Sunday, 25 January 2015

कुछ भी

हे असं नेहमीच होत आलं आहे.

अमेरिकन प्रेसिडेंट (अरे, अरे घाबरू नका, हे दुसरं आहे) जेफ आणि VP जिम यांच्याबरोबर मी खूप दा जेवायला जातो. हं, अगदी तारांकित हॉटेलात वैगेरे. हो मग, आपली पण अमेरिकन लोकांशी एकदम घष्टन आहे बरं. बियर चे सीप मारत असताना ते नॉनव्हेज प्लँटर दोघांनाही फारच आवडतं तेही with bones, you know. ते दोघंही तंदुरी चिकन मधील लेगपिसेस किंवा कोणतेही bones असलेले पिसेस (खरं तर हाडकं म्हणायचं होतं) काट्या अन सुरीने इतके शिताफीने खातात की शेवटी त्या लेग पिसला चिकन नावाला म्हणून उरत नाही.

त्यांचं बघून मी पण fork आणि knife चा वापर करून तसंच चिकन खायचं ठरवतो. पण ती करतानाची तारांबळ बघायलाच हवी. सगळ्यात पहिले सुरी उजव्या की डाव्या हातात या गोंधळात ५ मिनीटे जातात. मग चिकन जोवर भरपूर असतं तोवर दोन चार घास जातात बरोबर तोंडात. गडबड नंतर उडते. त्यापुढे खाताना मात्र चिकनचा पीस त्या आठ इंचाच्या प्लेटच्या बाहेर जाऊ नये यासाठी जी कसरत करावी लागते ती भीषण असते. ते प्रयत्न फोल गेल्यावर मी थांबतो. गेल्या दहा मिनीटात जेफ आणि जिम काय बोलले हे पण माझ्या गावी नसतं. इतका मी त्या अयशस्वी प्रयत्नात तल्लीन झाला असतो.

आता मी त्यांच्या संभाषणाचा भाग होतो. पण डोळ्याचा एक कोपरा मेंदूला सतत सिग्नल पाठवत असतो की लेग पीसला खुप चिकन उरलंय. माझं विवेकी मन अविवेकी मनावर विजय मिळवतं आणि मग मी कुणाचीही भीडमुर्वत न ठेवता पंजा आणि दात याचा मुक्त वापर करून फाडशा पाडतो. आणि मग तल्लीनतेकडून टल्लीकडे या पुढच्या प्रवासासाठी मोकळा होतो.

तळटीप: मी आमच्या अमेरिकन प्रेसिडेंट, जेफ बरोबर सकाळी चहाही पितो. कुणी कुणासाठी चहा बनवला याला काहीही महत्व दोघांच्याही लेखी नसतं. बिझीनेस महत्वाचा.
जर पाहुण्सांसाठी चहा बनवणे यावर कुणाला विनोद सुचत असतील तर त्यांची कीव करण्यापलीकडे काय करू शकतो. असो.


प्रजासत्ताक दिन चिरायु होवो. 

एक पोस्ट दोन कॉमेंट

फेसबुकवर संतोष शेलार आहेत. त्यांचे विचार वाचण्यासारखे असतात. उथळ नसतात. (माझ्यासारखे). त्यांचं लिहीणंही वाहतं. संथ असतं. पण खोली असते. मी त्याला शास्त्रीय संगीतही म्हणतो. आरोह, अवरोह, षडज्, गांधार काही कळत नाही पण ऐकायला छान वाटतं. तसंच काहीसं.

