Sunday, 31 August 2014

Value addition

लिहायचं कारण की, निलेश बंडाळे ने मधे प्रश्न विचारला होता Is Facebook value addition? आणि आठवड्यापूर्वी एका वादळी वाटणार्या मित्राने त्यांना फेसबुकवर मानसिक त्रास झाला असे लिहीले. खरंतर त्यांच्या लेखनशैलीवरून ते स्वत:ला मानसिक वैगेरे त्रास करून घेतील असं अजिबात वाटत नव्हतं. पण आता त्यांनीच लिहीलं म्हणजे खरंच असेल.

मला स्वत:ला २००४ साली professional front वर प्रचंड मानसिक त्रास झाला. इतकं कि मी नैराश्याचा शिकार झालो. छातीत pricking pains व्हायचे. एके दिवशी ऑफिस मध्ये दरदरून घाम फुटला. सरळ जहांगिरला पोहोचलो. सगळ्या टेस्ट झाल्या. बाकी रिपोर्ट नॉर्मल. शिवाजीनगरला एक महेश तुळपूळे नावाचे डाॅक्टर आहेत. त्यांनी माझं सगळं चेकिंग केलं आणि सरतेशेवटी सांगितलं "मित्रा तुझा त्रास मानसिक आहे तु psychatrist ला दाखव" त्यांनी डाॅ वाटवेंचा reference दिला. दोन सिंटींग झाल्यावर डाॅक्टर म्हणाले तु जी दोन कामं करतो आहेस त्यातलं एक सोड आणि या गोळ्या घे. पुढची appointment २० डिसेंबर ला. ही गोष्ट सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्याची. मी एक काम सोडलं, अन १५ नोव्हेंबरला वाटवेंना फोन केला "मी मस्त झालो आहे, २० डिसेंबरची भेट cancel"

२०१० ला जाॅईंट वेंचरच्या गोष्टी चालू झाल्या. मनाप्रमाणे घडत होतं, पण एक मनावर अनाहूत टेन्शन होतंच. त्यात सोसायटीचं काम हातात घेतलं, त्याचा प्रचंड मनस्ताप झाला. २०११ च्या मे मधे १५ दिवसाच्या अंतराने दोन छोटे ट्रेक मारले. दोन्ही वेळेस गड़ चढताना छातीत दुखलं. स्ट्रेस टेस्ट झाली पाॅझिटिव्ह आली. डाॅ हरदासांनी १८ जून २०११ ला अँजियोग्राफी केली अन लागोलाग प्लास्टी पण. हो इलाज नव्हता LAD ९५% पेक्षा जास्त ब्लाॅक होती. (१८ जून २००९ ला वडील गेले. बरोबर दोन वर्षानी मला life extension मिळालं). पोस्ट operative चालण्याचा व्यायाम करत असताना रेस कोर्स वर चक्कर आली, म्हंटलं जीवनदान क्षणिक का? परत निदर्शनास आलं त्रास मानसिक. झोपंच यायची नाही. यावेळेस डाॅ ज्योती शेट्टी. परत गोळ्या. हळूहळू टेपर करत सोडल्या.

अजूनही कंपनीत तशीच टेन्शन असतात, भांडणं होतात, कॅश फ्लो चा प्रोब्लेम असतो, कधी बाॅटमलाईन मार खाते. पण मला आता psychiatrist ची गरज नसते. ब्लाॅग लिहीण्यात नाहीतर फेसबुकवर मन रमवतो. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही किंवा कुणी माझ्या intention वर डाउट घेतला की रात्रभर तळमळणारा मी आता काय लिहायचं याचा विचार करत या जगात रममाण होऊ लागलो. आता मला कंपनीच्या प्रोब्लेम्स चा अजिबात ताण येत नाही. कंपनीही व्यवस्थित चालू आहे. खरंतर जरा जास्तंच व्यवस्थित.

या सगळ्यातून एकंच सांगायचं आहे मित्रांनो, या आभासी जगाला घेउन आयुष्यात वादळं निर्माण करू नका. कुठं पोलिस कंम्प्लेंट अन काय काय. इथं प्रेम करायला वेळ नाही, कुठं एकमेकांचा द्वेष करायचा. चर्चा व्हावी पण त्याने मानसिक त्रास, अरारा!! झेपेल तितकंच, नाहीतर ब्लाॅक आहे अनफ्रेंड आहे, deactivation आहे. वापरा की त्याला दिल खोलके.

बघा, विचार करा. एक वेळ physical त्रास परवडला पण मानसिक त्रास नको. स्वानुभव आहे दोस्तांनो! फेसबुकला value addition बनवा, ना की........................

