Monday 12 August 2019

हव्यास

शनिवारी सांगलीला टेम्पो पाठवायचा होता. नेमकं टेम्पो मालकाच्या आजोबांचं निधन झालं. मग जे काही पाठवायचं ते कारने पाठवलं. कार सोमवारी सकाळपर्यंत आली नव्हती. म्हणून कंपनीत कॅबने आलो.

कॅब मध्ये फोनवरून फळणीकरांशी बोलत होतो. औषधं कितीची झाली वगैरे चर्चा चालू झाली. मग पूरग्रस्त परिसरातील डॉक्टरशी बोलणं झालं. पुढच्या लॉट मध्ये काय पाठवायचं ते मागवून घेतलं. उद्या आमच्या क्रिसलीस ग्रुप मध्ये चर्चा ठरली, ते ही फोनवर बोलणं झालं. 

तर ही सगळी पार्श्वभूमी सांगण्यामागे एक कारण आहे. किंवा एक मित्रवर्य म्हणतात तसं वाचणाऱ्यावर प्रभाव पडण्याचा मला हव्यास आहे. तर जे तसं समजतात त्यांनी तसं समजावं. 

तर कारण हे आहे की कॅब मधून उतरण्याअगोदर कॅब ड्रायव्हर म्हणाला "तुम्ही सर कॅबचं भाडं देऊ नका."

मी विचारलं "का?"

तर म्हणाला "तुम्ही इतकं करताय तर माझ्याकडून फुल न फुलांची पाकळी".

मी समाधानाने हसलो. माझं कॅब अकौंट कार्डला  कनेक्ट आहे. शून्य रुपये आल्यावर म्हणाला आग्रह करू लागला, कॅश परत देतो.

मी म्हणालो "मित्रा, मदत करावी हे तुझ्या मनात आलं, हे खूप आहे. मदतीचा चान्स आज हुकला. कुठं तरी करशील नक्की"

मनोभावे आम्ही एकमेकांचा हात हातात घेतला.

दुसर्यावर प्रभाव पाडण्याचा हव्यास मला आता फेसबुकच नाही तर प्रत्यक्ष जीवनात पडला आहे. 

No comments:

Post a Comment