आता ही पोस्ट बघा. मला माझीच लाल (वॉल हो) करण्याची सवय असल्यामुळे मी फक्त माझ्या कॉमेंटस देत आहे. पण वाचण्यासारखं आहे, शेलारांच मुक्त चिंतन. त्यासाठी वेळ पाहिजे. त्यासाठी मी लिंक देतो आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=797750336963920&id=100001868826029&ref=bookmark

मुळ पोस्ट




Friday, 16 January 2015

उद्योगबोध 2015

जरा घाबरतच गेलो होतो मी त्या कॉन्फरन्स ला. उद्योगबोध २०१५. ९ आणि १० जानेवारीला झाली. गिरीश टिळकांना ओळखता का तुम्ही. हो, तेच हेड हंटर लिहिणारे. त्यांनी मेसेज करून सांगितलं, याच नक्की. रु ६००० मोजले वट्ट. वरण भातावर आणि नंतर वडा पावावर पोसलेल्या शरीराला झेपलं नाही. पण विचार केला बघू तर खरी काय प्रकार आहे. आणि परत मग अद्वैत भट आले होते, त्यांनी parent organisation बद्दल सांगितलं "Saturday Club Global Trust." महाराष्ट्रात उद्योग करणाऱ्या उद्योजकांनी networking च्या माध्यमातून एकमेकांना मदत करून एकमेकांच्या उद्योगाची भरभराट व्हावी या उद्देशाने एकत्र आलेल्या प्रोफेशनल्स चा क्लब. (मराठी लोकांना सदैव शिव्या घालणाऱ्या लोकांनी हे वाक्य परत वाचावे). हे ऐकूनच माझी उत्सुकता चाळवली. (हो, म्हणजे असं काही ऐकलं  तरीही माझी उत्सुकता चाळवते बरं).

venue होता मुंबई चं कफ परेड चं World Trade Center (अजून एक धक्का). उपस्थित लोक तब्बल २५०. सगळे सुटाबुटात एकदम. (मला पण शिवावा लागेल आता). सुरुवात पण  वेळेवर. (खरं तर वेळेचं  बंधन दोन दिवस प्रत्येक जण पाळत होता.) थीम होती "How to go Global?". मला नेहमीच प्रश्न पडायचा, बोंबलायला इथेच इतकं मार्केट पडलं आहे तर ग्लोबल कशासाठी जायचं, हातचं सोडून पळत्याच्या मागे. तर मित्रांनो, तसं नाही आहे ते. गो ग्लोबल म्हणजे, जगाच्या बेंच मार्क असलेल्या manufacturing practices अंगीकारा, क्वालिटी जागतिक दर्जाची बनवा. तुमचं प्रोडक्ट जगात विकण्याच्या लायकीचे बनवा. आणि त्यासाठी भारताबाहेर विका. एकदा कळले तिथले standards कि तुम्हाला डोमेस्टिक मार्केट मध्ये विकणं सोपं होईल आणि मग इथले कस्टमर हे म्हणतात "अरे वो जर्मनी का मिलता है १०० रुपयेमे तो तुम्हारा ५० मे मिलना चाहिये" हे असले तारे तोडणं बंद होईल. धन्यवाद विजय परांजपे साहेब. (विजय सर सिमेन्स च्या बोर्ड वरून नुकतेच रिटायर झाले आहेत. ज्याला हुंगून मनाला तरतरी यावी असं भाषणाचं  पाहिलं  पुष्पं त्यांनी गुंफल).

आणि मग शार्प electronics च्या जपानीज डायरेक्टर साहेबांचे भाषण झाले. Mr Tomiolsogai San. अतिशय हळुवार भाषेत त्यांनी जपान्यांच्या आणि भारतीयांच्या मानसिकतेत ला फरक दाखवला. हळुवार भाषा होती पण मेसेज कडक होता. over commitment देऊ नका. जितकं झेपतं तितकंच commit करा. अभ्यास करा. प्लान करा. situation ला जोखा. वेळ पाळा. मला तर आवडलं बुवा त्यांचं रोखठोक बोलणं. हो म्हणजे, मराठी बाण्याचं फार कौतुक. जपानी बाणा पण कळला. एकदम Straight From Heart. Take a bow, Tomiolsogai San.

