Saturday 10 January 2015

3 कॉमेंट्स

फेसबुकवर बर्याचदा जातीवरून चर्चा होते. शेतीसारखंच या क्षेत्रातलं माझं ज्ञान तोडकं आहे. आणि का अज्ञानी असू नये. लहानाचा मोठा झालो, पण जातीबद्दल ना कधी घरी विषय ना शाळेत. दहावीनंतर डिप्लोमा ला गेलो. तिथं रमेश नारखेडे नावाचा जीवलग मित्र झाला. तो काही लोकांना जयभीम म्हणायचा. मी एके दिवशी विचारलं, तु नमस्कार च्या ऐवजी जयभीम का म्हणतोस. पहिल्यांदा राग आला त्याला, पण मला खरंच काही माहित नसल्यामुळे शांत झाला.  मग तो मला कॉलेजच्या शेजारी आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर घेऊन गेला. आणि सांगितलं भीमराव आंबेडकर आणि त्यांचं महत्व. दोस्ती दृढच राहिली.

यथावकाश लग्न झालं. आंतरजातीय. विरोध झाला, नाही नाही जातीवरून नाही, अस्मादिक डॉक्टर नव्हते म्हणून. ज्या घरात मला दिलं आहे ते तर राष्ट्रीय संमेलन. माझं आंतरजातीय, वैभवीची बहिण क्षितीजा चं arranged आंतरजातीय, भाऊ अमोल त्याचंही स्वजातीत नाही. चुलत भाऊ शंतनु ची बायको ब्राम्हण, बहिण राधिका चं पंजाब्याशी लग्न. दुसरा चुलत भाऊ संजयची बायको ख्रिश्चन तर चुलत बहिणीचा नवरा ब्राम्हण. मामे बहिण चारू चा नवरा तमिलियन तर मावस बहिण शिल्पाचा नवरा काश्मिरी. प्रसादचं arranged आंतरजातीय. इतकंच काय वैभवीच्या आजोबांनी ब्राह्मण बायको शी लग्न केलं होतं. जमलो कधी अन जातीवरून भांडायचं म्हंटलं तर कुणी कुणाशी भांडायचं.

मी कधी कुणाची जात नाही काढली न माझी कुणी.

मधे मला एका मोठ्या कंपनीतून फोन आला "तुमच्या employees ची जात लिहून पाहिजे" मी विचारलं "का" तर म्हणाला आमच्या कंपनीचा नियम आहे. मी बोललो "employee ला घेताना जात विचारायची नाही हा माझा नियम आहे" तर म्हणाला "सांगावीच लागेल" मी म्हणालो "फोन ठेवतो, परत फोन करू नका" तर साहेबाला घेऊन आला. सगळं कळल्यावर मला म्हणाले "government ला डाटा द्यायचा आहे, प्रायव्हेट सेक्टर मधे मागासवर्गीयांचं स्थान काय?" बोललो "हे आधी सांगायचं ना मग, नियम आहे म्हणून काय सांगता" पोरांना बोलावलं "या कारणासाठी जात विचारतोय" डाटा अमनने गोळा केला अन कंपनीला दिला. (नंतर मग बर्याच कंपन्यांनी मागितला)

जात अजूनही आपल्या समाजात इतकी खोलवर रूजली आहे हे मला फेसबुकवरच कळतं, अन मनस्वी दु:खही होतं. लोकं कधी समोर वार करतात तर कधी आड़ून.

जातव्यवस्था फ़ारशी माहित नसलेला मी एक अज्ञानी माणूस आहे.

त्यामुळे सुखी आहे.

*****************************************************************************

सध्या सगळ्यांचीच कसरत चालू आहे, तारेवरून चालायची. आपण पडतो, धडपडतो पण परत उठून प्रयत्न करतो. तारेवरून चालताना कुणी उजवीकडे झुकतात आणि परत balance साधतात. हेच balance साधण्याचं काम काही जणं डावीकडे झुकूनही करतात. जर सध्या काही सुसह्यता असेल तर अशा समतोल साधणार्या लोकांमुळेच.
*****************************************************************************

 पण एक लक्षात घे. चोरी हा मुळ गुन्हा आहे. तो करताना तुम्ही means कुठले वापरता यावर शिक्षा किती तीव्रतेची आहे ते ठरते. धर्माचा दुराभिमान हा गुन्हा. त्या गुन्ह्याचं execution करताना कोण किती खालची पातळी गाठतं हे दिसतं जगाला. ते विवादास्पद होतं मग, मुळ गुन्हा बाजूला राहतो आणि मग तु आणि मी झटापट करू लागतो.

3 कॉमेंट्स 

No comments:

Post a Comment