Tuesday 18 February 2014

बदल

कसला बदल घडतोय न आयुष्यात. कुठं चालू झालं आणि कुठे येउन पोहोचलय. नशीबवानच आहे मी या युगात जन्मलो ते.

- मनमाडच्या रेल्वे स्टेशनवर आईच्या कडेवर लहान भाऊ, मी आजोबांचा हात पकडून. दोघांच्या हातात ब्यागा. रात्री बाराची अजंता एक्स्प्रेस. सीट मिळवण्याची मारामारी. सकाळी परभणीला पोहोचण्यासाठी. 
- १९८९, बाबांची मुंबई ला बदली. डेक्कन क्वीन चं तिकीट काढण्यासाठी सकाळी ५ ला पुणे स्टेशन ला लायनीत. साडेआठ ला घामाघूम होऊन बाहेर आलेलो मी. 
- १९९४-२०००. computerized तिकिटे काढणारा मी, माझ्याच टुर ची.  पण रांगेत २-३ तास.

आणि आता घरबसल्या तिकीट काढून आरामात प्रवास करणारा मी (IRCTC चा फ्यान आहे मी)

- विमान फक्त आकाशात बघण्यासाठी असतं, हेच डोक्यात बसलं होतं. पहिला विमान प्रवास १९९६ साली. तिकीट दर पाहून डोळे विस्फारलेले.

आणि आता thanks to Captain Gopinath. एयर डेक्कन नि कवेत आणलं आणि आता सुदैवानं परवडू पण शकतं. तिकीट घरबसल्या.

- तुमच्या घरात चार चाकी असेल असं जर बाबांना कुणी सांगितलं असतं तर त्यांनी त्यांनी त्याला येडयात काढलं असतं.
- अचानक १९९१ साली लहान भाऊ (लहान असला तरी करामती आहे तो) फियाट घेऊन आला.
- १९९१-१९९७, कधी बंद पडत, कधी ढकलत चालू ठेवलेली कार.

आणि मग तंत्रज्ञान बदललं. २००० ते आतापर्यंत फक्त एकदा गाडी रस्त्यात बंद पडली आहे.

- १९९१ पर्यंत शेजारच्यांच्या फोन वर मदार. ट्रंक call ची मारामार.
- ISD फार दूरची गोष्ट, STD करताना जीव खाली वर व्हायचा.बुथवर कंटाळवाणी  वाट बघणे. 
- १९९८-९९ साली कंपनीच्या फोन चं बिल महिन्याला रु ५०००.

आणि आता मोबाईल, STD जणू लोकल call. ISD पण फार महाग नाही. Skype, Facetime सगळं दिमतीला. एवढं  करून महिन्याचा खर्च रु ३०००

- सगळीकडे लाईन. विजेच्या बिलाची, फोनच्या बिलाची, पोस्टाची, बँक लाईन. आपला नंबर आला कि खिडकी बंद होणे.

आणि आता फोन बँकिंग. सगळं घरात बसून. मोलकरणीचा पगार, दुध बिल, पेपर बिल, इस्त्रीवाला असे मोजकेच पैसे कॅश मध्ये. बाकी नेट  बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड वर. बँकेत गेलोच नाही आहे कित्येक वर्षात.

सगळ्यात जास्त फरक पडला आहे तो माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाच्या जीवन शैलीत. पण वाईट याचं वाटतं कि हाच वर्ग बोंब मारतो "६० वर्षात काहीच नाही घडले". अहो साधे ५०० डॉलर विदेशात घेऊन जायचे म्हंटले ना कि बँकेची permission लागायची. आणि आता सहजासहजी सह कुटुंब परदेशात जाताहेत, आरामात स्थायिक होत आहेत, पाहिजे तेव्हा परत येत आहेत. आणि वर तोंड घेऊन म्हणायचं काय तर मुंबई airport वर बेल्ट बंद पडला २ मिनिटासाठी कि उपहासाने "welcome to India" आणि मग एखाद्या गोर्याकडे बघून हसायचं,  आणि दाखवायचं काय जोक करतोय.

माझ्या ड्रायवर च्या घरी गेलो होतो. घर किती, तर १६० sqft चं. २ खोल्या. पुढच्या खोलीत अंघोळीची
 जागा ३x ३ फुट. दोन माणसं बसली तर तिसर्याला उभं राहावं लागतं. किती वर्ष राहतो आहे तर उणीपुरी ५० वर्षं. घरात माणसं किती, ४. नवरा, बायको, २४ वर्षाचा मुलगा आणि १९ वर्षाची मुलगी. बोला कसं मोठं केलं असेल, कधी त्याला बायकोशी एकांतात बोलायला मिळाले असेल. अशी लोकं गप्पं, जगताहेत आणि आम्ही सगळ्यात जास्त फायदा झालेले लोक ओरडतोय कि , "काही नाही, बकवास आहे".

सालं जिथे राहतो ती cooperative society नीट सांभाळू नाही शकत आपण. चार लोकं अंगावर आली तर फाटते आणि म्हणायचं कि यांना राज्य करता येत नाही.

टीका करा पण जर धरबंद ठेवू यात. गप्प बसा असं नाही म्हणत पण be part of solution. नेहमी प्रश्नच घेऊन उभे राहिलो तर कसे चालेल?

मित्रांनो, सकारात्मक बोलू यात, वागू यात. त्यातूनच काही चांगलं घडलं तर घडेल. नाहीतर नुसतं बोंबलंत राहिलो ना तर भविष्यात पण तेच करावं लागेल.

मनात आलेला प्रश्न:

- कनिष्ठ मध्यमवर्गीय चे आपण मध्यमवर्गीय झालो नंतर उच्च मध्यमवर्गीय झालो तरी आरडाओरड चालूच.मला माहिती आहे गरीब कुटुंब सुद्धा मध्यमवर्गीय होतंच असतील. ही कोकलायची सवय कुठल्या category त लागत असेल?


(माझ्यासारख्या तथाकथित मध्यमवर्गीय सुखवस्तु घरातल्या मुलांपेक्षा, रूढार्थाने गरीब घरातल्या, पण संवेदनशील अशा मुलमुलींच्या हातात उद्याच्या भारताचं भविष्य सुरक्षित आहे असं मला वाटतंय.)

No comments:

Post a Comment