मागील लेखात लिहिल्याप्रमाणे एकदा व्यवसायाचे मूळ सिद्धांत आणि उद्देश शोधला की मग पुढची पायरी येते ती व्यवसायाचा थोडा दूरवर विचार करण्याची. साधारण हा काळ तीन ते पाच वर्षाचा असावा. त्या काळामध्ये व्यवसायाचं रूप काय असणार आहे, आपल्याला काही नवनवीन गोष्टी करायच्या आहेत का आणि असेल तर त्या कुठल्या याबद्दल विचारमंथन व्हायला हवं. व्यवस्थापनेच्या भाषेत याला "बिझिनेस प्लॅन" म्हणतात. उद्याचा विचार करण्याची मानसिकता ही सिनियर लीडरशिप कडे असणं अपेक्षित असतं. त्याचं प्रतिबिंब हे या व्यवसायाच्या योजनेवर पडावं ज्यायोगे येणाऱ्या वर्षांमध्ये व्यवसायाची वाटचाल कोणत्या मार्गावर होणार हे अधोरेखित करता येतं.
या श्वेतपत्रिकेत व्यवसायाचे मूळ सिद्धांत आणि उद्देश याशिवाय कंपनीचं मिशन स्टेटमेंट काय आहे आणि ते कुणासाठी, कोणत्या पद्धतीने पूर्ण करायचं आहे हे उल्लेखलं गेलं पाहिजे. हे मिशन स्टेटमेंट बनवण्यासाठी जर तुम्हाला फारसे कष्ट पडत नसतील तर तुम्ही व्यवसाय योग्य पद्धतीने करत आहात असा निष्कर्ष काढायला हरकत नाही. थोडक्यात व्यवसायाचा आराखडा हा तुमच्या डोक्यात तयार आहे, तो फक्त व्यवस्थितपणे कागदावर उतरवायचा आहे. एकदा ते झालं की लिहिलेल्या गोष्टींवर वैचारिक मंथन करता येतं आणि व्यवसायच्या भावी काळातील योजना या स्पष्टपणे समोर येतात.
कंपनीचे मूळ सिद्धांत, मूळ उद्देश, मिशन स्टेटमेंट आणि हे मिशन कोणासाठी, काय पद्धतीने, किती काळात पूर्ण करतोय हे ज्याठिकाणी लिहिलं जातं त्याला व्यवसायाचा "दूरदृष्टी फलक" (व्हिजन बोर्ड) म्हंटलं जातं. हा एकदा तयार झाला की व्यवस्थापकीय कौशल्याचा पुढील भागाकडे आपल्याला जाता येतं.
तो भाग म्हणजे वार्षिक ध्येय ठरवणे. हे वार्षिक ध्येय बनवताना मी हॉवर्ड बिझिनेस रिव्ह्यू च्या एका पेपरचा संदर्भ देतो. ते असं म्हणतात की आपले वार्षिक ध्येय जर सांख्यिकी पायांवर लिहून काढायचे असतील तर त्यांना चार भागात विभागावं. या पद्धतीला त्यांनी "बॅलन्स स्कोअर कार्ड" असं नाव दिलं आहे. हे चार भाग आहेत, फिनान्शियल गोल (आर्थिक ध्येय), कस्टमर ओरिएन्टेशन (ग्राहकांप्रती सजगता), इंटर्नल प्रोसेस अँड सिस्टम्स (अंतर्गत पद्धती), लर्निंग अँड ग्रोथ (नाविन्यता आणि वृद्धी). थोडक्यात हा संदर्भ असं सांगतो की आपल्या व्यवसायात आपण जी काही ध्येये ठरवतो आणि ती पूर्ण करण्यासाठी ज्या काही कृती ठरवतो, त्या सर्व कृतींना आता उल्लेखलेल्या चार क्षेत्रात विभागता येतं आणि ते कौशल्य एकदा अंगीकारलं तर व्यवसायाचं व्यवस्थापन करणं हे सोपं जातं आणि त्यामागे पद्धतशीर निर्णयाचा आणि त्यायोगे कृतींचा आराखडा बनवता येतो. सगळ्यात मुख्य म्हणजे आपण जे ठरवलं ते त्याबरहुकूम घडतं आहे का हे मॉनिटर करता येतं.
हे सगळं वाचताना कदाचित असं वाटू शकेल की हे सगळं छोट्या व्यवसायाने करायची गरज आहे का? तर माझं उत्तर हो, असं आहे. आता इथे वाचताना ते अवघडही वाटू शकेल, पण एकदा तुम्ही व्यवसायाचा अभ्यास करत हे कौशल्य शिकलात तर तुमचा व्यवसाय हा शाश्वत पद्धतीने आणि त्याचबरोबर तो तुमच्या नियंत्रणात आहे असं लक्षात येईल. तस झालं तर मग करोना सारख्या आपत्तीने अस्थिर झालेल्या जगात तुमच्या व्यवसायाला स्थैर्य आणण्यात हातभार लागेल असं मला वाटतं.
सकाळ लेख क्र ८,
No comments:
Post a Comment