Wednesday 15 January 2014

भेट

आज सकाळी Marriott ला गेलो होतो, अमेरिकेहून पाहुणे आले आहेत, त्यांना घेण्यासाठी (guests ला आणण्याशिवाय कशाला जातोय हा दीडशहाणा Marriott मध्ये, असा खडूस विचार तुमच्या मनामध्ये आला असेल, तर तुम्हाला सांगून ठेवतो…………. तुमचा विचार बरोबर आहे). Lounge मध्ये वाट बघत बसलो होतो. बासरीचे सुमधूर सूर कानावर येत होते. सूर कुठुन येत आहेत असं बघत असतानाच मला "तो" दिसला. एका पिलरजवळ कोपर्यात खुर्ची टाकून बसला होता. २५-२६ चा असेल. किरकोळ शरीरयष्टी पण हातात भली मोठी flute. सुरेख वाजवत होता . ती उंच अशी lounge त्याच्या सुरांनी अशी भारून गेली होति. त्याच्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. जो तो आपापल्या कामात गर्क होता.  काही सुटा बुटा तील लोकं त्याच्याजवळच उभे राहून गप्पा मारत होते. तो त्यांच्या खिजगणतीतही नव्हता.  तो मात्र तन्मयतेने बासरी वाजवत होता.

 मी त्याच्याकडे बघून स्मित केले, त्यानेही प्रतिसाद दिला. मी त्याच्याकडे गेलो.

त्याचे नाव दीपक. मूळ गाव अंबड. १० वर्षापासून पुण्यात बासरी शिकतो आहे, पंडित गिंडे यांच्याकडे. मनात म्हणालो "मित्रा, हि तुझी जागा नाही रे, तुझी जागा तिकडे स्टेज वर, रसिकांसमोर. तु असाच वाजवतोय आणि लोकं ब्रम्हानंदात माना डोलवत आहेत." हात मिळवला आणि म्हणालो "पुढच्या वेळेला भेटू, तेव्हा माझ्या हातात तिकीट असेल तुझ्या कार्यक्रमाचं"

अजून बोलायचं होतं, पण विचार केला, Lounge Manager येईल आणि म्हणेल "चला…. भेटेची वेळ संपली. कैद्याला भेटायला आलेल्या नातेवाईकाला जेलर म्हणतो ना, अगदी तसंच.

त्यानं पण प्रेमाने हात दाबला आणि सस्मित नजरेने निरोप दिला.

दिवसभर त्याचे बासरीचे सुर कानात गुंजत होते

भेट

No comments:

Post a Comment