Monday, 3 March 2025

Believe me, peace is more precious than triumph".

 काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नील तेव्हा चौदा एक वर्षाचा होता. आम्ही दोघेच एक्स्प्रेस वे ने कारने चाललो होतो. मी आपलं बरोबर मधली लेन पकडून गाडी चालवत होतो. अचानक डावीकडच्या लेन मध्ये चालणाऱ्या एका महाकाय ट्रक ने आपला ट्रॅक बदलला आणि आमच्या लेन मध्ये घुसला. माझी कार ८० च्या स्पीड ने असेल. त्या ट्रक पासून वाचवण्यासाठी मला जीवाची धडपड करत, ब्रेक मारत कार कंट्रोल करावी लागली. हे करताना माझी कार पहिल्या लेन मध्ये थोडी टर्न झाली. मागून एक सुसाट वेगाने फोर्ड इंडिव्ह्युअर येत होती. तिलाही ब्रेक मारून स्पीड कमी करावा लागला. 

तो ट्रक बेदरकार पणे पुढे चालला गेला. मी त्याला ओव्हरटेक करत, तिसऱ्या लेनच्या पलीकडे असलेल्या मोकळ्या लेन मध्ये त्याला थांबवला. आणि उतरून त्या ट्रक ड्रायव्हर ला शिव्या देऊ लागलो. तो ट्रक सरळ इन्व्हेड करत माझ्या लेन मध्ये आला होता आणि अपघात होताना थोडक्यात वाचला होता. पहिल्यांदा आवाज चढवलेल्या त्या ट्रक ड्रायव्हर नरमाई दाखवतो आहे असं वाटत असतानाच एक विचित्र घटना घडली. 

मागची फोर्ड  पुढे जाऊन थांबली आणि त्यातून एक आलिशान सूट घातलेला माणूस खाली उतरला आणि "तुला गाडी चालवता येत नाही का. मी तुला धडकलो असतो तर तुझ्या कारचा चुराडा झाला असता" वगैरे फर्ड्या इंग्लिश मध्ये मलाच झाडू लागला. मी त्याला आपलं माझ्या मोडक्या तोडक्या इंग्लिश मध्ये "तुला कळतंय का काय बोलतोस. हा भला मोठा ट्रक माझ्या लेन मध्ये आडवा आला, म्हणून....." वगैरे व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करत होतो. तर अतिश्रीमंत माणूस अजूनच मोठ्या आवाजात माझ्या कार कडे बघत "तुम्हा गरीब लोकांना एक्स्प्रेस वे ला गाडी कशी चालवायची कळत नाही" वगैरे तत्सम काही बोलू लागला. तो ट्रक ड्रायव्हर राहिला बाजूला आणि त्या फोर्ड वाल्याचं आणि माझं भांडण चालू झालं. 

माझाही आवाज चढायला लागला तितक्यात एक हात माझ्या हाताला ओढू लागला. नील कार मधून उतरून माझ्याकडे आला आणि रडवेल्या चेहऱ्याने पाहत म्हणाला "पप्पा, जाऊ द्या ना. चला आपल्या कार मध्ये". ते बघून तो फोर्ड वाला माणूस काहीतरी बडबड करून निघून गेला, ट्रक ड्रायव्हर ने पण "सॉरी भाई" म्हणत ट्रक चालू केला. मी नील चा हात पकडून कार मध्ये येऊन बसलो. 

मी नील ला म्हणालो "का तू मला घेऊन आलास इकडे? चांगला झापला असता ना त्या मोठ्या कार वाल्याला". तर नील मला म्हणाला "त्याने काय झालं असतं? आणि आमच्या मॅम ने सांगितलं आहे No one wins in such argument but you loose your peace of mind."

आणि मग काचेतून बघत एक लाख मोलाचं वाक्य बोलला 

"Believe me, peace is more precious than triumph". 

No comments:

Post a Comment