त्यानंतर अनेक भाषणांची रेलचेल होती. Innovation पासून ते अगदी SME IPO किंवा ITP  मधून कसा पैसा उभा करू शकतात. एखादं भाषण सोडलं तर वक्ते पण दर्जेदार. पण सगळ्यात बाजी मारून गेले ते विवेक परांजपे   आणि वीरेंद्र गुप्ते. विवेक परांजपे, शप्पथ सांगतो, अतिशय महत्वाच्या गोष्टी, rather management च्या युक्ती, अगदी सहजतेने सांगितल्या, पण सहजता अशी की कुठलाही अभिनिवेश नाही. अगदी गप्पा माराव्यात तसं. पण अख्ख्या हॉलमधे  पिनड्रॉप सायलेन्स. इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व आणि management विषयाची खोलवर जाण हे त्यांच्या बोलण्यातून ठायी ठायी जाणवत होतं. मुकेश अंबानींचे सल्लागार आहेत ते यातच सगळं काय ते आलं. (मागे सुद्धा रिलायंस चा आदराने उल्लेख केला तेव्हा माझ्यावर टीका झाली होती. परांजपेंना ऐका, मग कळेल ३ लाख कोटी टर्न ओव्हर करायला काय पापड बेलावे लागतात ते). वीरेंद्र गुप्ते साहेब बोलले, ethical business practices वर. आता ते स्वत: TATA चं प्रोडक्ट. Ethical Business Practices वर बोलायला त्यांच्याशिवाय कोण योग्य असणार?

बर्याचदा अशा कॉन्फरंस मध्ये पदाधिकारी "माझ्या हाती माईक, अन माझंच ऐक" अशा प्रकारचे असतात. इथे तो ही अपवाद. जे वक्ते बोलावले होते, त्यांचे विचार ऐकण्यात वेळ सत्कारणी लागला.

सगळ्यात कडी म्हणजे B to B सेशन. म्हणजे ग्रुप बनवले होते. relevant business चे. त्यांनी एकत्र बसायचं. (नाही, ते आपलं बसायचं नाही) स्वत:च्या कंपनीची, product ची, कस्टमर सेगमेंट काय, कुठल्या गोष्टी procure करण्यात इंटरेस्ट आहे. सगळं. कार्ड एक्स्चेंज करायचे. नेट्वर्किंग चालू झालंय. नक्कीच फायदा होणार लोकांना.

मग dinner. व्हेज/नॉनव्हेज आणि कॉकटेल वैगेरे व्यवस्थित. black dog, Smirnoff, Bacardi वैगेरे तब्येतीत. (मुद्दाम लिहीलं नाहीतर वाटायचं, मराठी लोकं आहेत, भेळ अन चारोळ्या घातलेलं दूध असेल म्हणून).

आता या लेखाचा शेवट करण्या आधी या कल्पनेच्या founder बद्दल. श्री माधवराव भिडे नावाचे भन्नाट व्यक्तिमत्व. वय ८५ फक्त. खणखणीत भाषा, बोलण्यात प्रचंड उत्साह, मिश्कील विनोदाची पखरण. १४-१५ वर्षांपूर्वी, म्हणजे ते सत्तरीत असताना, ह्या कल्पनेचे १२००० पत्र पाठवली. दोघांनी उत्तर दिलं, ते पण नकारार्थी. त्यातून ही networking चळवळ उभी राहिली. आणि तिचे हे रूप. सार्थकी लागलं हो भिडे साहेब, तुम्हाला ऐकणं. कुणास ठाव, भेट होईल हि कदाचित.

मला तर आवडलं बुवा सगळंच. आता जमेल तसं, हळू हळू का होईना त्याचा भाग व्हावा असं वाटतंय. आणि का नाही वाटणार हो, त्यांची tagline बघा कि

एकमेका सहाय्य करू…………… अवघे होऊ श्रीमंत.

(इथेच मला दत्ता जोशीही भेटले

आणि माझा जुना मित्र विजय सोनावणे हि भेटला. नाशिकला लहानपणी एकत्र टवाळक्या करायचो. त्याच विजयला सुटाबुटात पाहिलं. बिझिनेस पण काय करतो तर multiple intelligence वर counseling. मस्त वाटले रे, विज्या. Oh Sorry, विजय सर!)

विवेक परांजपे साहेबांच्या भाषणावर नंतर.




