Monday, 30 September 2013

किस्सा मांडवडे सरांचा

पहिल्या भाषणाच्या निमित्ताने सी डी ओ मेरी शाळेची आठवण निघाली की अनेक घटनांची मालिका डोक्यात चालू झाली . त्यापैकीच हा एक किस्सा मांडवडे सरांचा. माझ्या बहुसंख्य मित्रांनी हि गोष्ट माझ्या तोंडून ऐकलेली आहे तरीही मी दरवेळेस ती सांगताना मी रोमांचित होतो, हरवून जातो .

१ ९ ७ ८ - ७ ९ साली आमची शाळा सुरु झाली . आम्ही शाळेचे पहिले विद्यार्थी . मी होतो सहावीला . आणि आमचे वर्गशिक्षक होते मांडवडे सर . दिसायला कडक पण वागायला तेव्हढेच मृदू . सडपातळ अशी अंगकाठी, गोलाकार कपाळ , सावळा रंग आणि डोळ्यात धाक म्हणजे  साधारण गणिताच्या शिक्षकाला शोभेल असच त्याचं व्यक्तिमत्व होतं . अर्थात ते गणितच शिकवायचे . आता एव्हढे आठवत नाही पण आम्हा मुला मुलीत ते प्रिय असावेत .

तर हे आमचे सर फक्त एकाच वर्ष आमच्या शाळेत होते . पुढील वर्षी त्यांची बदली झाली . नाशिक एज्युकेशन सोसायटी च्या बऱ्याच शाळा आहेत त्यापैकी एका शाळेत ते निघून गेले . आम्ही सुद्धा आमच्या पुढच्या शिक्षणात दंग झालो . यथावकाश दहावी झालो आणि शाळा सुटली . माझे सर्व सर आणि बाई आमच्या सगळ्यांच्या आजही लक्षात आहेत आणि गम्मत अशी त्यांनाही आम्ही आठवतो .

त्यानंतर मी औरंगाबादला डिप्लोमा करण्यासाठी गेलो . सुट्टीत नाशिकला जायचो तेव्हा शाळेत जायचो.  काही सरांशी आणि बाईंची भेट व्हायची . अर्थात यात मांडवडे सर कुठेच नव्हते कारण ते वेगळ्याच शाळेत शिकवत होते . ८ ५ साली बाबांची पुण्याला बदली झाली आणि माझा नाशिकशी संबंध सुटला (तुटला हा फारच क्रूर शब्द वाटतो). मीसुद्धा engineering करण्यासाठी पुण्यात आलो आणि माझं नाशिकला जाणं थांबलंच . पण आम्हा नाशिकच्या मित्र मंडळींचा पुण्यात एक कंपू जमला होता . मी, प्रताप, नितीन, राजेश गोडबोले,  अतुल, प्रसाद, वैभवी, अनुराधा, बंट्या, राजेश निघोट , सीमा, स्वाती असा एक मस्त ग्रुप जमला होता . शाळेच्या आठवणी निघायच्या पण मांडवडे सरांची आठवण निघण्याचे काही कारण नव्हते .

शिक्षण झाले , नोकरी  चालू झाली. first, second, third शिफ्ट करता करता पुरता skf मय झालो होतो . SKF ची पाच वर्षाची नोकरी झाली आणि १ ९ ९ ४ ला मी ती सोडून resident engineer म्हणून रोलॉन hydraulics नावाच्या कंपनीत रुजू झालो . फिरतीचा जॉब होता . मांडवडे सर आता तर माझ्या विचारांच्या कक्षेत कुठेच नव्हते . पण ते माझ्या superficial जगात नसावेत पण subconcious मनात असावेत .

