BJ Medical College म्हणजेच बैरामजी जीजीभोय मेडिकल कॉलेज. जगभर विखुरलेल्या डॉक्टरांचे स्वप्न. या कॉलेज मधून पास झालेल्या कुणाच्याही समोर, (त्याला वयाची अट नाही, डॉक्टर कुठल्या पोस्ट वर त्याचेही बंधन नाही) बी जे चे नाव काढले कि त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागते. जणू काही आपण त्यांच्या प्रियकराचे किंवा प्रेयसी चे नाव घेतले आहे.
तर अशा या बी जे शी माझी ओळख निव्वळ अपघातानेच झाली. (बी जे आणि ससून ची ओळख अपघाताने होणे हे भितीदायकच नाही का). माझ्या शाळेतील अनुराधा पाटील हि बी जे ला आहे हे कळले. मी आणि प्रताप वयोपरत्वे बी जे च्या लेडीज होस्टेल ला जाऊन थडकलो. आणि मग पुढची ५ वर्षे जातच राहिलो. काही दिवसातच वैभवीची पण भेट झाली. ती पण माझ्याबरोबर नाशिक ला CDO/मेरी हायस्कूल ला होती. आणि मग त्यांनीच मला बी जे मेडिकल कॉलेज मध्ये नेले.
दणदणीत अशी बिल्डींग, प्रशस्त आवार, त्याचे king-size प्रवेशद्वार, भलेमोठे corridor, कॅन्टीन सगळेच कसे अचंबित करणारे. औरंगाबादच्या साध्या वातावरणातून पुण्याच्या भारती विदयापीठ ला येउन मी तसा बुजलोच होतो. म्हणजे ज्याला इंग्रजी बोलता येत नाही तो माठ अशी एक भावना झाली होती. आणि इथे तर एकापेक्षा एक हुशार मंडळी मराठीत बोलत होती. Govt Polytechnic औरंगाबाद येथील DME आणि भारतीचे Production Engineering इथे स्त्री पार्टी चा दुष्काळच होता. त्यातही असल्या तर सौंदर्य त्यांच्या आसपास हि फिरत नव्हतं. आणि इथे बी जे मध्ये सौंदर्य आणि बुद्धिमत्ता हातात हात घालून सुखाने नांदत होत्या. आणि अजून एक वैशिष्ट्य "अच्छी सूरत को सवरने कि जरुरत क्या है, सादगी भी तो क़यामत कि अदा होती है" या ओळींना सूट होणारे पोरा पोरींचे रहाणे. कुठंही भपका नाही, shining नाही पण यांच्या देहबोलीत विलक्षण आत्मविश्वास, चेहऱ्यावर तेज. आणि कपडे पण साधे. कुठंही मिरवणे नाही. आणि केवढी ती पुस्तके. माझ्या engineering च्या एकूण पुस्तकाचे वजन यांच्या एका पुस्तका एवढे असावे. मला त्यांच्याबद्दल अप्रूप वाटायचं पण असूया कधीच वाटली नाही.
मुलामुलींचे एकमेकांशी बोलताना मोकळेपणा हा तर माझ्यासाठी कुतूहलाचा विषय होता. शाळेनंतर मी मुलींशी नीट बोललोच नव्हतो. (किंवा बोलायची अक्कल नव्हती). आणि इथे वैभवी आणि अनुराधा बिनधास्त मुलांशी गप्पा मारत होत्या. बरं त्यात उथळपणा अजिबात नव्हता.
माझी हळूहळू तिथल्या मुलींशी ओळख होऊ लागली. मंजिरी, वैशाली, श्रद्धा, सोनल (म्हणजे आताची फेसबुक सम्राज्ञी अनु सिंग), नाझिमा, गजाला, अनु-मंजू या वैभवीच्या एकदम फास्ट फ्रेंड. आणि मुलांमध्ये केदार, राजेश, वाळिंबे, हृषीकेश हि मंडळी. अर्थात हे सर्वजण माझ्याशी अंतर ठेवूनच असायचे (मी पण त्याच लायकीचा होतो). हि माझी वैभवीमुळे झालेली ओळख.
त्याच वेळेला माझे दुसरे ऋणानुबंध बी जे कडे नेऊ लागले ते म्हणजे आमचा अत्यंत जिवलग मित्र जगदीश पाटील. जगदीश माझ्या लहान भावाचा, उन्मेष चा मित्र आणि नंतरचा बिझिनेस पार्टनर. आणि जगदीश चा मोठा भाऊ सुनील पाटील उर्फ बाळा. आता larger than life अशी इमेज झालेल्या डॉक्टर बाळा पाटील याला बी जे तील त्याच्या १० वर्षे आधीचे आणि १० वर्षे नंतरचे मुलं मुली अगदी वैयक्तिक ओळखत असतील. त्याचं व्यक्तिमत्वंच तसं होतं, होतं का, अजूनही आहे.या बंधुद्वायांचे घर अशोकनगर मध्ये आमच्या घराजवळच होते आणि तिथे या बी जे च्या मुलांचा राबता असायचा. या सगळ्या वातावरणामुळे माझी बी जे ची भीड चेपली गेली.
