Sunday, 18 September 2016

हो, असाच आहे मी

आमचा एक ग्रुप फॉर्म झाला होता. WA चा. तो ग्रुप बनवण्याची आयडिया एका माणसाची होती आणि मग बाकीचे माणसं तो जोडत गेला. ग्रुप ची संकल्पना त्याची, त्याने काही रुल्स बनवले. तो ग्रुप त्याच्या मनाप्रमाणे चालवायचा. त्याने काही मेंबर्स नाराज व्हायचे. आणि मग कंप्लेंट करायचे. आणि मला विचारायचे "तू कसं सहन करतो हे सगळं" मी त्यातल्या एकाला सांगितलं "हे बघ असं आहे, एकतर मी लीडर असतो नाही तर फॉलोअर. एकदा मी कुणाला फॉलो करायचं ठरवलं की मग मी फाटे फोडत नाही. त्याने जसं सांगितलं तसं करतो. मला जर आवडलं नाही तर मी तिथून सरळ बाहेर पडतो, पण त्या लीडर बद्दल माझी काही तक्रार नसते. आणि जेव्हा मी लीड करतो तेव्हा कुणी फालतू ची लुडबुड केलेली आवडत नाही. मी टीम मेंबर चं ऐकल्यासारखं करतो पण शेवटी माझ्या मनाप्रमाणे करतो".

ब्रॉडर स्केल वर बोलायचं झालं तर गव्हर्नमेंट च्या बाबतीत मी असाच व्ह्यू अंगीकारतो. सध्याचं शासन हे मला न झेपणारं आहे. पण मी दर दिवशी त्यांच्यावर आगपाखड करत नाही. कारण ते वांझोटं असतं असं माझं मत आहे. त्याला विरोध करायला मतपेटी हा एकमेव मार्ग आहे असं मला वाटतं. आरक्षणाबद्दल मला काहीही मत नाही आहे. शासक जो ठरवेल त्याला फॉलो करतो. ज्या गोष्टी बदलण्याची माझ्यात ताकद आहे त्यावर मी विचार करतो. ते फेमस वाक्य आहे "हे विधात्या, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलण्याची मला ताकद दे, ज्या बदलू शकत नाही ते ऍक्सेप्ट करण्याची शक्ती दे, आणि या दोघातला बदल समजण्याची अक्कल दे" यावर माझा दृढ विश्वास आहे.

त्यामुळे मी दुसर्याने कसं वागायला पाहिजे ही अक्कल सहसा शिकवायला जात नाही. माझ्यात काय बदल घडवायचा ते पाहतो. कुठलेही सण साजरे करण्याची पद्धत आमूलाग्र पणे बदलण्याची गरज आहे. आणि हे ओळखून माझ्या पद्धतीत बदल केले आहेत. दुसर्याने ते करायलाच पाहिजे याबद्दल मी आग्रही नाही.

धर्म ही एक जीवन प्रणाली आहे असं मला वाटतं. गाईडलाईन्स, रुल नव्हे. त्याला तितकंच महत्व दिलं तर तो तुम्हाला सहिष्णू बनवतो. मानव्याला ते पूरक आहे असं मला वाटतं. धर्म  प्रणाली न राहता नियम म्हणून आला की ते आपल्यातल्या मानव्याला मारक होतं. त्या नियमांचा अतिरेक झाला की आपण दुसरी माणसं  मारायला लागतो.

माणसाच्या कर्मानुसार जाती व्यवस्था तयार झाली. कालानुरूप तिला काहीही महत्व नाही यावर माझा दृढ विश्वास बसतो आहे. त्यामुळे जातीबद्दल कुठलीही भावना माझ्या मनात नाही. अभिमानाची नाही आणि न्यूनत्वाची नाही. दुसऱ्याच्या नाही अन माझ्याही. तशी भावना ही माझ्यातल्या मानव्याला मारक आहे. तुरळक अपवाद वगळता मला जातीवरून कुणीही हिणवलं नाही आहे आणि ओवाळले पण नाही. माझ्याकडूनही अशी आगळीक झालेली आठवत नाही.

