आपण मोठ्या आस्थापनेला भेट देतो तेव्हा तिथे एक बोर्ड भिंतीवर टांगलेला दिसतो. जिथे त्या आस्थापनेचे काम करण्याचे मूळ सिद्धांत (कोअर व्हॅल्यूज) आणि मूळ उद्देश (कोअर पर्पज) लिहिलेले असतात. कधी आपण विचार केला आहे का की ते का लिहिले असतात? आणि मुख्य म्हणजे कधी हा विचार केला आहे का की हा फलक फक्त मोठ्या आस्थापनेत का दिसतो? कुणास ठाऊक काहींना वाटत असेल की हे सिद्धांत आणि उद्देश यावर विचार करायची गरज ही फक्त मोठ्या व्यवसायाला असते. किंवा कुणाला हे ही वाटू शकेल की हे फक्त लोकांना लुभावण्यासाठी केलेलं असतं. त्याने फक्त भिंती सजवल्या जातात प्रत्यक्ष व्यावसायिक जीवनात त्याचा काहीही उपयोग नसतो.
माझं याबाबतचं मत थोडं वेगळं आहे. मला सुद्धा व्यवसायाचे मूळ उद्देश आणि सिद्धांत डिझाईन करण्याची प्रेरणा २०१६ ला मिळाली. म्हणजे व्यवसाय चालू केल्यानंतर तब्बल १४ वर्षांनी. हे माहिती का करून घ्यायला पाहिजे यावर माझं मत व्यक्त करतो.
उद्योजक जेव्हा त्याचा व्यवसाय चालू करतो आणि जेव्हा व्यवसाय वयात येतो, म्हणजे त्याचं व्यावसायिक वय ८-१० वर्षे होतं तेव्हा आपण एक निष्कर्ष काढू शकतो की तो व्यवसाय आता तग धरू शकेल. याचा दुसरा अर्थ असा की ग्राहकांनी त्या व्यवसायाला स्वीकारलं आहे. पुढं जाऊन आपण असं म्हणू शकतो की उद्योजकाचे जे व्यवसायाचे सिद्धांत आहेत ते ग्राहकांनी, पुरवठादाराने तसेच त्याच्या एम्प्लॉईजने पण स्वीकारले असतात. आता थोडा असा विचार करा की ज्या सिद्धांतावर उद्योजकाने व्यवसायाचा डोलारा सांभाळला असतो तेच सिद्धांत त्याच्या प्रत्येक सहकाऱ्याने वापरले तर काय होईल?
अगदी बरोबर.....त्या आस्थापनेतल्या कर्मचाऱ्याबरोबर कोणताही व्यवहार करताना असं वाटेल की जणू काही आपण त्या व्यवसायाच्या संस्थापकाशी आपण व्यवहार करतोय. ग्राहकाला वाटेल की ज्या सिद्धांताच्या आधारे व्यवसायाला ऑर्डर दिल्या त्या आपण सातत्याने देऊ शकू कारण जी उत्पादन गुणवत्ता, जी सेवा आपल्या उद्योजकाने दिली तीच गुणवत्ता, तीच तत्पर सेवा त्या कंपनीचा कर्मचारी पण देतोय. साधारण अशाच पद्धतीची भावना पुरवठादार किंवा कामावर काम करणारे सहकारी यांच्या मनात पण असेल.
या सगळ्याचा उपयोग कंपनीतील कर्मचाऱ्यांची निवड करताना होतो. त्यातही जेव्हा आपण जेष्ठ पदावरचे लोक निवडत असतो, त्यावेळेला या मूळ सिद्धांत आणि उद्देश याचा संयुक्तिक वापर केला तर तुमचे पर्याय कंपनीत उभे करायला मदत होते आणि त्यामुळे व्यवस्थापनाची जबाबदारी वाटून घेता येते. बऱ्याचदा असं होतं की आपण कर्मचाऱ्यांची निवड करताना व्यवसायाशी निगडित तांत्रिक कौशल्यांच्या आधारे निवड करतो पण जर कधी त्यांची कामाची पद्धती आवडली नाही तर ती मूळ सिद्धांताच्या निगडित असते. तेव्हा मुलाखत घेताना जॉब सीकर चे मूळ सिद्धांत हे तुमच्या सिद्धांताशी जुळतात का ते पहा. तांत्रिक कौशल्य हे नंतर ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकवू शकतो पण सिद्धांत शिकवणं हे अत्यंत अवघड काम आहे. त्यातही ऑर्गनायझेशन च्या संरचनेत जेव्हा आपण जेष्ठ कर्मचारी निवडतो तेव्हा हा भाग अत्यंत महत्वाचा ठरतो.
तेव्हा तुमच्या व्यवसायाला जर सात आठ वर्षे झाली असतील आणि आता त्याबद्दल मनात आत्मविश्वास आला असेल की आपण हा व्यवसाय अनेक वर्षे चालवू शकू, तर तुमचे व्यवसायाचे मूळ सिद्धांत काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे हे शोधण्याचा जरूर प्रयत्न करा. थोडी अवघड प्रोसेस आहे पण अत्यंत उत्कंठावर्धक आहे. जर तुम्हाला काही अडचण वाटली तर सल्लागार लोकांची मदत घ्या. फक्त इथे एक निर्वाणीचा मुद्दा सांगतो. त्यावर काम करताना त्या प्रोसेसचा तुम्ही भाग व्हा. कारण तुमचे सिद्धांत आणि उद्देश हे तुम्हालाच शोधायचे आहेत. सल्लागाराची मदत फक्त प्रोसेस समजावून घेण्यासाठी घ्या.
व्यवसायाच्या या महत्वाच्या टप्प्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
सकाळ लेख क्र ७
No comments:
Post a Comment