Wednesday, 30 December 2015

चिंतन

तसं बघायला गेलं तर मला सख्खी बहिण नाही. त्यामुळे माझ्या बालपणी मी आणि माझा भाऊ. ज्या गावात माझं लहानपण गेलं, म्हणजे यवतमाळ, औरंगाबाद आणि नाशिक, तिथेही आजूबाजूला मुली नव्हत्या. घरात कधी चुलत किंवा मावस बहिणी वैगेरेे असायच्या पण त्या काही दिवसांसाठी. भेटलो की जेव्हा चुलत मावस भावांशी लवकर कनेक्ट व्हायचो तेवढा बहिणींशी नाही व्हायचो. आणि मग मैत्री व्हायच्या आत, किंवा ती दृढ व्हायच्या आत सुट्टी संपायची. साधारणपणे अशी माणसं अशा वातावरणात मोठी होतात ती स्त्रीबद्दल दोन भावना बाळगतात, एक तर ती भोग्य आहे नाहीतर पूजनीय आहे. मी ही त्याला अपवाद नाही. नाही म्हणायला सहावी ते दहावी को एड मधे शिक्षण झालं पण साधारणत: त्या वयात मुलींबद्दल दोन भावना, एकतर राखी बांधायची नाही तर लाईन मारायची. निखळ मैत्री, निरालस भावनांपासून मी कोसो दूर होतो. तसंही भिन्न लिंगी व्यक्तिबद्दल आकर्षण नाही असं म्हणणं दांभिकपणा झाला. पण समाजाला बांधून ठेवणारे संस्कार, भिती, आदर, निर्व्याज प्रेम या आकर्षणावर मात करतात आणि संबंध मैत्रीपूर्ण रहाण्यात मदत होते.

माझी या भावनांशी ओळख झाली ती बीजे मेडिकलला. तिथले पोरं पोरी टाळ्या काय द्यायचे, पाठीत काय मारायचे, बाईकवर बसून फिरायचे. आधीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर आणि औबादच्या मुलींचा दुष्काळ असलेल्या कॉलेजमधून आलेला मी विस्मयचकित होऊन जायचो. पण माझं मन काही प्रगल्भ झालं नाही दोन अडीच वर्षातच फुलत असलेल्या सुंदर मैत्रीच्या नात्याला तिलांजली दिली आणि प्रेमाकर्षणात बद्ध झालो. पुढे तिच्याशीच लग्न झालं आणि आता आम्ही मित्र मैत्रिणीसारखे राहतो हे म्हणणं म्हणजे त्यावेळेसच्या उथळ विचारांवर पांघरूण घालणं झालं.

अशी नाती कशी असतात याचा खर्या अर्थाने अनुभव घेतला तो लग्नानंतर. वैभवीला एक सख्खी बहिण, आणि सख्ख्याइतकंच घट्ट नातं असलेल्या तिच्या मामे आणि मावस अशा चार बहिणी. या सगळ्यांच्या सहवासात मला भिन्नलिंगी व्यक्तिंशी निखळ मैत्री म्हणजे काय याचा अनुभव आला. या सर्व मुलींशी, म्हणजे आता बायका झाल्यात त्या, माझे अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध आहेत.  त्यामुळे "साली आधी घरवाली" हा डायलॉग विनोद म्हणून बरा वाटला तरीही पंचवीशित मिळालेल्या या निरपेक्ष नात्याला धक्का पोहोचतो म्हणून मी तो कटाक्षाने टाळतो. बाकी माझी पत्नी याबद्दल माझ्यापेक्षा फारच संतुलित आहे. मुलगी, बहिण, सून  किंवा आई म्हणून तिने जपलेली नाती ही  माझ्यापेक्षा जास्त व्यवस्थित सांभाळली आहेत. मागे एकदा लिहिल्याप्रमाणे, "समाज सापेक्ष रूढार्थाने कमी कर्तृत्ववान असलेल्या माझ्या पत्नीच्या मागे तिच्यात दडलेली एक अत्यंत यशस्वी आई आहे, आणि तथाकथित कर्तृत्ववान असलेल्या माझ्या मागे माझ्यातला तितकाच अयशस्वी बाप आहे."

अगदी थोडक्यात सांगायचं तर  निखालस मैत्री करण्याचा गुण उपजत माझ्यात नव्हता तर आयुष्याच्या तरुण ते गृहस्थ या कालावधीत  हा मी अक्षरश: कमावला आहे. आता तर पन्नाशी आली आणि त्यात अशा मैत्रीपूर्ण नात्याला मी व्यवस्थित जोपासलं आहे. त्यामुळे परवा एकाने पोस्ट टाकली "बायकोच्या भावाला भाऊ म्हणतो, तर बायकोच्या मैत्रिणीला बायको का म्हणू नये" माझ्या कडून पटकन लिहिलं गेलं "कारण  बायको तुमच्या मित्राला नवरा म्हणत नाही"

असो.  खूप तारे तोडले. एक लास्ट कन्फेशन. जर सख्खी बहीण घरात असती किंवा मला मुलगी असती तर आता आहे त्यापेक्षा नक्कीच जास्त सेन्सिबल आणि रिस्पोन्सिबल माणूस असलो असतो.

