Tuesday, 24 June 2014

Kay Mhanta

एक मिनीट, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की भाववाढ होऊ नये, म्हणून तुम्ही सत्ताबदल घडवून आणला. तर नाही हो, २०-२५ पक्षाच्या कडबोळ्यामुळे वेळच्या वेळी भाववाढ करता नाही आली म्हणून यूपीए गंडली होती. आणि ती न केल्यामुळे non decisive mode मधे अख्खा देश गेला होता. बाकी monetary policy सारख्या व्यापक गोष्टीवर खल करण्यासाठी  RBI आहे, आंतरराष्ट्रीय अर्थकारण आहे ज्यातलं तुम्हा आम्हाला (बरं ठीक, आम्हाला) घंटा कळत नाही. परराष्ट्रीय धोरण ठरवायला वडील लोकं बसले आहेत आणि तिथेही आपल्या think tank बरोबरच जगभरातले तज्ञ त्या धोरणावर परिणाम करत असतात.
>
> Basically पूर्ण समाजामधे आणि पर्यायाने देशात एक gloominess आला होता. मरगळ आली होती. विकासाचं चाक गरागरा फिरता फिरता त्यांची गती कमी होतं गेली होती. आणि ती गती परत देऊ शकू असा विश्वास देण्यात आधीचं सरकार पूर्ण अपयशी ठरलं होतं. आणि त्याबरोबरंच समाजकारण भलत्याच दिशेने गेलं होतं आणि यातला सगळ्यात कळीचे मुद्दे होते  timid secularism, लादलेली घराणेशाही, खुलेआम चघळल्या जाणार्या corruption च्या केसेस, त्याबरोबरंच शेतकर्यांच्या आत्महत्या, पाण्याचं ढासळंत जाणारं नियोजन, वीजेची non availability, बर्याच राज्यात झालेली अंतर्गत सुरक्षेची वाताहात, आणि यात काही राजकारण्यांनी अपशब्द वापरत सामान्य जनतेची अवहेलना हे आग ओतत गेली.

तेव्हा वाढ यूपीए सरकारने केली, आम्ही फक्त implement केलं असं समर्थन करणं हे हास्यास्पद आहे. धमक असेल तर असं म्हणायला पाहिजे की अपरिहार्य कारणामुळे आधीच्या सरकारने ही भाववाढ टाळली होती, आता हीच संयुक्तिक आहे, दोन ते तीन वर्षाचा वेळ द्या त्यानंतर पुढची भाववाढ टाळू, थोडक्यात inflation rate वर क़ाबू आणू असा संदेश आणि विश्वास लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. 
 
चला, या निमित्ताने  एक तर कळले कि बहुमतात ताकद आहे. फार फार तर ३ किंवा ४ राष्ट्रीय पक्ष रहावेत आणि ते alliance वैगेरे भानगड नसावी. काही कामाची नसते.
 

Thursday, 19 June 2014

लिफ़्ट

दिल्ली च्या कस्टमर चा स्पिंडल repair केला होता.  तो म्हणाला पैसे मी तुला पुण्यातच द्यायची व्यवस्था करतो. त्यावेळेस मी फारंच माज करायचो, म्हणजे आधी पैसे मग माल. चितळे किंवा काका हलवाई स्टाईल. मी म्हणालो ठीक आहे.

दुपारी दोन च्या समोर फोन किणकिणला. समोरून एक मंजुळ आवाज आला. स्त्रीचा फोन किणकिणतो, माणसाचा रेकतो.  "सर, अमितजी की बहेन बात कर रही हू. वो पैसे कलेक्ट करने के लिए आप आ सकते हो क्या" मी म्हणालो "कहा आना है" ती म्हणाली "मेरे घरपे, पिंपळे सौदागर में" मी "कभी आऊँ" ती "शामको ६:३० बजे"

अहाहा, म्हणजे किती जमेच्या बाजू बघा, एकतर मंजुळ आवाजाची बाई, घरी बोलावते आहे आणि कशासाठी तर पैसे देण्यासाठी. आणि कधी तर संध्याकाळी ६:३० वाजता. एखादी फ़िल्मी situation यापेक्षा वेगळी काय असणार आहे. आता तिची मुलं आजोळी गेली आहेत आणि नवरा टूर वर गेला आहे अशा रम्य कल्पना तुम्ही लढवा.  पैसे देण्यासाठी मला कुणीही म्हणजे अगदी कुणीही, अगदी कुठेही बोलावलं तर  एका पायावर तयार असतो. तर असो.

