Saturday, 20 April 2024

भावनिक गुंतवणूक

 परवा आमच्या कंपनीतल्या एका मुलीच्या लग्नाची पोस्ट टाकली तर त्यावर माझा मित्र सदानंद बेंद्रे याने माझी सहकाऱ्यांबरोबर असणारी भावनिक गुंतवणूक यावर लिहायला सांगितलं. म्हणून ही पोस्ट. 

अगदी खरं सांगायचं तर इतर गुण अवगुणाप्रमाणे कंपनीतल्या सहकार्यांबरोबर ची नाती आणि भावनिक गुंतवणूक ही पण वयोमानाबरोबर इव्हॉल्व्ह होत गेली आहे. जेव्हा कंपनी लहान होती, तेव्हा नैसर्गिक होतं की त्याला मी कुटुंब समजायचो. त्यामुळे माझे सहकारी हे फॅमिली मेंबर प्रमाणे असायचे. त्यांचे प्रश्न हे माझे प्रश्न व्हायचे. त्यांनी ते जर मला सांगितले नाही तरी मला त्यांचा राग यायचा. त्यांना मी मग आउट ऑफ वे जाऊन मदत पण करायचो. पण त्याचा परिणाम असा झाला की मी त्यांच्या बाबतीत भयंकर पझेसिव्ह व्हायला लागलो. त्यांनी कंपनी वगैरे सोडली की खूप डिस्टर्ब व्हायचो. थोडक्यात मी त्यांना जी मदत करायचो आणि त्यांना कौटुंबिक रिलेशन मध्ये बांधायचो, या बदल्यात त्यांच्या कडून मी काही अपेक्षा ठेवायचो. आणि त्या पूर्ण नाही झाल्या की मला स्वतःला भयंकर मानसिक त्रास व्हायचा अन त्यातून मी कधी आक्रस्ताळेपणा पण करायचो. कदाचित माझ्या वागण्यातून हे प्रतिध्वनीत पण होत असेल की मी हे सगळं तुमच्यासाठी करतो आहे. 

जसजसे या मानवी नात्यांचे भरेबुरे अनुभव यायला लागले तसा मी पण कंपनीचा कर्ता म्हणून इव्हॉल्व्ह होत गेलो. त्यातून मला जबरदस्त शिकवण मिळाली आणि मी काही धडे घेतले. एकतर न मागता मदत देणं बंद केलं. आणि मुख्य म्हणजे ज्या मदतीतून माझ्या मनात अहंभाव तयार होईल अशी मदत करणं बंद केलं. हे जरी करत गेलो तरीही माझ्या सहकार्याबद्दल असणारं माझं कर्तेपण हे अबाधित राहिलं. फक्त त्यातून येणाऱ्या पझेसिव्ह फिलिंगला तिलांजली दिली. मी सेटको परिवाराचा प्रमुख आहे आणि माझ्या लोकांची काळजी घेणे हे माझं आद्य कर्तव्य आहे ही भावना मनात प्रबळ होत गेली. याची सगळ्यात जबरदस्त अनुभूती लागोपाठच्या दोन घटनांमधून झाली. 

पहिली घटना म्हणजे ७ जुलै २०१९ रोजी झालेला तो भीषण अपघात अन त्यात गमावलेले माझे चार सहकारी. ज्या घटनांमुळे तुझ्या स्वभावात आमूलाग्र बदल झाला अशा तीन घटना सांग असं मला कुणी विचारलं तर या अपघाताचा मी उल्लेख करेल. त्या आघातातून सावरताना माझ्या क्रायसिस मॅनेजमेंट ची कसोटी लागली.

आणि दुसरी कसोटी करोना काळात झाली. मला सांगायला आनंद होतो आणि थोडा अभिमान पण वाटतो की त्या काळात आलेल्या अनेक संकटांना सामोरे जाताना माझे लोक आणि ते संकट यांच्या मध्ये खंबीर पणे उभा राहिलो. पण हे सगळं करताना मी लोकांसाठी नव्हे तर माझ्या आनंदासाठी मी करतोय हे मनावर सातत्याने बिंबवित राहिलो. 

या सगळ्या प्रोसेस मध्ये हे झालं की माझ्या मनात माझ्या सहकार्याबद्दल प्रेम तर पूर्वीसारखंच आहे पण त्यात एक मलाच हवीहवीशी वाटणारी निरपेक्षता आली. आजही पालकत्वाची भूमिका तशीच आहे पण त्यातून येणाऱ्या मालकी हक्क भावनेला मी हद्दपार करू शकलो. 

