Friday, 28 July 2023

इव्हॉल्व्ह

 दोन एक महिन्यापूर्वी मी राजकोटला होतो. माझा फोन खराब झाला होता म्हणून आमचा सेल्स मॅनेजर प्रणव आणि गुजरात प्रतिनिधी आशिष मी आय फोन घ्यावा यासाठी एका दुकानात घेऊन गेले. आय फोन चा पाहिजे तो कलर तिथं नव्हता म्हणून आम्ही ठरवलं की पुण्यात जाऊन घेऊ. पुण्यात आल्यावर प्रणवने माझ्या मागे आय फोन घ्या भुंगा लावायच्या आत मी माझ्या बजेट मध्ये बसणारा सॅमसंग फोन ऑर्डर करून टाकला. प्रणव मला म्हणाला सुद्धा "तुम्हाला जमत असूनसुद्धा तुम्ही का घेत नाही आय फोन?" मी उत्तरादाखल काही बोललो नाही. 

१९९५-९६ ची गोष्ट असावी. बाबांना निवृत्त होण्यास तीन चार वर्षे उरली होती. निवृत्त झाल्यावर राहण्यास घर असावे म्हणून औंध मध्ये एका सोसायटीत आम्ही घर बघितलं. आजूबाजूचे १ बीएचके दोन फ्लॅट घ्यावे असा प्लॅन होता. किंमत निगोशिएट करण्यासाठी आम्ही, मी बाबा आणि उन्मेष, बिल्डरच्या ऑफिस मध्ये गेलो. पूर्ण सोसायटी तयार झाल्यावर फ्लॅट विकायचे असा त्या बिल्डर चा लौकिक. बाबा एमएसईबी मध्ये. बिल्डर ही मराठवाड्यातील. बाबांना वाटलं की या दोन क्वालिफिकेशन मुळे बिल्डर व्यवस्थित बोलेल आणि  सहज किंमत कमी करून देईल. पहिल्यांदा बाबांचा टोन मित्रत्वाचा होता. पण बिल्डर काही टस की मस हलायला तयार नव्हता. सुरुवातीला नीट बोलणारा बिल्डरचा टोन थोडा अरोगन्सी कडे झुकू लागला. फ्लॅट्स तर आम्हाला आवडले होते. त्यावेळेसची आमची आर्थिक परिस्थिती कशी होती हे मला माहिती नाही, पण किंमत कमी करून बजेट मध्ये बसावं म्हणून बाबांचा स्वर नंतर अगतिक होऊ लागला. बाबा जितके हतबल होत गेले तितका बिल्डर वरचढ होत गेला. आणि आमच्या शेवटच्या प्रयत्नाला प्रत्युत्तर म्हणून बिल्डर दरवाजाजवळ गेला आणि तो दरवाजा उघडून उभा राहिलं. थोडक्यात त्यांनी आम्हाला त्याच्या ऑफिसमधून निघून जायला सांगितलं. 

एखाद्याचा स्वभाव असा इव्हॉल्व्ह होत जातो. आजही मला ती घटना आठवली की बाबांची हतबलता जाणवते. त्यातून माझा स्वभाव असा घडला की मी अशाच गोष्टी विकत घेतल्या की ज्या घेताना मला १% सुद्धा पैशाबद्दल अगतिक वाटणार नाही. पुढं फ्लॅट घेतले, गाड्या घेतल्या, त्या चालवताना "टॅंक फुल कर" याशिवाय फ्युएल भरलं नाही, परदेशात खर्च करताना टेचात क्रेडिट कार्ड पुढं केले. पण ते सर्व अशाच पद्धतीने की माझ्या सेल्फ एस्टीम ला कुठेही धक्का पोहोचणार नाही. माझ्या अनेक मित्रांचे आलिशान मॅन्शन आहेत, त्यांच्याकडे लक्झरियस कार्स आहेत, भारी फोन्स आहेत. मला त्यांच्याबद्दल कायम आनंद वाटत आला पण त्या गोष्टी माझ्याकडे नाहीत याबद्दल कधीही असूया वाटली नाही.  

बकेट लिस्ट मध्ये काही गोष्टी आहेत. त्या पूर्ण करणार ते स्वतःच्या औकातीत राहून. काही कारणाने त्या नाही घडल्या तर त्याचा गिला-शिकवा नसणार हे नक्की.  


No comments:

Post a Comment