Saturday, 10 August 2013

Duniyadari

दुनियादारीच्या निमित्ताने:

शिरवळकरांच्या दुनियादारी चा चित्रपट बघितला आणि मस्त वाटले. ज्या पुस्तकांनी एके काळी वेड लावले त्यावर चित्रपट बनेल असे वाटले नव्हते. शेवट जर पुस्तकासारखा केला असता तर अजून मजा आली असती, आणि शिरीन साई देडगावकर चं प्रपोजल, नाही झेपलं. पण ok. तेव्हढे बदल खपून गेले, किंबहुना शोभले. ४० ते ६० वयोगटातल्या (यांनी पुस्तक वाचले असेल) प्रत्येकांनी हा चित्रपट आवर्जून बघावा.

या दुनियादारीने बऱ्याच वर्षांनी हा शब्द आठवला: कट्टा

औरंगाबाद च्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये मी तसा फुलत होतो. badminton आणि टेबल टेनिस खेळत होतो. inter college क्रिकेट खेळायचो. gathering चे stage म्हणजे आपली जहागीर आहे अशा पद्धतीने वावरायचो. खूप भाव खायचो.

डिप्लोमा पूर्ण करून degree साठी पुण्याला आलो. आणि देवाशपथ सांगतो सटपटलो. २५० रुपयामध्ये महिना घालवणारा मी, पुण्याच्या पोरांकडे १५००-२००० रुपये महिन्याला येत असताना बघून गांगरलो. बुजलोच म्हणा ना! त्यात माझे college भारती विद्यापीठ. उत्तर भारतातले पोरं आजूबाजूला. काही सुधरेच ना. एकतर govt engineering ला admission न मिळाल्याने आधीच inferiority complex आला होता. त्यात कॉलेज चे वातावरण. टकाटक इंग्रजी बोलणारे पोरं आणि पोरी. बोबडीच वळली. स्वतःला पाकळ्यात आकसून घेत होतो. नाही म्हणायला स्वतःला शोधण्यासाठी बी जे मेडिकल ला जायचो. मला मी तर सापडलो नाहीच (खरं तर अजून शोधतो आहे), आयुष्याची जोडीदार मात्र सापडली.

औरंगाबाद ला आठवड्यात एकदा डार्लिंग होटेल मध्ये मसाला डोसा खायला जाणे हि आमची चंगळ होति. पहिल्यांदा जेव्हा beer पिलो तेव्हा असं वाटलं होतं की काय सांगू. पण हे तीर्थ घेणे म्हणजे ३ महिन्यातून एकदा. आणि तो अक्षरशः सोहळा असायचा.

आणि अशा पार्श्वभूमीवर मला भेटला कट्टा, कर्वे रोड वर, नळ stop च्या चौकात कोपऱ्यावर अमृत तुल्य चहाचे दुकान होते. त्याच्यासमोर रेलिंग होते आणि दुकानाच्या पायऱ्या. हाच आमचा कट्टा. संज्या नवरे, केदया तालचेडकर, भांड्या, केतन हि मुंबई ची टोळी, अन्या चौधरी, शैल्या, अव्या पाटील, देवेंद्र दिक्षित, नितीन बर्वे, कधीतरी दर्शन देणारा अत्रे (हा मला आज ओळखणार नाही), बी जे चा आशिष धावलभक्त आणि अस्मादिक असा तो कंपू होता. अजून पण काही कलाकार होते पण मला आता त्यांची नाव आठवत नहि. वाटेल तसा चहा प्यायचा, सिगरेटी फुकायच्या आणि जगातल्या विभिन्न गोष्टीवर गप्पा कुटायच्या. साधारण ६ वाजता आम्ही जमायचो आणि ८ वाजता disburse व्हायचो. समोर एक मुलगी असायची, तिच्यावर या ग्रुप मधले निम्मे जण तरी लायना मारायचे. माझा पफ़लु बी जे ला फिट होत होता त्यामुळे मी त्या फंदात पडायचो नाही. पिताश्रीना एकवचनी हाक मारायची तिथे पद्धत होती. माझ्याच्याने ते कधीच झालं नही. तसाही मी त्या ग्रुप मध्ये शामळू म्हणूनच फ़ेमस होतो. त्यातली काही मंडळी माझ्याबरोबर भारती विद्यापीठ ला होति. आठवड्यातून एखाद दुसरा दिवस आम्ही वैशालीत दंगा घालायचो. पण औरंगाबादच्या पार्श्वभूमीवर हि मंडळी जास्तच ऐष करायची. सुदैवाने मला माझ्या हलक्या खिशाची जाणीव होती आणि माझा पाय फार कधी सरकला नाही. नशीबच. तसे आता सगळेच व्यवस्थित settle झाले आहेत.

डिप्लोमा करून गेल्यामुळे वासरात लंगडी गाय जर शहाणी होती. त्यामुळेही मला जरा sincere असल्यासारखा चेहरा ठेवावा लागायचा. पण एकंदरीतच भारती विद्यापीठाच्या गुदमरलेल्या वातावरणात मी इथे मुक्त श्वास घेत होतो. टेबल टेनिस, badminton कधीच थांबले होते. पुण्याच्या भपकेदार वातावरणामुळे मी तसा बुजलो होतो. अशा मनावर चट्टा उमटलेल्या अवस्थेत जर थोडे कुठे बरं वाटले असेल तर ते कट्ट्यावर.

दुनियादारी च्या निमित्ताने त्याची आठवण झाली एव्हढेच

No comments:

Post a Comment