Monday, 30 December 2013

सिंहगड

तसा मी हाडाचा trekker नाही. (तसं बघायला गेलं तर मी हाडाचा खेळाडू नाही, हाडाचा engineer नाही किंवा हाडाचा वाचक नाही. माझे आणि हाडाचे नाते हे फक्त चघळण्या पुरतेच आहे.) म्हणजे मला trekking ची आवड नाही असेही नाही, फक्त कुणीतरी पुकारा केला पाहिजे. कॉलेज मध्ये एक तर गोडबोल्यांचा राजेश फरफाटावायचा किंवा BJ Medical चा एक वल्ली ग्रुप होता ते तरी ओढून न्यायचे. (ह्या ग्रुप मधील वल्ली  आता पुण्यातील प्रथितयश डॉक्टर्स आहेत) नाही म्हणायला एक-दोन ट्रेक मी arrange केले आहेत पण ते तुरळक. बाकी आपली मजल पर्वती, चतुश्रुंगी किंवा फारतर घरामागची रामटेकडी. हो, म्हणजे डी म्हणेपर्यंत जी टेकडी संपते ती.

या पार्श्वभूमीवर मी रविवारी सिंहगडावर जायचे ठरवले तेव्हा माझे मलाच आश्चर्य वाटले. बाकी घरच्यांनी "याला वेड लागले आहे" असे म्हणून सोडून दिले. (या कारणास्तव मला दररोज कुठल्यातरी कामावर अर्पण केले जाते).

सकाळी ६:३० वाजता पायथ्याला पोहोचलो. एका छोटया शेतजमिनीचे pay and park मध्ये रुपांतर केले होते. शेतीच्या उत्पन्नापेक्षा पार्किंग मधून जास्त पैसे कमावता येतात हे बघून आश्चर्य वाटले. (संजय सोनवणी सरांच्या लेखाची आठवण झाली).

कारमधून उतरून खाली घसरलेली ३/४ जरा वरती ओढली. (ही आपली style आहे. कुठल्याही घाम गाळण्याच्या क्रिया करताना मी जरा अघळ पघळ कपडे घालतो. वजन आणि घेर कमी झाला आहे हे जाणवण्यासाठी ही फारच नामी क्लुप्ती आहे. मला माहिती आहे, तुमचे विचार चक्र कंसातील पहिल्या वाक्यावरच थबकले आहे. आणि नाही ते विचार तुमच्या मनात येत आहेत . पण ते थांबवा आणि पुढे वाचा.) आणि सिंहगडावर आक्रमण केले.

थंडी असेल म्हणून टी शर्ट वर पुल ओवर घातला होता. थोडया वेळातच उकडायला लागले, म्हणून तो काढून हातात घेतला. थोडया वेळातच त्या पुल ओवर चे वजन मला डाचायला लागले. म्हंटल किती बावळट आहोत आपण. (हे स्वगत दर दिवशी ४-५ वेळा कुठल्यातरी कारणास्तव होतेच) कार मधेच ठेवायला हवे होते.

एक गम्मत आहे, कुठल्याही गडावर जाताना वा येताना कुणीतरी असे भेटतेच किंवा काहीतरी असे होते कि ते विसरता येत नाही, मग ते रायरेश्वर वरून येताना "ओ ग माझा पांडुरंग, महराजाना भेटून आला व्हय चालत जाऊन" म्हणणारी आणि नील चा गालगुच्चा घेणारी म्हातारी आजी असो, किंवा राजगडावर भूक लागल्यावर स्वत:च्या वाटेची भाकरी आणि वाशाट देणारी मावशी असो. त्या पुल ओवर च्या वजनाचा विचार करत असतानाच मला समोर "ती" दिसली. साधारण ५५ वय, हिरवे नऊवारी पातळ, रापलेला रंग आणि डोक्यावर ३०-३५ लिटर चा पाण्याचा छोटा ड्रम आणि हातात एक कळशी. हळूहळू गड चढत होती. मला माझीच लाज वाटली. मी त्या माउली च्या मागेच होतो आणि तिची झोपडी आली. छोटे हॉटेल होते तिचे. मला आश्चर्य वाटले, तिथे एक तरणा बांड मुलगा काकडी चिरत उभा होता. मला ते काही झेपलं नाही. म्हणजे ती त्याची आई असो वा नसो, ते चित्र विचित्रच होतं, हे खरं. ते पाणी तिने  लिंबू सरबतासाठी आणले असावे.

चढण अर्ध्यावर आली होती. एक छोटा ग्रुप होता, साधारण तिशीतील असावे सर्व. २-३ लेडीज आणि २-३ जंटलमन. त्यातल्या एकीने एकाला विचारले "ही पाण्याची बाटली इथे फेकू का" तो म्हणाला "फेक" मला राहवले नाही. मी म्हणालो "प्रत्येक हॉटेल मध्ये आता कचरा गोळा करतात. तिथे टाका". तर ती तिशीतील तरुणी म्हणाली "बरं काका" काका, सूचना दिल्याचा सूड ती असा उगवेल असं वाटले नव्हते. माझ्या छातीत एक सूक्ष्म कळ उठली. ती गड भरभर चढल्यामुळे आली अशी मी मनाची समजूत घालून निघालो.

