Saturday 18 February 2023

व्यंकटेश

 काल व्यंकटेशला भेटलो. वेंकी म्हणतात त्याला. वय साधारण पस्तीस चाळीसच्या मध्ये. कंपनी पण तशी लहानच, पिनिया बंगलोर मध्ये. सहा सात हजार स्क्वे फूट मध्ये. वयोपरत्वे आणि व्यवसायाच्या साईझच्या दृष्टीने मी मोठा. म्हणून थोडा ताठ्यात गेलो होतो शॉप मध्ये.

वेंकीची स्टोरी अजब, ते मला तिथं दोन एक तास थांबल्यावर कळलं.
२००१-२ च्या सुमारास वेंकी उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. एम एस झालं, वेंकी ला जॉब लागला. जनरल मोटर्स ची एन व्ही एच मध्ये काम करणारी छोटी, पण हाय टेक कंपनीत. त्या कंपनीत वेंकी चमकला. कंपनीने त्याची ग्रीन कार्ड ची प्रोसेस चालू केली. आणि वेंकी ने तिथं जाहीर केलं की ग्रीन कार्ड बनवू नका कारण सहा महिन्यात मी भारतात जाऊन वडिलांच्या व्यवसायात जॉईन होणार आहे. त्याच्या भारतीय आणि अमेरिकन कलीग्ज ने "द ग्रेट अमेरिकन लाईफ स्टाईल" न सोडण्याचा आग्रह केला. पण वेंकीचा निर्णय फायनल होता.
२००५ ला वेंकी भारतात परतला, आणि जॉईन झाला वडिलांच्या प्रस्थापित इंजियरिंग व्यवसायात. पंचवीस वर्षे जुना व्यवसाय, मार्केट लिडर, कंपनीत शंभर पेक्षा जास्त लोक काम करत आहेत. वेंकीला सेकंड जनरेशन व्यावसायिक म्हणून यापेक्षा चांगलं पिच काय असणार? त्याने धडाक्यात काम चालू केलं.
कंपनीत काही सिनियर पार्टनर्स होते. त्यांना वेंकीची नवीन मॅनेजमेंट स्टाईल झेपत नव्हती. त्याच्यावर बंधनं यायला लागली. बदलत्या काळानुसार लागणारे निर्णय वेंकी घ्यायचा पण सिनियर पार्टनर्सचं त्याला अनुमोदन नसायचं.
शेवटी वेंकीने निर्णय घेतला. वडील आणि त्यांच्या पार्टनर्स पासून वेगळं होण्याचा. त्याने स्वतःचा व्यवसाय थाटला, जिथं मी उभा होतो. व्यंकटेश ने हाय एन्ड रोबोटिक्स मध्ये बिझिनेस चालू केला. मी पोहोचलो तेव्हा तिथे २० लोक काम करत होते. अल्युमिनियम प्रोफाइल मध्ये छोटं ऑफिस थाटलं होतं. डिझाईनचे दोन वर्क स्टेशन. वडिलांच्या प्रस्थापित बिझिनेस मध्ये राहिला असता तर राजा असला असता, पण प्रोग्रेसिव्ह मानसिकतेला खतपाणी जिथं मिळत नव्हतं त्या इझी लाइफस्टाइल ला वेंकी ने तिलांजली द्यायचं ठरवलं आणि स्वतःचा छोटा का होईना पण बिझिनेस चालू केला. प्रतिकुलता येतेच, पण अनुकूलतेतून अशी प्रतिकुलता येण्याचं उदाहरण मी पहिल्यांदा पाहत होतो. पण वेंकीची क्लिअर थॉट प्रोसेस पाहता तो त्यावर मात करेल यात शंका नाही.

तसं बघायला गेलं तर वेंकी दुसऱ्या पिढीचा व्यावसायिक. पण ज्या पद्धतीने त्याने व्यवसाय थाटला, त्याची तुलना फर्स्ट जनरेशन उद्योजकाशी केली तर वावगं ठरणार नाही.
वेंकीच्या युनिट मध्ये जाताना थोडा अहंकार होता माझ्या मनात. तिथून बाहेर पडताना स्वतःलाच वेंकीपेक्षा मी छोटा वाटू लागलो....... सर्वार्थाने.

No comments:

Post a Comment