Friday, 28 July 2023

इव्हॉल्व्ह

 दोन एक महिन्यापूर्वी मी राजकोटला होतो. माझा फोन खराब झाला होता म्हणून आमचा सेल्स मॅनेजर प्रणव आणि गुजरात प्रतिनिधी आशिष मी आय फोन घ्यावा यासाठी एका दुकानात घेऊन गेले. आय फोन चा पाहिजे तो कलर तिथं नव्हता म्हणून आम्ही ठरवलं की पुण्यात जाऊन घेऊ. पुण्यात आल्यावर प्रणवने माझ्या मागे आय फोन घ्या भुंगा लावायच्या आत मी माझ्या बजेट मध्ये बसणारा सॅमसंग फोन ऑर्डर करून टाकला. प्रणव मला म्हणाला सुद्धा "तुम्हाला जमत असूनसुद्धा तुम्ही का घेत नाही आय फोन?" मी उत्तरादाखल काही बोललो नाही. 

१९९५-९६ ची गोष्ट असावी. बाबांना निवृत्त होण्यास तीन चार वर्षे उरली होती. निवृत्त झाल्यावर राहण्यास घर असावे म्हणून औंध मध्ये एका सोसायटीत आम्ही घर बघितलं. आजूबाजूचे १ बीएचके दोन फ्लॅट घ्यावे असा प्लॅन होता. किंमत निगोशिएट करण्यासाठी आम्ही, मी बाबा आणि उन्मेष, बिल्डरच्या ऑफिस मध्ये गेलो. पूर्ण सोसायटी तयार झाल्यावर फ्लॅट विकायचे असा त्या बिल्डर चा लौकिक. बाबा एमएसईबी मध्ये. बिल्डर ही मराठवाड्यातील. बाबांना वाटलं की या दोन क्वालिफिकेशन मुळे बिल्डर व्यवस्थित बोलेल आणि  सहज किंमत कमी करून देईल. पहिल्यांदा बाबांचा टोन मित्रत्वाचा होता. पण बिल्डर काही टस की मस हलायला तयार नव्हता. सुरुवातीला नीट बोलणारा बिल्डरचा टोन थोडा अरोगन्सी कडे झुकू लागला. फ्लॅट्स तर आम्हाला आवडले होते. त्यावेळेसची आमची आर्थिक परिस्थिती कशी होती हे मला माहिती नाही, पण किंमत कमी करून बजेट मध्ये बसावं म्हणून बाबांचा स्वर नंतर अगतिक होऊ लागला. बाबा जितके हतबल होत गेले तितका बिल्डर वरचढ होत गेला. आणि आमच्या शेवटच्या प्रयत्नाला प्रत्युत्तर म्हणून बिल्डर दरवाजाजवळ गेला आणि तो दरवाजा उघडून उभा राहिलं. थोडक्यात त्यांनी आम्हाला त्याच्या ऑफिसमधून निघून जायला सांगितलं. 

एखाद्याचा स्वभाव असा इव्हॉल्व्ह होत जातो. आजही मला ती घटना आठवली की बाबांची हतबलता जाणवते. त्यातून माझा स्वभाव असा घडला की मी अशाच गोष्टी विकत घेतल्या की ज्या घेताना मला १% सुद्धा पैशाबद्दल अगतिक वाटणार नाही. पुढं फ्लॅट घेतले, गाड्या घेतल्या, त्या चालवताना "टॅंक फुल कर" याशिवाय फ्युएल भरलं नाही, परदेशात खर्च करताना टेचात क्रेडिट कार्ड पुढं केले. पण ते सर्व अशाच पद्धतीने की माझ्या सेल्फ एस्टीम ला कुठेही धक्का पोहोचणार नाही. माझ्या अनेक मित्रांचे आलिशान मॅन्शन आहेत, त्यांच्याकडे लक्झरियस कार्स आहेत, भारी फोन्स आहेत. मला त्यांच्याबद्दल कायम आनंद वाटत आला पण त्या गोष्टी माझ्याकडे नाहीत याबद्दल कधीही असूया वाटली नाही.  

