Tuesday, 22 July 2025

भरतीचा माज नाही, अन ओहोटी ची लाज नाही-वैभव जोशी

काल च्या पोस्टवर गानू सरांनी एक कॉमेंट केली की माझ्या स्वभावामुळे मला आयुष्यभरची मैत्री आणि लॉयल्टी मिळत असेल लोकांची. तर नम्रपणे सांगतो की असलं काहीही होत नाही. नंतर त्यांनी लॉयल्टी बद्दल लिहिलं पण मी मनातले विचार लिहून टाकतो. 

तर मी हे सगळं करतो ते माझ्या मनाला आनंद मिळावा म्हणून. यातून आयुष्यभराची मैत्री मिळते का तर माझ्याकडून मैत्रीत शत प्रतिशत देण्याची दानत आहे पण समोरून ती यावी ही अपेक्षा नाही. लॉयल्टी तर फार दूरची गोष्ट. अं हं, मला मोक्ष मिळाला किंवा संतत्व आलं आहे, असं तुमच्या मनात आलं असेल, तर थांबा. असलं काही झालं नाही आहे तर हे इव्हॉल्व्ह झालेलं मन आहे. खूप फटके खाऊन, धक्के पचवून. उदाहरणार्थ काही घटना सांगतो:

अनाथाश्रमातील पोरगा. त्याला जॉब दिला. संस्थापकांनी सांगितलं की मुलासारखा सांभाळा. सांभाळलं. सहा वर्षाने पोराने स्पर्धक कंपनीशी हातमिळवणी केली. (तिथे झेपलं नाही म्हणून मग परत मित्राच्या कंपनीत जॉब मिळावा म्हणून शब्द टाकला. आणि आता तिथेच आहे)

सहा वर्षे करत इंजिनियरिंग केल्यावर कुठंच जॉब मिळत नाही म्हणून एका पोराच्या मामाने जॉब द्या म्हणून रदबदली केली. दिला. त्याचं लग्न आहे म्हंटल्यावर लांब प्रवास करत थंडीत कुडकुडत हजेरी लावली. सात वर्षांनी आर्थिक गैरव्यवहार करत स्पर्धक म्हणून उभा राहिला. कधीही भेटलो की पोरगा पायाला हात लावायचा. मला वाटायचं पाया पडतोय. तो पाय ओढण्याची संधी शोधत होता. 

एका पोराच्या लग्नाला गेलो होतो, खेड्यात. गरिबी पाहून गलबलून आलं. नालीवर मंडप टाकला होता. भातावर मटन रस्सा बरोबर बोटी डालो असं मुलाचा मामा म्हणायचा पण त्यात तुकडे होते कुठं. ती गरिबी पाहून त्या गावात एकटाच लांब गेलो आणि मनसोक्त रडलो. त्या पोरावर तुफान काम केलं. आज तोच पोरगा स्पर्धा करत, तुम्हाला संपवतो अशी भाषा करतो.

एक पोरगा जॉईन झाल्यावर त्याची कहाणी ऐकली. घरात अठरा विश्व दारिद्र्य. पोराने प्रचंड कष्ट करत इंजिनियरिंग केलेलं. म्हणून मनात दया. बिझिनेस पार्टनर चा विरोध असताना पोराला यथाबुद्धी मदत करत राहिलो. काही तरी फालतू कारण सांगत बाहेर पडला आणि परत तेच इर्षात्मक स्पर्धा. 

अशा एक ना अनेक कहाण्या. काही सुखद पण आहेत, पण वर उल्लेखलेल्या जास्त. खूप जास्त.  

अनेक वेदना झाल्यावर. त्यावर फुंकर मारत गेलो. पण ती फुंकर म्हणजे शीळ आहे असे भासवत गेलो. त्यालाच बहुधा संवेदना म्हणत असावेत. 

आता मन निर्ढावलं आहे. स्वार्थी झालं आहे. त्यामुळे आता कुणाची मैत्री मिळावी म्हणून काहीही करत नाही. आता करतो ते फक्त स्वतःसाठी. माझ्या आनंदासाठी. मग त्याला कुणी मनस्वी म्हणत असतील, कुणी येडा म्हणत असतील. गानू सरांसारख्या मित्रांना कौतुक पण वाटत असेल. मित्रत्वाच्या नात्यात मी माझ्या बाजूने १००% देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही त्याला तसाच रिस्पॉन्स दिला तर आनंदच आहे. नाही दिला तरी अजिबात वाईट वाटणार नाही. 

मित्र वैभव जोशी म्हणतात तसं "भरतीचा माज नाही, अन ओहोटी ची लाज नाही".



