परवा तैपेई ला येताना सिंगापूरला स्टॉप ओव्हर होता. माझ्या शेजारी एक भारतीय मुलगा बसला होता. काहीतरी करून मी त्याच्याशी बोललो. तर नेमका मराठी निघाला.
वडील सोलापूरला एस टी मध्ये कंडक्टर आहेत. हा मुलगा एकुलता एक आहे. वालचंद मधून इंजिनियरिंग करून पोराने कष्ट करत आय आय टी खरगपूर मधून मास्टर्स केलं. कॅम्पस मधून च तैवान मधील एका प्रतिष्ठित कंपनीत जॉब मिळाला म्हणून त्याचा प्रवास चालू होता. पोराचा पहिलाच विमान प्रवास तो ही आंतरराष्ट्रीय. त्याला काळजी होती, इथे भारतीय लोक भेटतील का ते. माझ्या कंपनीतला एक मुलगा मध्ये एक वर्ष तैवान मध्ये होता. त्याने खूप भारतीय गोतावळा जमा केला होता. त्याला या तरुणाबरोबर कनेक्ट करून दिलं. सेटको च्या पोराने सिंगापूर विमानळावर गप्पा मारून एकदम आश्वस्त केलं. या मुलाने मला तैवान व्हिसा मिळायला अवघड असतो का त्याबद्दल विचारलं. मी म्हणालो "अरे, तुझं तर वर्क परमिट आहे, मग कसली काळजी?' तर म्हणाला "वर्षातून एकदा आईवडिलांना इथे आणलं तर माझी मानसिक स्थिती पण चांगली राहील आणि त्यांना पण बरं वाटेल." मी त्याला सांगितलं आहे की, त्याला वाटलं तर मी ही या आठवड्यात भेटेल त्याला.
तैवान मध्ये ज्या कंपनीत त्याचं सिलेक्शन झालं आहे त्या कंपनीचा उच्च पदस्थ भारतीय माणूस आहे. त्याने कंपनीत भारतीय मुलांना घ्यायचा ड्राइव्ह घेतला आहे. अर्थात प्रीमियम इन्स्टिट्यूट मधूनच.
एकुणात मला त्या मुलाला भेटून फार भारी वाटलं. एकतर लौकिकार्थाने गरीब घरातील मुलगा. आयआयटीयन झाला. बाहेरच्या देशात जॉब लागला आणि त्यातील मेजर काँट्रीब्युशन होतं त्या सिनियर माणसाचं ज्याने भारतीय मुलं घेण्याबाबत आग्रह धरला. त्या तरुणाची कौटुंबिक इको सिस्टम सुद्धा घट्ट.
देशाची ही अशी सामाजिक वीण इतर कुठल्याही सिस्टम पेक्षा महत्वाची आहे असं मला वाटतं. शिक्षण, कुटुंब, व्यावसायिकता या वेगवेगळ्या आघाड्यांवर सगळेच दान योग्य पडले आहेत हे पाहून मला मनापासून आनंद झाला.
No comments:
Post a Comment