Monday, 8 July 2024

२०१० ची गोष्ट असेल. माझा एक मित्र आहे समीर. इंडस्ट्रीयल आयटम ट्रेड करतो. ठीक ठाक बिझिनेस

करायचा. मुंबईला नागदेवी स्ट्रीट ला अडीचशे स्क्वेफूट चं ऑफिस. वडिलोपार्जित धंदा. भाऊ मदतीला.

(ऑफिसच्या आकारावर जाऊ नका. नागदेवी स्ट्रीटचा अडीचशे फुटचा गाळा म्हणजे करोडपतीच तो).

सम्या म्हणजे अगदी टिपिकल. कालच्या पोस्ट मध्ये सांगितला तसा. आव आणायचा बिझिनेस वाढवायचा

पण त्यावर ऍक्शन, त्या दृष्टीने घ्यायचा नाही.


एक दिवशी माझ्याकडे आला. म्हणाला "ट्रेडिंग करण्यासाठी अजून एखादा इंडस्ट्रीयल आयटम सांग की".

माझ्याकडे होता, रोटरी जॉईंट. माझ्या लाईनला पूरक प्रॉडक्ट. भारतात कुणी बनवायचं नाही. मी त्याला

म्हणालो "याची जर्मनीतून सप्लाय चेन बनवू आणि इथे विकू यात. काँट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करू यात. माझ्या

कंपनीचा ब्रँड तयार झाला आहे. अल्ट्रा. त्या नावाने विकू. सोपं पडेल." समीरला आवडली आयडिया. सहा

आठ महिने काम केलं. जर्मनीत प्रॉडक्ट डेव्हलप केला. डिसेंबर २०१० ला आम्ही प्रॉडक्ट लॉन्च करायला

तयार झालो. समीरने प्रॉडक्ट विकायचं. आमचा ब्रँड वापरण्यासाठी अल्ट्रा ला १०% कमिशन द्यायचं ठरलं.

२०११ ला आमचं इमटेक्स प्रदर्शन होतं जानेवारीत. मी सम्याला बोललो "माझा बूथ आहेच. हे प्रॉडक्ट ठेवू

यात तिथे आणि तू ही थांब स्टॉल वर. इन्कवायरीज मिळतील. काम करू" समीरच्या चेहऱ्यावर काळजीचे

भाव दिसले अन पहिलं रडगाणं तो गायला "धंद्यात मंदी आहे. बुथचं काँट्रिब्युशन द्यायला माझ्याकडे पैसे

नाहीत" मी म्हणालो "ठीक आहे यार. अशी किती जागा लागेल तो प्रॉडक्ट डिस्प्ले करायला. अल्ट्रा करेल

सगळा खर्च. तू स्टॉल वर रहा हजर सगळे दिवस"

त्या औद्योगिक प्रदर्शनात धमाल आली. २००९ ची मंदी संपून तेजीला सुरुवात झाली होती. स्पिन्डल, त्याची

रिपेयर सर्व्हिस आणि समीरचा नवीन प्रॉडक्ट रोटरी जॉईंट. (हो, आता तो समीरचा प्रॉडक्ट झाला होता)

सगळ्यांना खुप इन्कवायरीज मिळाल्या. रोटरी जॉईंट कन्झ्युमेबल असल्यामुळे त्यासाठी तर ऑर्डर पण

मिळाल्या.

प्रदर्शन संपल्यावर पहिला महिना समीर रोटरी जॉईंट विकण्यात खूप बिझी झाला. ते चालू असतानाच मी

एकदा मुंबईला समीरला भेटलो आणि सांगितलं "प्रॉडक्ट भारी झालं आहे. याला व्यवस्थित मार्केट करू. काही

टिपिकल मार्केट झोन आहे जिथे हा प्रॉडक्ट खूप खपेल. तू सप्लाय व्यवस्थित सेट कर. त्याचे मॉडेल निवडुन

ऑर्डर करून स्टॉक मध्ये ठेव. आयपीएफ, सर्च सारख्या मॅगेझिन मध्ये त्याची ऍड देऊ. त्याबद्दल आर्टिकल

छापू. तुझीअजून वेबसाईट नाही आहे. ती बनवू आणि हा प्रॉडक्ट तिथेही डिस्प्ले करू. संधी मिळाली आहे तर

तिचा फायदा उठवू" समीरने मान हलवली. पण ती ज्या पद्धतीने हलवली तिथेच माझ्या मनात शंकेची पाल

चुकचुकली.

