Monday 19 August 2019

सोशल मीडिया

जे जे म्हणून पहिलं ते आयुष्यभर लक्षात राहतं. पहिल्या मराठी सोशल मीडिया संमेलनाचा भाग झालो हे नेहमीच लक्षात राहील. कार्यक्रम संदर्भात कन्फेशन: तिथं पोहोचेपर्यंत वाटलं नव्हतं की कार्यक्रमाची मांडणी इतकी आखीव रेखीव असेल. विषय जोरकस होते. दर्जा एकंदरीत वरचा होता. त्याबद्दल समीर, मंगेश आणि टीमचे अभिनंदन. प्रसादचे आभार की त्याने माझं नाव इथं सुचवलं. एक प्रेक्षकांची संख्या सोडली, तर नाव ठेवायला अजिबात जागा नव्हती.

दोन सेशन मध्ये पॅनलिस्ट होतो. "ब्रँड, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सोशल मीडिया" आणि "मला व्यक्त होताना असणाऱ्या चिंता, त्यावरील उपाय आणि माझ्या अपेक्षा"

पहिल्या विषयावर पॅनलिस्ट म्हणून बोलण्यापेक्षा मलाच शिकायला खूप मिळालं. दोन तर महत्वाचे मुद्दे आहेत. माझे टेकअवे मी इथं लिहिणार नाही आहे. कुणाला हवे असतील त्यांनी मेसेंजर वर संपर्क करावा. पण एक मात्र बोललो की सोशल मीडिया तर्फे मार्केटिंग करण्याची अक्कल मला फार उशिरा आली आणि माझे त्या बद्दलचे खूप मिस कन्सेप्शन होते जे गेल्या वर्षभरात दूर झाले. सोशल मीडिया मार्केटिंग हा प्रकार सिरीयसली उद्योजकांनी घ्यायला हवा. २०१४ मध्ये नाही म्हणायला, थोड्या राजकीय विषयावर पोस्ट लिहायचो आणि त्यामुळे मी माझे कस्टमर्स आणि सहकारी यांना फेसबुकवर मित्र यादीत जागाच नाही दिली. ती मोठी चूक झाली. पुढे मग राजकीय पोस्ट लिहिणं हे अलमोस्ट बंद केलं. आता मात्र एक दिशा मिळाली आहे आणि ती दुसऱ्या पॅनल डिस्कशन मध्ये सांगितली.

दुसऱ्या टॉपिक मध्ये पहिले विचारलं की  पोस्ट चोरी होतात त्याबद्दल काय म्हणणं आहे. कौशल इनामदार आणि सारंग साठे हे दोघे दृकश्राव्य माध्यमातील त्यामुळे त्यांना ही चिंता असणारच. पण मी आणि गौरी या टेक्स्ट फॉर्म मध्ये लिहिणारे. मी सांगितलं "हा प्लॅटफॉर्म मी निवडला आहे. आणि त्याचा फॉरमॅट असा आहे की पोस्ट या उचलल्या जाणार आणि त्याबद्दल कन्सर्न असण्यात काही मतलब नाही. जो पर्यंत माझी पोस्ट वापरून कुणी अर्थार्जन करत नाही तो पर्यंत मी बोंब मारण्यात मतलब नाही. इंटरनेट चा खर्च याशिवाय मी त्या कन्टेन्ट वर फिजिकल खर्च करत नाही. ज्यांना स्वतःचं लिखाण चांगलं वगैरे वाटतं त्यांनी पुस्तक काढावं आणि पैसे कमवावे."

दुसरा विषय ट्रोलिंगचा. ट्रोलिंग हे मुख्यतः राजकीय आणि धार्मिक विषयावर पोस्ट अथवा कॉमेंट टाकली की होतं. व्यावसायिक लोकांनी राजकीय, धार्मिक, प्रांतिक, भाषिक या कुठल्याही मुद्दयांवर आपलं मत सोशल मीडियावर व्यक्त करू नये, असं मला वाटतं. आपल्या राजकीय भावनेचं प्रकटीकरण हे मतपेटीद्वारे आणि धार्मिकतेचं प्रदर्शन हे घरातल्या देव्हाऱ्यात मांडावं. सोशल मीडिया त्यासाठी प्लॅटफॉर्म नाही. तो ज्यांच्यासाठी आहे ते त्याचा दणकावून वापर करत आहे. आपण त्याच्या फंदात पडू नये.

क्लोजिंग रिमार्क मध्ये हेच सांगितलं की सोशल मीडिया हे कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी चांगलं टूल आहे. आणि मुख्य म्हणजे ते आपल्यासाठी बनलं आहे आपण त्याच्या साठी नाही. तर त्या डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया याचा वापर आपल्या वृद्धीसाठी वापरावा, मग ती व्यावसायिक असो वा वैयक्तिक असो.  

(बाकी विषय आणि त्यावर बोलणारे लोक धारदार होते. सायबर हायजिन, सायबर व्हिक्टिम, व्यवसायिक यश हे सगळे मुद्दे राज्याच्या कानाकोपऱ्यात जावे असं मला मनापासून वाटतं आणि एकूणच सर्वांची इन्क्लुजिव्ह ग्रोथ व्हावी हि सदिच्छा.)

No comments:

Post a Comment