(सदर पोस्ट हे गुरुविंदर सिंग यांच्या पोस्ट वर आधारित प्रकट चिंतन आहे. त्यात फेसबुकवरील इनबॉक्स Chatting वरून काही वाद, संवाद, प्रतिवाद होतात, यातून तयार झालेली thought प्रोसेस आहे. अगदीच सांगायचं झालं  तर माणूस हा मुळात चांगला असतो, आजूबाजूच्या परिस्थितीमुळे तो कदाचित चुकीचं वागू शकतो या जुन्या धारणेवर विश्वास ठेवावा) 

Sunday, 20 December 2015

बघा बुवा

नाही म्हणजे बघा तुम्हाला पटतं का ते! आता शासनाने हे सगळी थेरं बंद करावीत. म्हणजे एक पंधरा वर्षासाठी. जे आरक्षण आहे ते राहू द्यावे, कुठली स्मारकं बांधू नये, कुठली बंदी टाकू नये. मंदिर, मशीदींवरचे लाऊडस्पीकर ही ठेवावे. बोंबलू द्यावं लोकांना. काय झालं आहे की संख्याशास्त्र (Science of statistics) आणि तर्कशास्त्र (Science of probability and logic) याची नुसतीच तोंडओळख नाही तर पुर्ण डेव्हलप शास्त्र दिमतीला असताना भरतखंडाची झालेली अधोगति अभूतपूर्व आहे. वाहनांसाठी लागणार्या रस्त्यांची लांबी रूंदी (हा खरं तर आशियाचा प्रॉब्लेम झाला आहे), एखाद्या गावाला लोकसंख्येनुसार किती पाणी लागेल यांचे ठोकताळे, इंडस्ट्री किंवा शेतीसाठी योग्य विभागाचं वर्गीकरण या सगळ्या गोष्टींना गेल्या पंधरा वीस वर्षात मुठमाती मिळाली आहे. चाकण एरियात एका कंपनीची बिल्डींग बनवण्यासाठी खोदकाम चालू असताना आठ फूटावर भरभक्कम पाणी लागलं. हे सगळं पाणी पंप लावून ओढून फेकून दिलं. आमचं सामान्य ज्ञान अगदीच जुजबी. पण काहीतरी चुकलं हे वाटलं.  

काय आहे, आपले राज्याचे अन देशाचे प्रमुख बाहेरच्या देशातल्या लोकांना धंदा करण्यासाठी आमंत्रण देत फिरताहेत. पण त्यांनी जरा त्यांच्या कुणा लेफ्टनंटला काही मुलभूत गोष्टींवर ध्यान द्यायला सांगितलं तर बरं पडेल. रस्ते, पाणी, वीज या अगदी बेसिक गोष्टींचा अजूनही पायपोस नाही आहे. एक मोसम पाऊस झाला नाही तर अख्ख्या महराष्ट्राच अक्षरश: तोंडचं पाणी पळालं आहे. शेती कारणं दुरापास्त झालं आहे.

शप्पथ सांगतो, आम्हाला मॉल नको, डी मार्ट नको, मँकडोनाल्ड/केएफसी ची आम्हाला हौस नाही. आमचं जगणं सुसह्य करा बुवा! मुळात तुम्हाला सांगतो लोकांना धर्मावर आणि जातिवर विचार करायला वेळच नका देऊ हो. काही  मूलभूत गोष्टींना बरोबर घेऊन विकासाचं अधिष्ठान घेतलं की लोकांना सार्वजनिक रित्या गणपती बसवायला वेळ मिळणार नाही, रिक्षा स्टँडवर सत्यनारायण घालता येणार नाही. आमचे म्हणजेच साहेब हे ही लोकं विसरतील अन बघतो काय, मुजरा कर ही घोषणा ही इतिहासजमा होईल. 

आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ज्या कंपन्यांच्या दारात तुम्ही निमंत्रणपत्रिका वाटत फिरता आहात त्या कंपन्या तुमच्या केबिनच्या बाहेर इन्व्हेस्टमेंट प्रपोज़ल घेऊन उभे राहतील. म्हणजे लोकांनी उद्योग उभारायची प्रोसेस हे साध्य असावं. विकासाचं त्याला आपण साधन समजत असू तर आपण फार मोठी चूक करतो आहोत. 

आधीच्या शासनकर्त्यांनी देशाचा विकास साधताना एका निधर्मी राष्ट्राला सर्वधर्मसमभाव साधणारा देश म्हणत खोल गर्तेत ढकललं. त्यांच्या मित्रपक्षांनी भ्रष्टाचाराची कास धरली. त्या सगळ्यांना कंटाळून लोकांनी नवीन शासनाला विकासाचं अधिष्ठान घ्यायला निमंत्रित केलं पण साध्य आणि साधन याची गल्लत झाली असं वाटतंय 

Friday, 18 December 2015

नेते अभिनेते

माझे एक ओळखीचे पुढारी आहेत. म्हणजे आता मला ओळखणार नाहीत पण एक काळ होता जेव्हा मी त्यांच्याशी बोलायचो. मित्राचे वडीलच तसे ते. एकदम साधा सरळ माणूस वाटायचा मला. आणि बोलतानासुद्धा आपल्या सगळ्यांचे वडील जसे मायेने, पोराच्याबद्दल काळजीने बोलतात, तसेच बोलायचे. जोक्सही मारायचे.