Saturday, 10 January 2015

यश

च्यायला, आज कालची पोरं किती विचार करतात ना. आता हेच पहा ना, फेसबुकवर युवा मित्र आहे. ग्रामीण भागात राहतो. इंजिनियरिंग ला आहे. माझ्या पोराच्याच वयाचा आहे तो. त्यामुळे यश ठेवू त्याचं नाव. हा मुलगा त्याच्या काकांबरोबर कंपनीतही आला होता. तेव्हाच मला जाणवलं होतं, बंदेमे दम है!

मला मेसेज करून विचारतो

"डोक्यात बरेच दिवस झाले काही प्रश्न आहेत .त्याची उत्तर कुठल्याही पुस्तकात नाहीत अस वाटतय .म्हणुन तुम्हाला विचारतोय .
1)माणसाला मोठ व्हायच असेल तर काय हव .त्याच्याकडे ?
2)त्या माणसाच्या आयुष्यात तत्व असावीत का ?
3)समाजात माणसाला कश्यामुळ किंमत असत?"

बाकी काही उत्तर दयायच्या आधी त्याला बोललो "तुझं भविष्य उज्वल आहे मित्रा!. तुझ्या वयाचा मी होतो तेव्हा तत्व वैगेरे शब्द आसपासही फिरकत नव्हते. असो". मग म्हणालो "तुझ्या दुसर्या प्रश्नाचे उत्तर हो असं आहे. आणि मग तत्व असली, कि पहिल्या आणि तिसर्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागत नाही तर ते अपोआप मिळत जाते."

यश काही विचारात राहिला आणि मग मी यथाबुद्धी बोलत राहिलो. मग तो म्हणाला "आता व्हिजन ठरवतो आणि ते implement करतो. हे कसं वाटतं. तुमचं मत काय आहे?" आयला, आली का पंचाईत. मी आठवीला असताना आमच्या बाजूचा किरण नाना, जळगाव हून डिप्लोमा करून नासिकला परत आल्यावर १९८० साली ७०० रुपये पगारावर VIP कंपनीत नोकरीला लागला. या एकमेव कारणावर मी ठरवलं कि आपण डिप्लोमा करायचा. वयाच्या १९ व्या वर्षी महिन्याला ८०० रुपये. यापेक्षा दुसरे व्हिजन काय ठेवणार!. आणि हा पोरगा विचारतोय "तुमचं मत काय?"

रेटलं शेवटी, आणि मग मी यशला बोललो "हे बघ या वयात व्हिजन असणे काही वाईट नाही. पण ते नसेल तरी काही हरकत नाही. जगातल्या सर्वच यशस्वी लोकांनी वयाच्या २० व्या वर्षी व्हिजन वैगेरे ठेवली असेल असं जर तुला कुणी सांगितलं असेल तर ते धांदात खोटं आहे. व्हिजन स्टेटमेंट बनवण्यासाठी दुनियादारी बघावी लागते. या वयात सगळंच धुसर दिसतं. ते स्वच्छ दिसण्यासाठी थोडी का होईना अनुभवाची जोड लागते. destination ला पोहोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत, पण कुठला रस्ता पकडायचा हे थोडया अनुभवांती कळतं."

यश पुढे म्हणाला "तुमच्या मुलांना किती बरं ना, तुम्ही त्यांना समजावून सांगत असाल." मी हसलो गालातल्या गालात.

४०-४५ मिनिटे बोलल्यावर तो म्हणाला "सर, मार्गदर्शना बद्दल धन्यवाद" मी बोललो "अरे तुझ्या फोन मुळे आणि अशा चर्चेमुळे मलाच माझ्या मार्गाचं दर्शन होतं. तुझेच धन्यवाद."

फोन ठेवल्यावर  वाटून गेलं कि भारताचं भविष्य जितकं प्रोजेक्ट केलं जातं तितकंही वाईट नाही आहे, नाही का?

आता वाट बघतोय यश मंडलिक चं डोकं कधी पकवायला मिळेल ते!!

