Friday, 23 August 2013

मन २

आयुष्यात बर्याचदा गोष्टी घडून जातात, आपसूकपणे. त्या घडाव्या अशासाठी आपण काही विशेष प्रयत्न पण केला नसतो. पण त्या घडतात हेही खरं. मग त्या आपल्या मनासारख्या असोत वा मनाविरूद्ध.

सगळे फासे व्यवस्थित पडत असतात़ तेव्हा आपल्या जीवनावर आपलंच नियंत्रण आहे, ही भावना प्रबळ होते. पण "नियती" कधी रंग दाखवायला लागली की कशी पळता भुई थोड़ी होते. कधी एकदा या चक्रातून बाहेर पडतो असं होतं.

पण बाहेर पडतो बरं का! म्हणजे या चक्रव्यूहातून आपली सुटका होणार की नाही या विवंचनेत असतानाच असं काही दान पडतं की मार्ग खुला होतो. आणि चाचपडत नाही तर लख्खपणे रस्ता समोर दिसतो. फक्त या चक्रव्यूहात न थकता वाट शोधण्याची आस ठेवली पाहिजे. बर्याचदा आपण अगदी रस्त्याच्या जवळ आलो असतो, अगदी तेव्हाच तो शोधण्याचा नाद सोडून देतो.

सूर्योदयाच्या साक्षीने रोज मर्त्य असे आपण अमर्त्य अशा नियतीशी लढा देण्यासाठी सज्ज होत असतो, मार्ग शोधण्यासाठी...............................याला जीवन एेसे नाव 

Monday, 12 August 2013

मन

काही गोष्टी आपल्या मनात, आपल्या श्वासात, आपल्या नजरेत अगदी ठसलेल्या असतात़. त्याची अनुभूति परत कितीही दिवसांनी, वर्षांनी झाली तरी आपण हरखून जातो, हरवून जातो.

नासिकची सीडीओ/मेरी शाळा आजही मी बघितली की गलबलून जातो. तीच गत परभणीच्या माझ्या आजोळची-मुक्ताजीनची. औरंगाबाद च्या govt polytechnic वरून गेलो की मान पुन्हा पुन्हा वळतेच आणि ८३-८६ च्या काळात डुबकी मारून येतो़.

बर्याचदा एखाद्या shop floor वरून जाताना कुलंटचा एक तीव्र दर्प येतो़ आणि मला हटकून SKF ची आठवण येते. तो कुलंटचा वास सुद्धा मग मला केवड्याच्या वासाइतकाच मोहक वाटतो.

याउलट काही ठिकाणाहून जाताना ऋणानुबंध असतानाही आपण भावनाशून्य होऊन जातो. माझ्या बाबतीत उदाहरण द्यायचं म्हणजे भारती विद्यापीठ. का कोण जाणे, सातारा रोडहून जाताना मला कधी या माझ्या काॅलेजकडे प्रेमाने बघितलेले आठवत नाही. किंबहुना तीव्र भांडण झालेला मित्र अचानक समोर आला तर आपण कसे तोंड चूकवून पुढे जातो तसा मी भारतीच्या समोरून जातो. 

काही आपल्या हातून झालेल्या अक्षम्य चूका, कधी जाणतेपणी तर कधी अजाणतेपणी, केवळ कुणाला माहिती नसते, म्हणून आपण सहीसलामत सुटलेलो असतो. झूरळासारखे ते विचार झटकून द्यावे म्हंटलं तरी वेताळासारखे मानगुटीवर बसलेले असतात़. 

काही गोष्टी/घटना मनावर फुंकर मारतात, तर काही ओरखडे ओढून जातात.............याला जीवन एेसे नाव 

Saturday, 10 August 2013

Duniyadari

दुनियादारीच्या निमित्ताने:

शिरवळकरांच्या दुनियादारी चा चित्रपट बघितला आणि मस्त वाटले. ज्या पुस्तकांनी एके काळी वेड लावले त्यावर चित्रपट बनेल असे वाटले नव्हते. शेवट जर पुस्तकासारखा केला असता तर अजून मजा आली असती, आणि शिरीन साई देडगावकर चं प्रपोजल, नाही झेपलं. पण ok. तेव्हढे बदल खपून गेले, किंबहुना शोभले. ४० ते ६० वयोगटातल्या (यांनी पुस्तक वाचले असेल) प्रत्येकांनी हा चित्रपट आवर्जून बघावा.