या नवीन जॉब मध्ये नाशिक पण माझ्या under येत होते आणि मग १ ९ ९ ५ साली मला पुन्हा एकदा नाशिक ला जाण्याचा योग आला . आणि ठरवले शाळेत जायचे . शाळेत गेलो, डोळे भरून शाळा बघितली. एका खोलीत चालू झालेल्या त्या शिक्षण यज्ञाने चांगलीच भरारी घेतली होती . सर्व सर आणि बाई यांना भेटलो पण आमचे सगळ्यांचे आवडते गोटखिंडीकर सर पेठे हायस्कूल ला शिकवत असल्याचे  कळले . तडक पेठे हायस्कूल ला गेलो आणि सरांना भेटलो . नमस्कार केला आणि काय करतो ते तपशीलवार सांगितले . आणि निघतो म्हणत असतानाच माझ्या डोक्यात काय आले काय माहित आणि मी सरांना विचारले "सर, मांडवडे सर कुठे असतात हो आजकाल. " माझे subconcious मन बहुधा जागे झाले  असावे . "अरे याच शाळेत आहेत, भेटायचे का तुला " मी काही बोलायच्या आतच म्हणाले " ते बघ पेपर वाचत आहेत. जा जाऊन भेट"

पेठे हायस्कूल ला पेपर वाचण्यासाठी लाकडी stand असायचे आणि तिथे मांडवडे सर पेपर वाचत पाठमोरे उभे होते . मी गेलो आणि पाठीमागे उभं राहून हाक मारली "सर". सर वळले, तीच अंगकाठी, फक्त वयोमानानुसार काय चेहऱ्यात बदल पडला असेल तेव्हढाच. मित्रानो, विचार करा मी सोळा वर्षांनी सरांना भेटत होतो . मी वयाच्या १ १ व्या वर्षी त्यांचा विद्यार्थी होतो आणि आता २ ७ व्या वर्षी एक तरुण म्हणून त्यांना भेटत होतो . माझ्यासारखे हजारो विद्यार्थी त्यांच्याकडे शिकून गेले असतील . माझा आकार, उकार, उंची, रुंदी सगळंच काही बदलले होते .

पाया पडलो आणि म्हंटले " सर ओळखले का" मनात खात्रीच होती कि आता आपला सगळा इतिहास सरांना सांगावा लागेल आणि तेव्हा ते ओळखतील. डोळ्यावरचा चष्मा त्यांनी कपाळावर घेतला आणि माझ्याकडे निरखून बघितले, एक स्मितहास्य केले आणि म्हणाले…………………………  " राजेश भास्कर मंडलिक"………  मी अवाक. १ ६ वर्षानंतर एखादे सर म्हंटले असते "नाही ओळखले बुवा" किंवा "चेहरा ओळखीचा वाटतो आहे" किंवा "कुठल्या शाळेचा रे तू" आणि इथे हे सर मला हाक मारता आहेत पूर्ण नावानिशी. मी जाम खुश झालो, वाटले मी सरांचा आवडता विद्यार्थी, त्यामुळे नाव लक्षात असेल . फार भारी वाटत होते .

आणि "नितीन सुरेश कुलकर्णी " कुठे असतो. परत एक धक्का, "क्षिप्रा वसंतराव कडेकर" कुठे असते , आणि "प्रताप बालाजी निकम" "अतुल गोपालकृष्ण कुलकर्णी" "प्रसाद चंद्रशेखर राजवाडे" "अनुराधा बसवेश्वर पाटील" "राजेश लक्ष्मण गोडबोले"  ……………………. सरांना अक्षरश: पूर्ण वर्ग आठवत होता आणि आश्चर्याने त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती द्यायचा प्रयत्न करत होतो .  सुदैवाने सगळीच मुले/मुली आयुष्यात स्थिर स्थावर झाली आणि सरांच्या चेहऱ्यावर त्यांची माहिती ऐकून एक विलक्षण समाधान दिसत होते .

घंटा वाजली, आणि सर म्हणाले "तास आहे, भेटू परत कधी तरी" भारावलेल्या अवस्थेत मी त्यांना परत नमस्कार केला आणि पेठे हायस्कूल नामक ज्ञान मंदिरातून मार्गस्थ झालो . 