चढाई जारी होती. ५५-५६ वयाच्या ५-६  जणांचा ग्रुप आला. सगळे बापे. त्यातला एक जण त्यांच्या वयाला न शोभेल अशा घाण भाषेत बोलत होता. आणि मोठयानी. उगाचच हसायचे. बाकी लोकसुद्धा मनात इच्छा नसून साथ देत होते. मला त्यातील कृत्रिमपणा जाणवत होता. मला हसू आले. मनात आले यांनी माझे कॉलेज मधले सुसंवाद ऐकले असते तर सोवळे घालून "घालीन लोटांगण" म्हणले असते. असो.

सकळाचे ७:३० वाजले होते. तेवढ्यात एक जुना मित्र आला. त्याचे नाव "क्ष" ठेवू. ह्या क्ष ला जवानीत प्रत्येक पार्टी मध्ये out झाल्यावर रूमवर सोडायची जबाबदारी माझ्यावर असायची. तर क्ष म्हणाला "तब्येत कशी आहे" मी म्हणालो "उत्तम", पुढचा प्रश्न "मग काय ड्रिंक्स सोडले कि नाही" आयला वेळ सकाळची साडेसातची, गड चढतो आहे, बरं  हा एकेकाळचा पेत्ताड आणि मला विचारतो आहे दारू सोडलीस का? मी नवसागर पिल्यासारखा चेहरा केला आणि त्याला बाय म्हणालो.

दीड तासाची रपेट करून मी वरती पोहोचलो. गडाच्या मागे जाऊन भरार वारा खाल्ला, गड एकदम स्वच्छ दिसत होता. शासनांनी आणि काही NGO नि चांगले काम केल्याचे जाणवत होते. पोहे खाल्ले, २ ग्लास ताक पिलो. पोहे आणि ताकाचे ९० रु झाले. आणि माझा मध्यमवर्गीय मराठी बाणा जागा झाला. तेवढ्यात एक्स्प्रेस हाय वे वर चहासाठी २० रु मुकाट देण्याचा नतद्रष्ट पणा आठवला आणि पाणी आणणारी ती स्त्री हि आठवली. गपगुमान पैसे दिले आणि खाली उतरायला निघालो.

मजल दर मजल करत कार पाशी येउन पोहोचलो आणि गडाकडे पहिले. बऱ्याच दिवसानंतर आलो होतो. अडीच वर्षांपूर्वी angioplasty झाल्यापासून हे उदयोग कमीच झाले होते. त्यामुळे मस्त वाटले, आणि उगाचच घोषणा द्यावी वाटली "डॉ सुहास हरदास की जय" "angioplasty शोधणाऱ्या Allopathy चा विजय असो" रुबी hall ची ही आठवण आली. त्याचे बिलपण आठवले. रुबी hall चे बिल……… आई ग…………छातीत पुन्हा कळ  आल्यासारखे का वाटतंय.

Saturday, 28 December 2013

पराक्रम



Lead, Educate, Apply, Prosper (LEAP) असेच नाव होते conference चे. मे २०१३, हॉटेल grand hyatt गोवा. By the way, मी अशा भरपूर conferences attend करतो. पंचतारांकित हॉटेल मध्ये सकाळी दाबून ब्रेकफास्ट करतो, दुपारी दाबून जेवतो, दुपारचा High Tea हाणतो, आणि रात्री परत दाबून जेवतो. (मला माहित आहे "दाबून" या शब्दावर तुम्हाला कोटया सुचत आहेत, पण तूर्तास त्या तुमच्या जवळच दाबून ठेवा). तिथे shining पण भरपूर टाकतो. लोकांशी ग्लोबल गाव गप्पा मारतो, तिथे प्रश्न विचारतो, प्रश्नांना उत्तर देतो. एकदम फर्मास. लोकांना वाटते काय भारी माणूस आहे हा! मग परत येतो, रहाटगाडग्यात अडकतो, दाबून खाल्लेलं एव्हाना जिरून गेलं असतं आणि मी माझा नेहमीचा "सर्व जगाचा भार या खांद्यावर आहे" अशी देहबोली करून कामाला लागेलेला असतो.

पण या LEAP मध्ये एका माणसाला ऐकले, आणि "खूप काम आहे विसर ते व्यक्तिमत्व" असं बजावून हि  मनात ते भाषण रुंजी घालत राहतं.तसे तिथे तिघे बोलले श्री शिरगुरकर, श्री केळकर आणि पराक्रम सिंह जडेजा. विषय होता "when  I Was small" पहिल्या दोघांचंही भाषण मनाला उभारी देणारं. अस्खलित इंग्रजीत. दोघंही उच्च विद्याविभूषित आणि अगदी copy book पद्धतीने business वाढवला. म्हणजे प्रॉब्लेम आले पण ठीक होते. मी सांगणार आहे तिसऱ्या वल्ली बद्दल. 

