Monday 30 September 2013

किस्सा मांडवडे सरांचा

पहिल्या भाषणाच्या निमित्ताने सी डी ओ मेरी शाळेची आठवण निघाली की अनेक घटनांची मालिका डोक्यात चालू झाली . त्यापैकीच हा एक किस्सा मांडवडे सरांचा. माझ्या बहुसंख्य मित्रांनी हि गोष्ट माझ्या तोंडून ऐकलेली आहे तरीही मी दरवेळेस ती सांगताना मी रोमांचित होतो, हरवून जातो .

१ ९ ७ ८ - ७ ९ साली आमची शाळा सुरु झाली . आम्ही शाळेचे पहिले विद्यार्थी . मी होतो सहावीला . आणि आमचे वर्गशिक्षक होते मांडवडे सर . दिसायला कडक पण वागायला तेव्हढेच मृदू . सडपातळ अशी अंगकाठी, गोलाकार कपाळ , सावळा रंग आणि डोळ्यात धाक म्हणजे  साधारण गणिताच्या शिक्षकाला शोभेल असच त्याचं व्यक्तिमत्व होतं . अर्थात ते गणितच शिकवायचे . आता एव्हढे आठवत नाही पण आम्हा मुला मुलीत ते प्रिय असावेत .

तर हे आमचे सर फक्त एकाच वर्ष आमच्या शाळेत होते . पुढील वर्षी त्यांची बदली झाली . नाशिक एज्युकेशन सोसायटी च्या बऱ्याच शाळा आहेत त्यापैकी एका शाळेत ते निघून गेले . आम्ही सुद्धा आमच्या पुढच्या शिक्षणात दंग झालो . यथावकाश दहावी झालो आणि शाळा सुटली . माझे सर्व सर आणि बाई आमच्या सगळ्यांच्या आजही लक्षात आहेत आणि गम्मत अशी त्यांनाही आम्ही आठवतो .

त्यानंतर मी औरंगाबादला डिप्लोमा करण्यासाठी गेलो . सुट्टीत नाशिकला जायचो तेव्हा शाळेत जायचो.  काही सरांशी आणि बाईंची भेट व्हायची . अर्थात यात मांडवडे सर कुठेच नव्हते कारण ते वेगळ्याच शाळेत शिकवत होते . ८ ५ साली बाबांची पुण्याला बदली झाली आणि माझा नाशिकशी संबंध सुटला (तुटला हा फारच क्रूर शब्द वाटतो). मीसुद्धा engineering करण्यासाठी पुण्यात आलो आणि माझं नाशिकला जाणं थांबलंच . पण आम्हा नाशिकच्या मित्र मंडळींचा पुण्यात एक कंपू जमला होता . मी, प्रताप, नितीन, राजेश गोडबोले,  अतुल, प्रसाद, वैभवी, अनुराधा, बंट्या, राजेश निघोट , सीमा, स्वाती असा एक मस्त ग्रुप जमला होता . शाळेच्या आठवणी निघायच्या पण मांडवडे सरांची आठवण निघण्याचे काही कारण नव्हते .

शिक्षण झाले , नोकरी  चालू झाली. first, second, third शिफ्ट करता करता पुरता skf मय झालो होतो . SKF ची पाच वर्षाची नोकरी झाली आणि १ ९ ९ ४ ला मी ती सोडून resident engineer म्हणून रोलॉन hydraulics नावाच्या कंपनीत रुजू झालो . फिरतीचा जॉब होता . मांडवडे सर आता तर माझ्या विचारांच्या कक्षेत कुठेच नव्हते . पण ते माझ्या superficial जगात नसावेत पण subconcious मनात असावेत .