Wednesday, 27 August 2014

We learn English

He has ran इतकं म्हणालो आणि पाचवीला पेठे हायस्कूलमध्ये परांजपे बाईंनी काडकन वाजवली. इतकी कि वो थप्पड कि गुंज आज भी सुनाई देती है. थोडक्यात मार खाणं मला पाचवीला ला पूजलं. तेव्हापासून माझा इंग्रज अन इंग्रजी या दोन्हीवर प्रखर राग आहे. पुढे सातवीला जोशी सरांना वाटलं कि याचं इंग्रजी बहुधा बरं आहे आणि त्यापेक्षा पाठांतर चांगलं आहे म्हणून अभिमन्यूची गोष्टं इंग्रजीतून सांगण्याच्या स्पर्धेत निवड केली. इथे खेडयातून मुलं आली होती. बिचारी इंग्रजीतून भाषण करण्यासाठी. ते भाषण त्यांनी देवनागरी त लिहून आणलं होतं. आणि घोकत होती. (दोन महिन्यापूर्वी माझ्या दहा वर्षाच्या मुलानी मराठीत एक नोट लिहिली. मराठी देवनागरीत लिहिता येत नाही म्हणून त्याने इंग्रजी अल्फाबेट मध्ये लिहून काढली. दिवस असे बदलले आहेत) यथावकाश यांत्रिकी अभियंता झालो, हे मात्र अति झालं, mechanical engineer झालो. इंग्रजी शिवाय दुसर्या कुठल्याही भाषेत हे शिक्षण नव्हतं म्हणून मोडकं तोडकं का होईना बोलू लागलो. walking talking shivaji fell a king (बोलून चालून शिवाजी पडला राजा). SKF मध्ये बरीच स्वीडिश. जर्मन मंडळी असायची पण ती आपल्याच जातीची, म्हणजे इंग्लिश च्या बाबतीत हो. (जात हा शब्द लिहिताना सुद्धा आज काल माझे हात थरथरतात, गात्रे शिथिल पडतात, इतका मी या फेसबुक मुळे त्या शब्दाचा धसका घेतला आहे).

आणि मग मी बंगलोर च्या रोलोन नावाच्या कंपनीत जॉईन झालो. मी पुण्याला अन ऑफिस बंगलोर. बॉस चं नाव बोनी. त्याला हिंदी अ कि ठ कळत नव्हतं. मला त्याच्याशी रोज बोलावं मात्र लागायचं. मग माझ्या अगम्य अशा इंग्रजीत मी संवाद साधू लागलो. बोनी पण बिचारा चांगला माणूस, आजही तो माझा चांगला मित्र आहे, मला समजून घ्यायचा. चार सहा महिन्यात वाक्य व्यवस्थित जुळू लागली. म्हणजे मी बोनी चा फोन आला कि बहुधा इंग्रजीत विचार करू लागलो. ९६-९७ नंतर अमेरिकेहून खूप लोकं यायची आणि मग मला घेऊन त्यांना फिरावं लागायचं. बोनी चा आणि आमचा एम डी संजीव यांचं written communication माझ्यापर्यंत पोहोचायचं. त्याने माझंही drafting सुधारलं. थोडक्यात या सगळ्या प्रकारात हळू हळू मी इंग्रजाळू लागलो.

अन आता काय त्या इंग्रजीचं काही कौतुक राहिलं नाही. जगभरच्या लोकांशी संवाद साधताना ना त्याचं अप्रूप ना काही कौतुक. अर्थात त्याचं सगळं श्रेय रोलोन च्या ८ वर्षाच्या नोकरीला अन अर्थात बोनीला. तरी आमचं मोठं पोरगं convent चं, मग चुका काढतं. पण ठीक आहे. पण एक मात्रं आहे माझी अन त्या भाषेची नाळ काही जुळली नाही. म्हणजे मी इंग्रजीच्या उत्तमोत्तम साहित्याला मी मुकलो आहे हे तेव्हढंच खरं. आणि त्या भाषेतील चित्रपटापासूनहि  दूर राहिलो हे पण नाकारत नाही. नाही म्हणायला Fountainhead, The Goal, Godfather, Second Lady, Papilon अशी ५-५० वाचलीही असतील किंवा आता फेसबुक चं account नाही म्हंटल्यावर डोळे विस्फारतात तसं त्यावेळेस where eagles dare, Guns of Navarone, good, bad ugly, An Officer and A Gentleman  हे चित्रपट नाही बघितले म्हंटला कि पोरंपोरी  फिदफिदायची, म्हणून काय ते १०० एक पिक्चर बघितले असतील तेव्हढेच. बाकी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.