पराक्रम सिंह  त्याचे नाव. सध्याचे वय साधारण ४७-४८. राहणे: राजकोट. त्यांनी भाषण चालू केले, पहिल्यांदाच सांगून टाकले "माझं इंग्रजी कच्चं आहे, त्यामुळे मी हिंदीत बोलेल, जमेल तसं एखादं वाक्य इंग्रजीत बोलेल."  मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. भाऊ बहिणी अभ्यासात हुशार. पण पराक्रम मात्र खेळातच रमलेला. बुद्धीबळ आणि क्रिकेट ची विशेष आवड. यथातथा अभ्यास करत, बुद्धीबळ च्या स्पर्धेत चमकत होता. क्रिकेट जीव कि प्राण. national ला निवड झाली. गाव आठवत नाही पण स्पर्धेला जायचा खर्च होता रु २५०००. पराक्रमच्या वडिलांना ते जमवायला फारच कष्ट झाले. याला माग, त्याला माग, PF काढ. पराक्रम ते बघत होता. स्पर्धा हरला. मनात एकच, पैसे कमावणे इतकं अवघड आहे का? आणि मग सुरु झाली लढाई.

१२ वि नंतर शिक्षण सोडून मामांच्या धंद्यात join होणे, धंदा होता लेथ चे spares बनवणे. हळूहळू स्वतः चे शॉप टाकले, ज्योती enterprises , धंदा तोच, लेथ चे पार्टस बनवणे. साधारण १९९०. ३०० sqft, भांडवल रु ५००००/- (राजकोट लेथ प्रसिद्ध आहेत). ९५-९६ पर्यंत परिस्थिती अशी झाली की सर्वच पार्ट ज्योतीत बनायचे. ज्योती ने मग स्वतःची लेथच काढली. कंपनी वाढली. १२ वी शिक्षण झालेल्या माणसाच्या दृष्टीने ही मजल खूपच होती. पण पराक्रम पुढचा विचार करत होता, आणि त्यांनी CNC Turning Center launch केली. राजकोट मध्ये बातमी झाली "पराक्रम डूबनेवाला है". डीलर ने केलेल्या अपमानामुळे मार्केटिंग स्वतःच. झंझावाती कामाची मेढ रचली होती. कंपनीला भरपूर order मिळू लागल्या आणि भरभराट होऊ लागली.

पराक्रम सिंहची ज्योती आता चांगलीच स्थिर झाली होती. पण आव्हाने स्वीकारण्याची नशा असलेल्या पराक्रम सिंहना आता खुणावू लागले होते आता मशिनिंग सेंटर चे मार्केट. (लेथ चे CNC version म्हणजे Turning Center तर मिलिंग चे CNC Version मशिनिंग सेंटर). २००३ साली २ कोटी उलाढाल असलेल्या ज्योतीचे Imtex Exhibition चे बजेट होते तब्बल २ कोटी, आणि तिथेच launch झाली अत्याधुनिक मशिनिंग सेंटर. आणि त्यानंतर ज्योतीची घौडदौड चौफेर चालू झाली. नवीन प्रोडक्ट रेंज, मोठी जागा आणि अंगात असलेली जिद्द यांवर कंपनी exponential rate ने वाढत होती.  या दरम्यान ज्योतीला ह्युरोन मशीन टूल या फ्रांसच्या कंपनीतून पार्ट बनवण्याची order मिळाली. पराक्रमजी (आता जी म्हणणे गरजेचे होते) नेहमीच फ्रांस ला जायचे.

२००८. ह्युरोन च्या मालकांनी ठरवले कि कंपनी विकायची, आणि ज्योतीचे धाबे दणाणले. मोठा धंदा जाणार होता. पराक्रमजी फ्रांस मध्ये हॉटेलवर विचार करत बसले होते. एका निर्धारानीच झोपी गेले आणि दुसर्या दिवशी सकाळी ह्युरोन च्या मालकाला न भूतो अशी ऑफर दिली "मला तुमची कंपनी विकत घ्यायची आहे." फिरंग्याला वाटले याला वेड लागले. पण पराक्रम जी दृढ होते. negotiations झाले आणि भारतीय मशीन टूल इंडस्ट्रीच्या इतिहासात एक अतर्क्य गोष्ट घडली. राजकोट सारख्या गावातील (भारताचे मशीन टूल manufacturing हे बंगलोर, हैदराबाद, बेळगाव आणि पुण्यात एकवटले आहे) १०० कोटी उलाढाल असलेल्या कंपनीने फ्रांस मधील एक अग्रगण्य कंपनी २५० कोटीला विकत घेतली. पराक्रम सिंह जडेजा ह्युरोनचा चार्ज घ्यायला फ्रांस ला गेले आणि त्यांच्या समोर भारताचा तिरंगा त्या इमारतीवर फडकताना अंगावर रोमांच उभे राहिले होते.

आता ज्योतीचे नाव भारतात अक्षरश: दुमदुमू लागले. आज ती मशीन टूल इंडस्ट्री मध्ये एक नावारूपाला आलेली अग्रगण्य कंपनी आहे.

LEAP मध्ये हे भाषण झाल्यावर २ मिनिटे pindrop silence होता. भारावलेल्या अवस्थेत सर्वजण आपसूक उभे राहिले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. मला राहवले नाही, मी बोललो "Parakramji you were humble enough to say that you can't speak English well, and you would speak in Hindi. But your address was so straight from heart that even if you would have talked in your mother tongue Gujarati, we all would have understood it equally well."