मग काय, सुरुवातीला पंधरवड्यातून एकदा बी जे ला जाण्याची frequency वाढत, practically रोजावर आली. तिथले gatherings, orchestra आम्ही बी जे चे student असल्यासारखे एन्जॉय करायला लागलो. "बिलानशी नागीन निघाली" वर एकदा बेफाम नाचल्यावर तर एका दोघांनी विचारले सुद्धा "कुठल्या year ला आहेस" मी सुद्धा उत्तर ठोकून वेळ निभावून नेली.
बी जे चा orchestra म्हणजे एक प्रकरण आहे. मी खूपच एन्जॉय केले. ते भव्य auditorium, house full गर्दी. नुसता कल्ला. ते कागदी बाण. टाळ्या, गोंधळ. त्या सगळ्यात गाणे टिकवून धरायचे म्हणजे दिव्यच होते. पण हि भावी डॉक्टर मंडळी टिकवायचे. वर्षा गायकवाड चे "बिलानशी नागिन निघाली" अर्चना पेद्राम चे "तुम्हे हो न हो" किंवा "हवाहवाई" "जानेमन जानेमन" रवि करमरकर चे "रात कली एक ख्वाब मे आयी" शेखर कुलकर्णी चे "मधुबन मे राधिका नाचे रे" वैभावीचे "हरी ओम हरी" सुप्रिया बिल्दीकर चे "ओ लाल मेरी" हे अजूनही कानात गुंजन करत असतात.
तिथे काही परिसंवाद पण भारी असायचे. एकदा विषय होता "premarital sex is ethical or not" यात झालेली एकेक भाषणे म्हणजे ट्रीट होती. चंद्रशेखर फणसाळकर, आनंद जोशी, पंडित सर यांनी धमाल उडवून दिली होती.
तिथली भित्तीपत्रके हि वाचनीय असत. कविता, लेख यांची रेलचेल असायची. सध्या harmony नावाचा कार्यक्रम करणाऱ्या शेखर कुलकर्णीचा एक लेख, बहुधा पुण्यावर होता ज्याचा शेवट लेखकू शेखरू असा केलेला, लेख लक्षात नसला तरी शेवट लक्षात आहे.
यात कमी कि काय म्हणून हे सगळे ट्रेक्स पण भरपूर करायचे. ढाकचा भैरी, dukes nose, राजमाची, शिवथर घळ, तुंग तिकोना, लोहगड, हरिश्चंद्रगड हे यांचे favorite ट्रेक्स. मंगेश नारवाडकर माझा परिचयाचा. एकदा त्याने मला बी जे च्या टेरेस वर नेले आणि म्हणाला "इथून rapling करायचे आहे" मी म्हणालो "येड लागलं का तुला" तर म्हणाला "कर, घाबरतो कशाला, आम्ही आहोत ना" खाली जमिनीवर वैभवी आणि बहुधा वैशाली उभ्या होत्या. इज्जातीचाच सवाल होता. घेतलं देवाचं नाव आणि हळूहळू खाली आलो. पहिल्यांदाच rapling करणाऱ्याचे जे होते तेच माझेही झाले. शेवटचा काही भाग उलटापुलटा होतच आलो.
एकदा मला एप्रिल फुल करण्याच्या नादात, वैभवीच्या मैत्रिणींची मी हवा गुल केली होती, आता तुम्हाला होस्टेल वरूनच सस्पेंड करतो म्हणून. सगळा खुलासा झाल्यावर त्या ८-९ सुंदऱ्या आणि मी सुप्रियाला पार्टी करायला गेलो होतो. त्यानंतर कित्येक दिवस मला उगाचच डोक्यावर मोरपीस आणि हातात बासरी असल्यासारखे वाटत होतं.
एव्हाना माझे आणि वैभवी चे सुत जुळले आणि मग तर मी तिच्या मित्र परिवाराचाच भाग झालो. सुरुवातीला जे अंतर वाटायचे ते पण नाहीसे झाले. मी वरवर दाखवत असलो तरी मनातून जरा टरकतच होतो. कारण या पोरापोरींचा IQ आणि sense ऑफ humor फारच वरच्या दर्जाचा होता. तरीही मी त्यांच्यात मिसळायचो. trekking ला जायचो. पार्टीला जायचो. (आणि त्यावेळेस पार्टी म्हणजे काय हो स्टेशन चे माधव, नाहीतर सुप्रिया किंवा चौपाटी) एन्जॉय करायचो. वैभवीमुळे मी त्यांच्यात जायचो आणि ते पण मला मुकाट सहन करायचे.