माझी शंका खरी ठरली. ऑर्डरचा पहिला पूर ओसरल्यावर समीरकडे रोटरी जॉइन्टचा खडखडाक झाला.

स्टॉक ठेवण्यासाठी जे प्लॅंनिंग करावं लागतं ते समीरने केलंच नाही. प्रॉडक्ट चांगलं होऊनही मार्केटिंग न

केल्यामुळे ग्राहकापर्यंत ते पोहोचलं नाही. इंडस्ट्रीयल मॅगेझिन मध्ये ऍड नाही, इमटेक्स नंतर छोट्या प्रदर्शनात

सहभाग नाही. अत्यंत चांगलं आणि उपयोगी प्रॉडक्ट असूनही ते लोकांच्या विस्मरणात गेलं. वर्ष दीड वर्षात

समीरच्या ऑर्डरचा फ्लो घटला. अपेक्षित सेल झाला नाही म्हणून जर्मनीच्या कंपनीने काँट्रॅक्ट नाकारलं.

आज सहा वर्षे झालीत. समीर त्याच ऑफिसमध्ये बसून त्याचे वडिलोपार्जित प्रॉडक्टस विकतो आहे. तोच

रोटरी जॉईंट अहमदाबादच्या मुकुलने त्याच मॅन्युफॅक्चरर कडून डेव्हलप केलाय. हा लेख, मी अहमदाबादच्या

फ्लाईट मध्ये बसून लिहितोय. हो, मी चाललोय मुकुल ला भेटायला, काँट्रॅक्ट साइन करण्यासाठी. दरवर्षी २०

लाखाचे रोटरी जॉइन्ट्स मलाच लागणार आहेत, ते फायनल करायचं आहे.

( असं का झालं याचं थोडं स्पष्टीकरण हवं आणि त्यातून मिळणारा धडा):


हे असं होतं आणि अनेक जणांबाबत होतं. लोकांना व्यवसाय करायचा असतो, पण त्यामागच्या मूलभूत गोष्टींवर काम करायचं नसतं. आणि त्याऊपरही सांगतो की ज्याला आपण वृद्धिधिष्ठित मानसिकता म्हणतो तिचा पूर्ण अभाव असतो. सगळे प्रयत्न हे व्यावसायिक स्वतः श्रीमंत होण्याच्या दृष्टीने करतो, व्यवसाय संपन्न होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत नाहीत. इथे फक्त मेख आहे. स्वतः श्रीमंत होणे हा कुणाचा उद्देश असू शकतो आणि त्या भावनेबद्दल आदरच आहे. त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही, पण त्याच्याबरोबर येणारे प्रश्न सुद्धा तसेच असतात. त्यांना खुल्या मनाने स्वीकारण्याची तयारी हवी. 

इथे मला ज्या गोष्टीचा मी सारखा उल्लेख करत असतो त्या "व्यवसायाचा मूळ उद्देश" याबद्दल प्रचंड वैचारिक स्पष्टता हवी. आपण हा व्यवसाय का करतो हे मनात पक्कं हवं आणि त्याची व्याप्ती ही फक्त स्वतःपुरती मर्यादित असेल त्याचा समीर होतो. आपल्या व्यवसायामुळे समाजातील किंवा उद्योगातील किती प्रवर्गावर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे याचा अभ्यास हवा. आणि एकदा हे लक्षात आलं की हे उत्पादन मार्केट मध्ये स्वीकारार्ह आहे, तर मग व्यवसाय वृद्धीच्या सर्वांगीण वाटा धुंडाळून त्याचा विकास करणं हे शहाणपणाचं ठरतं. 

ते जर केलं नाही तर काय होणार? तर एक मोठी व्यवसायाची संधी वाया जाते. भले मग आपला सामाजिक आर्थिक चालनेमधे आपला खारीचा वाटा असेल, पण तो ही उचलण्यामागे आपण पाठ फिरवतो. बरं या प्रोसेस मध्ये फक्त व्यावसायिकच नुकसानीत जातो असं नाही तर त्याचा ग्राहक सुद्धा एक चांगलं उत्पादन मिळण्यापासून वंचित राहतो. 

मला असं वाटतं, जर तुमच्याकडे उद्योजकीय मानसिकता असेल तर अशा संधी वाया घालवणं हा औद्योगिक आणि सामाजिक गुन्हा आहे. 





No comments:

Post a Comment