मी ३-४ वर्षांपासून जडेजा साहेबाना भेटायचा प्रयत्न करत होतो. यावर्षी जमले. तीन तास दिले आणि अख्खी कंपनी दाखवली. ७५ एकरचा परिसर, अत्याधुनिक infrastructure, Leonardo Da Vinchi R&D  सेंटर, आणि कंपनीच्या आवारात मोठा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सर्वांसाठी खुला. आणि पराक्रम सिंह (ज्यांनी त्यांचे हे नाव ठेवले त्या आई वडिलांना प्रणाम) मात्र पूर्ण जमिनीवर. मागच्या वर्षीची  ज्योतीची उलाढाल रु ७०० कोटींची झाली आहे. आणि पराक्रम सिंह मात्र next generation मशीन च्या development च्या विचारात गुंतले आहेत.


(हा लेख त्यांचे भाषण आणि माझी भेट यावर आधारित आहे. दिलेल्या statistics मध्ये काही बदल असण्याची शक्यता आहे. पण दिलेल्या आकडेमोडी पेक्षा त्यांच्या जिद्दीचा आपण विचार करायला हवा, नाही का!)

Friday, 27 December 2013

योगायोग

कधी कधी ध्यानी मनी नसताना एखादी गोष्ट घडते आणि आपण हतबुद्ध होऊन जातो. त्या प्रसंगातून आपण सही सलामत बाहेर पडतो तेव्हा आश्चर्यच वाटते कि आपण कसे  बाहेर पडलो ते.

माझा लहान मुलगा नील तेव्हा साधारण दीड ते दोन वर्षाचा असेल. माझ्याकडे तेव्हा santro होती. मी आणि नील MG रोड ला गेलो होतो, फोटो फास्ट च्या दुकानात. अरोरा towers  च्या समोर. काही फोटो च्या प्रिंट काढायला दिले होते. त्याची डिलिवरी होती. संध्याकाळची ६ ची वेळ. तेव्हा मग रोड ला वेस्ट एंड च्या बाजूने प्रवेश होता. (म्हणजे आता जो वन वे आहे त्याच्या opposite). मी दुकानासमोर आलो तर गाडयांची मरणाची गर्दी. कार कुठेतरी लांब लाऊन यावं लागणार होतं. माझ्याबरोबर नील. विचार केला दुकानासमोर गाडी ठेऊनच काम झाले तर किती बरं होईल. दुकानाच्या समोर फोटो फास्ट चा एक मुलगा उभा दिसला.

फोटोची चिट्ठी खिशातच होती. hand brake लावला. गाडी चालूच ठेवली. उतरलो. नील गाडीतच. धावतच दुकानासमोर गेलो. त्या मुलाला सांगितले हि फोटोंची डिलिवरी घे आणि मला कार मध्ये आणून दे. आणि धावतच परत आलो. कार चा दरवाजा उघडायला गेलो आणि लक्षात आले कि दरवाजा उघडतच नाही आहे. आणि बघतो तर काय उतरताना मी मुर्खासारखा सेन्ट्रल lock करून खाली उतरलो होतो . दोन मिनिटे कळलेच नाही कि काय झाले ते. आता बोंबला!

म्हणजे situation बघा कशी आहे ती. कार चालू, माझा पोरगा कारमध्ये, मी बाहेर आणि गाडी locked. आतमध्ये टेप वर गाणी चालू होती, AC चालू होता, पोरगं गाण्यावर नाचत होतं………अहो पण मंडळी गाडी पण चालू होती. नशीब handbrake लावला होता. आता करू काय, काहीच सुचेनासे झाले होते. एव्हाना तो दुकानाचा मुलगा फोटो घेऊन आला. माझा पडलेला चेहरा बघून (हे एक माझं फार मोठे नाटक आहे, मनातल्या भावना चेहऱ्यावर लागलीच दिसतात) त्याने विचारले काय झाले? मी सांगितल्यावर तो पण हबकला. बंद काचेतून मी नील शी संवाद साधण्याचा विनोदी प्रयत्न करत होतो. मी बाहेरून काहीही म्हंटले कि ते वेडं पोर नुसते टाळ्या पिटत हसायचं. एव्हाना त्याने  driver च्या सीट चा ताबा घेतला होता. त्याला मी खाणाखुणा करून सेन्ट्रल lock चा नॉब उचलायला सांगत होतो. तो बिचारा त्याच नॉब शी खेळल्यासारखे करायचा आणि नंतर भलतीकडेच बघायचा.

संध्याकाळची वेळ. येणारे जाणारे भरपूर. त्या दुकानातल्या मुलाला, सतीशला, metalic पट्टी आणून मारुती ८०० चा दरवाजा उघडायचा अनुभव असावा. त्याने तो पण प्रयत्न केला. पण फसला. एव्हाना बघ्यांची पण गर्दी वाढली होती. "कसलं येडं आहे" असं माझ्याकडे बघत comment पास करत जात होते. नील चं हसणे जरा कमी होऊन त्याचा चेहरा रडवेला झाला होता. मला दडपण आलं आता या पोरानी भोकाड पसरले तर काय करायचे. मी माझा जास्तीत जास्त चेहरा नॉर्मल ठेवून लोकांना कटवत होतो.  duplicate किल्ली आणण्याशिवाय पर्याय नव्हता.

वैभवीची lab तेव्हा हडपसर ला होती आणि ती अर्ध्या रस्त्यात पोहोचली होती. duplicate किल्ली मी गाडी पुसणाऱ्या कडेच ठेवायचो, घरात नाही. (हा अजून एक मूर्खपणा). वैभवी म्हणाली मी करते manage आणि येतेच अर्ध्या तासात. या नाटयमय प्रसंगाला सुरु होऊन २० मिनिटे झाली होती आणि मला अजून ३० मिनिटे खिंड लढवायची होती.