यश

3 कॉमेंट्स

फेसबुकवर बर्याचदा जातीवरून चर्चा होते. शेतीसारखंच या क्षेत्रातलं माझं ज्ञान तोडकं आहे. आणि का अज्ञानी असू नये. लहानाचा मोठा झालो, पण जातीबद्दल ना कधी घरी विषय ना शाळेत. दहावीनंतर डिप्लोमा ला गेलो. तिथं रमेश नारखेडे नावाचा जीवलग मित्र झाला. तो काही लोकांना जयभीम म्हणायचा. मी एके दिवशी विचारलं, तु नमस्कार च्या ऐवजी जयभीम का म्हणतोस. पहिल्यांदा राग आला त्याला, पण मला खरंच काही माहित नसल्यामुळे शांत झाला.  मग तो मला कॉलेजच्या शेजारी आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर घेऊन गेला. आणि सांगितलं भीमराव आंबेडकर आणि त्यांचं महत्व. दोस्ती दृढच राहिली.

यथावकाश लग्न झालं. आंतरजातीय. विरोध झाला, नाही नाही जातीवरून नाही, अस्मादिक डॉक्टर नव्हते म्हणून. ज्या घरात मला दिलं आहे ते तर राष्ट्रीय संमेलन. माझं आंतरजातीय, वैभवीची बहिण क्षितीजा चं arranged आंतरजातीय, भाऊ अमोल त्याचंही स्वजातीत नाही. चुलत भाऊ शंतनु ची बायको ब्राम्हण, बहिण राधिका चं पंजाब्याशी लग्न. दुसरा चुलत भाऊ संजयची बायको ख्रिश्चन तर चुलत बहिणीचा नवरा ब्राम्हण. मामे बहिण चारू चा नवरा तमिलियन तर मावस बहिण शिल्पाचा नवरा काश्मिरी. प्रसादचं arranged आंतरजातीय. इतकंच काय वैभवीच्या आजोबांनी ब्राह्मण बायको शी लग्न केलं होतं. जमलो कधी अन जातीवरून भांडायचं म्हंटलं तर कुणी कुणाशी भांडायचं.

मी कधी कुणाची जात नाही काढली न माझी कुणी.

मधे मला एका मोठ्या कंपनीतून फोन आला "तुमच्या employees ची जात लिहून पाहिजे" मी विचारलं "का" तर म्हणाला आमच्या कंपनीचा नियम आहे. मी बोललो "employee ला घेताना जात विचारायची नाही हा माझा नियम आहे" तर म्हणाला "सांगावीच लागेल" मी म्हणालो "फोन ठेवतो, परत फोन करू नका" तर साहेबाला घेऊन आला. सगळं कळल्यावर मला म्हणाले "government ला डाटा द्यायचा आहे, प्रायव्हेट सेक्टर मधे मागासवर्गीयांचं स्थान काय?" बोललो "हे आधी सांगायचं ना मग, नियम आहे म्हणून काय सांगता" पोरांना बोलावलं "या कारणासाठी जात विचारतोय" डाटा अमनने गोळा केला अन कंपनीला दिला. (नंतर मग बर्याच कंपन्यांनी मागितला)

जात अजूनही आपल्या समाजात इतकी खोलवर रूजली आहे हे मला फेसबुकवरच कळतं, अन मनस्वी दु:खही होतं. लोकं कधी समोर वार करतात तर कधी आड़ून.

जातव्यवस्था फ़ारशी माहित नसलेला मी एक अज्ञानी माणूस आहे.

त्यामुळे सुखी आहे.

*****************************************************************************

सध्या सगळ्यांचीच कसरत चालू आहे, तारेवरून चालायची. आपण पडतो, धडपडतो पण परत उठून प्रयत्न करतो. तारेवरून चालताना कुणी उजवीकडे झुकतात आणि परत balance साधतात. हेच balance साधण्याचं काम काही जणं डावीकडे झुकूनही करतात. जर सध्या काही सुसह्यता असेल तर अशा समतोल साधणार्या लोकांमुळेच.
*****************************************************************************

 पण एक लक्षात घे. चोरी हा मुळ गुन्हा आहे. तो करताना तुम्ही means कुठले वापरता यावर शिक्षा किती तीव्रतेची आहे ते ठरते. धर्माचा दुराभिमान हा गुन्हा. त्या गुन्ह्याचं execution करताना कोण किती खालची पातळी गाठतं हे दिसतं जगाला. ते विवादास्पद होतं मग, मुळ गुन्हा बाजूला राहतो आणि मग तु आणि मी झटापट करू लागतो.