या सगळ्याचा फायदा असा झाला की माझ्या मनात एम्प्लॉयी आणि एम्प्लॉयर या नात्याबाबतीत खूप स्थितप्रज्ञता आली. ज्यांच्या बरोबर माझे सिद्धांत सिंक झाले आहेत त्यांना मी काही गोष्टी अधिकारवाणीने सांगतो पण त्याउपरही कुणाला माझं म्हणणं पटलं नाही तर त्यांच्या विचारांचा आदर करण्याची मानसिकता मी बाळगून आहे. 

तर असं आहे. थोडं कॉम्प्लेक्स वाटेल कुणाला. पण माझ्या मनात माझ्या सहकार्यांबद्दल प्रचंड प्रेम आहे. त्याबदल्यात येणारा विमोह मात्र मी त्यागला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मानसिक स्टेटस मी खूप एन्जॉय करतो आहे. 

Monday, 15 April 2024

विरोध

 विनायक पाचलग च्या थिंक बँक वर घेतलेल्या माझ्या मुलाखतीचं कवित्व तसं संपलं होतं. कौतुक पण झालं, मुलाखतीवर यु ट्यूब वर काही विरोधी प्रतिक्रिया पण आल्या "म्हणजे हा काय बडबड करतोय. स्वतः लोकांना किती पगार देतो" वगैरे वगैरे. 

मुलाखत एअर झाल्यावर दहा एक दिवसांनी मला एक फोन आला, माझ्या एका जुन्या मित्राचा. अनेक वर्षात त्याचा अन माझा काही संवाद पण  नाही आहे. भेटणं तर दूर पण फोन कॉल पण नाही. त्याचा फोन आला आणि त्याची सुरुवातच 

"काय अर्धवट ज्ञान घेऊन मुलाखत देणारे तथाकथित विचारवंत" अशी झाली. मी गांगरलोच एकदम. त्यानंतर तो जे काही बोलत होता, त्याची मला काही टोटल लागत नव्हती. सुरुवातीला राग आला, पण नंतर त्याच्या बोलण्याची गंमत वाटायला लागली. कारण मी जरी फार काही कर्तृत्ववान वगैरे नसलो तरी माझ्या या मित्राने आयुष्यात भरीव केल्याचं आठवत नाही. किंबहुना कामाच्या तराजूत माझं वजन किलोभर भरत असेल तर मित्राचं छटाक पण होणार नाही. तरीही मला फटकवायचा त्याचा कॉन्फिडन्स वाखाणण्याजोगा होता. 

माझा एक तर स्वभाव असा आहे की मला एखाद्या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तरीही समोरचा दुप्पट आत्मविश्वासाने जर सांगत असेल "अरे तुला माहिती नाही, मध्य प्रदेश ची राजधानी  लखनौ आहे, भोपाळ नाही" तर मी "असेल बुवा" असं म्हणून मूग गिळून गप्प बसतो. त्या फोन मध्येही मी गप्प बसलो. 

ही अजून एक सोशल मीडियाची देन आहे. दुसर्याने काही मत व्यक्त केलं असेल अन त्याला विरोध करायचा असेल तर विरोधी मत व्यक्त करायचं नाही तर "व्यासंग वाढवा", "गेट वेल सून", "कडक गांजा कुठं मिळतो" किंवा माझा मित्र म्हणाला तसा "अर्धवट माहिती घेऊन काहीही बरळू नका" अशी काही दुसऱ्याची खिल्ली उडवणारी दीड शहाणपणाची वाक्यं फेकायची. विरोध व्यक्त करण्याचा आपण वापरतो त्यापेक्षा चांगली पद्धत असते हे लोकांच्या गावीही नसतं. 

असो. माझे बिझिनेस कोच म्हणतात तसं "there is a way of living life.....And there is always better way of living life." विरोध करताना पण हे ध्यानी ठेवावं असं मला वाटतं. अर्थात नेहमीप्रमाणे..... आग्रह नाहीच. 

(पोस्ट लिहिण्यासाठी दोन कारणं झालीत. एका संयमित अकौंट वर व्यासंग वाढवा...बरळू नका अशी एका फेक अकौंट ने दिलेली कॉमेंट पाहिली आणि योगायोगाने पोस्ट त्या गावाहून लिहितो आहे जिथून माझ्या मित्राचा फोन आला होता. जमलं तर त्याला भेटून आज संध्याकाळी कोकम सरबत पिताना त्याच्याशी चर्चा करावी म्हणतोय) 

Friday, 12 April 2024

मुविंग ऍस्पिरेशन्स

 सेकंड जनरेशन इन्ट्रप्रेन्युअर ही एक कैचीत पकडली गेलेली जमात असते. बाहेरच्या लोकांना वाटत असतं, यांना काय कमी आहे? सगळं रेडी प्लेट मध्ये तर मिळालं आहे. बोर्न विथ सिल्व्हर स्पून वगैरे. हे जर खरंच झालं असेल तर या दुसऱ्या पिढीच्या मनात कॉम्प्लेसन्सी येते आणि व्यवसायाची वृद्धी थांबते. आणि दुसरीकडे अशीही परिस्थिती असते की वडिलांच्या कार्यपद्धतीमुळे एक संस्कृती तयार झालेली असते, जी या नवीन पिढीला झेपत नाही. पहिल्या पिढीच्या उद्योजकाने तयार केलेले सहकारी मालकाच्या मुलाला किंवा मुलीला सहजासहजी स्वीकारत नाहीत. 