माझ्या मूर्खपणाला कोसत मी कारला प्रदिक्षणा घालत होतो. तेव्हढ्यात मला मागच्या खिडकीच्या काचेत वरती थोडी gap दिसली. का कोण जाणे, मी त्या काचेवर हात ठेवला आणि खाली ओढल्यासारखे केले आणि काय आश्चर्य! ती काच आली कि खाली. मला आनंदाचे भरतेच आले. फोटो फास्ट चा सतीश पण उड्या मारू लागला. (सतीश माझ्या प्रॉब्लेम मध्ये पूर्ण गुंतला होता). वैभवी रिक्षात बसली होती, तिला सांगितले येऊ नको फत्ते झाली आहे.

मला आठवले, मागच्या काचेची वायर महिन्या पूर्वी तुटली होती आणि handle नुसतेच फिरत होते. आज दुरुस्त करू, उद्या करू अशी चालढकल करत ते राहूनच गेले होते. ते असे माझ्या पथ्यावर पडले होते.

दरवाजा उघडून पहिले सीट वर बसलो, शांतपणे. दोन घोट पाणी पिलो. नील साठी कॅडबरी घेतली होती ती सतीशला दिली, त्याने माझा हात प्रेमाने दाबला आणि म्हणाला "आता जावा घरी, आरामात". मी नील कडे पहिले, तो लहानगा जीव आता अर्धा तास एकटाच खेळून पेंगुळला होता. डोळ्यात तळं साठवून मी त्याच्या डोक्यातून हात फिरवला, आणि गाडी चालू केली, घरी जाण्यासाठी……………… आरामात.


(आता सगळ्याच गाड्यांचे पुढचे दार सेन्ट्रल lock करून लावले तरी lock उघडते, त्यामुळे या प्रॉब्लेम ची gravity कमी झाली आहे, हे आपले नशीब. Thanks to innovative ideas in automobile engineering.)

Friday, 20 December 2013

प्रसंग

प्रसंग

वर्ष २०१०. अमेरिकेतील रॅले गावाचे एयरपोर्ट. माझी शिकागोची फ्लाईट. सकाळी ८ ची वेळ. मी चेक इन काऊंटरच्या लाईनमधे. माझा नंबर आला. माझ्या मागे बरीच लोकं लाईनमंधे. मी तिकीट घेऊन गेलो. तिथे स्वयंचलित मशीन होतं बोर्डींग पास देण्यासाठी. तिकीटावर बारकोड होता. पण तो बारकोड कुठे दाखवायचा हे काही माहित नव्हतं. मी तिकीट मशीनवर वेगवेगळ्या पद्धतीने फिरवत होतो, पण मशीन काही फळत नव्हते. मी समोर बघितले, एक बाई उभी होती. रंगाने डार्क सावळी होती. (अमेरिकेत फळ्याला  black board म्हणता येत नाही). तुच्छतेने माझ्याकडे बघत होती. मी अजीजीने तिच्याकडे बघत होतो, पण बाई काही ढिम्म हलत नव्हती. मि विनंती केली, " could you help me to get the boarding pass please". मदत तर दूरची गोष्ट, बाई सरळ तोंड वाकडं करून निघून गेली.

एव्हाना मी हवालदिल झालो होतो. मागची लोकं शांत होती. पण ती शांतताच मला डाचत होती.

तेव्हढ्यात एक गौरांगना जी माझ्याच मागे लाईनमधे ऊभी होती, पुढे आली आणि माझ्या कानात किणकिणली "may I help you?" आणि मी हो म्हणायच्या आत माझं तिकीट घेतलं, मशीनवर योग्य ठिकाणी बारकोड दाखवला. पटकन माझा बोर्डींग पास प्रिंट होऊन बाहेर आला. हायसं वाटलं. मी सुंदरीला मनापासून thank you म्हणालो. ती परत किंणकिणली "you are welcome" आणि माझ्या पाठीवर थोपटलं. मी मोहरलो. (बोर्डींग पास मिळाला म्हणून, नाही तर तुम्हाला वाटेल थोपटलं म्हणून)

निघालो, पण त्या पहिल्या बाईचा तुच्छतेचा कटाक्ष बरेच दिवस सतवत होता. खोटं कशाला सांगू, आठवलं की अजूनही सतावतो.

आताच्या अमेरिकेच्या घटनेशी संबंध जोडणे, म्हणजे बादरायण प्रकार.

मॅडमची पत मोठी, हुद्दा मोठा आणि अपमानही मोठाच. आपली लायकी ती काय, त्यामुळे आलेला राग एकट्यानेच गिळला. आज गदारोळात आठवण झाली एवढेच. आपला पण हिशोब चुकता झाल्याचे समाधान.