पुढे जाऊन कळलं की त्यांनी एका बँकेचं लोन घेऊन बँकेला गंडवलं. मला प्रश्न पडला की यांच्या रेल्वेनं कुठं आणि कधी पटरी सोडली असेल.

शरद पवार साहेब, लालूप्रसाद यादव किंवा स्वर्गीय विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन ही मंडळी सुद्धा तरूणपणी ध्येयवादी असावीत. या सगळ्यांच्या आयुष्यात काय घडलं असेल की यांच्या प्रत्येक कृतीवर उत्तरआयुष्यात प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. ज्यांचं नाव लिहायला पण लाज वाटते असे आजचे राष्ट्रवादीचे नेते, जे एकेकाळी शिवसेनेचे होते, भ्रष्टाचाराच्या दलदलीत आज आकंठ बुडले आहेत तेसुद्धा नव्वदीच्या अगोदर तडफदार म्हणून प्रसिद्धच होते की!

राममनोहर लोहियांचे शिष्य म्हणून प्रसिद्ध असलेले लालूप्रसाद यांचा चारा घोटाळा हा आपल्याला अचंबित करून टाकतो. त्यांनी रेल्वेची खरंतर वाट लावली, हावर्डमधे भाषण दिले हे खोटं लिहीलं, मिसाबद्दलही काही प्रवाद निर्माण केले. बिहारच्या जनतेने त्यांच्या पारड्यात मत दिलं हे ठीक आहे पण महाराष्ट्रात त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यावर सोशल मिडीयात कौतुक केलं जातं हे मात्र आश्चर्यकारक आहे. असो. मला स्वत:ला मात्र लालूप्रसाद अजिबात झेपत नाहीत. नाही नाही, त्यांच्या तथाकथित गावंढळपणाचं अजिबात हसू येत नाही. आपण भाजपविरोधक आहोत म्हणून लालूप्रसाद यांच्यासारख्या भ्रष्ट माणसाचं कौतुक करायला आमची बुद्धी भ्रष्ट नाही.

बाकी वर उल्लेख केलेले मान्यवर नेते हे कलासक्त आहेत, सुजाण आहेत पण तरीही सत्तेचा प्रश्न आला की विलासरावांना शिवसेना जवळ करावी लागली. सत्ता हातात आली की महाजनांनी रिलायन्स बरोबर साटलोटं जुळवलं. महाजनांचं कर्तृत्व अन वक्तृत्व वादातीत होतं. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, पण ते असले असते तर भ्रष्टाचारी नेत्यांच्या यादीत त़्यांचं नाव बरच वर असलं असतं.  पुण्यातल्या कुठल्याही बिल्डरचं नाव घ्या, मग ते लवासा असो, पंचशील असो, मगर असो की काकडे असो, पवार साहेबांचं नाव जोडलंच जातं. मुंडे साहेबांच्या अपघाती निधनानंतर वाद प्रवाद झालेच होते. या सगळ्या प्रकारात शतप्रतिशत तथ्य नसलं तरी धूर निघतो म्हणजे आग तर लागली असेलच की कुठेतरी. पुन्हा एकदा असो.

पण या सगळ्यांच्या आयुष्यात एक पॉईंट असा नक्कीच येत असेल की जिथे आपल्या सामान्य लोकांच्या भाषेत पाय घसरला आणि मग सत्ता, त्यासाठी पैसा कमावण्यासाठी वाटाघाटी आणि तडजोडी चालू झाल्या असतील.

अभिनेते अन खेळाडू यांच्या बाबतीत ही होतं हे. कधी पैशाच्या बाबतीत तर कधी ते तारे तोडतात तर कधी अजून कुठल्या गोष्टीसाठी. परवा गिरीश कर्नाड बकले, ओम पुरी डोमेस्टिक व्हायोलन्स साठी प्रसिद्ध आहेत, अझर जडेजा ने पैसे खाऊन तोंड काळं केलं. शायनी अहुजा ने मोलकरणीवर बलात्कार केला तर संजय दत्त ने या प्रकारातला कहर केला. देशद्रोहाचा गुन्हा केला. मेरूमणीच तो.

तर असो. पाय सगळ्यांचा घसरतो, पण नेते जेव्हा भरकटतात तेव्हा सामान्य माणसांच्या जगण्याशी त्यांचा संबंध येतो. म्हणून त्यांच्याबद्दल प्रश्न विचारण्याचा मोह होतो.

सँट्रो

भौतिक सुखांची जरी आस ठेवली नाही तरी ती जेव्हा आली तेव्हा त्यांना झिडकारलं ही नाही. गरज पडत गेली तसं काही गोष्टी घेत गेलो. आता मग गरजा वाढत गेल्या का? तर हो. ज्या जीवनधर्माचा अंगीकार केला तिथे वाहन, मोबाईल ही गरज होती अन त्यामुळे आपसूक त्या गोष्टी आल्या.

