Thursday, 31 July 2014

१९९९-३

हा, तर असं भुकेल्या पोटी आम्ही झुरिक नामक गावी उतरलो. विमानतळावरच्या हॉटेल कडे बघण्याची तर काही सोयच नव्हती. हो, म्हणजे आधीच लोन काढून आलो होतो. कुठे जीवाचं Switzerland करणार नाही का? तिथून मग ट्रेन ने Neuchatel नावाच्या गावाला निघालो. ट्रेन मध्ये नाही म्हणायला एक खाण्याची गाडी फिरायची. आम्ही त्यातला एखादा आयटम उचलायचो, किंमत पाहायचो, गुणाकार करायचो आणि परत ठेवून दयायचो. असाच टाईम पास करत, भुकेल्या पोटी बाहेरचं सृष्टी सौंदर्य न्याहाळत (सौंदर्य घटघटा पित होतो) आम्ही एकदाचे न्युशाटेल नामक गावात येउन पोहोचलो. असं सांगितलं होतं कि हॉटेल रेल्वे स्टेशन पासून खूपच जवळ आहे म्हणजे ७५० मीटर. पण आपल्याला आपली सवय, त्यामुळे आम्ही विचार केला कि दीड ते दोन किमी असेल. म्हणून टयाक्सी केली. ड्रायवर ला पत्ता दाखवल्यावर तो आमच्याकडे भूत बघितल्यासारखा बघू लागला. काहीतरी पुटपुटत आमच्या bags त्याने डिकीत ठेवल्या. आम्ही बसलो आणि बुड हलवत स्थिरस्थावर होईपर्यंत गाडी एका बिल्डींगच्या दरवाजात थांबली. आम्ही शोफर कडे बघून हातवारे करत विचारलं "काय झालं" इंग्रजीचा त्यांच्याकडे दुष्काळ आणि आमच्याकडे आनंद होता. तर तो म्हणाला "हॉटेल". २ ते ३ मिनिटात आम्ही पोहोचलो असू. "९ franks" भोवळच आली मला. तब्बल २७० रु. १९९९ साली ३ मिनिटासाठी २७० रु म्हणजे मुकेश अंबानी च झालो कि हो.

Switzerland म्हणजे अगदी खर्याची दुनिया. सालं चोरीचापाटी चं नाव नाही. एका संध्याकाळी हॉटेल मध्ये खाली सहा वाजता आम्ही बियर पिलो पब मध्ये . आणि जेवायला गेलो बाहेर. साधारण रात्री साडेदहाला पार्टनर नि सिगारेट ओढण्यासाठी पाकिटात हात घातला तर पाकीट कुठे! त्याला लक्षात आलं कि पाकीट पब मध्ये. म्हंटल गेलं, आता कशाला सापडेल. रूम मध्ये दुसरं पाकीट घ्यायला जाणार, तेव्हढ्यात मी त्याला म्हणालो बघू तर पब मध्ये, आणि बघतो तर काय, ते गोल्ड फ्लेक चं पाकीट तिथंच जसं च्या तसं.

झालं, दुसर्या दिवशी पासून ट्रेनिंग चालू. कंपनीत पोहोचलो. सगळं कसं चकाचक. दिवस भर काम करून संध्यकाळी जॉन बरोबर गप्पा मारत होतो. मी विचारलं "बाबा रे, तुमच्या इथे बिल्डींग च्या भोवती compound wall का नाही आहे" त्यांनी विचारलं "ती कशासाठी" मी म्हणालो "अरे, आपली बोर्डर माहिती पाहिजे ना" त्यानी विचारलं "का" मी म्हणालो  "मित्रा, अरे आपल्या जागेला दुसरा कुणी त्याची म्हणू नये म्हणून" तो म्हणाला "त्याची नसताना जागा, तो कशाला म्हणेल माझी आहे म्हणून" मी हात टेकले.

लक्ष्मी रोड वरच्या सार्वजनिक पार्किंग च्या जागेला लोखंडी stand टाकून ती आमचीच आहे असं सांगून जागा अडवणाऱ्या गावचा मी, आणि ८००-१००० किमी तारेचं कुंपण घालून दोन देश विभक्त केलेल्यापैकी एका देशाचा मी रहिवासी, त्याला कसं सांगू भिंतीचं महत्व.जाऊ द्या, तू भला आणि तुझा देश भला.

परतीच्या प्रवासात हॉटेल वरून निघालो. येताना शहाणपणा केला होता. ३ किमी साठी २७० रुपये मोजले होते. विचार केला, समोर स्टेशन दिसतंय कशाला taxi. वाघेला, माझा पार्टनर, तयार झाला. निघालो. पुढे इंग्लंड ला जायचं  असल्यामुळे bags चांगल्या जड होत्या आणि मोठ्या पण. एक लक्षात नव्हतं आलं कि स्टेशन हून हॉटेल ला येताना उतार होता आणि उलटा पूर्ण चढ. मी bags ओढत ओढत वरती स्टेशन ला पोहोचलो. मागे वळून बघतो तर वाघेला बराच मागे. चढावर सिगारेट चा धूर निघत होता. ट्रेन ची वेळ झाली होती. मी सामानासकट वरती. शेवटी मनाचा हिय्या केला, ते सामान तसंच स्टेशन वर सोडलं आणि एकटा खाली आलो. वाघेलाच्या bags घेतल्या आणि वरती चढून आलो परत. माझ्या bags जशाच्या तशा तिथेच. हायसं वाटलं.

तर हि अशी zero crime country. अजूनही तशीच असावी.

१९९९-३

No comments:

Post a Comment