Monday, 26 January 2026

आरंभ

काही वर्षांपूर्वी मला माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला होता "हे तू आपलं घर ला सुट्टीच्या दिवशी किंवा कधी रात्री पर्यंत थांबतोस. काय मिळतं तुला यातून?" म्हणजे त्याच्या लेखी या सगळ्या लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा प्रकार होता. मी त्याला म्हणालो "तिथे किंवा त्यासारख्या संस्थेत गेलं की आपल्या अनेक भावना टोन डाऊन होतात." म्हणजे सांगायचं झालं तर आपल्या व्यावसायिक आयुष्यात एखादा मोठा प्रॉब्लेम आला तर तो सोडवता जाऊ शकतो याबद्दल आश्वस्त वाटतं, स्वतःबद्दल काही भ्रामक कल्पना तयार झाल्या असतील तर त्या दूर होतात, सहवेदनेचा खरा खुरा अर्थ कळतो, माणुसकी वरचा विश्वास दृढ होतो आणि याउपर या लोकांच्या हाताला हात लावून मम म्हणत जी काही कामं होतात त्याद्वारे आपल्या अकौंट मध्ये पण थोडं फार पुण्य जमा होतं हा स्वार्थी विचार पण मनात येतो. 

आज अंबिका टाकळकरच्या आरंभ संस्थेच्या नवीन वास्तूला भेट देताना अगदी हेच घडलं. २०१२ च्या सुमारास काहीतरी माझ्या डोक्यात खूळ आलं आणि पाच सहा समाजसेवी संस्थेसोबत माझा संवाद चालू झाला त्यापैकी आरंभ एक. या सर्वांशी माझी ओळख झाली तेव्हा असं काही अफाट काम समाजात चालू आहे हे पचवून घ्यायला बराच काळ गेला. आरंभ मध्ये मी जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो, कदाचित २०१५-१६ मध्ये तेव्हा ऑटिझम च्या मुलामुलींसाठी अंबिका ने उभं केलेलं काम बघून मी स्तिमित झालो होतो. ती वास्तू, मुलंमुली, त्यांना झालेली व्याधी आणि आपल्या अथक प्रयत्नाने ऑटिझम ला पराभूत करू या निर्धाराला वाहून घेतलेली अंबिका आणि तिची टीम हे सगळं पाहून नतमस्तक झालो होतो. 

मग या ना त्या कारणाने अंबिका बरोबर बोलत गेलो. मी पहिल्यांदा जिथे गेलो होतो, तिथून तिने संभाजीनगर च्या पोद्दार शाळेच्या शेजारी संसार हलवला आणि आता तिने वाळुंज पासून पैठण बाजूला ३.५ किमी आत आरंभ साठी जी नवीन संस्था बांधली ती म्हणजे तिने संस्थेसाठी पाहिलेल्या स्वप्नांचा, स्वमग्न आणि गतिमंद मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे जे म्हणून उत्तम, उदात्त करता येईल त्या प्रयत्नांचा विलोभनीय आविष्कार आहे. 

मी अंबिका ला म्हणालो सुद्धा की रस्त्यावरून मला पहिल्यांदा आरंभ ची बिल्डिंग दूरवरून दिसली, तेव्हा पहिली भावना ही आली की तिने घेतलेल्या झेपेने कमालीचा आश्चर्यचकित झालो. आणि ज्या कल्पकतेने तिने आणि आर्किटेक्ट राजेश चौधरी यांनी ती देखणी वास्तू उभी केली आहे तिला तोड नाही. अर्थात हा प्रवास सोपा नव्हताच. निसर्गनिर्मित, मानवनिर्मित आणि करायचं तर उत्तमच या तिनेच स्वतःला दिलेल्या आव्हानामुळे तयार झालेल्या प्रश्नांना अंबिकाने मोठ्या निर्धाराने उत्तरं शोधली.  उदात्त, उन्नत याच्या बरोबरीने पारदर्शक कामाला कुठून तरी आर्थिक आणि मानसिक पाठबळ मिळतंच याची प्रचिती पुन्हा एकदा अंबिकाची गाथा ऐकल्यावर आली. पुढच्या महिन्यापासून आरंभ चा प्रवास या नवीन वास्तुतून नवीन उमेदीने पुढे चालू राहणार आहे. 

ममता ताई, फळणीकर सर, अशोक, गिरीश कुलकर्णी सर आणि अंबिका सारखे लोक खऱ्या अर्थाने तारे जमीन पर आहेत. ही सगळी लोक आपल्याला ओळखतात, आपुलकीने संवाद साधतात ही खूप सुखावह भावना आहे. 