माझी पहिली कार सँट्रो. सप्टेंबर २००० ला घेत ली. त्याआधी मी हिरो होंडा स्प्लेंडर वर लढाईला जायचो. दिवसाला १०० किमी. उन, थंडी, वारा, पाऊस. काहीही असलं तरी योग्य ती आयुधं घेऊन रपेटी माराव्याच लागायच्या. सुटका नाही. जुलै २००० ची गोष्ट असेल. पेण जवळ वडखळ नाक्याला इस्पात इंडस्ट्रीजमधे कस्टमर कॉल होता. दोन तीनदा मी आधी लाल डब्याने गेलो होतो. पण घाटात लोकं उलट्या करायचे. मला कंटाळा यायचा. घरात मी बसने जातो सांगून स्प्लेंडर सरळ पेणच्या रस्त्याला घातली. (कसलं टेचात लिहीलं ना. जणू मर्सिडीज चालवतो आहे). कॉल करून साधारण तीनला परत निघालो. आणि खोपोली येईपर्यंत आभाळ भरून आलं. बोरघाट चढायला चालू केला आणि रपरप पाऊस चालू झाला. दहा पंधरा मिनीटातच मुसळधार पाऊस. असा की रेनकोटच्या आतले कपडे ही चिंब भिजले. नखशिखांत भिजणे म्हणजे काय याचा अनुभव घेतला. उर्वरित घाट माहिती असलेले सगळे स्तोत्र म्हणून पुर्ण केला आणि लोणावळ्याला पोहोचल्यावर पहिला निर्णय घेतहहोती
कार घ्यायची.

६ सप्टेंबर २००० ला मी सँट्रो घेतली. ह्युंडाई भारतात येऊन तीन एकच वर्षं झाली होती. मित्रांनी सांगितलं, मारूती घे म्हणून. पण मी सँट्रो वर ठाम होतो. त्यातही डार्क ग्रे कलर. लोकांनी अजुन नाकं मुरडली. संजय ह्युंडाईला कारची डिलीव्हरी घ्यायला गेलो तर सेल्समन म्हणाला "वहिनींना बोलवा. कारची चावी एकत्रच हातात देतो" इथं मुळात पहिल्या कारचं मला काही फारसं कौतुक नव्हतं अन वहिनींना तर त्याहून नाही. कार आणायला मी एकटाच गेलो. कसलं येडं आहे असे भाव तोंडावर आणत त्या सेल्समनने कारची डिलिव्हरी दिली.

पण एकदा कार घरी आल्यावर मात्र मी त्यातून बेधुंद फिरलो. मुंबई, नासिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि पुण्यातले आजूबाजूचे कस्टमर. वारू चौफेर उधळला होता. कामाबरोबरच कौटुंबिक सहलीही पुष्कळ केल्या. सँट्रोबरोबर दोस्तीच झाली माझी. पाच वर्षं झाल्यावर मी ह्युंडाईला कृतज्ञता  व्यक्त करणारं पत्रंही लिहीलं. एकंदरीतच वाहनांचं माझ्या आयुष्यातील स्थान हे नात्यातल्या लोकांइतकंच महत्वाचं आहे. अन का नसणार हो? दिवसातले अडीच ते तीन तास मी गाडीत बसणार अन गेले इतक्या वर्षात तिने एकदाही मला दगा देऊ नये हे आश्चर्यकारक नव्हे काय! पुढे २००५ ला वैभवीसाठी कार घेताना मी ह्युंडाई अॅसेंटला प्रधान्य दिलं.

२००७ च्या सुमारास डिझेल इंजिनची उपयुक्तता माझ्या नजरेत आली. पेट्रोलवरून डिझेलवर शिफ्ट झालो तर महिन्याला त्यावेळेस ८ हजार रूपयाचं सेव्हिंग होणार होतं. पैसे बचतीसाठी मी गॅस सिलींडर सँट्रोला लावलं, पण मजा नाही आली. शेवटी मी सँट्रो विकून स्विफ्ट घ्यायचा निर्णय घेतला. तब्बल १६५००० किमी फिरलो मी त्यातून. अनेक तणावाच्या, सुखाच्या, दु:खाच्या प्रसंगानंतर भावनेच्या लाटांवर या कार मध्ये मोकळा झालो.

निर्णय घेतला खरा पण जेव्हा नवीन मालक गाडी घ्यायला आला त्या दिवशी सकाळपासून खुपच हूरहूर लागली होती. असं वाटत होतं, काहीतरी घडावं आणि तो माणूस कारची डिलीव्हरी घ्यायला येऊच नये. पण असं व्हायचं नव्हतं. तो आलाच. सह्यांचे सोपस्कार झाल्यावर थरथरत्या हाताने किल्ली दिली मी. जणू मुलीला लग्नमंडपातून निरोप एखाद्या बापाच्या मनात जसे भाव असतील तसा मी कातर झालो. मला काही कळायच्या आत तो सँट्रो घेऊन गेलाही. कंपनीच्या अंगणात मी एकटाच उभा होतो. इतका वेळ सांभाळलेलं अवसान माझ्या डोळ्यातून घळाघळा ओघळत होतं.

