Thursday 6 July 2023

देशाप्रती प्रेम

बऱ्याचदा इथल्या प्रचलित ट्रेंड च्या विरुद्ध कुणी काही लिहिलं तर बऱ्याच कॉमेंट कर्त्यांचा आव असा असतो असे लिहिणारे कुणी विदेशी लोक आहेत. माझ्यावरती पण ही बला येते.  पण एखाद्या पक्षाच्या धोरणाबद्दल, अजेंडा बद्दल जरा काही विरोध दर्शवला की फार मोठी चूक विरोधकाने केली आहे असा जो आव आणला जातो तो हास्यास्पद ठरतो. इन फॅक्ट मला हे आवर्जून सांगावं वाटतं की कामानिमित्त मला आणि माझ्यासारख्या करोडो लोकांना अनेक परदेशी लोकांशी बोलावं लागतं, परदेशात दौरे करावे लागतात. तिथं हे सारे लोक देशाचे अघोषित ब्रँड अँबेसेडर म्हणून वावरत असतात. देशापायी प्रेम हे त्यांच्या वागण्यातून, कृतीतून झळकत राहतं. 

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी मिडल ईस्ट मध्ये एका कस्टमर कडे गेलो होतो. तिथला अधिकारी कुठला जॉर्डन किंवा सीरिया असल्या तत्सम देशातला होता. त्याने माझ्या कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे विचारलं. माझ्या कंपनीत त्यावेळी सर्व मशिन्स या भारतीय बनावटीच्या होत्या. ते सांगितल्यावर तो मला कुत्सितपणे म्हणाला "अच्छा, तुला असं सांगायचं आहे की भारतीय मशिन्स वापरून तू इंटरनॅशनल क्वालिटी आणतोस?". त्याला मी विचारलं की "तू कधी भारतात आला आहेस का? एकदा ये आणि भारतात आणि माझ्या कंपनीत काय चालू आहे ते डोळ्याने बघ. आणि नंतर स्वतःचं मत मांड. तुझ्या या देशात मी देतो ती सर्व्हिस देणारं कुणी नाही म्हणून तू मला इथं बोलावलं आहेस, मी बिझिनेस मागायला तुझ्याकडे आलो नाही आहे." हे बोलताना माझा आवाज पण चांगलाच धारदार झाला होता. त्याचे दोन असिस्टंट भारतीय होते. ते मला डोळ्याने इशारा करत होते की जरा सबुरीने घे म्हणून. मी काही बधलो नाही. 

जर्मनीतल्या एका कंपनीने आपल्या इथल्या चुकीच्या वर्क प्रॅक्टिसेस बद्दल बेकार तोंडसुख घेतलं होतं. त्याला टाटा, इन्फोसिस सारख्या आणि माझ्या माहितीतल्या अनेक बेस्ट ह्युमन ऍसेट मॅनेज करणाऱ्या कंपनीची माहिती दिली. त्याने मग आमची कंपनी पाहिली. त्याचं मत बदललं. बरोबर येऊन भारतात काम करू यात अशी त्याने आम्हाला गळ घातली. काही कारणाने शक्य झालं नाही, पण भारताबद्दलचं त्याचं मत बदललं हे नक्की. 

कुणी विदेशी पाहुणा इथं आला की गरिबीचे फोटो काढतो. मी त्याला ठणकावून सांगतो की हे फोटो काढू नको. काही ऐकतात, काही ऐकत नाहीत. पण हे  सांगताना कचरत नाही. 

अनेक उद्योजक असे आहेत की जे आपल्या कामाच्या स्वरूपातून सामाजिक बांधिलकी जपतात. माझा एक मित्र आहे. एक प्रॉडक्ट ट्रेंड करायचा जपान हुन. चार लोक होते, कमिशन मिळायचं त्याला, सुखात होता. त्याने ते प्रॉडक्ट भारतात बनवायचं ठरवलं. मशिनरी घेतली, सत्तर लोक घेतले, व्हेंडर डेव्हलप केले आणि प्रॉडक्ट डेव्हलप केलं. थोडा प्रॉब्लेम मध्ये असतो, तेव्हा मी विचारलं सुद्धा त्याला " कशाला ही प्रॉडक्शन ची झकमारी करतोस?" तर तो म्हणाला "अरे हे जर केलं नाही तर आपल्या अस्तित्वाचा काय उपयोग? इथं रोजगारनिर्मिती झाली, जागा लागली, कस्टमर ला फायदा झाला प्राईसचा. आपल्या लोकांना जर काही काम मिळत असेल तर थोडा त्रास सहन करायला काय प्रॉब्लेम आहे?". उद्योगाचा मूळ उद्देश हा पैशापलीकडे असला ते माझ्यालेखी वंदनीय आहे. 

तेव्हा मित्रानो, तुमच्या आवडत्या नेत्याच्या किंवा पक्षाच्या विरोधात कधी कुणी चार शब्द बोलत पण असतील तर याचा अर्थ असा नाही की त्याचं देशावर प्रेम नाही आहे. देशावर या भारत भूमीवर त्यांचं पण प्रेम असतंच,  फक्त ते उन्मादी किंवा आक्रस्ताळी पद्धतीने फेसबुकवर प्रतिक्रियांद्वारे किंवा पोस्टद्वारे व्यक्त करण्याची त्यांना गरज भासत नाही तर ते व्यक्त करण्यासाठी त्यांनी वेगळं माध्यम वेगळं निवडलं आहे. 

तिरंगा फडकताना किंवा राष्ट्रगीत चालू झालं की अंगावर रोमांच उभे राहत डोळ्याच्या कडा ओल्या होणे हे भारतभूच्या प्रत्येक सजग नागरिकात होतं इतकं समजून घेतलं तरी पुरेसं आहे. 

तुम्हाला हेच म्हणायचं होतं  ना 

No comments:

Post a Comment