बकेट लिस्ट मध्ये काही गोष्टी आहेत. त्या पूर्ण करणार ते स्वतःच्या औकातीत राहून. काही कारणाने त्या नाही घडल्या तर त्याचा गिला-शिकवा नसणार हे नक्की.  


Friday, 14 July 2023

मानसिकतेवर

 Well, I have experienced this quite a few times and learnt it hard way. If for some reasons, you are not going well in relationships, just move on. It helps both the involved. And more importantly, positive way. I am talking this in relation with business relationship, friendly relationship and even family relationship.


I have seen many business partnership which broke on bitter terms but I think what was more important was breaking off. Once it was broken, both the partners have followed their own path and did well. Or even if any of them did not do well, it was because of their own actions.

In fact, the wonderful fact of such moving on is that mostly you cross path again in future on happy note. Time kills the bitterness.

Any relationship which is impeding your development, it is better to sacrifice that relationship, however valuable it is. In terms of business, this can be applicable to working partners, employer-employee, customer-supplier or otherwise. We usually try to pull on such strained relations only to land in unhealthy situation, more so for your personal well being.

Remember, no one is indispensable in this world.

काही गोष्टी शिकण्यासाठी खूप मोठी किंमत मी चुकवली आहे. त्यातली एक गोष्ट आहे, ते म्हणजे काही नाती मला झेपत नसताना निभावण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षे गेली हे समजण्यासाठी की कुठलंही नातं हे स्ट्रेच करण्याची काहीच गरज नसते. तुटण्याआधी त्या नात्यातून बाहेर पडलं तर दोघांसाठी खरंतर तो फायद्याचा सौदा ठरतो. आणि हे कुठल्याही नात्यासाठी खरं आहे. मग ते व्यावसायिक संबंध असो, मैत्रीचं नातं असो किंवा अगदी कौटुंबिक नातं असो. थोडं वाचताना विचित्र किंवा अविश्वसनीय वाटेल पण हे माझं लर्निंग आहे. 

मी अनेक व्यावसायिक पार्टनरशिप या तुटताना बघितल्या आहेत. आणि अगदी वाईट पद्धतीने तुटताना पाहिल्या आहेत. पण आज मी ते आठवतो, तेव्हा हे जाणवतं की यातला सगळ्यात महत्वाचा आणि चांगला किंवा महत्वाचा भाग कुठला असेल तर ती पार्टनरशिप तुटणे. एकदा की हे नातं संपलं की बहुतेकदा दोन्ही पार्टनर्स ने आपले मार्ग वेगवगेळे केले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दोघांचं भलं झालं. आणि अगदीच कुणाचं भलं नाही झालं तर त्याचं उत्तरदायित्व हे दुसऱ्या कुणावर नसून स्वतःवर असतं, हा साक्षात्कार फार भारी असतो. 

गंमत म्हणजे, बऱ्याच केसेस मध्ये हे दोन पार्टनर्स नंतरच्या काळात एकमेकांच्या समोर आले आणि अगदी निवांतपणे एकमेकांना सामोरे गेले. दोघामधील कटुता ही काळ या औषधाने संपवली असते. 

जे नातं तुमच्या मानसिकतेवर आघात करतं, त्या नात्याचा त्याग करावा. तो लवकरात लवकर करावा या निष्कर्षाप्रत मी आलो आहे. कौटुंबिक नात्याबाबतीत हे अवघड असेल कदाचित पण लोक व्यावसायिक नातं सुद्धा ताणून धरतात. खरंतर व्यवसायामध्ये वर्किंग पार्टनर्स, कंपनी आणि त्याचे कर्मचारी, ग्राहक आणि सप्लायर या कुठल्याही नात्यामध्ये कटुता येते आहे असं जाणवलं तर ते नातं विसर्जित करावं. ते केलं नाही आणि मनाच्या विरुद्ध त्या नात्याला निभावत राहिलात, तर त्याचा परिणाम खूप वाईट होतो. 