(हे सगळे लिहिताना मी माझी स्मरण शक्ती किती भारी आहे हे सांगण्याचा प्रयत्न सांगतो असे कुणाला वाटत असेल…………………………………. तर ते योग्य वाटतं आहे. असो )

Thursday, 26 September 2013

माझे पहिले भाषण

आजच संजय सोनवणी सरांची पहिल्या भाषणाची पोस्ट वाचली आणि मला माझं पहिलं भाषण आठवलं म्हणजे खरं तर फजिती आठवली. मी बहुधा सातवीत असेल. मराठी माध्यमातील नाशिक येथील सी डी ओ मेरी शाळेत  शिकताना एका स्पर्चेमध्ये इंग्रजी मध्ये भाषण ठोकायचे होते. पण त्याबरोबर एक उत्स्फूर्त (extempore) विषयावर ३-४ मिनिटे बोलायचे होते. इंग्रजी भाषणाचा विषय अभिमन्यु ची गोष्ट होती . माझ्याबरोबर आमच्या वर्गातील प्रसाद राजवाडे आणि एक इयत्ता मागे असलेली अश्विनी कुलकर्णी होती. प्रसाद आणि अश्विनीला मराठीतच भाषण करायचे होते.

रट्टा मारण्यात पटाइत असल्यामुळे य दा जोशी सरांनी माझी निवड केली असावी . स्पर्धा नाशिकच्या पेठे हायस्कूल ला होती. झालं मी, प्रसाद, अश्विनी आणि आम्हाला सगळ्यांना घेऊन जाणारे माझे वडील असा सगळा लवाजमा पेठे हायस्कूल ला पोहोचला . वेगवेगळ्या शाळांमधले शंभर एक विद्यार्थी जमा झाले होते स्पर्धेसाठी . काही आजूबाजूच्या खेड्यातील हि होते . समोर ५ एक परीक्षक बसले होते. त्यामध्ये एक परांजपे बाई पण होत्या . या बाई नी पाचवीत पेठे हायस्कूल ला शिकत असताना इंग्रजी च्या तासाला काहीतरी चुकीमुळे एक कानाखाली वाजवली होती . उस थप्पड कि गुंज अबतक सुनाई देती है! तेव्हा तर फारच ताजी होती . त्यांना बघून आधीच टरकली होती . असो

पाठ केलेल्या भाषणाची स्पर्धा सुरु झाली. माझा नंबर आला . लटपट त्या पायांनी उभा राहिलो आणि देवाचे नाव घेऊन चालू केले . पाठांतर तगडे होतेच . (लहानपणी नाटकात पण कामं करायचो. एका नाटकात काम केल्यावर आमच्या भिसे बाईंनी comment केली "अभिनयाचे माहित नाही पण मंडलिक चे पाठांतर चांगले आहे" आता बोला) घडाघडा बोलून टाकले . टाळ्या वाजल्या तेव्हाच भानावर आलो . परांजपे बाई सुद्धा खुश वाटल्या.  म्हंटले मैदान मारले . तेव्हा कुठे माहित होते कि खरी गेम पुढे आहे .

