Tuesday 14 February 2023

दोन प्रकारचे लीडर्स

मी दोन प्रकारचे व्यावसायिक लीडर्स बघितले आहेत. 

पहिला प्रकार म्हणजे जे लोकांसाठी काम करतात. म्हणजे लोकांची ग्रोथ ही त्यांच्या केंद्रस्थानी असते. ग्रोथ म्हणजे फक्त आर्थिक ग्रोथ नव्हे, तर सर्वांगीण विकास. त्यासाठी हे लीडर्स आपल्या लोकांना एम्पॉवर करण्यात विश्वास ठेवतात. त्यासाठी ते त्यांना वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी उद्युक्त करतात.  ते स्वतःची पोझिशन बाजूला ठेवतात आणि फक्त कंपनीचं हित डोळ्यसमोर ठेवतात. 

आमचा रिटायर झालेला प्रेसिडेंट जेफ क्लार्क याबाबत माहीर होता. तो कधीही आपले निर्णय कंपनीवर लादायचा नाही. खरंतर "हे असं करा/करू नका" हे म्हणायची त्याच्याकडे पॉवर होती. पण असे अनेक निर्णय, भले त्याच्या मनाविरुद्ध असतील पण कंपनीच्या हिताचे असतील तर त्याने खुल्या मनाने स्वीकारले. आणि हो, हे करताना अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा केली, समोरच्याला बोलू दिलं, त्याच्या मताचा आदर केला, काउंटर अर्ग्युमेंट करताना व्हेटो कधी वापरला नाही. काही वेळा त्याने त्याच्या निर्णया बद्दल कन्व्हिन्स केलं आम्हाला पण तो लादला नाही. याचा फायदा असा झाला कि प्रत्येकाचा सेल्फ एस्टीम हा जोपासला गेला. शेवटी एकमेकांना आदर देणं म्हणजे हेच नाही का?

जेफ सारखे लोक ही पहिली कॅटेगरी. 

याउलट मी असे काही लोक बघितले आहेत की त्यांचा आपल्या टीमवर अजिबात विश्वास नसतो. (तो जर नसेल तर ही लोक टीम वाढवतात कशाला हा मला नेहमी पडणारा प्रश्न). सतत त्यांना आरोपीच्या कटघर्यात. निर्णय त्यांच्यावर लादायचे आणि ते वर्क आउट नाही झाले तर त्यासाठी टीमला जबाबदार धरायचं. व्यवसायात स्वतः निर्णय घेऊन टाकायचा टीमला विचारायचं नाटक करायचं. म्हणजे सहसा त्यांचा डायलॉग असा असतो "मी अमुक तमुक करायचं ठरवलं आहे. तुम्हाला काय वाटतं?" आता तुम्ही व्यवसायाचे प्रीमियर. तुम्ही ठरवलंच आहे तर आम्ही कशाला विरोध करू? असा लोक विचार करतात. आणि यापुढे जाऊन कुणी काही सुचवलं तर आपल्या पोझिशनचा वापर करून ते म्हणणं हाणून पडायचं. लोक सुद्धा आपल्या कोशात जातात. ते निर्णय घेत नाहीत आणि मग होयबा, किंवा प्राकृत भाषेतील चमचा लोकांची गॅंग आपल्या भोवताली जमा करण्यात तो लीडर धन्यता मानतो. या प्रकारच्या लीडर बरोबर काम करणाऱ्या लोकांची वाढ खुरटते, पर्यायाने व्यवसायाची. 

काळाच्या कसोटीवर सिद्ध होणारं एंटरप्राइज, मग ते कुठल्याही साईझ चं असो, बनवायचं असेल तर पहिल्या प्रकारचे नेतृत्वगुण अंगात बाणवायला हवेत असं माझ्या लक्षात आलं. 

लोकांना भेटलं की हे असं नव्याने काही तरी शिकायला मिळतं. 


व्यवसायाने बाळसं धरल्यावर एका प्रक्रियेत मोठा फरक होतो. फरक बऱ्याच गोष्टीत होतो. पण सगळ्यात मोठा फरक होतो तो निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत. 

व्यवसाय लहान असताना सर्व निर्णय तुम्हाला एकट्याने घ्यायचे असतात. त्यातून परिस्थितीला अनुसरून निर्णय घ्यायची सवय लागते खरी, पण त्या प्रोसेस मध्ये अजून एक घडतं. एकधिकारशाहीचा जन्म होतो. एखाद्या सिच्युएशन कडे आपण जसं बघतो तीच पद्धत बरोबर असा एक फाजील आत्मविश्वास अंगात भिनतो. 

कालानुरूप व्यवसाय वाढतो. त्याला संयुक्तिक असं एक बोर्ड कंपनीत तयार होतं, डायरेक्टर बोर्ड. अगदीच फॉर्मल बोर्ड तयार नाही झालं तरी मग सिनियर लोकांची टीम तयार होते. असं अपेक्षित असतं की आता यापुढे घेतले जाणारे निर्णय हे त्या बोर्ड च्या किंवा कोअर टीमच्या संमतीने घेतले जावेत. मग ते कुठलेही असोत.

इथं खरी गंमत चालू होते. इतके दिवस एकट्याने निर्णय घेण्याच्या आणि त्याची अंमलबजावणी करण्याची सवय लागलेल्या प्रमुखाला अपल्यावरती आता बोर्ड आहे आणि त्याला माझ्यापेक्षा जास्त पॉवर आहे हेच मान्य होत नाही. 

तीच गोष्ट सिनियर लोकांच्या टीमची. या टीमला जर निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं नाही तर कुठलाही निर्णय घेताना एकांगी विचार केला जातो, फक्त प्रमुखाच्या मेंदूने, जो व्यवसायाच्या दृष्टीने हितकारक असेलच असे नाही. रादर दीर्घकालीन भविष्याच्या दृष्टीने तो चुकीचा पण असू शकतो.

No comments:

Post a Comment