तीन एक वर्षापूर्वी दापोडीच्या इथे माझं लक्ष एका सँट्रोवर गेलं MH 12 AN 5374. हो, माझीच डार्लिंग कार . मी कचकचून ब्रेक दाबत थांबलो. मी प्रेमाने तिच्या बॉनेटवर हात फिरवताना तिचा आताचा मालक आला. तुसडेपणाने  म्हणाला "क्या है" मी त्याला माझी कथा सांगितली, पहिली कार अन काय काय. फोटो काढू का विचारलं. चेहर्यावर अविश्वासाचे भाव ठेवत तो हो म्हणाला. "संभालके रखना दोस्त" असं म्हणत त्याचा प्रेमभराने हात दाबला. माझी पाणावलेली नजर बघत भांबावल्या अवस्थेत त्याने मला निरोप दिला.

आजीचा सल्ला

मी लहान असताना माझी आजी आमच्याकडे रहायची. मला खेळण्याचा खूप नाद. त्यात माझे मित्र असे अतरंगी होते की मी अभ्यासाला बसलो, की बिल्डींगच्या खाली उभे राहून विशीष्ट आवाजात शिट्टी मारायचे. ती शिट्टी ऐकली की माझ्या मनात चलबिचल व्हायची. आईबाबा घरात असतील तर काही तरी कारण सांगून मी घरातून पसार व्हायचो. परत जेव्हा यायचो तेव्हा आईची बोलणी खाऊ नये म्हणून गुपचूप अभ्यासाचं पुस्तक घेऊन बसायचो. आमची आजी डोळ्याच्या कोपर्यातून ही सगळी माझी नाटकं बघायची. दहावीला फक्त मित्र खेळायची म्हणून मी पण खेळायला जायचो. ज्याला आजकाल पिअर प्रेशर म्हणतात ना, साधारण तोच प्रकार. मित्र असं वागतात ना, मग आपणही तसंच वागायचं.

एके दिवशी घरात कुणी नसताना आजीने मला तिच्या समोर बसवलं आणि माझ्या डोळ्यात बघत म्हणाली "हे बघ राजेश, मी काय बोलते ते लक्ष देऊन ऐक. मी बघतेय की गेले काही महिने तु फक्त मित्र असं करतात म्हणून तसं वागतोयस. हे तुझ अभ्यास अर्धवट टाकून खेळायला जाणं हा तुझा पिंड नाही आहे. पण मित्रांच्या वागण्याचालण्याचं, बोलण्याचं तु अंधानुकरण करतो आहेस. तुझे काही मित्र असे आहेत की ज्यांचा अभ्यास पूर्ण झाला आहे आणि मग ते खेळायला येत आहेत. तर काही जण असे आहेत की ज्यांना अभ्यासाचा काही गम नाही आहे. ते दिवसभर टिवल्याबावल्याच करत असतात. पण तु न या गावचा न त्या गावचा. त्यामुळे तु मनात आधी पक्क कर, कसं वागायचं ते. म्हणजे अभ्यास पूर्ण करून मैदानात उतरायचं की त्या दुसर्या मुलांसारखं फुकाचा टाईमपास करण्यासाठी चकाट्या पिटायच्या ते. जा आता."

काही वर्षांनी आजी देवाघरी गेली. पण तिचा सल्ला मी कायम लक्षात ठेवला. मग कॉलेजमधे मित्रांच्या हेयरस्टाईलची कॉपी केली, किंवा सिगरेट पिली किंवा कधी पिअर प्रेशर खाली कंपनीच्या पार्टीत ड्रिंक्स घेतले आणि हे पुन्हा पुन्हा घडलं की घरी आल्यावर फोटोतली आजीची नजर मला बेचैन करायची. आणि मग फक्त मित्र हे करतात, ते असं बोलतात,  म्हणून मी पण करायचं हे लागलीच टाळायचो.

आज मी ४७ वर्षाचा आहे. माझी आजी जाऊन कित्तेक वर्ष झाली. पण तिचा सल्ला मी फेसबुकवरही काटेकोरपणे पाळतो. त्यामुळे सहसा पिअर प्रेशरमुळे चालू वादाच्या मुद्द्यावर केवळ मित्र लिहीतात म्हणून मी लिहीत नाही, काही आदरणीय मित्र लिहीतात म्हणून मग मी पण इतक्या मंडळींना नारळ दिला असंही  लिहीत नाही. आजीची शिकवण आयुष्याच्या या टप्प्यावर कामाला येईल असं कधी वाटलंही नव्हतं.

माझी आजी फारच हुशार होती, नै. 

Sunday, 13 December 2015

व्यक्तिचित्रण

महेंद्रभाईंनी व्यक्तिचित्रण दिंडी काढली पण काही कारणामुळे ते लांबचा पल्ला गाठू शकली नाही. कारण का ते कळलं नाही. कदाचित वाद होण्याची शक्यता म्हणून लोकांनी टाळलं असेल. प्रविणने मला दोनदा आवाहन केलं पण काही कारणामुळे जमलं नाही. आज ठरवलंच की लिहून काढायचं म्हणून. अन माझा दुसरा प्रॉब्लेम असा होता की मला अनेक लोकांबद्दल लिहायचं होतं. आता त्यातून कुणाबद्दल लिहायचं हा प्रश्न सोडवण्यात बरेच दिवस गेले. मित्रपरिवार मोठा झाला आहे. बरं सगळे एकाहून एक सरस. त्यांचं लिखाण, पोस्टवरच्या कॉमेंटस या अफलातून असतात.  तरीही त्यांच्यापैकी सात निवडले आहेत. तेच का निवडले, तर कारण नाही. चिठ्ठ्या टाकल्या आणि सात उचलल्या असं समजा.