शक्यतो मी सकाळी ७:३०-८ ला आंघोळ केली की या हँडसम, पण रंग गेला तर पैसे परत, अशा चेहर्याला परत २४ तासानेच पाणी लागतं. त्यादिवशी मात्र मी कंपनीच्या बाथरूम मधे अगदी साबण लावून खसखस चेहरा धुतला. आमच्या कंपनीत एक हिरो सौंदर्य प्रसाधने आणतो, त्याचाही वापर झाला. तो माझ्याकडे डोळे विस्फारून बघत होता. मी त्याला बाय म्हणत शीळ वाजवत माझ्या मर्सिडीज़ चा स्टार्टर मारला. खरंतर सॅंट्रो होती, पण इतका बहकलो होतो की ती मला मर्सिडीज़ वाटत होती. माहोल तयार व्हायला पाहिजे ना!

पिंपळे सौदागर ला पोहोचलो. एव्हाना माझे २-३ फोन झाले होते अनिताशी. हो अनिताच नाव होतं. खरंतर मी मॅडमच संबोधत होतो, पण मला कळलं की नाव अनिता आहे. इथं लिहायला काय हरकत आहे, नाही का?. चौथ्या मजल्यावर घर होतं. गाडी पार्क केली. (वाॅचमन चा लेख आठवतो का, हो म्हणजे यहाँ नहीं, वहाँ, तेडी लगी थोड़ी सीधा वैगेरे नाटक झालं).

झालं, (कुठे काय, लिहीतो आहे अजून) उद्वाहन यंत्रात, मराठीत लिफ़्ट आणि क्लासिकल इंग्रजीत त्याला एलेव्हेटर असे संबोधतात, लिफ़्ट बरं आहे, बसलो. म्हणजे उभा राहिलो. आणि ती चौथ्या मजल्याकडे कूच करती झाली. तिचा एक स्पीड असणार, पण मला उगाच ती हळू चालली आहे असं वाटत होतं.

आणि अघटित घडलं. लिफ़्ट दुसर्या आणि तिसर्या मजल्याच्या मधे असताना वीज गेली. किती चुकीच्या वेळेला वीज गेली. मॅडम मला ट्रॅक करत असल्यामुळे तिला माहीत होतं की मी लिफ़्ट मधे आहे. लाईट जाऊन लिफ़्ट बंद पड़णे ही माझ्यासाठी फारंच casual गोष्ट होती. कारण जनरेटर बॅक अप वर ती दोन किंवा फारतर पाच मिनीटात चालू होणार हे माहिती होतं. ते न होता अचानक आवाज यायला लागल "वाॅचमन, कहा हो, अरे हमारे गेस्ट है लिफ़्ट में, अभीतक जनरेटर चालू क्यूँ नहीं हुआ. वाॅचमन, वाॅचमन" थोडक्यात यजमानीण बाई अस्मादिकाची चिंता करत ज़ोर जोरात बोंबलत होत्या. फोनवर कसला मंजुळ आवाज होता राव. इथे पहिला भ्रमनिरस झाला.

