काही दिवसंपूर्वीची गोष्ट आहे. मी अहमदाबाद वरून बांद्रा टर्मिनस ला ट्रेन ने आलो. प्लॅटफॉर्म वरून चालत असताना अचानक एक माणूस समोरून आला आणि मला हिंदीत प्रश्न विचारला "कहा से आए हो?" मी सांगितलं "अहमदाबाद". मला आय कार्ड मागितलं. मी पहिल्यांदा चपापलो. स्वतःला सावरत मी उलट विचारलं "तुम्ही कोण आहात?" तर डाव्या तळव्यात लपवलेलं त्यांचं आयकार्ड दाखवलं. साध्या वेशातील पोलिसच होते ते. मी आधार कार्ड दाखवलं. एव्हाना माझ्या एक दोन वाक्याने कळलं की मी मराठी आहे. बाकी सांगितलं की दिवसभर काम करून संध्याकाळी पुण्याला जाणार आहे.
त्यांनी मला जायला सांगितलं. जाताना मी त्यांना प्रश्न विचारला "असं माझं चेकिंग का केलं?". ते जास्त काही बोलले नाही. फक्त रँडम चेकिंग आहे म्हणाले.
तिथून निघाल्यावर मी माझ्या भावाकडे गेलो. फ्रेश होण्यासाठी. त्याला मी झालेला किस्सा सांगितला आणि रँडम चेकिंग झालेलं सांगितलं. त्यावेळेस हसत भाऊ म्हणाला की तुझं रँडम चेकिंग झालेलं नाही आहे. तर तुला प्रश्न यासाठी विचारले गेले की तुझ्या बॅगचा रंग हिरवा आहे. (तो खरंतर हिरवा नव्हता तर तो त्याकडे झुकणारा पोपटी होता). आणि दिल्ली बॉम्ब स्फोट नंतर दोनच दिवसात मुंबईला आलो होतो.
म्हणजे माझ्या जागी कुणी अस्लम किंवा मोहसीन असला असता तर त्याला बाजूला घेऊन कसून तपासणी झाली असती.
मुस्लिम दहशतवाद्यांना हे कळत नाही आहे की त्यांच्या निषेधार्ह कृत्यामुळे अनेक भारतीय मुस्लिम नागरिकांवर काय आपबिती येते ते. टेररिझम मुळे लॉ अबायडिंग मुस्लिम नागरिकांकडे संशयाने बघण्याचा जो शिफ्ट आला आहे तो योग्य की अयोग्य हा मुद्दा नाही आहे, पण तो आला आहे हे अधोगतीचे परिमाण आहे.
No comments:
Post a Comment