सप्तसुर

१. निर्भयसिंह जाधव: फेबु खेळायला चालू केल्यावर हा गृहस्थ मित्रयादीत आला. याचे चार मित्र आहेत, सध्या त्यांनी एकमेकांना ब्लॉक केलंय असं दिसतंय. पण हे पाच जण मिळून फुल दंगा घालायचे. निर्भय एखादा मुद्दा  टाकायचा, म्हणजे पेटवायचा आणि बाकी त्यावर फुंकर मारायचे. नाही, फुंकर विझवायची नाही तर धगधगायची. याची राजकीय समज त्याच्या वयाच्या मानाने खूप चांगली आहे. तो स्वत:च्या मतांवर ठाम असतो. प्रसंगी हेकेखोरही असतो. त्यामुळे त्याने खुप सिनियर मित्र गमावले. आता तो खूप लो प्रोफाईल असतो. मला फेबुची गोडी लावण्याचं पाप निर्भयला लागलं आहे.

२. सौ स्मिता गानू जोगळेकर.: मी फेबुवर फार ताई वैगेरे कुणाला संबोधत नाही. तीन चार जणी असतील. पण त्यांनी ती पदवी त्यांच्या लिखाणातून अन वेळोवेळी माझ्यावर वर्षावलेल्या आशिर्वादातून कमावलेली आहे. स्मिताताई, तिच्या लिखाणाबद्दल, स्वभावाबद्दल मी काय बोलणार? वादातीत आहे ते. फेबुवरून डिअॅक्टिवेट होतो मधे. तेव्हा दोघी जण कायम संपर्कात होत्या, त्यापैकी एक स्मिताताई. फेबुवर  नसताना तिच्याशी जी मेलामेली झाली तो माझ्या संग्रही एक अमूल्य ठेवा आहे. मी जेव्हा कधी तिला भेटेल तेव्हा तिचे पाय धरण्यासाठी हा ताठ पाठीचा कणा एका सेकंदात वाकेल याबाबत शंका नाही.

३. बालाजी सुतार: एक प्रथितयश लेखक, एक भावस्पर्शी कवी अन त्यावर कडी करणारा त्यांचा गुण म्हणजे एक मोठा माणूस. ते ललित लिहीतात तेव्हा त्यांच्या शब्दातून शीतल चांदणे बरसते अन जेव्हा धगधगतात तेव्हा त्याच शब्दातून आग लागते. अत्यंत संतुलित विचारसरणी, ती मांडण्याची विलक्षण वाचनीय हातोटी अशा या आदरणीय व्यक्तिमत्वाची गळाभेट घेण्याची इच्छा आहे. ती कधी पूर्ण होईल याची वाट पाहतो आहे.

४. दिलीप लिमये: दोन गुरू लोकं भेटले आहेत. एक विनोदाची पखरण करणारे उदय जोशी अन दुसरे ललित लेखन ताकदीने उतरवणारे दिलीप लिमये. लिमयेंच्या मित्रयादीत फार मंडळी नाहीत बहुधा. ते पण लाईक गेमपासून दूर आहेत. पण त्यांचं लिखाण हे खिळवून टाकणारं असतं. संग्रही प्रचंड अनुभव आहे आणि त्या अनुभवाला शब्दात गुंफतातही ते छान. भेटण्याचा वादा झाला आहे, बघू कधी योग येतो ते. अंगठा मागणार नाहीत असे वाटते.

५. राहुल बनसोडे.: हा माणूस विद्वान आहे. कमी वयात त्याने कमावलेला आवाका हा स्तिमित करणारा आहे. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राष्ट्रीय अन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा त्याचा अभ्यास दांडगा आहे. तो जितक्या ताकदीने रूपक लिहीतो तितक्याच जोरकसपणे ललित आणि त्यापेक्षाही इंटेन्सिटीने इकॉनॉमिक आर्टिकल लिहीतो. नाही म्हणायला त्याच्या काही पोस्ट डोक्यावरून जातात, त्यातल्या त्यात तो जेव्हा झाडबुके बनून लिहीतो तेव्हा. पण ठीक आहे. चालतं ते. सुगम संगीताच्या मैफिलीत  ऐकताऩा एखाद दुसरं शास्त्रीय गाणं आपण ऐकतोच की!

६. श्रेणिक नारदे/नरडे/नारडे: नको असलेले आडनाव खोडून टाक रे. हा मुलगा अद्भूत लिहीतो. ग्रामीण बाज त्याने चपखल उचलला आहे. पुढचं वाक्य काय असेल याची कायम उत्कंठा लागलेली असते. ट्विस्ट इतके देतो की सुरूवात कुठून करतो आणि संपते कुठे हे मजेशीर असते. श्रेणिकने लिहीत राहिला तर थोड्याच दिवसात त्याचं पुस्तक अत्रे सभागृहात विकायला दिसेल अशी मला खात्री आहे.

