Saturday, 25 October 2025

स्पार्क

काल जे एन इ सी, छत्रपती संभाजीनगर इथे झालेलं भाषण अनेक अर्थाने लक्षात राहील. 

ज्या हॉल मध्ये भाषण झालं ते रुक्मिणी सभागृह, माझ्या मते मी आतापर्यंत जिथे भाषणं दिली, त्यापैकी सगळ्यात भव्यदिव्य आणि नेत्रदीपक सभागृह होतं. तिथली लाईट आणि साउंड सिस्टम, सीटिंग अरेंजमेंट, व्यासपीठाची साईझ हे एकूणच अव्वल दर्जाचं. 

त्या "स्पार्क" कार्यक्रमाची मॅनेजमेंट सुद्धा वाखाणण्याजोगी. अनेक कॉलेजेस मध्ये अशा कार्यक्रमाला मुलं मुली गोळा करण्यासाठी शेवटच्या क्षणी धावपळ करावी लागते. पण इथं दिसत होतं की कार्यक्रमासाठी आधी रजिस्ट्रेशन प्रोसेस केली होती आणि त्यानुसार मुलं मुली हजर होती. अनेक ठिकाणी कार्यक्रमाला दिलेली वेळ आणि सुरु होण्याची वेळ यात कमालीची तफावत असते. काल मात्र साडेदहा ची दिलेली वेळ बरोबर पाळली गेली. अँकर्स ने पूर्ण तयारी केली होती. त्यांनी बोलायचं कसं, चालायचं कसं यात कमालीची प्रोफिशियंसी दिसत होती. अतिशय थोडक्यात ओळख करून देऊन, इतर नेहमीच्या बोरिंग सोपस्कारांना टाळत मला बसल्यापासून पुढील पाच मिनिटात स्टेज वर बोलावलं सुद्धा. आणि सरते शेवटी कार्यक्रमाची संपण्याची वेळ बारा होती, त्या वेळेला बरोबर कार्यक्रम संपला. 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलामुलींनी विचारलेले प्रश्न. अनेक कॉलेजेस मध्ये मुलं मुली प्रश्नच विचारत नाहीत, कारण बहुधा त्यांना जबरदस्तीने तिथे बसवलं असतं. पण इथे मी प्रश्न विचारा असं आवाहन केल्या केल्या दोन हात वर गेले होते. (याची कल्पना मला प्रो पवार यांनी दिली होती). पहिला प्रश्न मला इथे सांगावासा वाटतो 

"तुम्ही कॉलेज मध्ये स्टुडंट म्हणून कसे होता?" कदाचित हा प्रश्न मला याआधी कधीही विचारला गेला नव्हता. यावरून तुम्हाला कल्पना येईल की नंतरच्या आठ दहा प्रश्नाची लेव्हल किती चांगली होती ते. 

सगळ्यात शेवटी सांगावंसं वाटतं की महात्मा गांधी मिशनने उभे केलेल्या या विद्यापीठाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे कमालीचं सुबक आणि सर्वांगीण विचार केलेलं जाणवतं. त्या परिसरात वावरताना ज्या पॉझिटिव्ह वाईब्ज चा आपण नेहमी उल्लेख करतो, तिचा ठायी ठायी अनुभव येतो. तिथले विद्यार्थी/विधार्थिनी आणि प्रोफेसर्स हे जेव्हा त्यांच्या डिपार्टमेंट ची माहिती सांगतात, तेव्हा त्यांच्या आवाजातील अभिमान आणि चमक ही जाणवत राहते. इंजिनियरिंग डिपार्टमेंट मध्ये त्यांनी मशिन्स, रोबोट्स, ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इ व्ही यांच्या मॉडेल्स वर चांगलीच इन्व्हेस्टमेंट केली आहे. लॅब अद्यावत आहेत. आणि याबरोबरच स्विमिंग पूल, स्टेडियम, काही मोठा कर्यक्रम झाला तर डेलिगेट्स च्या राहण्यासाठी सुविधा यावर विचारपूर्वक डेव्हलपमेंट केली आहे. 

ज्या शहरात माझा डिप्लोमा झाला, त्याच शहरात इंजिनियरिंग कॉलेजमधील दुसरं भाषण. पहिलं इन्फॉर्मल पद्धतीने झालं होतं. पण कालच्या जे एन इ सी च्या "स्पार्क" कार्यक्रमामुळे मनात एक वेगळाच वरचा बेंचमार्क तयार केला आहे. यापुढे अशा कारणासाठी जेव्हा कधी बोलावणं येईल तेव्हा त्याची तुलना कालच्या स्पार्क कार्यक्रमाशी केली जाईल हे नक्की. 

ज्यांनी मला या कार्यक्रमात आमंत्रित केलं ते जे एन इ सी चे श्री पवार सर, प्रिन्सिपल डॉ मुसंदे मॅडम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या स्टुडंट असोसिएशन ने हा कार्यक्रम इतक्या नेटक्या पद्धतीने मॅनेज केला  त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. 

No comments:

Post a Comment