Saturday 18 February 2023

सनराईज उद्योग

२०१७ ची गोष्ट आहे. ब्रिटन गॉट टॅलेंट मध्ये एक विनोदवीर आला होता. डॅलिसो चोपंडा नावाचा. भारी कॉमेडियन आहे. तिथे ४-५ मिनिटाच्या स्किटमध्ये त्याने धमाल उडवून दिली होती. त्या स्किट मध्ये ब्रिटन मधील मंदी बद्दल तो विनोदाने म्हणाला होता "इंग्लंड मध्ये रेसेशन आलं आहे असं मी तेव्हा मानेल जेव्हा एखादी भारतीय कंपनी इंग्लंड मध्ये कॉल सेंटर उघडेल." खोटं कशाला सांगू, पण मी सुद्धा त्या विनोदावर हसलो होतो. त्याला कारण होतं. त्याची विनोदाची जातकुळी भन्नाट आहे. डिलिव्हरी क्लास आहे. पण थोडं वाईट वाटलं होतं. ते टाटांनी जे एल आर, टेटली, कोरस स्टील  घेऊन सुद्धा, भारतीय असलेल्या पण इंग्लंडस्थित राहून भारतात पोलाद साम्राज्य उभे करणाऱ्या मित्तलांनी यूरोपातील अर्सेलर घेऊनही असे जोक केले जातात, यासाठी. 

तीन चार दिवसांखाली एअर इंडिया ने बोईंग आणि एअरबस वर ला  ४७० विमानांची ऑर्डर दिली त्याने कदाचित असे जोक करताना कॉमेडियन चार वेळा विचार करतील असं मनाला चाटून गेलं. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, फ्रांस चे अध्यक्ष मॅक्रो आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्या ऑर्डर बद्दल काय स्टेटमेंट दिलं आहे हे आपण पेपर मध्ये वाचलंच आहे. पण भारताला सुद्धा या ऑर्डरमुळे दूरगामी फायदा होणार आहे असं दिसतं, ज्याबद्दल रिलेटिव्हली कमी बोललं गेलं असं वाटतं. (याआधी अशी मोठी ऑर्डर अमेरिकन एअरलाईन्स ने २०११ साली दिली होती)

भारतात काही सनराईज उद्योग उदयाला येत आहेत आणि एव्हिएशन त्यापैकी एक आहे हे एव्हाना अनेकांना माहिती झालं आहे. असं म्हंटलं जातं की या ऑर्डरपासून प्रेरित होऊन इंडिगो जी, कोविड आधी ३०० विमानांची ऑर्डर देणार होती, ती रिलीज करण्याच्या निर्णयाप्रत आली आहे. आणि कुणास ठाऊक ती कदाचित ५०० ची असेल अशी वदंता आहे. स्वतः टाटांनी आताच्या ऑर्डरची प्राईस हेज करण्यासाठी अजून ३४० विमानांची ऑर्डर देऊन ठेवली आहे असं बोललं जातं. टाटा ग्रुप मधल्या उच्चपदस्थाने ही माहिती शेअर केली होती, जी बहुतेक गोपनीयतेचा भंग झाला म्हणून मागे घेण्यात आली. नुकत्याच चालू झालेल्या अकासा ची सुद्धा ७२ विमानाची डिलिव्हरी पुढील दोन वर्षात अपेक्षित आहे. येणाऱ्या काही वर्षात सगळे मिळून २००० नवीन विमाने भारतात येण्याची शक्यता आहे. 

या उद्योगाला येणाऱ्या काही वर्षात पायलट्स, केबिन क्रू, ग्राउंड स्टाफ, मेंटेनन्स क्रू या क्षेत्रात रोजगार तयार होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर विमानातील वेगवेगळ्या सब असेम्ब्ली चा मेंटेनन्स करणाऱ्या व्यावसायिकांना चांगले दिवस यावेत. गेल्या अनेक वर्षात टाटा, महिंद्रा, क्वेस्ट यांनी उद्योगांनी बंगलोर, हैद्राबाद, नागपूर, वडोदरा इथे एव्हिएशन इंडस्ट्रीच्या निगडित उद्योग थाटले आहेत, जे बोईंग, एअरबस, लॉकहीड मार्टिन सारख्या कंपन्यांना विमानांचे स्पेअर पार्टस पुरवतात. त्या उद्योगांना आणि तसेच त्यांच्या व्हेंडर्स ला व्यवसायपूरक परिस्थिती निर्माण झाली आहे. एव्हिएशन इंडस्ट्री मध्ये व्हेंडर म्हणून पात्र होण्यासाठी क्वालिटी चे एंट्री बॅरिअर खूप कडक आहेत. पण त्यांची जर यशस्वीरीत्या पूर्तता केली तर खूप प्रॉस्पेक्ट्स आहेत इतकं नक्की. येणाऱ्या काही वर्षात या सगळ्या व्यवसायाला चांगले दिवस येणार आहेत हे नक्की. 

बाय द वे, या डीलची घोषणा करताना टाटा ग्रुप चे एन चंद्रा, बोईंग चे डेव्हिड कॅलहून, एअरबस चे जेफ निटेल यांना वर्ल्ड मीडिया ने जास्त कव्हर केलं नाही हे आजच्या प्रथेला धरूनच आहे. 

No comments:

Post a Comment