व्हाट्स अप विद्यापीठाबद्दल सध्या बराच बोलबाला आहे. जाहीर आहे की त्याबद्दल चांगलं कुणी बोलत नाही. तरीही व्हाट्स अप ग्रुप मध्ये आलेले मेसेज आपण वाचतो, काही फॉरवर्ड करतो. काही दीड शहाणे लोक तिथं आलेली माहिती संदर्भ म्हणून वापरत, त्यात स्वतःचा मिर्च मसाला जोडत सुरस आणि चमत्कारिक कथा तयार करतात. प्रत्यक्षात वादविवाद घालतात. ते काही व्याख्याते जसं "भगतसिंगाला पकडल्यावर तो इंग्रज जेलर म्हणाला" एकदम आत्मविश्वासाने सांगतात तसं हे व्हाट्सअप युनिव्हर्सिटी चे "पादवी" धारक "बंद दारा आड झालेल्या मिटिंग मध्ये अजित डोवाल यांनी पुतीन ला सांगितलं की भाऊ युद्ध थांबव, नाहीतर महागात पडेल." जणू काही बंद दरवाज्याआड हा होताच तिथं. असो.
मी सम हाऊ या व्हाट्सअप विद्यापीठापासून मुक्त आहे. आणि ही अवस्था प्रयत्नांती आली आहे. त्यासाठी थोडा वाईटपणा घेतला आहे. पण त्याचा परिणाम असा झाला आहे की, मला कुठल्याही प्रकारचे भंकस मेसेज येत नाही. सकाळी व्हाट्स अप बघितला कि त्यात जेमतेम चार किंवा पाच मेसेजेस येऊन पडलेले असतात. त्यातला एखाद दुसरा महत्वाचा असतो, ज्यावर मला प्रति उत्तर द्यायचं असतं किंवा फ़ॉलो अप करायचा असतो आणि बाकी व्यवसायाच्या माहितीपर असतात. हे कसं जमलं ते तुमच्याशी शेअर करावं म्हणून पोस्टप्रपंच.
पहिलेपासून मला व्हाट्सअप ग्रुप ची ऍलर्जी आहे. तरीही मित्राग्रहास्तव मी सुरुवातीला लिहिणाऱ्या लोकांच्या एक दोन ग्रुपचा मेंबर झालो होतो. पाच सहा महिन्यात पकलो आणि तिथून एक्झिट झालो. तेव्हापासून कानाला खडा लावला आणि आज मी कुठल्याही अवास्तव ग्रुपचा मेम्बर नाही आहे. लिहिणारे नाही, विज्ञान रिलेटेड नाही, मशिनिंग ग्रुप, सीईओ ग्रुप असा कुठलाच ग्रुप नाही.
आमच्या क्रिसलीस चे तीन एक ग्रुप आणि कोबिझ नावाच्या इंडस्ट्री चे, तसेच आपलं घरचा ट्रस्टीचा क्लोज ग्रुप, आणि एक दोन इंडस्ट्रियल असोसिएशनचे ग्रुप आहेत जिथे मी मेंबर आहे कारण आम्हाला महिन्या दोन महिन्यातून एकदा भेटायचं असतं आणि त्याचे अपडेट्स ग्रुपवर येत असतात. त्या ग्रुपवर आम्ही आमचे अचिव्हमेंट्स आणि मिटिंग तारखा आणि आमच्या रिक्वायरमेंटस याबद्दल लिहीत असतो.
याशिवाय माझे शाळा, पॉलीटेक्नीक, इंजियरिंग आणि एक अवास्तव असे वेगवगेळे चार ग्रुप आहेत. आणि फॅमिली म्हणजे फक्त सख्खे भाऊ बहीण असे दोन तीन ग्रुप आहेत. याशिवाय अनेक नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी मी नम्र पण ठामपणे नकार दिला आहे.
माझे व्हाट्सअप चे दोन नंबर आहेत. एक फॉर बिझिनेस आणि एक जनरल. क्रिसलीस, कोबिझ हे जे कामाचे ग्रुप आहेत तिथं माझा बिझिनेस चा नंबर आहे. बाकी जे एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी जे ग्रुप आहेत तिथं पर्सनल नंबर आहे. पर्सनल फोन मी घरीच ठेवतो. जे काही मेसेज असतील ते कामावरून परत आल्यावर बघतो. बहुतांशी पर्सनल ग्रुप्स वर मी काही काम करावं असं नसतंच.
याशिवाय काही स्वयंशिस्तीचे नियम बनवले आहेत.
१. मी स्वतः कितीही भारी फॉरवर्ड असेल तरी कुणालाही पाठवत नाही. अपवादात्मक काही असतील पण बोटावर मोजण्याइतके.
२. कुणाचीही जयंती किंवा श्रद्धांजली याचे मेसेजेस फॉरवर्ड नाही, बनवत नाही आणि कुणी पाठवले तर त्याला रीस्पॉन्ड पण करत नाही. अगदीच कुणी माझ्या माहितीतले असतील तर तिथे व्यक्त होतो.
३. काही सणांना आणि महत्वाच्या दिवशी मेसेजेस आले तर त्याला उत्तर देतो पण स्वतःहून कुणालाही मेसेज पाठवत नाही. अगदीच वाटलं तर फोन करतो.
४. कुणाचा वाढदिवस असेल तर व्हाट्स अप वर शुभेच्छा देण्याऐवजी फोन करून किंवा पर्सनल मेसेज करून भावना व्यक्त करतो.
५. कुणी नातेवाईक मेसेजेस पाठवून खूप बोअर करत असेल तर मी त्यांना सरळ ब्लॉक करतो.
No comments:
Post a Comment