या नवीन जॉब मध्ये नाशिक पण माझ्या under येत होते आणि मग १ ९ ९ ५ साली मला पुन्हा एकदा नाशिक ला जाण्याचा योग आला . आणि ठरवले शाळेत जायचे . शाळेत गेलो, डोळे भरून शाळा बघितली. एका खोलीत चालू झालेल्या त्या शिक्षण यज्ञाने चांगलीच भरारी घेतली होती . सर्व सर आणि बाई यांना भेटलो पण आमचे सगळ्यांचे आवडते गोटखिंडीकर सर पेठे हायस्कूल ला शिकवत असल्याचे  कळले . तडक पेठे हायस्कूल ला गेलो आणि सरांना भेटलो . नमस्कार केला आणि काय करतो ते तपशीलवार सांगितले . आणि निघतो म्हणत असतानाच माझ्या डोक्यात काय आले काय माहित आणि मी सरांना विचारले "सर, मांडवडे सर कुठे असतात हो आजकाल. " माझे subconcious मन बहुधा जागे झाले  असावे . "अरे याच शाळेत आहेत, भेटायचे का तुला " मी काही बोलायच्या आतच म्हणाले " ते बघ पेपर वाचत आहेत. जा जाऊन भेट"

पेठे हायस्कूल ला पेपर वाचण्यासाठी लाकडी stand असायचे आणि तिथे मांडवडे सर पेपर वाचत पाठमोरे उभे होते . मी गेलो आणि पाठीमागे उभं राहून हाक मारली "सर". सर वळले, तीच अंगकाठी, फक्त वयोमानानुसार काय चेहऱ्यात बदल पडला असेल तेव्हढाच. मित्रानो, विचार करा मी सोळा वर्षांनी सरांना भेटत होतो . मी वयाच्या १ १ व्या वर्षी त्यांचा विद्यार्थी होतो आणि आता २ ७ व्या वर्षी एक तरुण म्हणून त्यांना भेटत होतो . माझ्यासारखे हजारो विद्यार्थी त्यांच्याकडे शिकून गेले असतील . माझा आकार, उकार, उंची, रुंदी सगळंच काही बदलले होते .

पाया पडलो आणि म्हंटले " सर ओळखले का" मनात खात्रीच होती कि आता आपला सगळा इतिहास सरांना सांगावा लागेल आणि तेव्हा ते ओळखतील. डोळ्यावरचा चष्मा त्यांनी कपाळावर घेतला आणि माझ्याकडे निरखून बघितले, एक स्मितहास्य केले आणि म्हणाले…………………………  " राजेश भास्कर मंडलिक"………  मी अवाक. १ ६ वर्षानंतर एखादे सर म्हंटले असते "नाही ओळखले बुवा" किंवा "चेहरा ओळखीचा वाटतो आहे" किंवा "कुठल्या शाळेचा रे तू" आणि इथे हे सर मला हाक मारता आहेत पूर्ण नावानिशी. मी जाम खुश झालो, वाटले मी सरांचा आवडता विद्यार्थी, त्यामुळे नाव लक्षात असेल . फार भारी वाटत होते .

आणि "नितीन सुरेश कुलकर्णी " कुठे असतो. परत एक धक्का, "क्षिप्रा वसंतराव कडेकर" कुठे असते , आणि "प्रताप बालाजी निकम" "अतुल गोपालकृष्ण कुलकर्णी" "प्रसाद चंद्रशेखर राजवाडे" "अनुराधा बसवेश्वर पाटील" "राजेश लक्ष्मण गोडबोले"  ……………………. सरांना अक्षरश: पूर्ण वर्ग आठवत होता आणि आश्चर्याने त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती द्यायचा प्रयत्न करत होतो .  सुदैवाने सगळीच मुले/मुली आयुष्यात स्थिर स्थावर झाली आणि सरांच्या चेहऱ्यावर त्यांची माहिती ऐकून एक विलक्षण समाधान दिसत होते .

घंटा वाजली, आणि सर म्हणाले "तास आहे, भेटू परत कधी तरी" भारावलेल्या अवस्थेत मी त्यांना परत नमस्कार केला आणि पेठे हायस्कूल नामक ज्ञान मंदिरातून मार्गस्थ झालो . 


(हे सगळे लिहिताना मी माझी स्मरण शक्ती किती भारी आहे हे सांगण्याचा प्रयत्न सांगतो असे कुणाला वाटत असेल…………………………………. तर ते योग्य वाटतं आहे. असो )

1 comment:

  1. अप्रतिम सिम्पली क्लास अपार्ट

    ReplyDelete