वाॅचमन पाच मिनीटे झटला जनरेटर चालू करण्यासाठी. त्या असफल प्रयत्नानंतर आणि अनिता मॅडमच्या कोकलण्यामुळे ते काम सोडून तो माझ्या मदतीसाठी वरती धावत आला. त्याच वेळेला अनिता चौथ्या मजल्यावरून तिसर्या मजल्यावर आली. कसली घामाघूम झाली होती, म्हणजे नाकी डोळी नीट्स होती पण त्या वाॅचमनला तिने पार भंडावून सोडलं होतं आणि घाबरल्यामुळे विचित्र दिसत होती. "अरे कुछ तो करो, हमारे मेहमान है. क्या ये सोसायटी है. मेहमान को कुछ हो जाएगा" मी म्हणालो "मॅडम आप घबराइए नहीं, मैं बिलकुल ठीक हू. आप वाॅचमन को बिलकुल
tension मत दिजीए" मग वाॅचमनला म्हणालो "लाईट कभी आएगी" तो "टाईम लगेगा" मी " तो तीसरे माले के  गेट का
चाबी है क्या? " तो धावत गेला. गेटवरून चावी घेऊन आला. मनात आलं, काय घडायला पाहिजे होतं आणि काय घडत होतं.  हे सगळं बि घडत असताना अनिताची बडबड चालूच होती. मी म्हणालो "बये, जरा गप बसतेस का. मी इथे निवांत आहे आणि तु काय बडबड लावली आहेस" हे सगळं सांस्कृतिक हिंदीत

वाॅचमन आला, त्याने गेट उघडलं. आता मला वर खेचण्याएवढी जागा तयार झाली होती. मी हात वर केला आणि म्हणालो "ओढ़ मला" हे सगळं वाॅचमनला बरं का, नाहीतर तुम्हाला वाटायचं.......   मॅडम गालावर हात ठेवून (तिच्याच) माझी आणि वाॅचमन ची कसरत बघत होती. शेवटी जॅकीचॅन सारखी उड़ी मारत मी बाहेर आलो. उपमा जास्तंच भारीची दिली, घ्या सांभाळून. मी वरती आल्यावर मला मॅडम काय करेल या कल्पनाविश्वात असतानाच ती म्हणाली " जाओ, जनरेटर ठीक करो"

यांच्या पुढची गोष्ट फारंच नीरस आहे. म्हणजे वर जाणे, पैसे घेणे आणि निघणे.

खरंतर मी आज चेन्नईत आहे आणि सकाळी पेपर मधे बातमी वाचली लिफ़्ट मधे घाबरून मृत्यु. आपल्यातले पण बरेच जण लिफ़्ट बंद पडली की घाबरतात, आरडओरडा करतात. असं काही करू नका. शांततेत घ्या, तुम्ही व्यवस्थित बाहेर पडाल. लेखातला विनोदाचा भाग सोडून द्या. पण लिफ़्ट शी खेळ करू नका आणि त्याचा जास्त  फोबिया ठेवून नका.  

Tuesday, 17 June 2014

चायना मार्केट

कोण कुठला देश पण मला चायना किंवा चीन या देशाबद्दल विलक्षण मत्सर आहे. म्हणजे वर्गामध्ये मागच्या बाकावर बसलेला एखादा वांड मुलगा, जो शिक्षकांची टिंगल करायचा, पोरीबाळींची छेड काढायचा, आढ्यताखोर असा तो मोठेपणी एखादी top क्लास सेदान घेऊन, माझ्यासारख्या तथाकथित सभ्य, हुशार माझ्या hero होंडा समोर हॉर्न वाजवत उभा राहिला कि जसे वाटेल तसे मला चीन बद्दल वाटते.

खरंतर चीन ला मी एकदाच गेलो आहे २००५ साली. ( तसं मी बर्याच देशांना एकदाच गेलो आहे, पण असं लिहिले कि शान वाढते). मुठभर लोकांनाच भेटलो आहे. (खरं तर चीन च्या मानाने चिमुटभरच म्हणायला पाहिजे नाही का). त्यावरून त्या अख्या देशाचा अंदाज करणे म्हणजे मूर्खपणाच आहे. पण ज्या काही लोकांना भेटलो, आणि हे सगळे industrialist बरं का, ते एकाहून एक गर्विष्ठ आणि चालू होते. आता एकाच segment मधील जवळपास २० जणांना भेटलो आणि त्यातला एक हि जण मला नोटेबल वाटू नये हे जरा विचित्रच नाही का? तुम्हाला खोटं वाटेल पण बहुतेक बिझिनेस डील रात्रीच्या पार्टी मध्ये. पार्टी नंतर काय काय अजून डील होत असतील ते वेगळेच.

