उबर सारखी टॅक्सी सर्व्हिस, ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारखं ऑनलाईन स्टोअर, एअर बी एन बी किंवा ओयो सारखी हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस, बुक माय शो सारखी ऑनलाईन बुकिंग ची सर्व्हिस, एअर डेक्कन ने चालू केलेली नो फ्रिल एअरलाईन्स ही आजकालच्या जगातील काही उदाहरणे.
उद्योजकाने आणलेली कल्पना ही नाविन्यपूर्ण असते आणि त्यामुळे त्याला स्पर्धा कमी असते. व्यवसायिक मात्र प्रचलित कल्पनेवर व्यवसाय चालू करतो. ते करत असणारे अनेक उद्योग अस्तित्वात असतात. त्यामुळे त्याला स्पर्धा जास्त असते. त्यातही काही हरकत नाही, पण जो पर्यंत तुम्ही व्यवसाय करण्याच्या धोरणामध्ये काही "हटके" करत नाही तोपर्यंत उत्पादन किंवा सेवेच्या किमतीत स्पर्धा होत राहते.
साधारणपणे व्यावसायिक हा व्यवसायाची आर्थिक गणितं मांडत वाटचाल करतो. तर उद्योजक मात्र अमूर्त अशा मूळ सिद्धांताचा पाठपुरावा करतो. त्याच्या आणि बिझिनेसच्या संदर्भातील गोष्टी मध्ये बदल घडवायचा प्रयत्न करतो.
व्यावसायिक लोकांना अशी वागणूक देतो की बिझिनेस ची ग्रोथ होईल, तर उद्योजक बिझिनेस ची अशी जडण घडण करतो की लोकांची ग्रोथ होईल.
कोणताही निर्णय घेताना व्यावसायिक आकडेमोडी मध्ये गढलेला असतो त्यामुळे रिस्क कमी घेतो, तर उद्योजक संख्यात्मक विश्लेषणाबरोबर अंतर्मनाचा पण आधार घेतो, त्यामुळे त्याच्या निर्णय प्रक्रियेत रिस्क असते.
व्यावसायिक मार्केट मध्ये स्वत:साठी जागा बनवतो तर उद्योजक स्वत:साठी नवीन मार्केट शोधतो.
उद्योजक व्यवसायाकडे त्रयस्थ भूमिकेतून बघू शकतो. तो स्वतःला व्यवसायापेक्षा मोठा समजत नाही.
उद्योजक व्यवसायाकडे त्रयस्थ भूमिकेतून बघू शकतो. तो स्वतःला व्यवसायापेक्षा मोठा समजत नाही.
वरच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने उकल केली तर असं सांगता येईल की व्यवसाय म्हणजे धोका घेणे, जो उद्योजकाचा स्थायीभाव आहे, हे जितकं खरं आहे तितकंच त्या रिस्कला तोंड देता येईल असा बॅक अप प्लॅन बनवणे हेही महत्वाचं आहे. अगदी थोडक्यात सांगायचं दोन्ही बाजूंचे चांगले गुण उचलून व्यवसायाभिमुख दूरदृष्टी ठेवणं ही कसरत असते खरं, पण ती जर जमली तर समाजाने, राष्ट्राने आणि सरतेशेवटी जगाने दखल घ्यावी असा व्यवसाय उभा राहू शकतो. एव्हाना माझ्या लक्षात आलं आहे की उद्योजक आणि व्यावसायिक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्यातल्या उद्योजकतेला जर व्यवसायिकतेचं कोंदण दिलं तर ते नाणं खणखणीत वाजण्याची शक्यता तयार होते.
सकाळ लेख क्र ३
No comments:
Post a Comment