3 कॉमेंट्स 

Wednesday, 7 January 2015

८ जानेवारी, प्रभात डायरी

दोन दिवस अहमदाबाद ला होतो. इस्रो ला. सलीम आणि इरफान हि होते बरोबर. कंपनीचे टेक्निशियन. तिघंही बर्यापैकी फिरलो. एक मित्र आहे तिथे. एका multinational कंपनीचा हेड. त्याने कार दिली होती. मीच चालवली.

फिरताना सलीम ला सांगितलं, मोबाईल तयार ठेव. कचऱ्याचा ढीग दिसला, किंवा नगरसेवकाचे फेल्क्स दिसले तर हाण फोटो. दुर्दैवाने नाही सापडले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे होते पण ते Vibrant गुजरात आणि प्रवासी दिवस ची ad करणारे. अखिलेश यादव यांचेही होते. UP त येउन investment करा म्हणून सांगणारे. गालातल्या गालात हसलो.

ड्रायविंग करत असल्यामुळे लक्ष ट्राफिक वर होतं. मागे इरफान बसला होता. म्हणाला "च्यायला, BRT चे थांबे बघा कि सर. चकाचक आहेत." सिग्नल ला थांबलो. डोळ्याच्या कोपऱ्यातून बघितलं. न बघितल्यासारखा केलं. इरफान परत पचकला. "BRT फ़ुल्ल सक्सेस दिसती हो इथं. च्यामारी, आपल्या इथे कोण पेंड खातंय मग" मी विषय बदलला. इस्रो चा प्रॉब्लेम कसा solve करू यात विचारलं. त्याला माहित नव्हतं. तो गप्प बसला.

रात्री मित्र भेटला जेवायला. हो, तोच multinational कंपनीचा हेड. साळवी त्याचं नाव. अख्खी हयात पुण्यात गेलेली. गेली ४ वर्षं अहमदाबाद ला आहे. म्हणाला "पोरं आजकाल पुण्याला गेली कि नावं ठेवतात. हे काय लोड शेडींग. पाणी काय वेळेवर मिळत नाही. नातेवाईक भेटतात म्हणून खुश तरी असतात." "तुला शप्पथ सांगतो राजा, क्वालिटी ऑफ लाईफ म्हणशील ना तर १ ते १० च्या स्केल वर मी पुण्याला ३ नंबर देईन तर अहमदाबाद ला ८." जेवण करता करता मी बोललो "जेवण छान आहे, पण गुजरात मध्ये फारच गोड करतात. मला आवडत नाही" आम्ही मग धंदा कसा चालू आहे यावर बोलू लागलो.

दुसर्या दिवशी तुडुंब भरलेल्या नदीवरील ब्रिज वरून जाताना सलीम बोलला "२००३ ला आलो होतो इथे मी. पात्र पार कोरडं असायचं हो. सर्कशी भरायच्या. हि काय जादू झाली." रिवर फ्रंट चं कामही जोरात चालू होतं. आज सलीम आणि इरफान दोघंच गप्पा मारत होते. मी बोललो "गुजरात दंग……" मला तोडून ते मला म्हणाले "सर, चेन्नई नंतर पुढचं स्पिंडल सर्विस सेंटर इथेच काढू" मी मान खाली घालत बघू म्हणालो. 

अहमदाबाद स्टेशनला आलो. २ तास आधी. इरफान ने Wi Fi जोडला आणि मोबाईल खेळत बसला.