चीन मध्ये फसलेल्या किमान तीन तरी माझ्याकडे कहाण्या आहेत आणि ऐकीव नाही, एकदम आपले जिगरी दोस्त आहेत. पण अक्षरश: जीव मुठीत धरून पळून यावं लागलं होतं नाहीतर आयुष्यभरची कमाई गमावून बसले असते.

मला सूद्धा एका कंपनीने एजन्सी ऑफर केली  होती. मी एक questionnaire बनवून पाठवले ज्यात काही technical, काही commercial तर काही लीगल प्रश्न विचारले होते. त्या नंतर मला त्यांनी contact केलं नाही.

अजून एक माझं observation आहे कि तिथे बायका खूप काम करतात. INTERNATIONAL मार्केटिंग मध्ये तर बायकाच भेटतील. वेस्टर्न जगाशी affinity वाढावी म्हणून स्वत:ची नावं बदलतात. मध्ये तर मला अस्मिता नावानी चीन मधून मेल आली  कि आमचे product विकत घ्या म्हणून. आता बोला. पण UK  च्या माझ्या एका मित्रानी सांगितलं कि top management मध्ये बायकांचाफार  कमी सहभाग असतो.

बाकी POLITICAL SYSTEM  बद्दल काय बोलणार. ते तर सगळ्यांनाच माहित आहे. banking किंवा accounting system च्या नावाने आनंद आहे.

या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं कि आपण त्या चीनशी competition वैगेरे करण्याच्या भानगडीत पडू नये. एखादा गर्विष्ठ, माजोरडा माणूस सुद्धा अति श्रीमंत बनतो पण त्याची पत बाजारात काहीच नसते तसं हे चीनचा प्रकार आहे.  न पेक्षा आपण natural resources preserve करणाऱ्या पण भांडवलशाही ला हाताशी धरून समाजाचं कल्याण करणाऱ्या
जर्मनी सारख्या देशाचा आपण आदर्श ठेवावा असं मला वाटतं.

(मला माहित आहे कि सदर comment मध्ये analytical approach कमी असून sentimental approach जास्त आहे) 

Sunday, 8 June 2014

मुलाखत

मुलाखत 

आज आणि उद्या कंपनीत walk in interview आहेत. गेल्या १२ वर्षातील ही पाचवी वेळ. सकाळपासून बोलतो आहे विविध लोकांशी.

- काय एक एक कथा असतात़ राव एकेकांच्या. कधी अक्षरश: काटा येतो तर कधी डोळ्यात पाणी. पण मी पण रेटतो बरं का बोलणं. अजिबात कळत नाही त्यांना की मी आतून हललो आहे ते.

- ऐकलं होतं गावातल्या गावात नोकरी करण्याच्या हव्यासापायी मराठी माणूस मागे पडला आहे. सिंहगड रोडवरच नोकरी करायची म्हणून हज़ार रूपये कमी पगारावर यायला तयार आहेत लोकं. भरकटलोच मी.

- हातात जाॅब नसताना पहिला जाॅब सोडण्याची बेडरता वाढीला लागली आहे. (केजरावालांनी या प्रश्नाला राष्ट्रीय बनवले आहे)

- काही व्यावसायिक अतिशय हलकटासारखे लोकांना वागवतात. पगार उशीरा देणे, retention money ठेवणे, pf खाणे. Employee अक्षरश: मेटाकुटीला येतो.

- माझे काही समव्यावसायिक बोंब मारतात, लोकं मिळत नाहीत, हे धादांत खोटं आहे. माझ्या छोट्या कंपनीत तीन लोकं भरायचे आहेत, पहिल्याच दिवशी २० लोकं select केली आहेत. ठरवायचं आहे कुणाला घ्यायचं ते. खरं सांगू धंदा चालू केल्यापासून मला माणसांची कधी उणीव भासलीच नाही. बाकीचे म्हणतात लोकं टिकत नाहीत. माझ्याकडे तोही problem कमी. बारा वर्षात इनमिन ३-४ जण सोडून गेलीत. पगार काही फार जास्त नाही माझ्याकडे, पण social security असावी, माहीत नाही.

असो, शुभेच्छा़ द्या चांगली माणसं मिळण्यासाठी.