पाठ केलेल्या भाषणाचा राउंड संपल्यावर उत्स्फूर्त भाषणाची फेरी चालू झाली . हा म्हणजे अवघडच प्रकार होता . आधीच पहिली स्पर्धा आणि त्यात हा प्रकार . असं वाटत होतं कि काहीतरी व्हावं आणि हे टळाव. थोडी पोट दुखावून बघितले, चक्कर येते का ते चेक केलं. पण त्यातले काहीच झाले नाही. बरे पहिल्या फेरीत तोफ धडाद्ल्यामुळे जोशी सरांची पण कॉलर टाईट होती. माझ्या आधी प्रसाद चा नंबर आला आणि त्याने ठोकले कि भाषण आणि चक्क परीक्षक त्याला शाबासकी देत होते. मी माझ्याच चिंतेत गर्क होतो आणि तेवढ्यात झाला कि पुकारा आणि घ्या म्हंटले चिठ्ठी. चिठ्ठी उघडली तर भाषणाचा विषय होता …………. "माझे पहिले भाषण" आता म्हंटले काय बोलणार कप्पाळ.  (तसा दुसरा कुठलाही विषय असता तरी या ठिकाणी हेच म्हणावे लागले असते "काय बोलणार कप्पाळ") अर्ध्या तासापूर्वी मी आयुष्यातले पहिले भाषण केले होते. आणि त्यावरच पुन्हा बोलायचे . काही नाही, चिठ्ठी घेतली आणि उभा राहिलो शुंभासारखा. जोशी सर खुणा करत होते काही बोल म्हणून.  अहो पण सुचतंय कुठे. थोडं बाबांकडे बघायचा प्रयत्न केला पण ते माझी दशा बघून कुठल्या तरी दुसऱ्या पालकाशी बोलत होते . बहुधा प्रसाद कडे बोट दाखवत होते . मला आता असे वाटते कि ते प्रसाद्चीच ओळख त्यांचा मुलगा म्हणून करत असावेत . ते ३ मिनिटे अक्षरशः ३ युगासारखे वाटले . परांजपे बाईकडे लक्ष गेले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर कानाखाली मारल्यावर जे भाव होते तेच आता झळकत होते. शेवटी एकदाची ३ मिनिटे झाल्याची शिट्टी वाजली तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. कसनुसं हसत (कि रडत) मी जागेवर जाऊन बसलो.

माझ्यासाठी तो दिवस म्हणजे दु:स्वप्न होता. शाळेत रमल्यानंतर अचानक एक दिवशी कळले की आमच्या टीमला त्या स्पर्धेमध्ये तिसरे बक्षीस मिळाले. माझ्यामते प्रसाद जाऊन बक्षीस घेऊन आला. खरं तर तोच ते घेण्यासाठी पात्र होता मी तर फक्त मम म्हणायच्याच लायकीचा होतो.

दिवस सरले, वर्षे गेली. डिप्लोमा ला असताना gathering गाजवले. professional career मध्ये presentations दिली. काही भाषणही दिली अगदी extempore ही. अजूनही लटपट तो पण एखाद दुसरा मिनिट. नंतर सगळे सुरळीत होते . पण त्याचा पाया त्या पेठे हायस्कूलच्या स्पर्धेत रचला गेला याबाबत माझ्या मनात य:किंचित हि शंका नाही .

दोन वर्षापूर्वी सी डी ओ मेरी  शाळेत मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. आणि मला मुलांच्या समोर बोलायचे होते  आणि स्टेज वर य दा जोशी सर. एक जोरकस दहा मिनिटाचे भाषण दिले. बहुधा जोशी सरांनी पेठे हायस्कूल मध्ये धरलेला श्वास त्या दिवशी सुस्कारा म्हणून सोडला असावा . भाषणाचा शेवट शाळेवरच्या एका कवितेने आवंढा गिळत केला

आठवणीच्या कपाटामध्ये एक साफसुथरा
नीटनेटका कप्पा माझ्या सी डी ओ मेरी शाळेचा
अगदी छान सजला आहे तो
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या वर्ग सजावटी सारखा
त्याला मैत्रीची झालर आहे
गुरुजनांच्या धाकाची आणि मायेची मखर आहे
बंदिस्त कुपीमध्ये साठलेले ते स्वप्नील क्षण
ती स्नेह संमेलनाची लगबग
म्हसरूळ marathone  मध्ये पळायची तगमग
लेझीमचा एक्स्ट्रा तास
दरवर्षी साजऱ्या केलेल्या कांदे नवमीच्या भज्यांचा वास
क्रिकेट, हॉकी, badminton टेबल टेनिस हे तर आमचे आवडते खेळ
कबड्डी, खो-खो चाही तेव्हढाच जमायचा मेळ.
मैदानाच्या कोपऱ्यात चालू असलेली लगोरी आणि लंगडी
सी के नायडू, मिहीरसेन, ध्यानचंद, तेनसिंग- रमलेत सगळे सवंगडी
आठवणींच्या क्षणांची ही मालिका
हातात हात घालून खेळलेल्या जोड साखळी सारखी
शिक्षण आणि संस्कार दोघांचेही तेव्हढेच महत्व
नाही शिकवलं अहं, जपावे ते सत्व
माणूस नावाच्या इमारतीचा पाया भरण्याचे ते दिवस
आम्हाला घडवणारे, हसवणारे आणि रडवणारेसुद्धा ते दिवस
आयुष्यभराचे संचित असलेले माझे सी डी ओ मेरी शाळेचे दिवस
माझे सी डी ओ मेरी शाळेचे दिवस