धर्माचं आचरण कसं करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो प्रश्न माझ्यापुरता मी सोडवला आहे. तो कसा सोडवला याचा डिंडोरा पिटण्याची मला गरज वाटत नाही.

इथं बऱ्याच ठिकाणी "मला असं वाटतं" "माझं मत" असं लिहिण्यात आलं आहे. दुसर्यांची मत अशीच असायला हवी हा अट्टाहास नाही.

बरेच दिवस या विषयाला वॉल वर थारा न देण्याचा प्रयत्न केला, पण आपसूक ओढला गेलो. त्या विषयावरची पुढची लिहिपर्यंत शेवटची पोस्ट.

जात आणि आडनाव

मागच्या आठवड्यात कंपनीत जनरल मॅनेजर ह्या पोझिशन साठी मी आणि जेफ इंटरव्ह्यू घेत होतो. एक अशा आडनावाचा माणूस आला की ज्याचं नाव आपल्या महाराष्ट्रात एकाच जातीत येतं. त्याचं नाव सतीश होतं. तो सध्या रायपूर ला सर्व्हिस ला होता. आडनाव वाचून मी त्याला विचारलं "Do you belong to Maharashtra" तो म्हणाला "Yes" आणि पुढे म्हणाला "माझं आडनाव जरी अमुक असलं तरी मी तमुक (जातीचा) आहे" अर्थात हे सांगताना त्याचा काही अविर्भाव नव्हता.

इंटरव्ह्यू त्याचा एकदम झकास झाला. आम्हाला जनरल मॅनेजर मध्ये ज्या क्वालिटी हव्या होत्या त्या सगळ्यात सतीश एकदम फिट होता.

जेफ ला ज्यावेळेस म्हणत होता "So finally our search for GM ends here" त्याच वेळेला मी त्याच्या अप्लिकेशन वर रिजेक्टड लिहीत होतो. जेफ म्हणाला "He was a good candidate. Why are rejecting?"

मी त्याला सगळं सांगितलं. आणि या जनरल मॅनेजर पोस्ट साठी असा जातीचा उल्लेख करणं कसं चुकीचं आहे ते ही सांगितलं. सतीश ची विकेट पडली.

तर साने सर, आहे हे असं आहे. माझ्या सारखे टिनपाट कंपनी चालवणारे जात प्रकाराला घराच्या आणि कंपनी बाहेर लटकवून ठेवतात. तर बाकी कार्पोरेट चं काय सांगणार. हे नारायण मूर्ती, रतन टाटा, अझीम प्रेमजी तुम्हाला वाटतं, जात वगैरे बघत असतील?

हे जाती धर्मावरून एकमेकांना घोडे लावण्याचं काम फक्त फेसबुक आणि WA वर चालतं. तुम्ही जास्त त्रास करून नका घेऊ.

आपण आपलं काम करत राहायचं. ते चांगलं आहे तुमच्या माझ्या तब्येतीसाठी. 

इंग्रजी शब्द

इंग्रजीत काही काही शब्द असे आहेत की त्यांचा उच्चार सारखा असला तरी अर्थ काही तरी वेगळाच आहे. म्हणजे उदा:

Automation या शब्दाचा अर्थ आहे की एखाद्या प्रक्रियेला स्वयंचलित करणे. बरेच लोकं या शब्दा ऐवजी atomisation हा शब्द वापरतात. Atomisation म्हणजे एखादा द्रव पदार्थ हाय प्रेशर ने एखाद्या नोझल मधून पास केले असता जे छोटे पार्टीकल्स तयार होतात, त्याला atomization म्हणतात. एखादी मटेरियल हॅंडलिंग ची मॅन्युअल प्रोसेस काढण्यासाठी atomization असं म्हंटलं की गोंधळ उडतो.

एकदा मी उद्यान एक्स्प्रेस ने बंगलोर ला गेलो होतो. एका स्टेशन वर आंदोलन झाल्यामुळे माझी ट्रेन उशीरा पोहोचली. हे कारण सांगताना मी आमच्या MD ला म्हणालो "there was some allegation en route" MD संजीव म्हणाला "do you want to say agitation?"

एखाद्या कार्यक्रमाची सूत्र सांभाळणे त्याला facilitation म्हणतात आणि एखाद्याचा सत्कार करायचा त्याला felicitation.