Sunday, 15 December 2013

स्नेहालय-एक अनुभव

आणि यादवबाबा मंदिरात माझी गिरीश सर सगळ्यांशी ओळख करून देत होते "हे राजेश मंडलिक, माझे मित्र". मित्राची ओळख किती जुनी तर दहाएक मेल ची देवाणघेवाण. बस. त्या पहिल्या भेटीनेच गिरीश सरांनी मला खिशात टाकले होते. राळेगण सिद्धी गावाला चक्कर मारून माझ्या गाडीने नगर कडे निघालो. आणि त्या प्रवासात उलगडला गिरीश सरांचा आणि पर्यायाने "स्नेहालय" चा प्रवास. हो तेच गिरीश कुलकर्णी, "स्नेहालय" वाले.

लहानग्या गिरीश ला लहानपणी रेड लाईट भागातून क्लास चा जावं लागायचं. वेळ वाचवा म्हणून short cut. पण ह्याच मार्गाने त्यांचा आयुष्याचा मार्ग बदलला . १३-१४ वर्षे ते ७० च्या वेश्या आणि त्यांचे जीवन बघून गिरीश विचार करायला लागला कि कसे असेल यांचे आयुष्य. त्यांची लहान पोरं तिथेच खेळत असायची. आणि मग वयाच्या २० व्या वर्षी गिरीश कुलकर्णी या युवकाने ठरवून टाकले कि या लोकांना मेन स्ट्रीम मध्ये आणायचे. आणि साकारली एक अद्भुत चित्तरकथा.

६ ची  ६० मुलं झाली आणि राहते घर अपुरे पडायला लागले. "मुलांना आज आपण laptop घेऊन देतो, माझ्या वडिलांनी मला घरात वडिलांनी वेश्या ठेवण्याची परवनगी दिली, पुनर्वसनासाठी" गिरीश सहज पणे सांगून जातात. MIDC च्या माळरानावर एक जमिनीचा तुकडा दिला मुथा परिवाराने. आणि सुरु झाले "स्नेहालय". गिरीश सरांची एकनिष्ठता बघून जास्त जमीन मिळत गेली आणि १० एकराच्या परिसरात आज स्नेहालय उभे राहिले आहे. जवळपास ४०० मुलं मुली (बहुतांशी वेश्यांची) तिथे सांभाळली जात आहेत. यातील निम्य्याहून अधिक HIV positive  आहेत. त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळत आहे. सिप्ला foundation तर्फे शाळेची नितांत सुंदर इमारत उभी आहे. सुसज्ज असे कॅन्टीन आहे. जवळपास २० बेडचे हॉस्पिटल आहे. आणि इथे ३rd  स्टेज च्या hiv पेशंटची ट्रीटमेंट दिली जाते अगदी मोफत. अंबादास चव्हाण सारखे कार्यकर्ते गिरीश सरांची वर्षानुवर्षे साथ देत आहेत. आणि त्यांच्या मुलांच्या एकएक कहाण्या ऐकल्या तर माणूस थरारल्या शिवाय राहत नाही. मग ते बलात्काराच्या केस मध्ये मास जन्मठेप घडवून आणणारा साक्षीदार असो, कि सिंगापूर मध्ये एक लाख पगाराची मिळवणारा विद्यार्थी असो, कि श्रीगोन्द्याला फासेपार्धींची मुले सांभाळणारा असो. संस्थेतून कित्येक मुलींचे संसार उभे झाले आहेत. (हो तुम्ही समजताय तसंच, वेश्यांच्या hiv positive मुलींचेच संसार).

"women empowerment" हा शब्द पुष्कळदा ऐकला होता. त्याचा अर्थ गिरीश सरांचा २५ एकरातील  "हिम्मतग्राम' प्रकल्प सांगून जातो. वेश्यांचे पूर्ण पुनर्वसन. पहिले व्यसनमुक्त करायचे, त्यांना व्यवसाय द्यायचा पर्यायी आणि वेश्या व्यवसायापासून परावृत्त करायचे. २५ वर्षापासून चाललेल्या या प्रयत्नांचे दूरगामी परिणाम दिसायला लागले आहेत. नगर जिल्ह्यात आता १८ वर्षाखालील वेश्या नाहीत. पूर्वी नगर जिल्हा, सांगलीच्या मागोमाग वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आणि आता नगर पार तळाला. पूर्वी ९०० वेश्या धंद्याला उभ्या आता उण्यापुर्या २००. वेश्यांच्या मुली हा व्यवसाय सोडून साधे जिणे जगत आहेत आणि मुलं दलालीचा घाणेरडा प्रकार सोडून कंपनी त काम करून अभिमानाचे जिणे जगत आहेत.

कौटुंबिक हिंसाचार आणि कुमारी माता यांना मदत म्हणून "भारत माता" प्रकल्प. स्त्रियांवर होणारे अत्याचार ऐकले तर अक्षरश: थरकाप उडतो. पण गिरीश सर आणि त्यांची टीम लिगल matters पासून ते प्रकरण तडीला नेईपर्यंत सगळी मदत करतात.

आणि या सगळ्यांवर कळस म्हणजे "स्नेहांकुर" प्रकल्प. २-३ दिवसांपासून ते ३ वर्षापर्यंत लहान मुलं मुली बघताना जीव गलबलून जातो. पण तिथे सुद्धा अतिशय सुंदर काळजी. विविध कारणांनी आई बापानी सोडलेल्या लहानग्यांचे इथले असंख्य स्वयंसेवक पालक झाले आहेत. मुलीदेखत वडिलांनी आईचा केलेला खून, बलात्कारातून mentally challenged बाईला झालेला मुलगा, किती आणि कशा केसेस. पण या सगळ्यांची पालनपोषणाची जबाबदारी उत्कटतेने पार पाडली जाते.