 -----------------------------------------------------------------------------------------------------------

झालं, संपलं ते interview प्रकरण. कसली बडबड केली दोन दिवस. शिणलो आहे.

जेव्हा जेव्हा मी interview घेण्याच्या प्रक्रियेतून जातो तेव्हा तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते (याआधी पण जाणवली होती पण हे ब्लॉग/फेसबुक वैगेरे प्रकार नव्हते, म्हणून व्यक्त केले नव्हते) कि आज जे काही आहे ना आयुष्यात ते घरच्यांच्या मुळे आहे. महिन्याचा किराणा, भाजी पाला, gas बिल, लाईट बिल, मुलांच्या admissions, त्यांची आजारपणं, लग्न, साखरपुडा, मुंजीचे कार्यक्रम, आई वडिलांच्या तब्येती कसला म्हणजे कसलाच घोर नव्हता हो जीवाला. म्हणजे तुम्हाला सांगतो वडिलांना cancer झाला होता. त्या तीन चार महिन्याच्या आजारपणात २-३ सुट्ट्या झाल्या असतील माझ्या. सकाळचा त्यांचा कार्यक्रम उरकून मी आणि वैभवी कामाला जायचो. सकाळी ६;३० लाच मी गडबड चालू करायचो. पण बाबांनी कधी कुरकुर नाही केली. खरं तर गेले त्या दिवशीही मी सकाळी कंपनीचा ड्रेस घालून तयार झालो होतो. नंतर काय वाटलं काय माहित, आईला म्हणालो "आज थांबतो घरात" आणि संध्याकाळी सहाला ते गेले. असो. सांगायची गोष्ट अशी कि मला आई वडिलांनी आणि वैभवीने अक्षरश: आधी माझा जॉब आणि नंतर धंद्यासाठी सोडून दिलं होतं आणि होतं का, अजूनही आहे. दौर्यावर जायचं किंवा conference ला जायचं म्हंटला कि मी फक्त सांगतो "निघालो". गेल्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत ("झगमगत्या" असं लिहायचा मोह अनावर होतो, पण किती लाल करून घ्यायची त्याला मर्यादा आहे त्यामुळे आवरतो) घरच्या कामासाठी कंपनीचं काम hamper झालं आहे असं मला तरी आठवत नाही. २०११ साली अमेरिकेला चाललो होतो. संध्यकाळी ६ ला निघायचं आणि सकाळी ११ वाजता मोठा मुलगा football खेळताना डोक्यावर पडला आणि बेशुद्ध झाला. मी कंपनीतून हॉस्पिटल ला पोहोचेपर्यंत परिस्थिती आटोक्यात आली होती. CT स्कॅन होऊन नंतर सगळं नॉर्मल आहे असाही report आला. वैभवीने सांगितलं "तू जा बिनधास्त. मी बघते" नंतर सगळं सुरळीत पार पडलं.

आणि या पार्श्वभूमीवर लोकांना किती प्रॉब्लेम असतात राव. या कौटुंबिक बाबींसाठी career ची धूळधाण  उडालेले मी किमान १५ जण तरी पहिले. कुणाला आई वडिलांचं आजारपण तर कधी मुलाचं. कधी कौटुंबिक वाद तर कधी भावाने केलेलं कर्ज. एक ना अनेक. बर्याचदा वाटायचं फेकतात कि काय, मग मी नजरेला नजर भिडवायचो आणि ती नाही खोटं बोलत. ऐकायचो, आणि वाटायचं "ये बाबा उदयापासून च कामाला. किती त्रास करून घेशील जीवाला". मनावर दगड ठेवूनच सांगितलं "पुढच्या आठवडयात कळवतो".

थोडक्यात मतितार्थ काय तर, पंख देवाने सगळ्यांनाच दिलेले आहेत पण त्याच्यात उडण्यासाठी बळ तुमच्या कुटुंबातील eco system देते यावर गेल्या दोन दिवसात शिक्कामोर्तब झाले आहे.