Sunday, 20 July 2025

रोहडू

तर झालं असं होतं की आमच्या कंपनीत एक मुलगा जॉईन झाला. एकदा  शिळोप्याच्या गोष्टी करताना मी सहज त्याचं मूळ गाव विचारलं. तर त्याने सांगितलं "रोहडू", सिमला च्या पुढे १०० किमी. आणि त्याच्या घराचे फोटो दाखवले. ते अप्रतिम फोटो बघून माझ्या तोंडून सहज एक वाक्य निघून गेलं " एकदा जायला हवं तुझ्या गावाला". (त्यावेळी नुकताच मी वैभव कुलकर्णी दिग्दर्शित रॅबिट हाऊस नावाचा पिक्चर बघितला होता आणि तिथली पार्श्वभूमी हिमाचल होती). त्या पोराने ते माझं वाक्य पकडलं "एकदा जायला हवं तुझ्या गावाला". मानेसरला आलो की त्याचा पहिला प्रश्न असायचा "सर, रोहडू जायचं आहे ना? घरचे लोक तुमची वाट बघत आहेत" म्हणजे त्याने घरी पण सांगून ठेवलं होतं. मी नाही म्हणायचो. की तो लागलीच "ठीक आहे नेक्स्ट व्हिजिट ला". 

यावेळेस पुण्यात भेटलो, तेव्हा त्याने परत तोच प्रश्न विचारला. यावेळेस मी ठरवूनच टाकलं की मानेसर ला गेलो की रोहडू ला जायचं. १९ आणि २० जुलै तशीही सुट्टी होतीच.

दिल्ली रोहडू व्होल्वो सर्व्हिस आहे. व्हाया चंदिगढ, सिमला. १३ तास प्रवास. पुणे ते बंगलोर मी के एस आर टी  सी च्या व्हॉल्वो तुन बेफाम प्रवास केला आहे. त्यामुळे गेल्या ६-७ वर्षात बसने प्रवास न केल्याचं मनात आलेलं खोडून टाकलं. बस १ तास लेट झाली आणि रोहडू ला उतरलो. सकाळचा प्रवास विस्मयचकित होऊन बघितला. सिमला ते रोहडू १०० किमी अंतर आहे पण त्याला चार तास लागले. पण त्या काळात जे निसर्ग दर्शन झालं त्याने पार येडा झालो. 

आणि त्याही पलीकडे पागल झालो ते पहाडी लोकांच्या आदरातिथ्य मुळे आणि ज्या कुटुंबाकडे मी आलो त्यांची सफरचंदाची आणि पेर (याला इथे नाशपती म्हणतात) ची बाग पाहून. अक्षरश: हजारो सफरचंद लगडलेल्या झाडांच्या मध्ये असलेलं ते घर, तिथली प्रचंड कष्ट करणारी यजमान लोक, त्यांची ती पहाडी हेल असणारी कानाला वेगळीच वाटणारी हिंदी, मनात विचार आला तरी वाहनाचा आवाज आणि रादर कुठलाही आवाज न येणारा भवताल, नीरव शांतता हे सगळं मी तीस तासा मध्ये अनुभवलं. शेतात खुडून आणलेल्या मश्रुमची भारी भाजी, राजमा भात, वेगळ्याच गव्हाची चपाती, बटाटयाची भाजी सारण म्हणून वापरलेलं आणि तळलेली जाड पुरी ज्याला इथे फोलडू म्हणतात, लाल रंगाचा भात, अफीम टाकून आपले उकडीचे मोदक असतात तसं सिडू, आपल्या धिरड्यासारखं लागणारं लौटे अशा लोकल डेलिकसी त्या कुटुंबाने आवर्जून खाऊ घातल्या. 

या सोबतीला दिला अमाप आदर आणि प्रेम. पंच्यांशी वर्षाच्या दादूपासून आणि उच्चशिक्षित समवयीन नानूपासून ते आमच्या माणसाच्या लहान बहिणीपर्यंत सगळ्यांनी आवर्जून गप्पा मारल्या. यजमान आणि यजमानीण त्यांची शेताची कामं सांभाळून माझी सरबराई करत होते. 

एका छोट्या ब्रेक नंतर पण आगळ्यावेगळ्या मोठ्या मनाच्या लोकांना भेटून परत निघालो आहे, ते पुन्हा कधी यायचं आहे त्याचा विचार करतच. 

(बाय द वे, वर उल्लेख केलेले नानू, त्यांची चेहरेपट्टी साधारण पणे नानाजी देशमुखांशी जुळणारी. रामभक्त आहेत ते. खरी गंमत पुढे आहे. माघ महिन्यात ते अस्खलित उर्दू मध्ये रामायण कथा सांगतात. आणि ती ऐकण्यासाठी दोन्ही धर्माचे लोक भक्तिभावाने आले असतात)

रोहडू 

Friday, 4 July 2025

महाराष्ट्र शासन 

मुंबई 

संदर्भ: विकसित महाराष्ट्र 

महोदय, 

सगळ्यात प्रथम आपण नागरिकांकडून २०४७ सालापर्यंत विकसित महाराष्ट्र होण्यासाठी आपण सूचना मागवत आहात त्याबद्दल धन्यवाद. माझे विचार खाली देत आहे. ते आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्यावर कार्यवाही होईल याची खात्री नाही, तरी नागरिक कर्तव्य पार करण्यासाठी हा खटाटोप करत आहे. 

