चेन्नई ला मी ज्या हॉटेल मध्ये राहतो तिथं एक वेटर काम करतो, सतीश नाव त्याचं. बाकी वेटर पेक्षा कामात तो उजवा आहे हे सारखं जाणवायचं. गेस्ट ब्रेकफास्ट ला आला की त्याचं हसून स्वागत करणार, गुड मॉर्निंग म्हणणार, काय हवं नको ते पाहणार, पाण्याचा ग्लास रिकामा झाला की पाणी द्यायला येणार, कॉफी, टोस्ट, चटणी वगैरे काही एक्स्ट्रा आयटम हवा असल्यास लागलीच आणून देणार, ब्रेकफास्ट व्यवस्थित झाला का हे निघताना आवर्जून विचारणार. बाकी पण तीन चार वेटर्स तिथं असायचे पण त्यांच्यापैकी सतीश एकदम बिझी असायचा. बाकी वेटर टंगळमंगळ करत असताना सतीशचा मात्र कायम कामावर फोकस असायचा. त्याला अजिबात फुरसत नसायची.
कोविड नंतर फिरणं जस्ट चालू झालं होतं. हॉटेल मध्ये गजबज नसायची. एकदा तर मी एकटाच होतो ब्रेकफास्ट रूम मध्ये. वेटर मध्ये पण फक्त सतीश आणि किचन मध्ये एकदोन कुक असावेत. त्या दिवशी मी सतीशशी थोड्या गप्पा मारल्या. मी विचारलं की तू चेन्नई चा आहेस का की कोविड च्या भीतीने इतर गावचे वेटर येत नसल्यामुळे तुला बोलावून घेतलं. तर कळलं की सतीशचं गाव पण १८० किमी लांब आहे चेन्नई पासून. कोविडमुळे अगोदरच प्रॉब्लेम मध्ये असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट ने अनेक वेटर्स ला बोलावून घ्यायचा प्रयत्न केला होता. पण कुणी दाद दिली नव्हती, अगदी चेन्नई तल्या वेटर्स ने पण नाही. सतीश तयार झाला. हॉटेलच्या मालकाने कार पाठवून सतीशला बोलावून घेतलं.
मला त्यादिवशी कळलं की सतीशच्या घरी अगदी गरिबी. काम शोधण्यासाठी तो चेन्नईत आला. सध्याच्या हॉटेल च्या बाजूला एक रेस्टोरंट आहे तिथे टेबल साफ करायला म्हणून काम चालू केलं. असंच एकदा माहिती झालं की या शेजारच्याच हॉटेल मध्ये, जिथे मी राहतो तिथे, वेटर्स हवे आहेत. तिथं त्याने जॉब मिळवला आणि प्रचंड कष्टाने आपलं बस्तान बसवलं, सेट केलं.
मी जेव्हा कधी गेलो तेव्हा सतीश असायचाच जॉब वर. मी त्याला त्या दिवशी गप्पा मारताना विचारलं "तू कधी सुट्टी घेतलेली बघितली नाही मी. सणासुदीला किंवा घरी काही पूजा वगैरे असेल तर जात नाहीस का घरी". तो म्हणाला "जातो की. पण इथे माझी सुट्टी वगैरे होत नसेल तरच. कारण मला या नोकरीने इतकं काही दिलं आहे की माझ्यासाठी कर्म ही पहिली प्रायोरिटी." आणि मग साऊथ इंडियन टोन मध्ये बोलत म्हणाला "this work is worship for me and this work place is temple."
आज सकाळी त्याच हॉटेल मध्ये ब्रेकफास्ट करताना माझी नजर सतीशला शोधत होती. माझ्या शेजारी सुटाबुटातील एक कॅप्टन येऊन उभा राहिला आणि मला त्याने विचारलं "सर, मला ओळखलं नाही तुम्ही" मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिलो. तुम्ही बरोबर ओळखलं, तो सतीशच होता. मॅनेजेमेंट ने त्याचे कष्ट, त्याचं निष्ठा जाणली होती. त्याच्या छातीवर त्याच्या नावाची नेमप्लेट होती, आणि खाली लिहिलं होतं "मॅनेजर". मी झटकन उभा राहिलो आणि त्याचा हात प्रेमभराने दाबत त्याचं मनापासून अभिनंदन केलं.
मी कुठे तरी वाचलं होतं "Walk that extra mile and you will find that road is not much crowded" सतीश त्या वाक्याची जितीजागती मिसाल होता.
No comments:
Post a Comment