आणि मग जोशी सरांचा शाबासकी साठी थबकलेला पेठे हायस्कूल मधील हात वयाच्या ४ ३ व्या वर्षी पाठीवर पडला तेव्हा कुठे जीवाला हायसे वाटले.

Tuesday, 24 September 2013

अकेले हम अकेले तुम

जीवनात तडजोड म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात. यशला काशीबाई नवले कॉलेज ला इंजिनीरिंग ला प्रवेश मिळाला (गंगेत घोडे न्हाले. हो तेव्हढा मोठा झाला आहे यश). घरापासून कॉलेज १६ किमी लांब म्हणून नांदेड सिटी मध्ये मित्राचं घर भाडयाने घेतलं. (एक वर्तुळ पूर्ण झाले. माझी जन्मभूमी मराठवाडयातील नांदेड, पुण्याजवळील नांदेड गावात कंपनी म्हणून कर्मभूमी नांदेड आणि आता वास्तव्य हि तिथेच). वयाच्या ४५ व्या वर्षी घर एकटयाने चालवायची अघोरी  जबाबदारी अंगावर पडली. आणि तिकडे, म्हणजे मूळ घरी, आनंद सोहळा चालू आहे . तसं मी टूर वर गेल्यावर उत्सव साजरा व्हायचा. पण तो उत्सव महिन्यातून एकदा वा दोनदा. आता म्हणजे शनिवार संध्याकाळ ते सोमवार सकाळ पर्यंत कळ सोसायची  कि नंतर आनंदी आनंद.  असो.

घर सांभाळायला लागल्यानंतर काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या .

- भांडे घासत असताना नळ न सोडता ते घासणे अशक्य आहे . आमच्या मूळ घरच्या मोलकरणीची मी मनापासून माफी मागतो की मी उगाच तिच्यावर ओरडायचो

- सकाळी चहा बनवताना एकतर साखर किंवा चहा किंवा दुध यापैकी काहीतरी सांडणे अनिवार्य आहे .

- दुध गरम करताना उतू जाऊ न देणे हे फक्त दैवी शक्ती असणार्या व्यक्तीनाच शक्य आहे .

- आधी मला सकाळी फक्त पेपर वाचण्याचे काम  दिले होते. एवढी विविधांगी कामे सकाळी असतात आणि ती पूर्ण करून वेळेवर घराच्या बाहेर पडणे हे योगी माणसाचेच अंगी असू शकते, माझ्या नाही.

- किराणा भरण्या इतके सोपे काम कुठले नसावे असे मला वाटायचे. त्या समजुतीला पहिल्या महिन्यातच तडा गेला

- दूर राहिल्यामुळे बायकोच्या मनात आपल्याबद्दल आदर, दया वैगेरे भावना येतील असे वाटले होते आणि आश्चर्य म्हणजे तुम्हाला सांगतो……………… कि असे काहीच झाले नाही.

असो. एकंदर नवा अनुभव घेणे चालू आहे. नव्याचे नऊ दिवस हि संपले आहेत. बघू कसे आणि कुठपर्यंत झेपते ते.