Thursday, 22 August 2019

पॉझिटिव्हीटी

काल आनंद मोरे ने एक महत्वाचा मुद्दा मांडला की सकारात्मकता दाखवणं ठीक आहे पण भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते. मिलिंद सरवटे सरांनी याबद्दल एक लेख मला मागे पाठवला होता, या विषयावर.

उद्योजकता आणि व्यावसायिकता हे दोन वेगळे पैलू आहेत असं मला नेहमी वाटत आलं आहे. त्या दोघांचे गुण अवगुण आहेत. ज्या लोकांमध्ये दोन्ही पैलूंचे गुण एकवटून येतात ते नारायण मूर्ती, रतन टाटा बनतात आणि फक्त व्यावसायिकता दाखवली तर त्यांचा सायरस मिस्त्री किंवा विशाल सिक्का बनतो.

उद्योजकांचा इमोशनल किंवा सेंटिमेंटल कोशंट हा जास्त असतो, हे मी माझ्यावरून आणि आजूबाजूला जे उद्योजक आहेत त्यावरून सांगू शकतो. व्यावसायिकांचा एनलिटिकल कोशंट जास्त असतो. इमोशनल पद्धतीने एका लेव्हल पर्यंत कंपनी चालू शकते. पण त्यानंतर फक्त सकारात्मकता किंवा नकारात्मकता घेऊन किंवा फक्त स्ट्रॉंग रिलेशन्स वर व्यवसाय केला तर त्याला लिमिटेशन्स येतात. हे वेळीच ओळखून उद्योजकाने जर त्याच्यात व्यवसायिकतेचा अभाव असेल, तर बाहेरून ते हायर करावेत आणि स्वतःच्या इमोशन्सचा लगाम, मग ते सकारात्मक असो वा नकारात्मक, त्या व्यावसायिक माणसांच्या हातात द्यावा.

उद्योजकाच्या तथाकथित पॉझिटिव्हीटी ला, व्यावसायिक एनलिटिकल डाटा चं कोंदण लावतात आणि मग त्या व्यवसायाचं बस्तान बसतं असा माझा अनुभव सांगतो.

माझ्या भावनाप्रधान स्वभावाला लगाम लावायचं काम कंपनीत प्रोफेशनल्स करतात आणि फेसबुकवर आनंद, मिलिंद सर, मेधा नाईक सारखे मित्र मैत्रिणी करतात.

राहता राहिला प्रश्न कौस्तुभ ने मेंशन केलेलं यशस्वी उद्योजक हे बिरुद. जे मी लिहिणार आहे त्यात विनय नाही, न्यूनगंड ही नाही आणि अहंगंड तर नाहीच नाही. एक उद्योजक म्हणून मी स्वतःला दहापैकी सहा मार्क देईल पण व्यावसायिक म्हणाल तर मी स्वतःला अयशस्वी समजतो. व्यवसायिकतेचे गुण मिळतात परफॉर्मन्स मेझर वर. सतरा वर्ष व्यवसाय करूनही मी माझं एस एम इ टॅग काढू नाही शकलो आणि पुढील चार वर्षे तरी काढू शकणार नाही. यातच काय ते आलं. त्यांनतर जर सेटको मिडीयम किंवा लार्ज कंपनी म्हणून ओळखली गेली तर माझ्या उद्योजकतेपेक्षा माझ्या कंपनीतील व्यावसायिक लोकांचा त्यात जास्त वाटा असेल याबाबत शंका नाही.

अजून एक जाता जाता सांगावंसं वाटतं की कौस्तुभला जे यशस्वी म्हणून अभिप्रेत आहेत तसे सोशल मीडियावर खूप कमी लोक लिहितात. कारण ते कदाचित वर लिहिलेले परफॉर्मन्स मेझर अचिव्ह करण्यात बिझी असावेत. मी तिथं स्वतःला बिझी ठेवत नाही म्हणून इथं वेळ देऊ शकतो इतकाच काय को फरक.  

No comments:

Post a Comment