Wednesday, 31 July 2024

पुणे

नाही म्हणजे वाईट याच गोष्टीचं वाटतं की पुण्याची ही कॅन्सरस ग्रोथ चालू झाली तेव्हा टेक्नॉलॉजी आपल्या कवेत आली  होती. इंटरनेट मुळे जग जवळ आलं होतं. संख्याशास्त्र आणि तर्कशास्त्र हे पण विकसित झालं होतं. त्याच्याशी संबंधित संगणक प्रोग्रॅम तयार झालेले होते. तरी आपल्या राजकारण्यांनी, नोकरशहांनी आणि त्यांच्या कंत्राटदारांनी व बांधकाम व्यावसायिकांनी शहराची व्यवस्थित ग्रीस लावून ठासली. त्यांनी टेकड्या सोडल्या नाही, नदी काठ सोडले नाही, जिथं म्हणून शक्य आहे तिथं आपल्या अक्कलशून्यतेने अगदी सिस्टेमॅटिक वाट लावली. एकेकाळी अत्यंत कडक नियमावली असलेल्या या शहराची अंधाधुंद वाढ झाली आणि तिला साथ मिळाली ती नागरिकांच्या बेशिस्तीची. 

या शहराचे प्लॅनर जगभर अभ्यास दौरे करत असतात तरीही यांना स्वयंकेंद्रित स्वभावामुळे स्वतःच्या तुंबड्या भरण्यात फक्त सुख दिसतं. ही लोक पूल कसेही बांधतात, चुकीचे बांधले म्हणून पडतात, रस्त्याच्या कंत्राटदाराकडून अनिर्बंध पैसे खातात आणि शहरातल्या नागरिकांना रस्त्यावर बेवारस सोडून देतात. दुचाकी चालवणारी लोक अक्षरश: शीर तळहातावर ठेवून गाड्या चालवत असतात. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन एखाद्या तरुणाचा जीव जातो आणि त्याचा हतबल बाप एकहाती खड्डे बुजवण्याची मोहीम घेतो. त्याचे व्हिडीओ व्हायरल होतात, पण त्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांचं मन द्रवत नाही. ते पुन्हा पुन्हा तितकीच घाण करत असतात आणि नागरिक लाचार होऊन जगत राहतात.

आम्ही टेक्नॉलॉजी च्या मदतीने डिजिटल पेमेंट चा जगात डंका बडवतो पण एक माईचा लाल इथं पैदा होत नाही की जो डिफेक्ट फ्री सिगनल रस्त्यावर बसवेल, त्याला व्हिजन कॅमेरा ची साथ देईल. कुणाचा तरी उठतो, सिग्नल चे खांब रोवून मोकळा होतो. त्याची प्रणाली काय आहे, परिणामकारकता काय आहे, अचूकता काय आहे याची कुणाला झाट पडलेली नसते. असले भंगार रोड अन त्या जोडीला ही बेशिस्त इको सिस्टम. मग गाड्या चालवणारे वाहतूक शिस्तीला खुंटीला टांगतात. तरुण, म्हातारे, पुरुष, बायका होलसेल मध्ये शिस्तीला गाड्या चालवताना फाट्यावर मारत असतात. ते सिग्नल तोडतात, रस्त्याने उलट बाजूने येतात, नो एन्ट्री मध्ये गाड्या चालवतात, मूर्खासारखी पार्किंग करतात. अगोदरच बोजवारा उडालेल्या सिस्टमला अजून खड्ड्यात घालतात. 

आम्हाला कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची त्याची अक्कल नाही, ओला आणि सुका कचरा वेगळा कसा ठेवावा याचं तारतम्य नाही, नदीचं पाणी स्वच्छ कसं ठेवायचं ते खिजगणतीतही नाही, बंदी टाकूनही तो घाणेरडा गुटखा खाऊन लोक पचापच रस्त्याने थुंकत असतात, प्लास्टिक च्या पिशव्यांची बंदी आम्ही झुगारून टाकतो. आम्हाला ऑर्गनाईझ्ड केऑस करायला खूप आवडतो. 

एकेकाळी देशाची सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय सुविधाचं शान असलेलं शहर आता बकाल, रोगांच्या साथीचे, रस्त्यावरील अपघातांचे, ड्रग्ज चे, अनिर्बंध बांधकामे केल्यामुळे आलेल्या पुराचे शहर म्हणून ओळखू लागले आहे ही एक दुःखद शोकांतिका आहे. 

  

No comments:

Post a Comment