या दुनियादारीने बऱ्याच वर्षांनी हा शब्द आठवला: कट्टा

औरंगाबाद च्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये मी तसा फुलत होतो. badminton आणि टेबल टेनिस खेळत होतो. inter college क्रिकेट खेळायचो. gathering चे stage म्हणजे आपली जहागीर आहे अशा पद्धतीने वावरायचो. खूप भाव खायचो.

डिप्लोमा पूर्ण करून degree साठी पुण्याला आलो. आणि देवाशपथ सांगतो सटपटलो. २५० रुपयामध्ये महिना घालवणारा मी, पुण्याच्या पोरांकडे १५००-२००० रुपये महिन्याला येत असताना बघून गांगरलो. बुजलोच म्हणा ना! त्यात माझे college भारती विद्यापीठ. उत्तर भारतातले पोरं आजूबाजूला. काही सुधरेच ना. एकतर govt engineering ला admission न मिळाल्याने आधीच inferiority complex आला होता. त्यात कॉलेज चे वातावरण. टकाटक इंग्रजी बोलणारे पोरं आणि पोरी. बोबडीच वळली. स्वतःला पाकळ्यात आकसून घेत होतो. नाही म्हणायला स्वतःला शोधण्यासाठी बी जे मेडिकल ला जायचो. मला मी तर सापडलो नाहीच (खरं तर अजून शोधतो आहे), आयुष्याची जोडीदार मात्र सापडली.

औरंगाबाद ला आठवड्यात एकदा डार्लिंग होटेल मध्ये मसाला डोसा खायला जाणे हि आमची चंगळ होति. पहिल्यांदा जेव्हा beer पिलो तेव्हा असं वाटलं होतं की काय सांगू. पण हे तीर्थ घेणे म्हणजे ३ महिन्यातून एकदा. आणि तो अक्षरशः सोहळा असायचा.

आणि अशा पार्श्वभूमीवर मला भेटला कट्टा, कर्वे रोड वर, नळ stop च्या चौकात कोपऱ्यावर अमृत तुल्य चहाचे दुकान होते. त्याच्यासमोर रेलिंग होते आणि दुकानाच्या पायऱ्या. हाच आमचा कट्टा. संज्या नवरे, केदया तालचेडकर, भांड्या, केतन हि मुंबई ची टोळी, अन्या चौधरी, शैल्या, अव्या पाटील, देवेंद्र दिक्षित, नितीन बर्वे, कधीतरी दर्शन देणारा अत्रे (हा मला आज ओळखणार नाही), बी जे चा आशिष धावलभक्त आणि अस्मादिक असा तो कंपू होता. अजून पण काही कलाकार होते पण मला आता त्यांची नाव आठवत नहि. वाटेल तसा चहा प्यायचा, सिगरेटी फुकायच्या आणि जगातल्या विभिन्न गोष्टीवर गप्पा कुटायच्या. साधारण ६ वाजता आम्ही जमायचो आणि ८ वाजता disburse व्हायचो. समोर एक मुलगी असायची, तिच्यावर या ग्रुप मधले निम्मे जण तरी लायना मारायचे. माझा पफ़लु बी जे ला फिट होत होता त्यामुळे मी त्या फंदात पडायचो नाही. पिताश्रीना एकवचनी हाक मारायची तिथे पद्धत होती. माझ्याच्याने ते कधीच झालं नही. तसाही मी त्या ग्रुप मध्ये शामळू म्हणूनच फ़ेमस होतो. त्यातली काही मंडळी माझ्याबरोबर भारती विद्यापीठ ला होति. आठवड्यातून एखाद दुसरा दिवस आम्ही वैशालीत दंगा घालायचो. पण औरंगाबादच्या पार्श्वभूमीवर हि मंडळी जास्तच ऐष करायची. सुदैवाने मला माझ्या हलक्या खिशाची जाणीव होती आणि माझा पाय फार कधी सरकला नाही. नशीबच. तसे आता सगळेच व्यवस्थित settle झाले आहेत.

