Monday, 2 June 2014

वॉचमन

हे security guard, ज्याला मराठीत वॉचमन असेही म्हणतात, हे एक अजब character आहे. समस्त देशातल्या रिक्षा ड्रायवर प्रमाणे ह्यांच्यात unique qualities आहेत. यांच्याकडून सलाम कमवायचा असेल ना तर जाता येता, खरं तर एकदाच, एक स्मितहास्य पुरेसं असतं. आणि हो स्मितहास्यच बरं का. तुम्ही फिदी फिदी हसलात ना कि मग तो हि तुमच्यापेक्षाही भीषण हासतो. आपण लोक पण बावळट असतो (आपण हे माझ्यासाठीच वापरलेले आदरार्थी वचन आहे), त्याच्यासमोरून flat face (यालाच सांस्कृतिक इंग्रजीत iron face असेही म्हणतात) जातो आणि हळूच डोळ्याच्या कोपर्यातून हळूच बघतो वॉचमन सलाम ठोकतो कि नाही. एक दोनदा तो करतोही पण नंतर तो हि तुमच्या पेक्षाही सपाट चेहरा करून उभा राहतो. आणि मग आपण त्याच्या manager ला फोन करून सांगतो "अरे क्या वो तुम्हारा वॉचमन उसको साधा manners नही सलाम करनेका" हे म्हणताना आपण आपला  साधं हसण्याचा शिष्टाचार बासनात गुंडाळून ठेवला हे सोयीस्कर रित्या विसरून जातो.

या वॉचमन जमातीची एक विचित्र सवय आहे. तुम्ही कुठलेही वाहन, समजा माझ्याकडे कार आहे, (सदर पोस्टचा उद्देश माझ्याकडे कार आहे हे सांगण्याचा आहे असा तुमचा समाज असेल तर तो बरोबर आहे), तर कार बंद करून खाली उतरलो आणि सेन्ट्रल लॉक केलं कि हा पठ्ठ्या पळत येणार "साहब, यहा गाडी लगाना मना है" आणि हे म्हणताना त्याच्या तोंडावर एक विलक्षण असुरी आनंद असतो. आणि हे माझ्याबरोबर अगणित वेळा झालं आहे. समस्त हॉटेल्स, देवळं आणि कंपन्या. कंपनीत visit ला गेलो कि "साहब यहा नही, वहा. थोडी तेडी लगी है, सिधी करो. सिधी लगी है, आडी करो. दुसरी गाडी आनेवाली है, घीस जायेगी"

अरारा . नुसता संताप व्हायचा. हो व्हायचाच. आता नाही होत. त्यादिवशी याची देही याची डोळा तो प्रसंग बघितला आणि…………… तर ते असं झालं मी बंगलोर ला होतो. (पुण्याला असतो कधी बाबा) हॉटेल चाणक्य मध्ये भरपेट नाश्ता करून (भरपेट म्हणजे काय हो इडली वडा आणि उपमा. आणि हो त्याबरोबर चटणी. बंगलोर ला सांभार/सांबर/सांबार अनलिमिटेड. हेच. फार चैन म्हणजे डोसा) मी बाहेर आलो आणि मला कट मारून एक अलिशान BMW, दरवाज्यासमोर भिंत होती, त्याला लागून उभी राहिली. स्वत:च गाडी चालवणारा मालक बाहेर आला. सेन्ट्रल लॉक चं बटन दाबलं आणि रीतिरिवाजाप्रमाणे वॉचमन पळत आला "साहेब इथं गाडी लावू नका" काही वाक्य मला कुठल्याही भाषेत समजतात. त्यापैकीच हे एक. मालकाच्या तोंडावर मग्रुरी, राग याचं एक लोभस मिश्रण. "का"    

"साहेब, ट्रक येणार आहे माल घेवून"
"अरे दोन मिनीटाच काम आहे, आलोच आत जाऊन" (खरं तर हादडायला आला असतो ३० मिनिटे कमीत कमी)
"साहेब, अहो नका लावू. प्रोब्लेम आहे, मालक रागावतात"
"अरे आधी नाही का सांगायचं. आता लॉक केली गाडी. राहू दे"

साहेब, साहेब म्हणे पर्यंत तो आत गेला पण आणि वॉचमन दात ओठ खात दरवाजापाशी जाऊन उभा राहिला. चला मनोरंजनाचा कार्यक्रम संपला. माझी पण taxi येणार होती. वाट बघत होतो. तेवढयात "खळ खट्य्यक" असा आवाज आला. महाराष्ट्रात राहत असल्यामुळे मला या आवाजाचे महत्व चांगलेच माहिती होते. आणि बघतो तर काय BMW ज्या नारळाच्या झाडाखाली उभी होती तिथे दैवयोगाने त्या कल्पतरू वरून दोन नारळ सरळ त्या BMW च्या पुढच्या काचेचे वेध करते झाले. आणि त्या काचेचा चकनाचूर झाला. अगदी एखादी सुंदर ललना नटून थटून चालली आहे आणि एखादा रिक्षावाल्या मुळे खड्यातले पाणी तिच्या भरजरी ड्रेस वर उडते तसे. कर्णोपकर्णी हि बातमी आत बसलेल्या BMW च्या (आता कसली BMW) मालकाला कळली आणि तो तणतणत बाहेर आला. बघितल्या बघितल्या डोकं धरून बसलाच. आणि त्या वॉचमन वरच भडकला "साला पहिल्यांदा सांगायचं नाही का" वॉचमन वर भडकल्या वर पहिले शिवी का येते हे काही कळत नाही. तो वॉचमन आता अगदी स्थितप्रज्ञ झाला होता. आणि अतिशय सूक्ष्म हसत होता. मालकाच्या कडे आता बोंब मारण्याशिवाय काहीच नव्हते.

परवा भोसरी ला गेलो होतो कंपनीत visit ला. सीन रिपीट. मी म्हणालो "पाच मिनिटात चेक घेऊन येतो"
 "साहेब, पाण्याचा tanker येतो आहे. उगाच घासली कुठे गाडी, तर आम्हालाच शिव्या दयाल"

गप परत आलो आणि त्या वॉचमन च्या मार्गदर्शनाखाली त्याला पाहिजे तिथे, पाहिजे तशी गाडी लावून टाकली. (यावेळेस खूप मदत करतात हि मंडळी) त्याचा शाप कसा असतो ते पाहिलं होतं मी.

"security" वॉचमन ऐवजी अशी हाक मारा. एकदम कडक "yes sir " म्हणतात कि नाही बघाच.  




No comments:

Post a Comment