साधारण १९९४ नंतर वैभवीच ससून सुटलं आणि माझं त्या परिसरात जाणं बंद झालं. पण आयुष्यभराचे संचित मला इथे मिळाले. डॉक्टर सुनील आणि डॉक्टर अनुपमा (alias बाळा आणि बोपी, जास्त संभ्रमात पडू नका) यांच्या लग्नात सहजच revive झालेली विनय आणि वैशालीची ओळख पुढे कित्येक पर्यटनाचा आणि मैफिलीचा साथीदार देऊन गेली. आजही हे मैत्र मैत्रिणी भेटतात आणि भूतकाळात हरवून जातात आणि मी त्यांचे ते हरवून जाणे अनिमिष नजरेने बघत असतो. डॉक्टरांच्या मांदियाळीत गप्पांच्या मैफिलीत माझी ओळख "हा engineer आहे बरं का" अशी करून देताना "हा दहावी पास आहे" अशा टोन मध्ये केल्यासारखी वाटते पण माझी तक्रार नसते कारण नंतरचे २-३ तास हे फक्त हसण्यासाठी मुक्रर केलेले असतात. टोणगावकर, सुशील, केदार यांची विनोदबुद्धी envious आहे. हरीशचा sensitiveness आपल्यालाही आयुष्याचा वेगळ्या तऱ्हेने विचार करायला भाग पाडतो. Reunion ला भेटायचं, तिथे खूप धमाल करायची, त्याची CD करायची आणि तीच CD परत बघताना परत तेवढीच धमाल करायची हे यांनाच जमू जाणे. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात ७-८ स्त्री पुरुषांचा जणांचा ग्रुप आहे, ते दिसायला तेजस्वी आहेत, आपल्या वयाची तमा न बाळगता ते जोरजोरात हसत आहेत, टाळ्या घेत आहेत, देत आहेत, एकमेकांची खिल्ली उडवत आहेत तर खुशाल समजावं हे बी जे मधून पास झालेले डॉक्टर्स आहेत.
आयुष्य जर rewind करून परत जगायचे म्हंटले तर बी जे त जायला आवडेल. (आणि तो अभ्यास, नको का हे वाक्य इथे).
असा मी बी जे मेडिकल एन्जोय केलेला engineer, Lets Act च्या कार्यक्रमात बी………… जे, बी………………… जे अशा घोषणा देत आपसूक भूतकाळात जातो. स्क्रीन वर बी जे चा फोटो झळकतो, तेव्हा पार्शभूमीवर "याद ना जाये बिते दिनोकी " चालू असते आणि सभागृहातल्या प्रत्येक डॉक्टरच्या डोळ्यातून धारा वाहत असतात, त्यावेळेस हा अभियंता सुद्धा पाणथळलेल्या डोळ्यांनी तो रोमांच अनुभवत असतो.
काही गोष्टी:
- यातील उल्लेखलेले सर्वच जण हे आज प्रथितयश डॉक्टर्स आहेत. त्यांचा एकेरी उल्लेख कदाचित खटकेल, पण हा प्रेमापोटीच झाला आहे. आणि त्यापायीच त्यांची नावं मी अगदी बेधडक वापरली आहेत, त्यांची परवानगी न घेता. कुणाला आवडले नसल्यास आधीच sorry म्हणतो.
- उल्लेखलेल्या प्रत्येकामागे डॉक्टर लिहिणे अपेक्षित असते. पण तसं लिहिले असते तर लेखभर "डॉक्टर" असेच दिसले असते
- काही संदर्भ चुकीचे असतील. पण भाव महत्वाचा.
- बाळा पाटील आता फारच मोठे प्रस्थ आहे. कालानुरूप त्याला इथे बाळासाहेब किंवा त्याच्या अमेरिकन connection मुळे सनी वैगेरे म्हणायला हवे. पण तसं लिहायला हात धजवातच नाही.
-
- मला माहिती आहे बी जे मेडिकल पुण्याच्या ऐवजी मुंबई, कराड, सोलापूर, मिरज, औरंगाबाद, नागपूर इथल्या कुठल्याही govt मेडिकल कॉलेज चं नाव लिहून हा लेख परत लिहिला तर काहीच चुकीचे वाटणार नाही.
- आणि हो! लेखापेक्षा तळ टीप जास्त झाल्या, नाही.