अंबिका, बाळासाहेबआणि त्यांच्या टीमचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सगळ्यासाठी पियुष मिश्रा चे शब्द उसने घेऊन म्हणतो

"आरंभ है प्रचंड"


Thursday, 1 January 2026

 नवीन वर्षाची सुरुवात करताना परत एका गोष्टीचा पुनरुच्चार करावासा वाटतो की भारतीय उत्पादन क्षेत्र हे अतिशय सकारात्मक संक्रमणातून जात आहे. किंबहुना जागतिकीकरणाचा भाग झाल्यावर पहिल्यांदाच जगाच्या पाठीवर वेगवगेळ्या क्षेत्रात अनेक घडामोडी एकाच वेळेस घडताना दिसत आहेत. कोविड १९ झालं, रशिया युक्रेन युद्ध झालं, यूरोप मध्ये सीरिया, जॉर्डन, अफगाणिस्तान, लेबनान सारख्या देशातून असंख्य लोक आश्रित म्हणून आले, चीनची एकूणच शक्ती प्रचंड वाढली, तैवान ला त्याने खुले आव्हान दिले तर युरोप मध्ये अनेक देशात चीनने प्रचंड गुंतवणूक केली, अशी परिस्थिती तयार झाली की जग ग्लोबलायझेशन कडून लोकलायझेशन कडे वळत आहे अशी चिन्ह दिसू लागली, जगात क्रमांक एकवर असलेल्या महासत्ता असलेल्या देशाच्या लीडरशिप ने अनाकलनीय निर्णय घेतले ज्यामुळे जगाची दिशा भरकटल्यासारखी वाटली. भारतात सुद्धा बऱ्या वाईट गोष्टी घडल्या, ज्यावर मागे लिहिलं होतं. त्याबद्दल परत लिहीत नाही, कारण मूळ विषय सोडून वेगळ्याच गोष्टींवर चर्चा सुरु होते. 

आज भारताचे उत्पादनक्षेत्र जीडीपी मध्ये १५% सहभाग नोंदवतं. येणाऱ्या दशकामध्ये हे गुणोत्तर प्रमाण २५% नेण्याची योजना आहे. त्यादृष्टीने अनेक योजना कार्यान्वित केल्या गेल्या आहेत. 

हे जरी खरं असलं तरी जगात तयार झालेल्या अनिश्चिततेमुळे (मॅनेजमेंट जार्गन मध्ये याला VUCA जग असे संबोधतात. Volatile, Uncertain, Complex, Ambiguous), दोन गोष्टींचा व्यावसायिकाने विचार करावा असं वाटतं. एक तर जगात काय घडतं त्यापासून आपण इम्यून आहोत या गैरसमजातून बाहेर पडावं. दोन दशकांपुर्वी हे बऱ्याच अंशी खरं असेल, पण आता नाही. आणि दुसरं म्हणजे जगात हे जे काही चालू आहे त्या बदलांचा स्वीकार करणे आणि मुख्य म्हणजे त्या बदललेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वतःमध्ये बदल आणण्यात चपळता दाखवणे. आपलं भविष्य सुरक्षित करण्याची शक्यता या मुळे तयार होईल. खात्री नाहीच. 

आपल्या उत्पादनाची आणि सेवेची गुणवत्ता यात सातत्याने सुधार आणणे हा आपला मंत्र असायला हवा. भारताची उत्पादकता आणि गुणवत्ता याबद्दल जगात फारसं चांगलं बोललं जात नाही. अर्थात शैक्षणिक, सामाजिक आणि  राजकीय भवताल हा सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणि उत्पादकता या मानसिकतेला दुर्दैवाने पूरक नाही आहे. पण आजूबाजूच्या इको सिस्टम कडे दुर्लक्ष करत व्यवसायाने अंतर्गत पद्धती या इतक्या सशक्त बनवायला हव्यात की बाह्य मूलभूत अवगुणांचा जगाला विसर पडायला हवा. अवघडच आहे ते, पण घडायला हवं. 

एक प्रश्न व्यावसायिकाने सातत्याने विचारायला हवा तो म्हणजे "जगात सर्वोत्तम असं जेव्हा बोललं जातं, तेव्हा माझ्या व्यवसायाचं नाव घेतलं जातं का?" त्याचं उत्तर देताना मुक्त पणे "हो" येत नसेल तर बाह्या सरसावून सर्वोत्तम बनण्यासाठी काम करणे क्रमप्राप्त आहे. 

२०२६ मध्ये पाऊल टाकताना, पुढील दशकात व्यवसायाची भरभराट कशी होईल, याच्या पायाभरणीवर लघु आणि माध्यम उद्योगांनी जोर देण्यात शहाणपण आहे.  

तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.