७. मयूर लंकेश्वर: विद्रोही लेखन म्हणजे नामदेव ढसाळ इतकंच माहिती होतं. इथे फेबुवर सतीश वाघमारेंच्या लिखाणाने त्याची खर्या अर्थाने ओळख झाली. आणि आता मयूर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकतो आहे. काही सामाजिक विषयांवर माझी तोंडओळख आहे, पण आरक्षण या विषयावर माझं कुठलंही ठाम मत अजून झालं नाही. पण मयूरचा आरक्षण या विषयावरच्या लेखाने काही गोष्टी कळल्या. काही वेळा विरोध करताना त्याचा तोल जातो खरा, पण त्याने मयूरच्या विचारांचं महत्व कमी होत नाही.

ज्यांना भेटलो नाही अशांपैकीच लिहायचं ही अट होती. त्यामुळे काम थोडं सोपं झालं.  या सातही जणांना भेटलो नाही आहे मी. बाकी १०० एक लोकांना भेटलो आहे मी. आमचा परभणीकर ग्रूप आहे, खर्डेघाशी मंडळी आहेत. एका कुणाचं नाव लिहीत नाही पण ज्यांचं लिखाण अन त्यांचे विचार मेंदूला चालना देतात अशी अनेक मंडळी आहेत. काही जण इतक्या भन्नाट कॉमेंट टाकतात की मूळ पोस्ट झाकोळावी.  कधीकधी वैयक्तिकरित्या विसंवादी सूर लागतोही. पण विचारांची सरमिसळ जेव्हा होते तेव्हा या विसंवादी, संवादी सूरांमधून एक सिंफनी तयार होते आणि राजेश मंडलिक च्या मनाचा ऑर्केस्ट्रा सूरमयी तार छेडतो. 

Monday, 7 December 2015

पेट्रोलपंप

आता मात्र मला वेशभूषा आणि ओव्हऑल पर्सनालिटी सुधरवायची वेळ आली आहे. कुणीही टिंगल उडवायला लागलं आहे माझी. आता हेच पहा ना. शनिवारी मुंबईहून पुण्याला येत असताना एक्सप्रेस हाय वे च्या पेट्रोलपंपावर डिझेल भरायला थांबलो. कारमधून बाहेर पडलो तर समोरून दिपीका, करीना, प्रियांका सदृश मॉडेल्सचा कळप मला दिसला. हो म्हणजे अगदी तशाच, बारीक अंगकाठीच्या, देहयष्टीच्या, अल्प आणि तोकड्यावस्त्रांकिता.

खिशातून पाकीट काढण्याची कृती करत असतानाच, पंपावरचा डिझेल भरणारा मुलगा मला म्हणाला "साहेब, झिरो फिगरकडे बघा" मी वदलो "बघतोय" तर म्हणतो कसा "अहो साहेब, पंपाच्या झिरो फिगरकडे बघा" आणि मग टाळी देण्यासाठी हात पुढे केला.

असो. काही तळटीपा

- डिझेल मिळत असून त्याला फ्युएल पंप न म्हणता पेट्रोल पंप का म्हणतात?

- कार कुठली तर ती टोयोटा एटिऑस आहे. किती देते या प्रश्नाचं उत्तर इनबॉक्समधे मिळेल.

- अंगकाठी आणि देहयष्टी हे दोन्ही समानार्थी शब्द असले तरी इंम्पँक्ट जास्त पडावा यासाठी योजले आहेत. अल्प आणि तोकडे हे समानार्थी शब्द नसून एकमेकांना पुरक शब्द आहेत.

- साहेब असं तोंडदेखलं म्हंटला तरी त्या पोर्याला मी सेटको कंपनीचा ड्रायव्हर वाटलो असण्याची दाट शक्यता आहे. हे दोन शीट लोणावळ्याला सोडता का असं विचारलं नाही नशीब.

- तोंडावरचे खजील भाव लपवण्यासाठी मी पंपावर पाकीट खाली पाडून उचलण्याचा अभिनय केला. त्याचप्रमाणे मूळ पोस्ट मुळे माझ्याबद्दल काही चूकीचे मत तयार होऊ नये म्हणून भरकटवण्यासाठी तळटीपा लिहील्या आहेत हे चाणाक्ष मित्रांच्या लक्षात आलेच असेल.

- चाणाक्ष मित्र, वाचक नाही याची विशेष नोंद घ्यावी.

Sunday, 6 December 2015

Steve Warner

२००५ साली वेस्टविंड शी बिझिनेस रिलेशन प्रस्थापित झाले तेव्हा आम्ही मार्क टेरेल शी संभाषण करायचो. एखादं वर्ष झालं असेल, अचानक एक दिवशी सकाळी फोन आला. "मार्क ने वेस्टविंड सोडली आहे. तुमचं अकौंट आता स्टीव्ह बघेल."

स्टीव्ह वार्नर, भेटलो होतो मी त्याला. अत्यंत सरळ माणूस. टिपिकल ब्रीट. स्पष्टवक्ता, हजरजबाबी आणि विनोदाला खळखळून दाद देणारा. माझे अन त्याचे मैत्रीचे ऋणानुबंध जुळू लागले, तो पुण्याला आला होता आमची सर्विस ऑडीट करण्यासाठी. आणि मग तो त्यानंतर येतच राहिला. आणि दिवसभराच काम संपलं की आम्ही गप्पा मारायचो विविध विषयांवर. भारत, इंग्लंड, चर्च, मंदिर, धर्म, क्रिकेट.  अगदी  स्वत:च्या कुटुंबाबद्दल सुद्धा. युके मध्ये फ्यामिली चे काय प्रॉब्लेम आहेत आणि तो ते कसे हाताळतो, हे ही सांगायचा. क्रिकेट मध्ये इंग्लंड ची किंवा भारताची धुलाई झाली की आमच्या मेल्स वाचनीय असत. तसाही  सुर्याखालील कुठलाही विषय आम्हाला वर्ज्य नसायचा.

