Saturday 10 January 2015

यश

च्यायला, आज कालची पोरं किती विचार करतात ना. आता हेच पहा ना, फेसबुकवर युवा मित्र आहे. ग्रामीण भागात राहतो. इंजिनियरिंग ला आहे. माझ्या पोराच्याच वयाचा आहे तो. त्यामुळे यश ठेवू त्याचं नाव. हा मुलगा त्याच्या काकांबरोबर कंपनीतही आला होता. तेव्हाच मला जाणवलं होतं, बंदेमे दम है!

मला मेसेज करून विचारतो

"डोक्यात बरेच दिवस झाले काही प्रश्न आहेत .त्याची उत्तर कुठल्याही पुस्तकात नाहीत अस वाटतय .म्हणुन तुम्हाला विचारतोय .
1)माणसाला मोठ व्हायच असेल तर काय हव .त्याच्याकडे ?
2)त्या माणसाच्या आयुष्यात तत्व असावीत का ?
3)समाजात माणसाला कश्यामुळ किंमत असत?"

बाकी काही उत्तर दयायच्या आधी त्याला बोललो "तुझं भविष्य उज्वल आहे मित्रा!. तुझ्या वयाचा मी होतो तेव्हा तत्व वैगेरे शब्द आसपासही फिरकत नव्हते. असो". मग म्हणालो "तुझ्या दुसर्या प्रश्नाचे उत्तर हो असं आहे. आणि मग तत्व असली, कि पहिल्या आणि तिसर्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागत नाही तर ते अपोआप मिळत जाते."

यश काही विचारात राहिला आणि मग मी यथाबुद्धी बोलत राहिलो. मग तो म्हणाला "आता व्हिजन ठरवतो आणि ते implement करतो. हे कसं वाटतं. तुमचं मत काय आहे?" आयला, आली का पंचाईत. मी आठवीला असताना आमच्या बाजूचा किरण नाना, जळगाव हून डिप्लोमा करून नासिकला परत आल्यावर १९८० साली ७०० रुपये पगारावर VIP कंपनीत नोकरीला लागला. या एकमेव कारणावर मी ठरवलं कि आपण डिप्लोमा करायचा. वयाच्या १९ व्या वर्षी महिन्याला ८०० रुपये. यापेक्षा दुसरे व्हिजन काय ठेवणार!. आणि हा पोरगा विचारतोय "तुमचं मत काय?"

रेटलं शेवटी, आणि मग मी यशला बोललो "हे बघ या वयात व्हिजन असणे काही वाईट नाही. पण ते नसेल तरी काही हरकत नाही. जगातल्या सर्वच यशस्वी लोकांनी वयाच्या २० व्या वर्षी व्हिजन वैगेरे ठेवली असेल असं जर तुला कुणी सांगितलं असेल तर ते धांदात खोटं आहे. व्हिजन स्टेटमेंट बनवण्यासाठी दुनियादारी बघावी लागते. या वयात सगळंच धुसर दिसतं. ते स्वच्छ दिसण्यासाठी थोडी का होईना अनुभवाची जोड लागते. destination ला पोहोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत, पण कुठला रस्ता पकडायचा हे थोडया अनुभवांती कळतं."

यश पुढे म्हणाला "तुमच्या मुलांना किती बरं ना, तुम्ही त्यांना समजावून सांगत असाल." मी हसलो गालातल्या गालात.

४०-४५ मिनिटे बोलल्यावर तो म्हणाला "सर, मार्गदर्शना बद्दल धन्यवाद" मी बोललो "अरे तुझ्या फोन मुळे आणि अशा चर्चेमुळे मलाच माझ्या मार्गाचं दर्शन होतं. तुझेच धन्यवाद."

फोन ठेवल्यावर  वाटून गेलं कि भारताचं भविष्य जितकं प्रोजेक्ट केलं जातं तितकंही वाईट नाही आहे, नाही का?

आता वाट बघतोय यश मंडलिक चं डोकं कधी पकवायला मिळेल ते!!

यश

No comments:

Post a Comment