Saturday 1 January 2022

सकाळ, लेख क्र १

लौकिकार्थाने अर्थार्जन करण्यासाठी आपल्याकडे किंवा किंबहुना जगात दोन समाजमान्य पद्धती आहेत. एक म्हणजे नोकरी करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे व्यवसाय करणे. नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही प्रकाराबद्दल काही वाद, प्रवाद आहेत, समज, गैरसमज आहेत. नोकरी करणे म्हणजे धोका कमी आणि व्यवसाय करणे म्हणजे धोका पत्करणे हा फरक सार्वत्रिक प्रचलित आहे. त्याचबरोबर नोकरी करणे म्हणजे "निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही" आणि व्यवसाय करणे म्हणजे "निर्णय घेण्याची पूर्णतः: स्वायत्तता आहे" असंही समजलं जातं. अजून एक लोकप्रिय समज म्हणजे नोकरीत अर्थार्जन करण्यावर मर्यादा तर व्यवसायात अफाट श्रीमंती येते. (श्रीमंती आणि संपन्नता यात फरक आहे आणि तो काय आहे, यावर नंतर कधीतरी चर्चा करू यात)

नोकरी आणि व्यवसाय यातील फरक हे थोड्याफार फरकाने कुणासाठी खरे असतीलही तरीही दोन्ही क्षेत्रात काम करताना तुम्हाला व्यवस्थापनाची शिडी वर चढत जायची असेल तर काही व्यवस्थापकीय कौशल्याचा विकास होत जाणे ही गरज आहे. व्यवस्थापन पिरॅमिड चे तीन प्रवर्ग आहेत. एक म्हणजे डूअर, म्हणजे जो स्वतःच्या हाताने काम करतो, दुसरा म्हणजे मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक ज्याने दुसऱ्याकडून काम करवून घेणे अपेक्षित असतं आणि तिसरा भाग म्हणजे लीडर, नेता ज्याला लोक आदर्श मानतात आणि त्याने दाखवलेल्या मार्गावर चालत, वैयक्तिक आयुष्यात जे इप्सित आहे त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतात. 

या सगळ्या मॅनेजमेंट थिअरी मध्ये काही लोक असंही मानतात की लीडरशिप हा एक अंगभूत गुण असतो. म्हणजे कुणी जन्माला येतानाच तो (किंवा ती) हा गुण घेऊन पृथ्वीवर आला असतो. आणि काही जणांकडे हा गुण नसतोच. माझं स्वतःच याबाबतीत मत वेगळं आहे. माझ्या मते पृथ्वीवर जन्माला येणाऱ्या प्रत्येक मनुष्यजीवामध्ये लीडर चे गुण असतात. फक्त सामाजिक इको सिस्टम मुळे त्याच्यातील अंगभूत लीडरशिप गुणांना चालना मिळत नाही. तर काही जण हा चॉईस म्हणून स्वीकारतात. माझ्यामते डूअर आणि मॅनेजर असताना झोकून काम केलं आणि त्याबरोबरच स्वतःतील वैगुण्य ओळखत त्यावर जर दिवसागणिक विचारधारेला नवनवीन आयाम देत राहिलं तर आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर लीडर बनण्याची प्रोसेस चालू होऊ शकते आणि ती झाल्यावर काही काळात तो किंवा ती एक यशस्वी नेता, व्यवसायिक म्हणून मान्यता पावतात हे मी अनेक केस स्टडीज मध्ये आजूबाजूला घडताना  पाहतो. अगदी थोडक्यात सांगायचं तर "मी आज जर कालच्या पेक्षा कौशल्य पातळीत सुधारलो नसेल तर मला उदयाला काही अवघड प्रश्न पडू शकतील अशी शक्यता आहे" ही विचारधारा अंगी बाणवत, स्वतःमधील व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित करत जर वृद्धिधिष्ठित माइंडसेट ठेवला तर व्यावसायिकतेच्या निकषावर आपलं नाणं खणखणीत वाजेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. 

नोकरी की व्यवसाय याबाबत जसं आपल्या मनात सातत्याने द्वंद्व चालू असतं आणि त्याबाबत काही ग्रह आपण करून घेतले आहेत, त्याचप्रमाणे अजून दोन शब्दांचा अर्थ समजून घेण्यात आपण जरा गल्लत करतो आणि ते म्हणजे उद्योजक म्हणजे उद्योजक आणि व्यावसायिक. (Businessman and Entrepreneur). रूढार्थाने उद्योजक आणि व्यावसायिक हे समानार्थी शब्द आहेत असं वाटतं. पण या दोघांच्या काम करण्याच्या पद्धतीत खूप फरक असतो हे आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या व्यवसायाचा बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येईल. मी स्वतः उद्योजक या संज्ञेचा पुरस्कार करतो. पण इथं नमूद करू इच्छितो की बिझिनेसमन या संज्ञेला जागून जर कुणी त्यांच्या व्यवसायाची दिशा ठरवणार असेल तर त्यात चूक काहीच नाही आहे. फक्त याबाबतीतला फरक आपण समजून घ्यायला हवा ज्या योगे आपले विचार सुस्पष्ट होतील आणि व्यवसाय करतानाची मार्गदर्शक तत्वे आखण्यात आपल्याला मदत होईल. 

येणाऱ्या काही आठवड्यात या सदरामध्ये याच विषयातील बारकावे आणि कोणती व्यवस्थापकीय कौशल्ये विकसित करावी याबद्दल माझी काही मतं मांडणार आहे. सदर मतं ही माझ्याच ३२ वर्षाच्या अनुभवावर बेतली आहेत. 

नवीन वर्षाच्या आपल्याला आरोग्यमयी शुभेच्छा. 

सकाळ, लेख क्र १

 

No comments:

Post a Comment