Instead of म्हणजे त्याऐवजी आणि inspite of म्हणजे असं असलं तरी.

सगळ्यात हाईट म्हणजे परवा एक कस्टमर आमच्या डिझाइन इंजिनियर ला म्हणाला "we will stimulate this process" Stimulate म्हणजे उत्तेजित करणे, त्यांना simulate असं म्हणायचं होतं बहुधा. Simulate म्हणजे एखादी प्रोसेस कॉम्पुटर वा छोट्या स्केल वर जशीच्या तशी करून दाखवणे. अर्थाचा कसा अनर्थ होतो बघा.

सुटाबुटातला प्रोफाइल पिक्चर लावल्यावर, इतका शहाणपणा करण्याचा हक तो बनता है यार!

Tuesday, 13 September 2016

पार्टनर ७

मी पार्टनरला विचारलं "काय रे, आजकाल फार तारे तोडत असतोस. नेहमीच कसं पॉझिटिव्ह. जणू काही तुला प्रॉब्लेम्स च नाही. असं कसं?"

पार्टनर छद्मी पणे हसला.

चिडलोच मी "अरे, हसतोस काय बावळटासारखा. काय म्हणतोय मी"

पार्टनर शांतपणे बघत म्हणाला "हे बघ, तुलाही माहित आहे की प्रॉब्लेम्स मलाही आहेत पण पॉझिटिव्ह राहण्याशिवाय दुसरा ऑप्शन आहे का काही मित्रा"

"कसं आहे, असं राहिलं तर काही तरी मार्ग सुचतात. नाहीतर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलं तर आपण फक्त शिव्या देत राहतो. डोकं शांत ठेवलं तर अल्टरनेटिव्ह रस्त्याचा ऑप्शन डोळ्यासमोर येतो. एखादी गोष्ट करायची नाही म्हंटलं की संपलं की सगळं. आणि काही करायचं म्हंटलं की ते करण्याचे एक एक मार्ग सुचत जातात."

"आणि तसं ही नकारात्मक विचार आले की, हं मग पुढे काय, असं विचार स्वतः ला. त्याचं शेवटचं उत्तर तुला, हं, झालं सांगून आता कामाला लाग, असंच येतं. आणि मग ती शक्ती आणावी लागते."

"हे आहे हे असं आहे दोस्ता. व्रत स्वीकारलं आहे ना! मग  चॉईस नाही दुसरा"

पार्टनर उवाच.

हरतालिका

पोटभर जेवून आणि एक वाटी श्रीखंड वगैरे चोपून मी काल रात्री वैभवी ला विचारलं "काय मग, झाली का हरतालिकेची पूजा? ते सात जन्माबद्दल काही मागितलं की नाही?"

दिवसभराचा उपवास करून पिचलेली आणि येत्या आठवड्यातल्या गौरी गणपती च्या पूजा आणि व्रत वैकल्य याच्या कल्पनेनंच धास्तावलेली ती प्रियतमा वदली

"हो, मी पूजलं हरतालिकेला आणि म्हंटलं 'हे वरदायिनी, जगन्माते, या सात जन्माच्या थिअरी बद्दल मला जास्त माहित नाही. पण त्यात थोडं जरी तथ्य असेल तर माझ्यावर प्रसन्न हो आणि म्हण की बाई, ह्या माणसाबरोबर हा तुझा सातवा जन्म आहे. यापुढे हा धोंडा काही तुझ्या पदरात बांधणार नाही"

आता काल रात्रीपासून,  हरतालिका "तथास्तु" म्हंटली की काय या काळजीने मला ग्रासलं आहे. 

गुण अवगुण

माझा एक भाऊ आहे सुहास नावाचा.  फॅब्रिकेशन चा बिझिनेस करतो. नासिक मध्ये. सुहास स्वतः बेदम श्रीमंत आहे. नासिक आणि औरंगाबाद मध्ये ८-९ फ्लॅट, साधारण पणे ३० एक एकर ची इगतपुरी आणि सिन्नर साईड ला लँड बँक. लँड बँक, हं, फार आवडता शब्द आहे त्याचा.

