Tuesday 24 September 2013

अकेले हम अकेले तुम

जीवनात तडजोड म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात. यशला काशीबाई नवले कॉलेज ला इंजिनीरिंग ला प्रवेश मिळाला (गंगेत घोडे न्हाले. हो तेव्हढा मोठा झाला आहे यश). घरापासून कॉलेज १६ किमी लांब म्हणून नांदेड सिटी मध्ये मित्राचं घर भाडयाने घेतलं. (एक वर्तुळ पूर्ण झाले. माझी जन्मभूमी मराठवाडयातील नांदेड, पुण्याजवळील नांदेड गावात कंपनी म्हणून कर्मभूमी नांदेड आणि आता वास्तव्य हि तिथेच). वयाच्या ४५ व्या वर्षी घर एकटयाने चालवायची अघोरी  जबाबदारी अंगावर पडली. आणि तिकडे, म्हणजे मूळ घरी, आनंद सोहळा चालू आहे . तसं मी टूर वर गेल्यावर उत्सव साजरा व्हायचा. पण तो उत्सव महिन्यातून एकदा वा दोनदा. आता म्हणजे शनिवार संध्याकाळ ते सोमवार सकाळ पर्यंत कळ सोसायची  कि नंतर आनंदी आनंद.  असो.

घर सांभाळायला लागल्यानंतर काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या .

- भांडे घासत असताना नळ न सोडता ते घासणे अशक्य आहे . आमच्या मूळ घरच्या मोलकरणीची मी मनापासून माफी मागतो की मी उगाच तिच्यावर ओरडायचो

- सकाळी चहा बनवताना एकतर साखर किंवा चहा किंवा दुध यापैकी काहीतरी सांडणे अनिवार्य आहे .

- दुध गरम करताना उतू जाऊ न देणे हे फक्त दैवी शक्ती असणार्या व्यक्तीनाच शक्य आहे .

- आधी मला सकाळी फक्त पेपर वाचण्याचे काम  दिले होते. एवढी विविधांगी कामे सकाळी असतात आणि ती पूर्ण करून वेळेवर घराच्या बाहेर पडणे हे योगी माणसाचेच अंगी असू शकते, माझ्या नाही.

- किराणा भरण्या इतके सोपे काम कुठले नसावे असे मला वाटायचे. त्या समजुतीला पहिल्या महिन्यातच तडा गेला

- दूर राहिल्यामुळे बायकोच्या मनात आपल्याबद्दल आदर, दया वैगेरे भावना येतील असे वाटले होते आणि आश्चर्य म्हणजे तुम्हाला सांगतो……………… कि असे काहीच झाले नाही.

असो. एकंदर नवा अनुभव घेणे चालू आहे. नव्याचे नऊ दिवस हि संपले आहेत. बघू कसे आणि कुठपर्यंत झेपते ते.

No comments:

Post a Comment