चला, गेली तीन चार महिने बेफाम फिरलो आहे. जरा निवांत होतो आता काही दिवस. आज तर थकेपर्यंत विश्रांती घ्यायचा विचार आहे. झोपे मध्येच  दमून बघतो जरा.

Monday, 2 June 2014

वॉचमन

हे security guard, ज्याला मराठीत वॉचमन असेही म्हणतात, हे एक अजब character आहे. समस्त देशातल्या रिक्षा ड्रायवर प्रमाणे ह्यांच्यात unique qualities आहेत. यांच्याकडून सलाम कमवायचा असेल ना तर जाता येता, खरं तर एकदाच, एक स्मितहास्य पुरेसं असतं. आणि हो स्मितहास्यच बरं का. तुम्ही फिदी फिदी हसलात ना कि मग तो हि तुमच्यापेक्षाही भीषण हासतो. आपण लोक पण बावळट असतो (आपण हे माझ्यासाठीच वापरलेले आदरार्थी वचन आहे), त्याच्यासमोरून flat face (यालाच सांस्कृतिक इंग्रजीत iron face असेही म्हणतात) जातो आणि हळूच डोळ्याच्या कोपर्यातून हळूच बघतो वॉचमन सलाम ठोकतो कि नाही. एक दोनदा तो करतोही पण नंतर तो हि तुमच्या पेक्षाही सपाट चेहरा करून उभा राहतो. आणि मग आपण त्याच्या manager ला फोन करून सांगतो "अरे क्या वो तुम्हारा वॉचमन उसको साधा manners नही सलाम करनेका" हे म्हणताना आपण आपला  साधं हसण्याचा शिष्टाचार बासनात गुंडाळून ठेवला हे सोयीस्कर रित्या विसरून जातो.

या वॉचमन जमातीची एक विचित्र सवय आहे. तुम्ही कुठलेही वाहन, समजा माझ्याकडे कार आहे, (सदर पोस्टचा उद्देश माझ्याकडे कार आहे हे सांगण्याचा आहे असा तुमचा समाज असेल तर तो बरोबर आहे), तर कार बंद करून खाली उतरलो आणि सेन्ट्रल लॉक केलं कि हा पठ्ठ्या पळत येणार "साहब, यहा गाडी लगाना मना है" आणि हे म्हणताना त्याच्या तोंडावर एक विलक्षण असुरी आनंद असतो. आणि हे माझ्याबरोबर अगणित वेळा झालं आहे. समस्त हॉटेल्स, देवळं आणि कंपन्या. कंपनीत visit ला गेलो कि "साहब यहा नही, वहा. थोडी तेडी लगी है, सिधी करो. सिधी लगी है, आडी करो. दुसरी गाडी आनेवाली है, घीस जायेगी"

अरारा . नुसता संताप व्हायचा. हो व्हायचाच. आता नाही होत. त्यादिवशी याची देही याची डोळा तो प्रसंग बघितला आणि…………… तर ते असं झालं मी बंगलोर ला होतो. (पुण्याला असतो कधी बाबा) हॉटेल चाणक्य मध्ये भरपेट नाश्ता करून (भरपेट म्हणजे काय हो इडली वडा आणि उपमा. आणि हो त्याबरोबर चटणी. बंगलोर ला सांभार/सांबर/सांबार अनलिमिटेड. हेच. फार चैन म्हणजे डोसा) मी बाहेर आलो आणि मला कट मारून एक अलिशान BMW, दरवाज्यासमोर भिंत होती, त्याला लागून उभी राहिली. स्वत:च गाडी चालवणारा मालक बाहेर आला. सेन्ट्रल लॉक चं बटन दाबलं आणि रीतिरिवाजाप्रमाणे वॉचमन पळत आला "साहेब इथं गाडी लावू नका" काही वाक्य मला कुठल्याही भाषेत समजतात. त्यापैकीच हे एक. मालकाच्या तोंडावर मग्रुरी, राग याचं एक लोभस मिश्रण. "का"    

"साहेब, ट्रक येणार आहे माल घेवून"
"अरे दोन मिनीटाच काम आहे, आलोच आत जाऊन" (खरं तर हादडायला आला असतो ३० मिनिटे कमीत कमी)
"साहेब, अहो नका लावू. प्रोब्लेम आहे, मालक रागावतात"
"अरे आधी नाही का सांगायचं. आता लॉक केली गाडी. राहू दे"