असो. या सगळ्यांची आठवण या साठी कि आकाशवाणी वर कार्यक्रम चालतो "We learn English" आम्ही इंग्रजी शिकतो. मी थोड्यावेळ गम्मत म्हणून सुनिता मावशीला ऐकायचो अन मग channel बदलायचो. आज अचानक या तीन वर्षापासून चालणार्या कार्यक्रमाने खेडोपाड्यात कसा इंग्रजीचा प्रसार केला हे ऐकत होतो. शाळेतली गुरुजी सांगत होते कि ते कसा सराव करून घ्यायचे पोरापोरीकडून. छान वाटत होतं. आणि मग अचानक कार्यक्रमाची सुनिता मावशी म्हणाली "आता मुलामुलींच्या प्रतिक्रिया ऐकू" आणि ९-१० वर्षाच्या मुलामुलींचे मंजुळ आवाज कानी पडू लागले "I am Sunil Londhe. I am 9 years old. I am studying in class 5"
"I am  Shital Kapre. I am 10 years old. I am in Jilha Parishad School" काय नव्हतं त्या आवाजात. अप्रूप, आत्मविश्वास. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे हे मी रेडियो त हि बघत होतो. काहीच कारण नव्हतं तरी माझा गळा दाटून आला. त्या पोरांना इतकंच म्हणावं वाटतं "Congrats Dude". (इथं कदाचित काहीना वाटेल कि उगाच भावुक वाक्य वैगेरे, पण केवळ इंग्रजीत express होउ न शकल्यामुळे संधी गमावल्यांना विचारा)

हे खरं काम. नाही का. मी तर त्या सुनिता मावशीला मनोमन नमस्कार केला. न कंटाळता इतकं किचकट काम त्या आपल्या साथीदारासह रोज करायच्या आणि त्याचा परिणाम मी याच कानांनीहि ऐकला.

मला तर खरंच वाटतं हे कितीही एफ एम उड्या मारू देत किंवा टी व्ही channel घसा खरवडून ओरडू देत, सालं आकाशवाणी आणि दूरदर्शन चं स्थान अबाधित राहावं. Salute



Tuesday, 19 August 2014

लय भारी

माझी कंपनी अल्ट्रा प्रिसिजन स्पिंडल्स, पुण्यात अन या लेखातील दुसरं पात्र आहे वेस्टविंड एयर बेअरिंग हि आपल्या साहेबाच्या देशातील म्हणजे इंग्लंड मधील. पी सी बी च्या ड्रिलिंग स्पिंडल मधील दादा नाव. जगात ७०% मार्केट शेयर.

दीड वर्षं झालं मी वेस्टविंड नावाचा मासा गळाला लागेल असा प्रयत्न करत होतो. म्हणजे त्यांचे स्पिंडल्स भारतात रिपेयर करण्यासाठी आम्हाला अधिकृत करावं यासाठी मी झटत होतो पण आमच्याबरोबर दिल्ली ची एक कंपनी हि त्याच्या ऑथोरायझेशन साठी झगडत होती.शेवटी एक दिवस वेस्ट विंड च्या मार्क चा मेल आला "आमचे दोन्ही डायरेक्टर चीन मध्ये एक्झिबीशनला येणार आहेत. तू तिथं जाऊन दोघांना पटव." पटवण्याच्या कलेपासून मी वयाच्या २१ व्या वर्षी फारकत घेतली होती. पण फरक होता, इथं एका माणसालाच पटवायचं होतं. मी ठरवलं चीन ला जायचं. IPCA चं २७ जणांचं डेलिगेशन तयार झालं. बाकी सर्व PCB manufacturer होते. मी एकटाच सर्विस देणारा.

मार्च २००५ ला निघालो. शांघाय मध्ये एक्झिबिशन होतं. डेलिगेशन च्या हेड ने तिथं असं हॉटेल शोधलं कि ज्याचं restaurant भारतीय होतं. पतियाला  पर्ल त्याचं नाव. आता चीन मध्ये भारतीय खाद्य पदार्थ दिसणे म्हणजे राज्यसभेत रेखा दिसण्या इतकं दुर्मिळ होतं. (सचिन आपला आवडता त्यामुळे त्याला माफ). सकाळी नाश्ता आम्ही रामटवून करायचो. मग दिवसभर काही मिळालं नाही तरी हरकत नव्हती. खरं तर इतकी पण वाईट परिस्थिती नाही आहे, पण भरपेट नाश्ता करण्यासाठी हे एक कारण.

