मला कमीत कमी पाच जण आठवतात ज्यांना मी प्रवासात भेटलो आणि नंतर माझा त्यांच्या बरोबर डायलॉग झाला. नुसताच झाला नाही तर अनेक भेटी पण झाल्या. एक तर खूप मोठी हस्ती होती. एकेकाळी पुणे औद्योगिक क्षेत्रात त्यांचं नाव होतं. त्या भेटीत मी त्यांना व्यवसायाचे अनेक प्रश्न विचारले आणि नंतर पण अनेक वेळा त्यांना भेटलो होतो. एक जर्मन माणूस भेटलेला. शेतकरी होता तो. भेटल्यावर त्याला आठवड्याने मराठी नॉन व्हेज खाण्यासाठी सुर्वे मध्ये घेऊन गेलो होतो. एक जण माझा कस्टमर झाला तर दुसऱ्याबरोबर मी मर्जर चे खाचखळगे समजून घेण्यासाठी भेटलो. एका परदेशातील ट्रिप मध्ये मला एक शेट्टी भेटले होते. मुंबईत बार होता त्यांचा. त्यांनाही जाऊन भेटलो.
पण हे सगळं अनेक वर्षांपूर्वी घडलेलं जेव्हा मोबाईल होते, पण त्याचा आज इतका कहर वापर नव्हता. काही दिवसांपूर्वी मी अहमदाबाद हुन मुंबईला ट्रेन ने येत होतो. माझ्या शेजारच्या बर्थवर एक पस्तिशीतील तरुण घरी मराठीत सांगत होता कि गाडी मिळाली व्यवस्थित. बाकी दोन लोक गुजराती भाषिक होते. मी त्या मराठी बोलणाऱ्या युवकाशी गप्पा चालू केल्या. रात्री साडे आठ ते साडे दहा आम्ही गप्पा मारल्या. त्या दोन तासात एकमेकांच्या कार्यक्षेत्राबद्दल पूर्ण माहिती झाली. सर्वेश त्याचं नाव.
दुसऱ्या दिवशी सकाळी बाय म्हणताना सर्वेश म्हणाला की मला तुमच्या एकूणच व्यावसायिक प्रवासाबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे. तुमची कंपनी बघण्यासाठी मी पुण्याच्या पुढील ट्रिप मध्ये आवर्जून येईल. खरं सांगायचं तर मला वाटलं की देखल्या देवा दंडवत या न्यायाने सर्वेश म्हणाला की येईल म्हणून पण नंतर विसरून जाईल.
पण आश्चर्य म्हणजे तीन दिवसांपूर्वी सर्वेश चा फोन आला की तो पुण्यात येतो आहे आणि त्याला मला भेटायचं आहे. तो कंपनीत येईपर्यंत मला वाटलं नव्हतं की तो खरंच येईल. पण तो आला. मला यायला थोडा उशीर झाला पण तेवढ्या वेळात त्याने आवर्जून कंपनी बघितली. व्यवसायाबद्दल फीडबॅक देताना त्याने आवर्जून सांगितलं की तुमचा स्टाफ फार वेलकमिंग नेचरचा आहे. रिसेप्शनिस्ट रेवती, आमचा ऑफिस सांभाळणारा बाबू आणि त्याला कंपनी ज्याने दाखवली तो श्रीपाद या सगळ्यांचं त्याने खुलून कौतुक केलं.
त्याचा निघतानाचा रिमार्क फार महत्वाचा होता. तो म्हणाला "ट्रेन मध्ये बोलल्यावर तुमच्या कंपनीबद्दल, तिथल्या कार्यसंस्कृतीबद्दल एक प्रतिमा तयार झाली होती. ती प्रतिमा प्रत्यक्षात पण तशीच आहे हे छान वाटलं."
कंपनीत अनेक ग्राहक, मित्र, नातेवाईक येतात आणि कौतुक करून जातात पण केवळ दोन तासाच्या ओळखीवर कंपनीत आलेला हा पहिलाच पाहुणा आणि ते परवा एका पोस्ट मध्ये लिहिल्याप्रमाणे काही उद्देशाशिवाय. मला ही भेट खूप आनंदी करून गेली.
No comments:
Post a Comment