Tuesday, 14 October 2025
कॉलेज ब्रँडिंग
Monday, 6 October 2025
सातत्य
दसरा मेळाव्याची थोडी भाषणं ऐकली. डोक्याची मंडई झाली. कारण त्याच दिवशी आपलं घरच्या गाड्या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी पोहोचल्या होत्या. आणि तिथली विदारक परिस्थितीची जाणीव फोटो आणि व्हिडीओ बघून होत होती. मनात विचार आला आमच्यासारख्या साध्या लोकांना अशा बिकट प्रसंगी काय करायचं ते सुचतं, मित्रपरिवार आवाहन केल्या केल्या भरभरून मदत करत होता, स्वयंसेवक, डॉक्टर्स, परिचारक आणि परिचारिका दसऱ्याच्या दिवशी घर सोडून पूरग्रस्त विभागात जायला तयार झाले होते. आणि राज्याचे शासक अन त्यांचे विरोधक मात्र मेळावे करण्यात आणि त्याहून वाईट म्हणजे एकमेकांना शिव्या देण्यात मश्गुल होते.
परवा छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला येत होतो. तेव्हा लक्षात आलं की नेवासा ते अहिल्यानगर एंट्री या ७५ किमी अंतरात रस्ताच उरला नाही आहे. या खड्डेयुक्त रस्त्यावरून गाडी चालवत असताना मनात आलं की तीन महत्वाची औद्योगिक शहरं जोडणारा हा रस्ता. आपण काय इफिशियंसी किंवा प्रॉडक्टिव्हिटी बद्दल बोलणार? संभाजीनगर ते पुणे या २३० किमी च्या प्रवासाला साडे सहा तास लागले. कारचा सरासरी स्पीड झाला ३५ किमी प्रति तास. म्हणजे मालवाहतूक करणारे ट्रक्स तर प्रवास करतील २० किमी प्रति तास. त्याशिवाय ट्रक्सच्या ऍक्सल चा, शॉक ऍब्स चा बल्ल्या वाजणार तो वेगळाच. (कारला थोडी तरी जागा होती, डिव्हायडर ला चिटकून कार चालवली तर ५० किमी बरी चालली. अर्थात २५ किमी ५ किमी प्रति तास अशी चालवल्यावर बाकी पार्ट्सला धोका कमी).
चार वाजता संभाजीनगर हून निघाल्यावर साडेसात ला अहिल्यानगर आणि नंतर रात्री साडे दहाला घरी पोहोचलो. झोपताना मी हाच विचार करत होतो, की का इतकी वर्षे झाली पण रस्ता या महत्वाच्या विषयावर आपण सगळे इतके निरिच्छ का झालो आहोत? का छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकांनी आंदोलनं करून रस्ते सुधरवले तसे इतर ठिकाणी होत नाही?
डोक्यात विषयाची गर्दी झाली होती. एक दिवस आधीची राजकारणी लोकांची भाषा आणि दुसऱ्याच दिवशी अनुभवलेली पुणे-छत्रपती संभाजीनगर-पुणे रस्त्याची झालेली वाईट हालत.
तितक्यात आठवलं की छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या दोन गावांच्या मध्ये एक इमामपूर म्हणून खेडं लागलं होतं. विचार केला हा रस्ता व्हायचा तेव्हा होईल. उत्पादकता आणि इफिशियंसी या विषयावर बाकी देशातील लोक माझ्या देशातील लोकांना खिजवतात ते सहनही करू. पण हे इमामपूर गावाचं नाव बदलायला हवं. रस्ता चांगला होण्यापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे. आणि अतिशय महत्वाचा विषय माझ्या डोक्यात आला याबद्दल मी मलाच शाबासकी दिली. डोक्यातले विचार शांत झाले. मी निवांत झोपी गेलो.