कुठल्याही नात्याला पर्याय नसतो हा एक मोठा गैरसमज बाळगून असतो आणि त्याची मोठी किंमत चुकवतो. जितक्या लवकर हे कळेल तितकं तब्येतीला बरं. 

Thursday, 6 July 2023

देशाप्रती प्रेम

बऱ्याचदा इथल्या प्रचलित ट्रेंड च्या विरुद्ध कुणी काही लिहिलं तर बऱ्याच कॉमेंट कर्त्यांचा आव असा असतो असे लिहिणारे कुणी विदेशी लोक आहेत. माझ्यावरती पण ही बला येते.  पण एखाद्या पक्षाच्या धोरणाबद्दल, अजेंडा बद्दल जरा काही विरोध दर्शवला की फार मोठी चूक विरोधकाने केली आहे असा जो आव आणला जातो तो हास्यास्पद ठरतो. इन फॅक्ट मला हे आवर्जून सांगावं वाटतं की कामानिमित्त मला आणि माझ्यासारख्या करोडो लोकांना अनेक परदेशी लोकांशी बोलावं लागतं, परदेशात दौरे करावे लागतात. तिथं हे सारे लोक देशाचे अघोषित ब्रँड अँबेसेडर म्हणून वावरत असतात. देशापायी प्रेम हे त्यांच्या वागण्यातून, कृतीतून झळकत राहतं. 

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी मिडल ईस्ट मध्ये एका कस्टमर कडे गेलो होतो. तिथला अधिकारी कुठला जॉर्डन किंवा सीरिया असल्या तत्सम देशातला होता. त्याने माझ्या कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे विचारलं. माझ्या कंपनीत त्यावेळी सर्व मशिन्स या भारतीय बनावटीच्या होत्या. ते सांगितल्यावर तो मला कुत्सितपणे म्हणाला "अच्छा, तुला असं सांगायचं आहे की भारतीय मशिन्स वापरून तू इंटरनॅशनल क्वालिटी आणतोस?". त्याला मी विचारलं की "तू कधी भारतात आला आहेस का? एकदा ये आणि भारतात आणि माझ्या कंपनीत काय चालू आहे ते डोळ्याने बघ. आणि नंतर स्वतःचं मत मांड. तुझ्या या देशात मी देतो ती सर्व्हिस देणारं कुणी नाही म्हणून तू मला इथं बोलावलं आहेस, मी बिझिनेस मागायला तुझ्याकडे आलो नाही आहे." हे बोलताना माझा आवाज पण चांगलाच धारदार झाला होता. त्याचे दोन असिस्टंट भारतीय होते. ते मला डोळ्याने इशारा करत होते की जरा सबुरीने घे म्हणून. मी काही बधलो नाही. 

जर्मनीतल्या एका कंपनीने आपल्या इथल्या चुकीच्या वर्क प्रॅक्टिसेस बद्दल बेकार तोंडसुख घेतलं होतं. त्याला टाटा, इन्फोसिस सारख्या आणि माझ्या माहितीतल्या अनेक बेस्ट ह्युमन ऍसेट मॅनेज करणाऱ्या कंपनीची माहिती दिली. त्याने मग आमची कंपनी पाहिली. त्याचं मत बदललं. बरोबर येऊन भारतात काम करू यात अशी त्याने आम्हाला गळ घातली. काही कारणाने शक्य झालं नाही, पण भारताबद्दलचं त्याचं मत बदललं हे नक्की. 

कुणी विदेशी पाहुणा इथं आला की गरिबीचे फोटो काढतो. मी त्याला ठणकावून सांगतो की हे फोटो काढू नको. काही ऐकतात, काही ऐकत नाहीत. पण हे  सांगताना कचरत नाही. 

