Friday 16 January 2015

उद्योगबोध 2015

जरा घाबरतच गेलो होतो मी त्या कॉन्फरन्स ला. उद्योगबोध २०१५. ९ आणि १० जानेवारीला झाली. गिरीश टिळकांना ओळखता का तुम्ही. हो, तेच हेड हंटर लिहिणारे. त्यांनी मेसेज करून सांगितलं, याच नक्की. रु ६००० मोजले वट्ट. वरण भातावर आणि नंतर वडा पावावर पोसलेल्या शरीराला झेपलं नाही. पण विचार केला बघू तर खरी काय प्रकार आहे. आणि परत मग अद्वैत भट आले होते, त्यांनी parent organisation बद्दल सांगितलं "Saturday Club Global Trust." महाराष्ट्रात उद्योग करणाऱ्या उद्योजकांनी networking च्या माध्यमातून एकमेकांना मदत करून एकमेकांच्या उद्योगाची भरभराट व्हावी या उद्देशाने एकत्र आलेल्या प्रोफेशनल्स चा क्लब. (मराठी लोकांना सदैव शिव्या घालणाऱ्या लोकांनी हे वाक्य परत वाचावे). हे ऐकूनच माझी उत्सुकता चाळवली. (हो, म्हणजे असं काही ऐकलं  तरीही माझी उत्सुकता चाळवते बरं).

venue होता मुंबई चं कफ परेड चं World Trade Center (अजून एक धक्का). उपस्थित लोक तब्बल २५०. सगळे सुटाबुटात एकदम. (मला पण शिवावा लागेल आता). सुरुवात पण  वेळेवर. (खरं तर वेळेचं  बंधन दोन दिवस प्रत्येक जण पाळत होता.) थीम होती "How to go Global?". मला नेहमीच प्रश्न पडायचा, बोंबलायला इथेच इतकं मार्केट पडलं आहे तर ग्लोबल कशासाठी जायचं, हातचं सोडून पळत्याच्या मागे. तर मित्रांनो, तसं नाही आहे ते. गो ग्लोबल म्हणजे, जगाच्या बेंच मार्क असलेल्या manufacturing practices अंगीकारा, क्वालिटी जागतिक दर्जाची बनवा. तुमचं प्रोडक्ट जगात विकण्याच्या लायकीचे बनवा. आणि त्यासाठी भारताबाहेर विका. एकदा कळले तिथले standards कि तुम्हाला डोमेस्टिक मार्केट मध्ये विकणं सोपं होईल आणि मग इथले कस्टमर हे म्हणतात "अरे वो जर्मनी का मिलता है १०० रुपयेमे तो तुम्हारा ५० मे मिलना चाहिये" हे असले तारे तोडणं बंद होईल. धन्यवाद विजय परांजपे साहेब. (विजय सर सिमेन्स च्या बोर्ड वरून नुकतेच रिटायर झाले आहेत. ज्याला हुंगून मनाला तरतरी यावी असं भाषणाचं  पाहिलं  पुष्पं त्यांनी गुंफल).

आणि मग शार्प electronics च्या जपानीज डायरेक्टर साहेबांचे भाषण झाले. Mr Tomiolsogai San. अतिशय हळुवार भाषेत त्यांनी जपान्यांच्या आणि भारतीयांच्या मानसिकतेत ला फरक दाखवला. हळुवार भाषा होती पण मेसेज कडक होता. over commitment देऊ नका. जितकं झेपतं तितकंच commit करा. अभ्यास करा. प्लान करा. situation ला जोखा. वेळ पाळा. मला तर आवडलं बुवा त्यांचं रोखठोक बोलणं. हो म्हणजे, मराठी बाण्याचं फार कौतुक. जपानी बाणा पण कळला. एकदम Straight From Heart. Take a bow, Tomiolsogai San.