घरी पोहोचलो सकाळी ५ ला. उजाडल्यावर वैभवीने औषधाची बाटली आणि सुरी दिली. म्हणाली "झाकण काढून दे." पूर्वी झाकणाला सुरी स्पर्श केली कि ते joint तटकन तुटायचे. आज बराच वेळ फिरवत होतो. ताकदीने. झाकणाचे joint काही तुटेना.

मला वाटलं, बहुधा माझ्या सुरीची धार जरा बोथट झाली आहे. उगाचच. मी ते औषध कडू असेल असं वाटून बाटली ठेवून दिली.
*******************************************************************************

बातम्या ऐकल्या, गंमत वाटली. काय ना, हा माणूस आपला UNO च्या सेक्रेटरीचा उमेदवार होता.

******************************************************************************

Paris: काय बोलणार. त्यांना कळत नाही आहे ते कुठे चालले आहेत. थोडी अक्कल दयावी बुवा त्यांना, देवाने.

८ जानेवारी, प्रभात डायरी



Saturday, 3 January 2015

Spindle

मध्ये काही दिवस काही पोस्ट टाकल्या अन खूप जणांना स्पिंडलबद्दल कुतूहल निर्माण झाले. विचारलं "हि काय भानगड आहे बुवा" तेव्हा आजची पोस्ट स्पिंडल बद्दल. थोडी टेक्निकल. कदाचित बोर होईल. आधीच वैधानिक इशारा.

अगदी सोप्या शब्दात "any part which rotates around its own axis can be called as spindle. It becomes more relevant if it is cylindrical in cross section i.e. shaft." पुस्तकी व्याख्या वेगळी असेल. पण मला जी वाटली व्यवहाराची भाषा. आता मग स्पिंडल कुठेही असू शकतो. कारमध्ये, सायकल, गियर बॉक्स एवढंच काय पण नळात पण स्पिंडल असतो. टेक्सटाईल स्पिंडल तर फ़ेमस आहे. तर मग ज्या स्पिंडलच्या गिरकीमुळे मी गिरक्या घेतो (संतोष शेलार) ते काय आहे. तर सांगतो:

कोणताही पार्ट बनवायचा म्हणजे त्याला मशिनिंग करून बनवावे लागते. म्हणजे थोडक्यात round बार किंवा चौकोनी ठोकळा किंवा for that matter कुठल्याही भौमितीय आकारा मधला लोखंडाचा पीस घेतला (आता इथे वापरले जाणारे वेगवेगळे धातू आहेत. तूर्तास आपण लोखंड समजू. ज्याचा वापर कमी झाला आहे पण तरीही तेच सगळ्यात जास्त वापरले जाणारे) तर पाहिजे नसलेले मटेरियल आपण मशिनिंग करून काढतो. आता हे काम करण्यासाठी CNC मशिन्स असतात. ज्याला turning center आणि मशिनिंग सेंटर म्हणतात. यातला आपण मशिनिंग सेंटर प्रकार घेऊ. तर स्पिंडल म्हणजे heart ऑफ मशीन. म्हणजे स्पिंडल च्या पुढे टूल पकडलं जातं आणि त्याला rpm देतात आणि मटेरियल कट केले जाते.

थोडक्यात आपल्या दैनंदिन जीवनातील कोणतंही व्हेइकल आणि त्याचे पार्टस आणि बाकी मेकँनिकल काम्पोनन्टस बनवताना CNC मशीन्स लागतात. आणि मेटल कटिंग मशीन आली की स्पिंडल आलाच. पुढे हेच application Wood working (फर्नीचर), PCB इंडस्ट्री, ग्लास mfg, dental applications याठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरले गेले आहे. त्यामुळे यात ही स्पिंडल आलाच.

हा स्पिंडल म्हणजे १५-२० पार्ट मिळून असेम्ब्ली असते. त्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे बेअरिंग. ह्या बेअरिंग ला stipulated लाइफ असतं. म्हणजे काही ठराविक तासाने बेअरिंग खराब होतात. (१००००-१२००० working hours. साधारण ४-५ वर्ष.) आणि त्या बेअरिंग खराब झाला कि स्पिंडल आमच्याकडे येतात. रिपेयर करायला. (थोडक्यात आमचं पोटा पाण्याचं त्यामुळे भागतं). कधी मशीन्स वर accident होतात. त्याने पण स्पिंडल खराब होतात. बेअरिंग replacement शिवाय बरीच कामं असतात, पण ते इथं explain करणं फार किचकटीचं होईल.