साहेब, साहेब म्हणे पर्यंत तो आत गेला पण आणि वॉचमन दात ओठ खात दरवाजापाशी जाऊन उभा राहिला. चला मनोरंजनाचा कार्यक्रम संपला. माझी पण taxi येणार होती. वाट बघत होतो. तेवढयात "खळ खट्य्यक" असा आवाज आला. महाराष्ट्रात राहत असल्यामुळे मला या आवाजाचे महत्व चांगलेच माहिती होते. आणि बघतो तर काय BMW ज्या नारळाच्या झाडाखाली उभी होती तिथे दैवयोगाने त्या कल्पतरू वरून दोन नारळ सरळ त्या BMW च्या पुढच्या काचेचे वेध करते झाले. आणि त्या काचेचा चकनाचूर झाला. अगदी एखादी सुंदर ललना नटून थटून चालली आहे आणि एखादा रिक्षावाल्या मुळे खड्यातले पाणी तिच्या भरजरी ड्रेस वर उडते तसे. कर्णोपकर्णी हि बातमी आत बसलेल्या BMW च्या (आता कसली BMW) मालकाला कळली आणि तो तणतणत बाहेर आला. बघितल्या बघितल्या डोकं धरून बसलाच. आणि त्या वॉचमन वरच भडकला "साला पहिल्यांदा सांगायचं नाही का" वॉचमन वर भडकल्या वर पहिले शिवी का येते हे काही कळत नाही. तो वॉचमन आता अगदी स्थितप्रज्ञ झाला होता. आणि अतिशय सूक्ष्म हसत होता. मालकाच्या कडे आता बोंब मारण्याशिवाय काहीच नव्हते.

परवा भोसरी ला गेलो होतो कंपनीत visit ला. सीन रिपीट. मी म्हणालो "पाच मिनिटात चेक घेऊन येतो"
 "साहेब, पाण्याचा tanker येतो आहे. उगाच घासली कुठे गाडी, तर आम्हालाच शिव्या दयाल"

गप परत आलो आणि त्या वॉचमन च्या मार्गदर्शनाखाली त्याला पाहिजे तिथे, पाहिजे तशी गाडी लावून टाकली. (यावेळेस खूप मदत करतात हि मंडळी) त्याचा शाप कसा असतो ते पाहिलं होतं मी.

"security" वॉचमन ऐवजी अशी हाक मारा. एकदम कडक "yes sir " म्हणतात कि नाही बघाच.  




रेल्वे डायरी

दिल्ली observations

दिल्ली गुरगाव हाय वे वर टोल नाका होता. कसला भीषण प्रकार होता तो. सगळ्यांसाठीच, commuter साठी आणि ते टोल गोळा करणारे. ते तर रोबो झाले होते. लोकांनी लिगल लढा दिला आणि टोल बंद झाला. त्या लढ्याबद्दल लिंक्स आहेत. वाचा. जर valid reason असेल तर शासन नमतेच. कारण शासक ही माणसंच आहेत.

मला या दिल्लीकरांचे फार कौतुक वाटते. बर्याच मंडळींना अलिशान कारचा शौक नाही. म्हणजे wagon r किंवा alto सुळसुळ पळताना दिसतात. आणि ४२-४३° सेंटिग्रेड (सकाळी ८:३० वाजता चटके बसत होते) मधे सुद्धा AC वापरत नाही, पण या अशा गाड्यांवर नोकरीवरचा ड्रायव्हर मात्र आवर्जून दिसतो. अंतरं अशी मरणाची आहेत की ड्रायव्हर ठेवावाच लागतो. मग ८००० रूपयाचा ड्रा़यव्हर ठेवण्यासाठी बाकी cost saving.

दिल्ली पोलीसचा नियम आहे pan card हॉटेलमधे ओळखपत्र म्हणून चालत नाही.