अनेक उद्योजक असे आहेत की जे आपल्या कामाच्या स्वरूपातून सामाजिक बांधिलकी जपतात. माझा एक मित्र आहे. एक प्रॉडक्ट ट्रेंड करायचा जपान हुन. चार लोक होते, कमिशन मिळायचं त्याला, सुखात होता. त्याने ते प्रॉडक्ट भारतात बनवायचं ठरवलं. मशिनरी घेतली, सत्तर लोक घेतले, व्हेंडर डेव्हलप केले आणि प्रॉडक्ट डेव्हलप केलं. थोडा प्रॉब्लेम मध्ये असतो, तेव्हा मी विचारलं सुद्धा त्याला " कशाला ही प्रॉडक्शन ची झकमारी करतोस?" तर तो म्हणाला "अरे हे जर केलं नाही तर आपल्या अस्तित्वाचा काय उपयोग? इथं रोजगारनिर्मिती झाली, जागा लागली, कस्टमर ला फायदा झाला प्राईसचा. आपल्या लोकांना जर काही काम मिळत असेल तर थोडा त्रास सहन करायला काय प्रॉब्लेम आहे?". उद्योगाचा मूळ उद्देश हा पैशापलीकडे असला ते माझ्यालेखी वंदनीय आहे. 

तेव्हा मित्रानो, तुमच्या आवडत्या नेत्याच्या किंवा पक्षाच्या विरोधात कधी कुणी चार शब्द बोलत पण असतील तर याचा अर्थ असा नाही की त्याचं देशावर प्रेम नाही आहे. देशावर या भारत भूमीवर त्यांचं पण प्रेम असतंच,  फक्त ते उन्मादी किंवा आक्रस्ताळी पद्धतीने फेसबुकवर प्रतिक्रियांद्वारे किंवा पोस्टद्वारे व्यक्त करण्याची त्यांना गरज भासत नाही तर ते व्यक्त करण्यासाठी त्यांनी वेगळं माध्यम वेगळं निवडलं आहे. 

तिरंगा फडकताना किंवा राष्ट्रगीत चालू झालं की अंगावर रोमांच उभे राहत डोळ्याच्या कडा ओल्या होणे हे भारतभूच्या प्रत्येक सजग नागरिकात होतं इतकं समजून घेतलं तरी पुरेसं आहे. 

तुम्हाला हेच म्हणायचं होतं  ना 

माझे व्हाट्सअप

व्हाट्स अप विद्यापीठाबद्दल सध्या बराच बोलबाला आहे. जाहीर आहे की त्याबद्दल चांगलं कुणी बोलत नाही. तरीही व्हाट्स अप ग्रुप मध्ये आलेले मेसेज आपण वाचतो, काही फॉरवर्ड करतो. काही दीड शहाणे लोक तिथं आलेली माहिती संदर्भ म्हणून वापरत, त्यात स्वतःचा मिर्च मसाला जोडत सुरस आणि चमत्कारिक कथा तयार करतात. प्रत्यक्षात वादविवाद घालतात. ते काही व्याख्याते जसं "भगतसिंगाला पकडल्यावर तो इंग्रज जेलर म्हणाला" एकदम आत्मविश्वासाने सांगतात तसं हे व्हाट्सअप युनिव्हर्सिटी चे "पादवी" धारक "बंद दारा आड झालेल्या मिटिंग मध्ये अजित डोवाल यांनी पुतीन ला सांगितलं की भाऊ युद्ध थांबव, नाहीतर महागात पडेल." जणू काही बंद दरवाज्याआड हा होताच तिथं. असो. 

मी सम हाऊ या व्हाट्सअप विद्यापीठापासून मुक्त आहे. आणि ही अवस्था प्रयत्नांती आली आहे. त्यासाठी थोडा वाईटपणा घेतला आहे. पण त्याचा परिणाम असा झाला आहे की, मला कुठल्याही प्रकारचे भंकस मेसेज येत नाही. सकाळी व्हाट्स अप बघितला कि त्यात जेमतेम चार किंवा पाच मेसेजेस येऊन पडलेले असतात. त्यातला एखाद दुसरा महत्वाचा असतो, ज्यावर मला प्रति उत्तर द्यायचं असतं किंवा फ़ॉलो अप करायचा असतो आणि बाकी व्यवसायाच्या माहितीपर असतात. हे कसं जमलं ते तुमच्याशी शेअर करावं म्हणून पोस्टप्रपंच. 