पण उद्योग उभा केलेली पहिली पिढी आणि त्याच व्यवसायात उतरलेली त्यांची दुसरी पिढी यांच्यात समन्वय असेल तर अनेक वर्षांची लिगसी तयार होणारे उद्योग उभे राहतात हे एव्हाना आपल्याला रिलायन्स, बजाज, बिर्ला, महिंद्रा या उदाहरणावरून माहिती आहेच. अर्थात या लोकांनी दोन पिढ्यातील विचारांच्या तफावतीमुळे तयार होणारे प्रॉब्लेम्स हे प्रोफेशनल्स घेऊन सोडवले आहेतच. ही दूरदृष्टी छोटे उद्योग दाखवत नाहीत. किंबहुना त्यामुळेच ते छोटे राहतात. 

या पार्श्वभूमीवर मला एक पुस्तक हातात आलं, श्री दत्ता जोशी लिखित "मुव्हिंग ऍस्पिरेशन्स", ज्यामध्ये सेकंड जनरेशन इन्ट्रप्रेन्युअर च्या तब्बल पंचवीस स्टोरीज आहेत. त्या कथांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. 

एक जैन इरिगेशन सोडलं तर बाकी सगळ्या केसेस या लघु आणि मध्यम उद्योगांच्या आहेत. पण त्यातील बहुतेक उद्योग या एम एस एम ई तुन लार्ज उद्योगसमूहात जाण्याच्या सीमेवर आहेत. दुसरं मला सगळ्यात जास्त काय आवडलं तर जोशींनी अनेक सो कॉल्ड औद्योगिकदृष्ट्या मागे असलेल्या म्हणजे धुळे, नांदेड, लातूर या शहरातील उद्योगांना पुस्तकात स्थान दिले आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे अनेक प्रकारचे उद्योग त्यांनी कव्हर केले आहेत. त्यात माझं आवडतं इंजिनियरिंग आहेच, पण फूड इंडस्ट्री, फर्टिलायझर, कन्स्ट्रक्शन, आर्किटेक्चर असे सर्व प्रकारच्या उद्योगाबद्दल पुस्तकात वाचायला मिळतं. 

मला या पुस्तकात खूप जास्त भावलेली गोष्ट म्हणजे ही सर्व नवीन पिढी परदेशात उच्च शिक्षण घेऊन भारतात परतली आहे आणि कौटुंबिक व्यवसायाला अजून जोमाने पुढे नेत आहे. 

त्यात अनेक इंस्पायरिंग टेक अवेज आहेत. मग त्यात बिझिनेस लॉस मध्ये जातोय असं दिसल्यावर तो वेळेत बंद करायची कथा आहे, करोना मध्ये व्यवसायात कर्ज झाल्यावर त्यातून कसे बाहेर पडले ती गोष्ट आहे, व्यवसायातील प्रॉफिट हा फक्त स्वतःच्या नव्हे तर व्यवसाय वृद्धीसाठी कसा वापरला याचे धडे आहे. 

ज्यांना कुणाला "व्यवसाय" या करिअर बद्दल, प्रक्रियेबद्दल जाणून घ्यायचं असेल, त्यांनी प्रत्येकांनी हे पुस्तक वाचावं असं मी आवर्जून सांगेन. पुस्तक वाचनीय झालं आहे. अर्थात दत्ता जोशींचा या विषयात हातखंडा आहे. त्यांची तब्बल ३० एक पुस्तकं या विषयावर प्रकाशित झाली आहेत. 

फर्स्ट जनरेशन इन्ट्रप्रेन्युअर ला बऱ्याचदा प्रतिकुलतेतून व्यवसाय उभा करावा लागतो. पण फॅमिली मॅनेज बिझिनेस मध्ये सेकंड जनरेशन ला अनुकूलता नेहमी पूरक असेलच असे नाही तर कधी ती मारक पण असते. त्यावर कशी मात करायची याचा वस्तुपाठ म्हणजे "मुव्हिंग ऍस्पिरेशन्स".