१. सगळ्यात प्रथम शहरातील आणि एकूणच महाराष्ट्रातील रस्ते: एक काळ असा होता की इतर राज्यातील रस्त्यांपेक्षा महाराष्ट्रातील रस्ते खूप चांगले होते. पण आता परिस्थिती एकदम उलट झाली आहे. तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणा या राज्यातील चांगल्या रस्त्यांचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. पण त्याच वेळेस महाराष्ट्रातील अनेक शहरातील रस्ते मात्र उद्विग्न करणारे आहेत. जगभरातील रस्ते हे चांगल्या क्वालिटीचे असताना, भारतातील आणि त्यातही महाराष्ट्रातील रस्ते हे अत्यंत घाणेरड्या स्थितीत आहेत हे खेदाने नमूद करावे वाटते. 

२. स्वच्छता आणि घन कचरा व्यवस्थापन: जगभरातील कोणतंही राष्ट्र हे भारतापेक्षा स्वच्छ आहे हे कुणीही सांगू शकेल. त्याबाबतची सामाजिक, राजकीय आणि नोकरशाहीची अनास्था ही अनाकलनीय आहे. रस्त्याने, नदीमध्ये, समुद्र किनाऱ्यावर दिसणारी यामुळे लाज वाटते. याची जबाबदारी ही सर्व समाजावर आहे पण त्याला शिस्त लावण्याची जबाबदारी मात्र नोकरशाही आणि शासनाची आहे असं मला वाटतं. 

३. पाणी उपलब्धता: चांगल्या गुणवत्तेचं पाणी मिळणं ही जनतेची बेसिक गरज आहे. गुणवत्ता सोडा पण मराठवाड्यात आजही दररोज पाणी उपलब्ध होत नाही ही वस्तुस्थिती आहे. पाणी स्रोत आणि नद्यांचं पुनरज्जीवन करून पाणी टंचाई हा विषय चर्चेत यायला नको अशी सिस्टम बनवणं हे गरजेचं आहे. 

४. वीज उपलब्धता: मी एक लघु उद्योजक आहे. क्वालिटी वीज मिळत नसल्यामुळे आणि मिळणारी वीज वेळोवेळी खंडित झाल्यामुळे उद्योजकांचे प्रचंड नुकसान होते. 

५. कायदा आणि सुव्यवस्था: महाराष्ट्रातल्या अनेक शहरात कायदा आणि सुव्यवस्था याचा बोजवारा उडालेला आहे. बलात्कार, चोऱ्यामाऱ्या, खून असे मेजर गुन्हे तर घडतच आहेत पण वाहतूक व्यवस्थेबद्दल सुद्धा पोलिसांनी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. लोकांनी शिस्त पाळणं गरजेचं आहे हे मान्य आहे, पण ती जर पाळली जात नसेल तर तर कायद्याचा बडगा दाखवून बेशिस्त लोकांवर कारवाई करण्याचं काम हे शासनप्रणीत यंत्रणेचं आहे. 

६. सामाजिक सलोखा: गेल्या काही वर्षात धार्मिक आणि जातीय मुद्द्यांवर समाजात प्रचंड ध्रुवीकरण झालेलं दिसत आहे. काही विशिष्ट धर्माला लक्ष्य बनवून त्यांना वेगळं पाडण्याचे कट कारस्थान हे सातत्याने होत असते. समाजात पडणारी ही दरी लॉन्ग टर्म साठी धोकादायक आहे. दुभंगलेला समाज हा कधीही सशक्त राज्य किंवा राष्ट्र बनवू शकत नाही. धार्मिक ध्रुवीकरणाबरोबर जातिधिष्ठित राजकारणाला आणि पर्यायाने समाजकारणाला खतपाणी घातलं जात आहे. 

७. शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा: शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा देताना जरी खाजगीकरण झालं असेल तरी शासन त्यातून पूर्ण स्वतःला वगळू शकत नाही. तसं झालं तर गरीब लोकांना या सुविधांचा लाभ घेणं अवघड होत जाईल. विकसित राज्यात किंवा देशात या सुविधांवर शासनाचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण असतंच. 


Where the mind is without fear
and the head is held high;

Where knowledge is free;

Where the world has not been broken up
into fragments by narrow domestic walls;

Where words come out from the depth of truth;

Where tireless striving stretches its arms toward perfection;

Where the clear stream of reason has not lost its way
into the dreary desert sand of dead habit;

Where the mind is led forward by Thee
into ever-widening thought and action —

Into that heaven of freedom,
my Father, let my country awake.

By Rabindranath Tagore