डिप्लोमा करून गेल्यामुळे वासरात लंगडी गाय जर शहाणी होती. त्यामुळेही मला जरा sincere असल्यासारखा चेहरा ठेवावा लागायचा. पण एकंदरीतच भारती विद्यापीठाच्या गुदमरलेल्या वातावरणात मी इथे मुक्त श्वास घेत होतो. टेबल टेनिस, badminton कधीच थांबले होते. पुण्याच्या भपकेदार वातावरणामुळे मी तसा बुजलो होतो. अशा मनावर चट्टा उमटलेल्या अवस्थेत जर थोडे कुठे बरं वाटले असेल तर ते कट्ट्यावर.

दुनियादारी च्या निमित्ताने त्याची आठवण झाली एव्हढेच

Tuesday, 6 August 2013

फेसबूक

धर्म, जातपात यावर कधीही विचार न करणारा मी, या फ़ेसबुक च्या लपेट्यात येउन कधी त्या विषयावर विचार करायला लागलो हे माझे मला कळलेच नाही. आणि ठरवलं बास, या लोकांचं वाचायचं नाही आणि वाचलंच तर सोडून द्यायचं. गांधी, आंबेडकर, सावरकर, बोस, नेहरू, टिळक यांच्यात युद्ध तर लावलंच पण ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, रामदास या संतानाही या तथाकथित विद्वानांनी सोडलं नाही. ती भाषा, त्यांचे विचार असे की मन उद्विग्न व्हावे. खोटं कशाला लिहू, सुरूवातीला बरं वाटलं, पण नंतर त्यांचा अतिरेक व्हायला लागला. गड्या आता पूरे. बरं हे तथाकथित पुरोगामित्वाचा चांगला घट्ट मुखवटा घालतात. पण त्याच्या आडून तीर कुणावर आणि कसे मारतात हे प्रेक्षणीय असतं.

या लोकांना सूर्याखालील कूठलाही विषय वर्ज्य नसतो वाद घालायला. धर्म आणि जात हे चघळायचे विशेष विषय. त्यानंतर नंबर लागतो सामजिक विषय, त्यातही अग्रक्रम अर्थशास्त्राचा. उदारमतवादी समाजवाद, संकुचित भांडवलवाद: शब्दांची अशी काही सरमिसळ करायची की खर्या अर्थ तज्ञांनी यांच्या घरी झाडलोट करावी. मला एक कळत नाही, करोडोंची संपत्ती create करणारे नारायण मूर्ति, अझीम प्रेमजी, रतन टाटा ही मंडळी हे असले विषय चघळीत असतील का हो?

बरं हे दाखवतात की यांनी समाजमनाचा आरसा पकडला आहे. पण या आरश्यामधे फक्त जातीपातीचे प्रतिबिंब कसे पड़ते बुवा? म्हणजे मला एकही group, rain water harvesting बद्दल चर्चा करताना दिसत नाही, किंवा कुणीही solid waste management वरती समाजाला सुशिक्षीत करताना दिसत नाही. अशा विषयांवर बोलताना या विद्वानांच्या लेखणीतील शाई कुठे ग़ायब होते कोण जाणे.

मग मला माझ्या सारख्या small and medium establishment चालवणार्या लोकांचे कौतुक वाटते, काही नाही तर २०-५०-१०० कुटुंबाची काळजी तर ते घेत असतात़. तिथे जात नसते, धर्म नसतो. एका कुटुंबासारखे राहून त्यातल्या प्रत्येकाचा आर्थिक आणि सामाजिक स्तर ऊंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न तर चालू असतो. आज़च शिमोगा मधील एका SME चा कार ड्रायव्हर म्हणाला, मालक आम्हाला घरच्यासारखे वागवतात. जाती वरून मार lecture झोडणार्या या विद्वानांपेक्षा मला हा मालक समाजासाठी जास्त उपयुक्त वाटतो.

मी तर ठरवलं आहे, मनाला उभारी देणार्या पोस्ट वाचायच्या. वास्तवतेवर भाष्य करणारे विचार वाचयचे. इतिहासाचा खांदा वापरून, समोरच्या जातिधर्मावरती बंदूक़ झाडायची, नको रे बाबा! ज्या महामानवांच्या पायाशीही बसण्याची आपली लायकी नाही, त्यांच्या बुद्धीचे विश्लेषण करण्याचे धाडस माझ्या अंगी नाही, आणि ज़र कुणी करत असला तर ते आकलन करण्याची क्षमता ह्या पामराजवळ नाही.