सुहास बिझिनेस करतो खरा पण त्याची मॅनेजमेंट स्टाईल एकदम अलग आहे. आरडाओरडा, शिवीगाळ हे त्याच्या ऑफिस मध्ये नेहमी चालू असतं. सप्लायर्स च्या पेमेंट ला डिले हे नेहमीचंच. बँकेचं अकौंट एन पी ए ही त्याच्यासाठी आम बात असते. लोकांकडून पैसे व्याजावर घ्यायचे आणि व्याज बुडवण हे म्हणजे अगदी नेहमीचं. मुद्दल परत देतो उपकार केल्यासारखी. लोकांचे पैसे परत द्यायला त्याच्याकडे पैसे नसतात. असं असताना मागच्या सप्टेंबर मध्ये सुहास बायको पोरांना घेऊन ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड ला जाऊन आला.

 बिझिनेस म्हणाल तर अडखळत चालू आहे. सुहास ने तुफान ओव्हरट्रेडिंग केलं आहे. साधे फॅब्रिकेशन करता करता अचानक मोठ्या व्हेसल्स बनवायच्या बिझिनेस मध्ये तो पडला. नाशिक जवळ दोन तीन एकराचा प्लॉट घेतला, तिथे मोठी फॅक्टरी बांधली.  बँकांची बेधुंद लोन्स उचलली. ती बुडवली. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट चा ससेमिरा लागला. नाना भानगडी.

इतकं होऊनही पठया ऑफिस मध्ये ताठ मानेने बसला असतो. त्याचे देणेकरी पैसे मागायला येतात तेव्हा त्याचा रुबाब असा असतो जणू हाच त्यांना काही मदत करणार आहे. "माझ्याकडे आहेत ना पैसे, म्हणजे रिझर्व्ह बँकेत पैसे आहेत असं समजा" देणेकरी रिकाम्या हाताने परत जातो तेव्हा सुहास सुहास्य वदनाने पुढच्या माणसाची ठासायला सज्ज झाला असतो.

शिवा आयथळ म्हणतो  Liars Prosper तसं सुहास चं आयुष्य आहे खरं तर.

वैभवी मला म्हणते "बघा तो सुहास, इतकं बेकार आयुष्य जगून ही स्वतः किती मजेत असतो. काय कारण असेल की नशीब याच्यावर इतकं न्योछावर असेल" मी तिला म्हणालो "नक्कीच सुहास मध्ये एक गुण असा असेल की तो त्याच्या सगळ्या दुर्गुणांवर मात करत असेल. तो गुण कुठला हे मला सापडत नाही आहे. पण जी परिस्थिती त्याने तयार केली आहे त्याच्या मध्यात राहून पंचवीस तीस कोटींचा टर्न ओव्हर करणे खायची गोष्ट नाही आहे"

सुहास  बद्दल माझी ही भावना आहे. तीन लाख कोटी टर्न ओव्हर करणाऱ्या आणि भारतात नव्हेच तर जगात अव्वल स्थान पटकावणाऱ्या रिलायन्स बद्दल शेरेबाजी करण्यासाठी माझी बोटं कि बोर्ड बडवायला धजावत नाही हा माझा कमकुवतपणा आहे.

पण एक नक्की की मरायच्या आधी सुहास चा किंवा अंबानी बंधूंचा तो गुण शोधायला आवडेल जो साऱ्या प्रचलित दुर्गुणांवर मात करतोय. 

पार्टनर ६

मी आणि राम थेऊर च्या गणपतीचं दर्शन घेऊन बाहेर आलो तर एक भिकारी पैसे मागण्यासाठी मागे येऊ लागला. मी राम ला बोललो "च्यायला, कसली लोकं आहेत ही. चांगला धडधाकट असूनही भीक मागतोय लेकाचा"

राम गालातल्या गालात हसला.

मी म्हंटलं "का रे, हसलास का?"

तर म्हणाला "तो देवळाच्या बाहेर भीक मागतो अन तू देवळात जाऊन"

गप गुमान कारचा स्टार्टर मारला अन निघालो.

राम, माझा पार्टनर. बेकार माणूस आहे साला.