तो आला की आमची म्हैसूर ची व्हिजीट असायचीच. मग आधी बंगलोर, हॉटेल ला राहणे. आणि मग दुसर्या दिवशी सकाळी कारने म्हैसूर ला. चार तास प्रवास. गप्पांमध्ये एक मिनिट खंड नाही पडायचा. मी झोपलो असेल तेव्हाच आम्ही थांबायचो. मंगळावर यान पाठवलं तेव्हा स्टीव्ह म्हणाला "इतकी गरिबी असताना कशाला तुम्हाला असा उपद्वयाप पाहिजे, ५०० कोटीचा." मग मी त्याला पन्नास फुट ही उंच न उडणाऱ्या रॉकेट वर कसे हजारो कोटी रुपये आम्ही खर्च करतो, कुंभमेळ्यावर कसे जमून पैशाची उधळपट्टी करतो, विविध धर्माच्या यात्रेवर कशी सबसिडी देतो हे सांगितलं आणि मंगळावर काय मिळेल ती गोष्ट वेगळी पण या जोखडातून मुक्तता होऊन विज्ञानधीष्ठीत दृष्टीकोन येण्यासाठी हे कसं गरजेचं आहे ते सांगितलं. पटलं त्याला.

मधे कलाम सर गेले तेव्हा त्यांच्या सहीचं लेटर कव्हर फोटो म्हणून मी लावला होता. त्याच आठवड्यात तो पुण्याला आला होता. मला म्हणाला "कलाम सरांची पोच आली ते ठीक आहे, पण तु लिहीलंस काय पत्रात"
ब्लॉगवर असलेलं ते पत्र त्याला वाचायला दिलं. आधीच ब्रिटीश अन त्यात आमचं दिव्य इंग्रजी. तो गालातल्या गालात हसला यात काही नवल नव्हतं. मी विचारलं, का हसतोस म्हणून. तर म्हणाला "तुझ्या इंग्रजीच्या मास्तरांनी व्याकरणावर खूप भर दिला असं वाटतं. असं इंग्रजी इंग्लंडमधे साधारणपणे मागच्या पिढीतले लोक लिहायचे. आता असं कुणी लिहीत नाही. पण एक सांगतो, मला तुझं इंग्रजी वाचल्यावर मला असं वाटलं की मनात येउन ही मी असं लिहू शकणार नाही."

त्याच्या कामात ही अत्यंत चोख आणि हुशार. बाकी वेळेस आम्ही इतर काही बोलत असलो तरीही कामाच्या वेळी बाकी भंकस नसायची. वेस्टविंड प्रती त्याची प्रचंड निष्ठा. कंपनीला धक्का बसेल असेल असं कुठलंही वर्तन त्याच्याकडून घडलं नाही. आणि आमचं सर्व्हिस सेंटर वर्ल्ड क्लास राहावं म्हणून तो नेहमीच प्रयत्नशील राहिला. खूप वेळा आउट ऑफ वे जाऊन आम्हाला मदत ही केली. कधी वादही झाले, पण मर्यादेत राहून. आमच्या कंपनीचं आता जे बरं स्टेटस आहे त्यात वेस्टविंडचा, खरं तर स्टीव्ह चा नि:संशय वाटा आहे हे नक्की. 

दोन आठवड्यापूर्वी  सांगितलं त्याने की, वेस्टविंड ने त्याला सांगितलं की बिझिनेस कमी झाल्यामुळे त्याचा जॉब धोक्यात आला आहे. मला वाटलं की, ठीक आहे, कंपनीने हूल उठवली असेल. पण दैव काही पलटल नाही. परवा स्टीव्ह ची मेल आली निरोपाची. मी काही त्याला उत्तर देऊ शकलो नाही, म्हणजे इच्छाच झाली नाही. स्टीव्ह शिवाय वेस्टविंड, मी कल्पना च करू शकत नाही. 

काळाचं चक्र फिरत राहील. स्टीव्ह सारखा सदगुणी माणूस नोकरीला लागेलही अजून कुठे. कुणास ठाऊक,  त्या चक्रात फिरताना स्टीव्ह शी भेट होईल च होईल. नक्कीच. 

Hi Steve, 

I wrote a mail on your personal e mail id. But it looks that it has not reached you. 

This post is dedicated to our friendship, your professional working at Westwind and most important to your nature as sensible human being. 

I could have written this post in English. But it is said that emotions are better expressed in mother tongue. Do not try to translate it in to English. It looses aura of expressions. No no, don't worry. I have mentioned all good things about you. 

I can only say that it was pleasure working with you for past 9 years. And who knows, we will meet again for some or the other reason. 

Wish you every success in your assignment. 

Rajesh