आता हे आमच्याकडे का? तर ह्या मशिन्स इम्पोर्टेड असतात. जर्मनी, जपान, तैवान, USA ह्या देशातून मशिन्स येतात.  आणि त्याचा स्पिंडल रिपेयर करायचा म्हणजे तो परत त्या देशात पाठवावा लागतो. कारण तो रिपेयर करायचे स्किल इथे फार कमी लोकांकडे आहे. बाहेरच्या देशात स्पिंडल पाठवणे आणि तो रिपेयर करून आणणे हे दिव्य काम आहे. Thanks to Indian Customs. वेळ प्रचंड लागतो. आणि परत कॉस्ट. हि गोरी मंडळी पार धुलाई करतात हो. आणि त्यामुळे आमची चलती. साधारण पणे OEM पेक्षा आम्ही १/४ th कॉस्ट मध्ये काम करतो. म्हणजे एक ठोकताळा. हे १/१० ते १/२ पर्यंत बदलू शकते.

आणि मुख्य म्हणजे त्याला लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणे हे फार किचकट आहे. आणि मुख्य म्हणजे कॅपिटल intensive आहे.  आम्ही सुद्धा गेली १२ वर्ष हे उभं करतोय पण पूर्ण international standards च्या ५०% उभं केलं असेल, आता पर्यंत.

अगदी थोडक्यात सांगायचं तर मशीन म्हणजे माणसाचा देह समजला तर हृदयाला जे जे करावं लागतं ते आम्हाला या क्षेत्रात करावं लागतं. फक्त cardiologist इतके आम्ही श्रीमंत नसतो. (कारण Cardiologist माणसाला जिवंत ठेवून हृदयावर काम करत असतात. आमच्या केस मध्ये मशीन बंद असते).

याउपर कुणाला माहिती हवी असल्यास rmandlik87@gmail.com यावर विचारणे. माहिती दिली जाईल. (मोफत). कुणाला अजून इंटरेस्ट असेल तर पुण्याला या, यथाशक्ती, यथा बुद्धी सांगेल.

आता इतक सांगितलंच आहे तर अजून सही. आमच्या इंडस्ट्री बद्दल.

आम्ही मशीन टूल इंडस्ट्री ला represent करतो. थोडक्यात मदर इंडस्ट्री. आज make in India चा बराच बोलबाला
चालू आहे. त्या प्रोजेक्ट ला यशस्वी करण्यामध्ये मशीन टूल इंडस्ट्री चा सिंहाचा वाटा असेल याबाबत शंका नाही. मशीन टूल इंडस्ट्री ला स्कोप हि खूप आहे. आपल्या देशाच्या मानाने इंडस्ट्री चा साईझ लहानच आहे. ५००० कोटी ची अख्या देशाची इंडस्ट्री. जगात ५००० कोटी पेक्षा जास्त उलाढाल असणार्या किमान १५ कंपन्या आहेत. आणि सध्या भारतात लागणाऱ्या मशिन्सच्या ७०% मशिन्स बाहेरून येतात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती प्रचंड स्कोप आहे ते. थोडक्यात यंग इंजिनियर्स जे हे वाचत आहेत, त्यांनी मशीन टूल इंडस्ट्री हा एक करियर ऑप्शन जरूर ठेवावा. कष्ट भरपूर करण्याची तयारी हवी. पण जर creativity चा आनंद लुटायचा असेल तर Mechanical आणि Electronics इंजिनियर्स खुप enjoy करू शकतील. IMTMA नावाची असोसिएशन आहे. ते या इंडस्ट्रीला लागणारे खुप कोर्सेस कंडक्ट करतात, बंगलोरला. यामुळे industry compatible engineers तयार होतात.

पधारो मारो industry.