मागेच ९०. ४ FM स्वतःचे radio station. समाजप्रबोधन पार संदेश दिला जातो. कमीतकमी २% मतदार मतदानासाठी प्रवृत्त करायचे ही धारणा.

आणि हे सगळे सांगताना कुठलाही अभिनिवेश नाही, आपण काही समाजासाठी करतो आहे अशी भावना नाही. सगळे कसे अगदी सरधोपट पद्धतीने. मग ते आमिरखान च्या सत्यमेव जयते मधून मिळालेली देणगी असो, सिप्ला foundation ने केलेली भरघोस मदत असो, कि Thermax च्या अनु आगा madam ची मदत असो. एवढ्या मोठमोठ्या व्यक्तिशी ओळख असलेले गिरीश सर माझ्याशी तेवढेच समरसतेने सांगत होते. बरं एवढं करून ह्या गृहस्थाची ओळख आता स्नेहालायाचे founder member म्हणूनच आहे. legally ते न तिथले अध्यक्ष आहेत ना सेक्रेटरी आहेत. निरपेक्ष स्वयंसेवक. स्वत: उभ्या केलेल्या संस्थेपासून एवढं detach होऊन पण attach असणे अवघडच. पण गिरीश सर सहजतेने करतात. आपण निकराने आवंढे गिळत असताना गिरीश सर एखाद्या स्थितप्रज्ञाप्रमाणे विविध विचार सहजपणे सांगत जातात.सच्च्या विचारांना लोकांची जोड मिळत जाते तशी सरांच्या कार्याला असंख्य लोकांचे हातभार लागले आहेत. 

गिरीश सर, तुमच्यासारखे लोकं जगात आहेत म्हणूनच हे चाक फिरते आहे, अव्याहत.

स्नेहालय-एक अनुभव

Thursday, 12 December 2013

प्रकरण आणि confession

मला सौ तेजपाल, सौ आहुजा, सौ हिलरी क्लिंटन या गृहिणीचं फारच कौतुक वाटतं  बुवा! कसल्या पाठीशी सॉलिड उभ्या राहतात त्या नवऱ्याच्या. एकदम खंबीर! मानलं. नाहीतर आमच्या मंडळी. असं काही सत्कृत्य माझ्याकडून झालं तर पोलिसाला मंडळ च सांगेल "घ्या हो याला जरा खोपच्यात" "ते टायर ची treatment काय असते हो, बराच ऐकले होते, तीच द्या याला म्हणजे चांगलं जागेवर येईल" "नाहीतर याच्या …………… " (पुढचं वाक्य तुम्ही तुमची प्रतिभाशक्ती वापरून पूर्ण करू शकता)

साधारण २००३-४ ची गोष्ट असेल. मी रोबोटिक्स आणि आटोमेशन वर एक आर्टिकल लिहिले होते. त्या magazine मध्ये एक सेल्स executive होती . मुंबईला असायची. लेखापुरते आपण तिचे नाव सोनिया ठेवू यात. (खरं तर सकाळपासून हे नाव ठरवण्यात खूपच वेळ गेला. म्हणजे फेसबुक वर कोणी या नावाचे friend नाही आहे ना, पंचक्रोशीत या नावाची कुणी स्त्री नाही आहे ना, जुन्या मैत्रीणीपैकी हे नाव कुणाचे नाही आहे ना , याची शहनिशा करूनच हा नामकरण विधी पार पडला.) तर हि सोनिया माझ्या खूपच मागे लागली होती, (पुढे वाचा) म्हणजे लेख लिहिण्यासाठी. मी खूप बिझी आहे वैगेरे सांगून टाळत होतो. खरंतर इंग्रजी मध्ये लिहायचे म्हणून मी उडवत होतो. पण ती फारच चिकाटीची होती. सारखा follow up करून पार भंडावून सोडलं होतं. शेवटी मी एक यथाबुद्धी लेख लिहून पाठवला. आर्टिकल पब्लीश झाल्यावर मला १५ दिवसानंतर फोन आला आणि सोनिया म्हणाली "आर्टिकल फारच छान लिहिले आहे" मी आभार मानून फोन कट केला.

त्यानंतर १५ दिवसानंतर परत फोन "पुढच्या issue साठी आर्टिकल लिहा ना" आयला म्हंटलं आली का आफत. मी तेव्हा आतासारखा रिकामटेकडा नव्हतो, खरंच खूप बिझी होतो. परत technical गोष्टीवर लिहा, म्हणजे डोकं वापरा, चार इंजीनियर ते वाचणार, त्यावर प्रश्न विचारणार. खुराकच की हो तो!  हे आता लिहीतो तसं नाही, वाचलं तर वाचलं कुणी, नाहीतर राहील गुगलच्या सर्व्हर वर सडत. मी म्हंटलं "बघतो" आणि तिथं फसलो. (सरळ नाही म्हणताच येत नाही. आयुष्यातल्या बर्याच प्राॅब्लेम चं ते प्रमुख कारण आहे).