पहिलेपासून मला व्हाट्सअप ग्रुप ची ऍलर्जी आहे. तरीही मित्राग्रहास्तव मी सुरुवातीला लिहिणाऱ्या लोकांच्या एक दोन ग्रुपचा मेंबर झालो होतो. पाच सहा महिन्यात पकलो आणि तिथून एक्झिट झालो. तेव्हापासून कानाला खडा लावला आणि आज मी कुठल्याही अवास्तव ग्रुपचा मेम्बर नाही आहे. लिहिणारे नाही, विज्ञान रिलेटेड नाही, मशिनिंग ग्रुप, सीईओ ग्रुप असा कुठलाच ग्रुप नाही. 

आमच्या क्रिसलीस चे तीन एक ग्रुप आणि कोबिझ नावाच्या इंडस्ट्री चे, तसेच आपलं घरचा ट्रस्टीचा क्लोज ग्रुप, आणि एक दोन इंडस्ट्रियल असोसिएशनचे  ग्रुप आहेत जिथे मी मेंबर आहे कारण आम्हाला महिन्या दोन महिन्यातून एकदा भेटायचं असतं आणि त्याचे अपडेट्स ग्रुपवर येत असतात. त्या ग्रुपवर आम्ही आमचे अचिव्हमेंट्स आणि मिटिंग तारखा आणि आमच्या रिक्वायरमेंटस याबद्दल लिहीत असतो. 

याशिवाय माझे शाळा, पॉलीटेक्नीक, इंजियरिंग आणि एक अवास्तव असे वेगवगेळे चार ग्रुप आहेत. आणि फॅमिली म्हणजे फक्त सख्खे भाऊ बहीण असे दोन तीन ग्रुप आहेत. याशिवाय अनेक नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी मी नम्र पण ठामपणे नकार दिला आहे. 

माझे व्हाट्सअप चे दोन नंबर आहेत. एक फॉर बिझिनेस आणि एक जनरल. क्रिसलीस, कोबिझ हे जे कामाचे ग्रुप आहेत तिथं माझा बिझिनेस चा नंबर आहे. बाकी जे एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी जे ग्रुप आहेत तिथं पर्सनल नंबर आहे. पर्सनल फोन मी घरीच ठेवतो. जे काही मेसेज असतील ते कामावरून परत आल्यावर बघतो. बहुतांशी पर्सनल ग्रुप्स वर मी काही काम करावं असं नसतंच. 

याशिवाय काही स्वयंशिस्तीचे नियम बनवले आहेत. 

१. मी स्वतः कितीही भारी फॉरवर्ड असेल तरी कुणालाही पाठवत नाही. अपवादात्मक काही असतील पण बोटावर मोजण्याइतके. 

२. कुणाचीही जयंती किंवा श्रद्धांजली याचे मेसेजेस फॉरवर्ड नाही, बनवत नाही आणि कुणी पाठवले तर त्याला रीस्पॉन्ड पण करत नाही. अगदीच कुणी माझ्या माहितीतले असतील तर तिथे व्यक्त होतो. 

३. काही सणांना आणि महत्वाच्या दिवशी मेसेजेस आले तर त्याला उत्तर देतो पण स्वतःहून कुणालाही मेसेज पाठवत नाही. अगदीच वाटलं तर फोन करतो. 

४. कुणाचा वाढदिवस असेल तर व्हाट्स अप वर शुभेच्छा देण्याऐवजी फोन करून किंवा पर्सनल मेसेज करून भावना व्यक्त करतो.  

५. कुणी नातेवाईक मेसेजेस पाठवून खूप बोअर करत असेल तर मी त्यांना सरळ ब्लॉक करतो.