पुढे मी एसकेएफला लागलो. तिथले हुशार म्हणून गणले जाणारे इंजिनियर्स यांनी बजाज ऑटो मध्ये काम केलं होतं आणि मग एसकेएफ ला आले होते. इतकंच काय पण माझे क्लासमेट असणाऱ्या साऱ्या जणांच्या वागण्यात एक धार आली होती. टेक्निकल नॉलेज त्यांचं झळाळून निघत होतं. बजाज ऑटोच्या टेक्निकल कामाची कमाल होती. अशी तगडी ऑर्गनायझेशन श्री राहुलकुमार बजाज यांनी बनवली होती.
पुढे हायड्रॉलिक सील्स विकण्याच्या आणि नंतर माझ्या स्पिंडल दुरुस्ती आणि उत्पादन करायच्या व्यवसायाच्या निमित्ताने मला बऱ्याचदा बजाज ऑटो च्या औरंगाबाद आणि आकुर्डी प्लांट मध्ये जावं लागलं. आजही जातो. लौकिकर्थाने मी फारसा काही बिझिनेस केला नाही, पण कधीही बजाज ऑटो मध्ये जायचं म्हंटल्यावर मी हरखून जायचो. एक वेगळीच सकारात्मक भावना बजाज ऑटो च्या मेन गेट पासून सरसरत जायची. कंपनीच्या लीडरची ही कमाल असते. श्री राहुलकुमार बजाज यांच्यामुळे असणारे पॉझिटिव्ह व्हाइब्ज हे कंपनीच्या प्रत्येक आवारात जाणवत राहतात.
बजाज ऑटो मध्ये दिसणारा नेटनेटकेपणा, कुठलंही काम उत्तम करण्याचा तिथला आग्रह, सातत्याने नवनवीन होणारी डेव्हलपमेंट ही संस्कृती राहुलकुमार बजाज सरांनी रुजवली आणि त्यांची शिकवण पुढच्या पिढीने फुलवली. सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व असावं अशा पद्धतीने डावपेच रचणाऱ्या चायनीज उत्पादनाला मात्र दुचाकी आणि चारचाकी व्यवसायात भारतात जम बसवता आला नाही त्यामागे भारतातील सर्वच ऑटोमोबाईल कंपन्यांचा सहभाग आहे. बजाज ऑटो चे धोरण या क्षेत्रात पूरक होतं आणि ते बनवण्यात श्री राहुलकुमार बजाज यांचं योगदान असावं असं मानण्यात चांगला वाव आहे. उत्तर भारतातील हिरो ग्रुपने जपानच्या होंडा बरोबर सामंजस्य करार करार करत बजाज ऑटो ला टक्कर दिली आणि भले व्यवसायिक गणितावर ते बजाजच्या पुढे गेले पण मार्केट मध्ये बजाज ऑटो चा दबदबा कायम राहिला. स्कुटर या त्यांच्या एस प्रॉडक्ट ला दुरावा देत, पुढच्या पिढीने आणलेल्या मोटारसायकल ला श्री राहुलकुमार बजाज यांनी पाठिंबा दिला आणि कंपनीची सूत्र राजीव आणि संजीव बजाज यांच्या हातात सोपवताना कुठलंही फ्रिक्शन होणार नाही याची काळजी घेतली.
भारतीय उत्पादनक्षेत्राला ज्या मोजक्या कंपन्यांमुळे चार चांद लागले त्यात बजाज ऑटो चा नंबर खूप वर आहे आणि पर्यायाने श्री राहुलकुमार बजाज यांचं नाव हे आपल्या औद्योगिक इतिहास जेव्हा कधी लिहिला जाईल तेव्हा आत्यंतिक आदराने घेतलं जाईल यात शंका नाही. चार पाच वर्षांपूर्वी एका लग्न सोहळ्यात श्री राहुलकुमार बजाज केवळ दहा फुटांवर बसले होते. पण त्यांच्या आजूबाजूला मोठमोठ्या लोकांचा घोळका होता, त्यामुळे इच्छा असूनही मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही पण दुरूनच नमस्कार केला. सुदैवाने मला पुढचा जन्म जर इंजिनियरचा मिळाला तर काही कंपन्यांमध्ये माझी या जन्मी काम करायची अपूर्ण राहिलेली इच्छा तेव्हा पूर्ण होईल यात एक नाव हे बजाज ऑटो पण आहे.
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राचे अर्ध्वयू, बुलंद भारत की बुलंद तस्वीर दिवंगत श्री राहुलकुमार बजाज यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.
No comments:
Post a Comment