त्यानंतर अनेक भाषणांची रेलचेल होती. Innovation पासून ते अगदी SME IPO किंवा ITP  मधून कसा पैसा उभा करू शकतात. एखादं भाषण सोडलं तर वक्ते पण दर्जेदार. पण सगळ्यात बाजी मारून गेले ते विवेक परांजपे   आणि वीरेंद्र गुप्ते. विवेक परांजपे, शप्पथ सांगतो, अतिशय महत्वाच्या गोष्टी, rather management च्या युक्ती, अगदी सहजतेने सांगितल्या, पण सहजता अशी की कुठलाही अभिनिवेश नाही. अगदी गप्पा माराव्यात तसं. पण अख्ख्या हॉलमधे  पिनड्रॉप सायलेन्स. इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व आणि management विषयाची खोलवर जाण हे त्यांच्या बोलण्यातून ठायी ठायी जाणवत होतं. मुकेश अंबानींचे सल्लागार आहेत ते यातच सगळं काय ते आलं. (मागे सुद्धा रिलायंस चा आदराने उल्लेख केला तेव्हा माझ्यावर टीका झाली होती. परांजपेंना ऐका, मग कळेल ३ लाख कोटी टर्न ओव्हर करायला काय पापड बेलावे लागतात ते). वीरेंद्र गुप्ते साहेब बोलले, ethical business practices वर. आता ते स्वत: TATA चं प्रोडक्ट. Ethical Business Practices वर बोलायला त्यांच्याशिवाय कोण योग्य असणार?

बर्याचदा अशा कॉन्फरंस मध्ये पदाधिकारी "माझ्या हाती माईक, अन माझंच ऐक" अशा प्रकारचे असतात. इथे तो ही अपवाद. जे वक्ते बोलावले होते, त्यांचे विचार ऐकण्यात वेळ सत्कारणी लागला.

सगळ्यात कडी म्हणजे B to B सेशन. म्हणजे ग्रुप बनवले होते. relevant business चे. त्यांनी एकत्र बसायचं. (नाही, ते आपलं बसायचं नाही) स्वत:च्या कंपनीची, product ची, कस्टमर सेगमेंट काय, कुठल्या गोष्टी procure करण्यात इंटरेस्ट आहे. सगळं. कार्ड एक्स्चेंज करायचे. नेट्वर्किंग चालू झालंय. नक्कीच फायदा होणार लोकांना.

मग dinner. व्हेज/नॉनव्हेज आणि कॉकटेल वैगेरे व्यवस्थित. black dog, Smirnoff, Bacardi वैगेरे तब्येतीत. (मुद्दाम लिहीलं नाहीतर वाटायचं, मराठी लोकं आहेत, भेळ अन चारोळ्या घातलेलं दूध असेल म्हणून).

आता या लेखाचा शेवट करण्या आधी या कल्पनेच्या founder बद्दल. श्री माधवराव भिडे नावाचे भन्नाट व्यक्तिमत्व. वय ८५ फक्त. खणखणीत भाषा, बोलण्यात प्रचंड उत्साह, मिश्कील विनोदाची पखरण. १४-१५ वर्षांपूर्वी, म्हणजे ते सत्तरीत असताना, ह्या कल्पनेचे १२००० पत्र पाठवली. दोघांनी उत्तर दिलं, ते पण नकारार्थी. त्यातून ही networking चळवळ उभी राहिली. आणि तिचे हे रूप. सार्थकी लागलं हो भिडे साहेब, तुम्हाला ऐकणं. कुणास ठाव, भेट होईल हि कदाचित.

मला तर आवडलं बुवा सगळंच. आता जमेल तसं, हळू हळू का होईना त्याचा भाग व्हावा असं वाटतंय. आणि का नाही वाटणार हो, त्यांची tagline बघा कि

एकमेका सहाय्य करू…………… अवघे होऊ श्रीमंत.

(इथेच मला दत्ता जोशीही भेटले

आणि माझा जुना मित्र विजय सोनावणे हि भेटला. नाशिकला लहानपणी एकत्र टवाळक्या करायचो. त्याच विजयला सुटाबुटात पाहिलं. बिझिनेस पण काय करतो तर multiple intelligence वर counseling. मस्त वाटले रे, विज्या. Oh Sorry, विजय सर!)

विवेक परांजपे साहेबांच्या भाषणावर नंतर.




No comments:

Post a Comment