पुणे-बंगलोर किंवा चेन्नईचं airfare बर्याचदा affordable असतं, पण दिल्ली म्हणजे लूट. आतासुद्धा ११५०० ते १२००० तिकीट होतं विमानाचं वन वे. नाही परवडत. मग जाता येता ट्रेन. वेळ जातो पण ही कसरत करावी लागते. लिहायचं कारण हे की जेव्हा जेव्हा ट्रेन नी प्रवास करतो, माझं रेल्वेबद्दल प्रेम आणि आदर वाढत जातो. टॉयलेट आणि स्टेशनची स्वच्छता या दोन गोष्टी जर सुधरवल्या ना तर साला रेल्वेला पर्याय नाही. २ रू प्रति किमी मधे AC, बेडरोल, जेवण, नाश्ता. घर बनतं हो २० तासाचं.

शुभरात्री.


स्थळ : भुसावळ स्टेशन. मी प्लॅटफाॅर्मवर ते गाडीच्या दरवाजात.

ते: भैया, लेट है क्या?
मी: लग तो ऐसा ही है, देड घंटा
ते: कहा लेट हुई, भोपाल आते
मी: पता नहीं, शायद (त्यांच्या डोळ्यात आश्चर्य)
ते: दौंड कब पहुँचेगी
मी: शायद दो बजें
ते: शायद. हमम (डोळ्यात महदाश्चर्य)
मी: आप दिल्लीसे
ते: नहीं, सोलापूरसे. दौंड से सोलापूर जाएँगे by car.
मी: महाराष्ट्र के हो, मराठी
त्यांनी होकारार्थी मान डोलावल्यावर सुटलोच मी. इंजिनियरिंग इंडस्ट्रीचे. मग काय पाच मिनीटात दोस्ती आणि अर्धा तास गप्पा. बिझीनेस कार्ड exchange. पुढच्या आठवड्याभरात सोलापूर visit फ़िक्स
मी: तुमच्या हिंदीवरून वाटलं नाही हो तुम्ही मराठी असाल म्हणून. फसलोच मी
ते: (हसत) काय सांगायचं तुम्हाला. तुमचा निळा शर्ट. कोच अटेंडट चा पण तोच रंग. मला वाटलं तुम्हीसुद्धा........................

 


मगाशी दिसलेलं डोळ्यातील आश्चर्य आता शब्दातून लाजत टपकत होतं.

फेसबुकचं कालपासून निवांत चर्वण करत होतो. समोरचा माणूस काय बोलतो आणि कसा दिसतो यावरून त्याचा अंदाज बांधू नये हेच खरं.

तिरस्करणीय विरोध आणि वैचारिक विरोध, आंधळं समर्थन आणि वैचारिक समर्थन यांच्यात thin line वैगेरे काही नाही चांगला भरपूर फरक आहे. जाणवतंच अगदी.

अनुकरण केलेले लिखाण आणि स्वत:चे विचार. थोडं अवघड जातं कारण बेमालूम असतं, पण कळतंच. भोकरकरांच्या लिखाणात शिव्या बसतात चपखल मेकॅनो सारख्या. तुमच्या नाही. वाघमारे सरांच्या लिखाणातील जळजळ आतून आलेली असते. तुम्ही ओढून ताणून आणलेली असते. उगाच आपलं वर गेलेल्या नेत्यांचा एकेरी उल्लेख केल्याने टाळ्या मिळतीलही कदाचित, पण हाताला आलेल्या मुंग्या जायच्या आधी तुमचे विचार विस्मरणात जातात.

मनमाड आलं. कित्येक वर्षांनी. १९७९-८०. पंचवटी एक्सप्रेस नी उतरून ब्राॅडगेजवरून मीटर गेज ची अजंता एक्सप्रेस. रात्री अकराची वेळ. आईच्या कडेवर लहान भाऊ. एका हातात बॅग. छोट्या पावलांने धावणारा मी आणि मागे धोतराचा सोगा आणि पिशवी सांभाळत रूळ सांभाळत चालणारे आजोबा.
डोळे भरून पुन्हा बघत डोळे मिटले.

फ़्रूटी मिळाली, नाहीतरी आवंढ्याबरोबर काहीतरी गिळायला हवंच होतं.

Bye