"लिहा ना प्लीज़, माझी पर्सनल रिक्वेस्ट समजा" "सर पाठवताय ना आर्टिकल" "लिहायला घेतलय की उगीच थापा मारताय" अशा संवादांनंतर संभाषणाची गाड़ी दुसर्या विषयांकडे कधी वळली ते कळलंच नाही. "बरंच फिरता हो तुम्ही" "मजा आहे, वेगवेगळी गावं बघता" "काय जेवलात आज" "माझ्यासाठी पण आणा की काहीतरी दिल्लीहून" आरं तिच्या मारी, प्रकरण पुढं चाललं होतं. बरं मी तिला सांगितले की मी married आहे, मला एक पोरगा आहे. नंतर सोनियाचे फोन महत्वाच्या मिटींगमधे असताना यायला लागले. फोन उचलला नाही तर तासा दोन तासानी यायचाच, हडकून टाकत पण नव्हतो. बरं तेव्हा हे फ़ेसबुक पण नव्हतं. प्रवासात फोन आला की वेळ कटून जायचा. आर्टिकल वैगेरे बाजूला राहिलं. Virtual flirting चं म्हणा की. पण एक मात्र खरं की मी तिला स्वत:हून फोन कधीच करायचो नाही. पण आला आणि वेळ असेल तर गप्पा पण ठोकायचो.

एकदा मी कार चालवत होतो, वैभवी बाजूला आणि मागे कुणी पाहुणे होते. मोबाईल समोरच होता. तेव्हढ्यात मेसेज आला.  सहसा बायको माझा फोन घेत नाही आणि मेसेज तर त्याहून नाही. पण तो घेतला आणि तो सोनियाचा होता "तुम्हारी याद में " अशा धर्तीचा शेर होता. वैभवी वाचून दाखवत होती, लक्षात आलं ल्याेचा झालाय. झटकन फोन हिसकावला आणि मेसेज डिलीट करून टाकला. पण झालं, मेसेजनी आपलं काम बरोबर केलं होतं. बायकोला संशयच नाही तर खात्री झाली काहीतरी गडबड आहे. घरी गेल्यावर मला विचारलं काय प्रकार आहे. मी आपला साळसूदपणाचा आव आणत "नाही तसं काही नाही, उगाच आपलं" म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण वैभवी काही बधली नाही, तिने शांतपणे पण फर्मली विचारलं "जे काय आहे ते, खरं सांग" मी पण मग देवाशपथ खरं सांगेल, या धर्तीवर जे आहे ते सांगून टाकलं.

वैभवी म्हणाली "तिचा फोन नंबर दे" माझ्याकडे तो नव्हता, मेसेज डिलीट केला होता. पण ती हट्टालाच पेटली, म्हणाली
आताच संपवायचा हा विषय. माझी एकदम ट्यूब पेटली, received काॅलमधे असेलच. सापडला. वैभवीनी तिला
समजावून सांगितले की हे जे काही चालू आहे ते चुकीचं आहे. मला पण सांगितले की "ती नादान असेल, पण तुला तर
अक्कल पाहिजे की नाही" मी चूक क़बूल केली. खरं म्हणजे मी जे सोनियाला सांगायला पाहिजे होतं, ते वैभवीने सांगितलं

त्या दिवसापासून कानाला खड़ा लावला. प्रवासात सुद्धा कुणी स्त्री वर्ग शेजारी आला की……… . खरं सांगू, कुणी येतंच नाही हो. जवळपास दहा वर्ष झाली या गोष्टीला, पण आजही मेसेज आला की वैभवी तो कटाक्षाने वाचते. काय करणार "बूँद से गयी ………….

पण तुम्हीच सांगा या पार्श्वभूमीवर त्या तीन सौ बद्दल कौतुकमिश्रीत आदर वाटणे सहाजिकच नाही का?

Sent from my iPad

Sunday, 8 December 2013

आयुष्य

आज सकाळी ६:३० वाजता कार घेउन बाहेर पडलो. समोरच्या काचेवर धुकं साचले होते. काचेतुन फारच अंधुक दिसत होते. वायपर चालवले. काही क्षणापुरते दिसले, पण परत काचेवर फाॅग जमा झाला. एसी चं तापमान कमी जास्त करून बघितलं, पण काहीच फरक पडला नाही. फारच विचित्र वाटत होतं. तेव्हढ्यात समोर एक खड्डा आला. समोरच्या काचेतुन ठीक दिसत नसल्यामुळे, खड्ड्यात आदळली. पण फार काही नुकसान न होता पुढे जात राहिलो.  खिडकीची काच ख़ाली केली, वर केली, पण समोरच्या काचेवरचा फाॅग काही कमी होइना. समोरून दूसरी कार आली. आदळलोच असतो. थोडक्यात वाचलो. आता मी अगतिकतेने काचेला आतल्या बाजूने हाताने साफ करून ते धुकं घालवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होतो.  मी हतबल झालो होतो.

अचानक बाहेरचं तापमान आणि कारमधील आतलं तापमान याची काहीतरी सांगड घडली आणि आश्चर्य म्हणजे समोरच्या काचेवरचं धुकं नाहीसं झालं. समोरचा रस्ता लख्ख दिसायला लागला. मला कळलंच नाही, माझ्या प्रयत्नानी हे घडलं की आपोआपच. मला एकदम हायसं वाटायला लागलं आणि कार चालवायला मजा यायला लागली.

आयुष्य हे साधारण आपण असंच जगतो, नाही का?