एव्हाना डेलिगेशन मधील लोक माझे मित्र झाले होते. सगळ्यांना माझं येण्यामागचं कारण कळलं होतं. त्यांनी शक्कल लढवली. हि सगळी मंडळी वेस्टविंड च्या प्रोडक्ट चे एंड युजर. त्यामुळे त्यांना हे प्रोडक्ट रिपेयर करण्यासाठी कंपनी भारतात असणं गरजेचं  होतं. एक एक करून वेस्टविंड च्या बूथ वर जायचे. तिथे स्टीव्ह वेब म्हणून वेस्टविंड चा एम डी उभा असायचा. मित्र जायचा (जो PCB manufacturer असायचा), गप्पा मारायचा आणि हळूच स्पिंडल रिपेयर करण्याबद्दल बोलायचा.  हळू हळू डिस्कशन ची गाडी माझ्यापर्यंत येउन पोहोचायची अन मित्र बूथ मधून निघेपर्यंत वेस्टविंड चे स्पिंडल भारतात रिपेयर करण्यासाठी अल्ट्रा प्रिसिजन हि कशी योग्य कंपनी आहे यावर शिक्कामोर्तब झालेलं असायचं. असे जवळपास २० मित्र माझं प्रेझेन्टेशन व्हायच्या आधी स्टीव्ह ला टेकून आले होते.

झालं. शांघाय मधील एका अलिशान हॉटेल मध्ये त्या दोन डायरेक्टर समोर मी बडबडलो, पण एव्हाना माझ्या मित्रांनी माझं काम फत्ते केलं होतं. मी परत पतियाला पर्ल मध्ये आलो अन पोहोचेपर्यंत माझ्या मोबाईल मध्ये मेसेज झळकू लागला "वेलकम टू वेस्टविंड फ्यामिली"

अशा पद्धतीने २००५ साली इंग्लंड च्या कंपनीने भारतातल्या कंपनीला चीनच्या भूमीवर त्यांच्या प्रोडक्ट ला रिपेयर करण्यासाठी अधिकृत मान्यता दिली.

जाता जाता एकंच सांगतो, शांघाय, चीन भारी वैगेरे असेल हि, पण मला तिथली लोकं एकदम चालू, अढ्याताखोर वाटली. अर्थात चीमूटभर लोकांना भेटून पूर्ण देशाबद्दल असं लिहिणं बावळट पणाचं लक्षण पण जवळपास २५ कंपनी च्या मालकांना भेटलो, त्यात एकही धड माणूस भेटू नये हे नवलच नव्हे काय?

लय भारी

Wednesday, 13 August 2014

जाॅईंट वेंचर

सन २०१०. युनिडो (युनायटेड नेशन्स इंडस्ट्रीयल डेवलपमेंट ऑर्गनायझेशन, अबब) काही होतकरू कंपन्यांच्या शोधात होती. म्हणजे छोट्या कंपनीला तंत्रज्ञानाद्वारे अजून अपग्रेड करायचा प्रोग्राम होता. त्यात माझी कंपनी "छोटी" या सदरात चपखल बसत होती. त्याच्याहि खाली "खूप छोटी" किंवा मायक्रो अशी काही लेवल असली असती तरी आमच्या कंपनीची दखल घ्यावी लागली असती. बरं तंत्रज्ञान दृष्टया प्रगत करायचा ध्यास. इथं तर आम्ही सगळ्यात पात्र उमेदवार. म्हणजे तंत्र तर आमच्या आस पास नव्हतं आणि ज्ञान, काय जोक करता राव. त्यामुळे माझी मुलाखत झाली. आणि अमेरिकेला जायच्या दौऱ्यावर सिलेक्शन झालं.

या सगळ्या प्रकारात युनिडो आम्हाला या ट्रीपचे निम्मे पैसे देणार होती. आता आलं लक्षात हे सगळं का सांगत होतो ते. बाकीचं जावू दया, ट्रीप निम्मी स्पोन्सर होणार होती. पूर्ण नाही झाली, यामुळे खट्टू झालो होतो. तेव्हा अशा निम्म्या आनंदानिशी मी अमेरिकेला जाण्याच्या तयारी ला लागलो.

IMTS नावाच्या प्रदर्शनात जायचं होतं. ते बघून मिशिगन युनिवर्सिटी ला आणि काही वाहन उद्योगांना भेट असा कार्यक्रम होता. त्या नंतर ग्रुप फुटून सगळे जण आपापल्या पर्सनल कामाला जाणार होते. मी सेटको नावाच्या कंपनीच्या प्रेसिडेंट ला भेटणार होतो. डेट्रोइट  इथे मिटिंग ठरली. आमच्या भारतातल्या कंपनीत एक विशिष्ट प्रकारचे स्पिंडल टेस्ट करण्यासाठी टेस्ट रिग मला हवी होती जी मी या सेटको कंपनीकडून घ्यायच्या उद्देशाने आलो होतो. आता माझ्यासारख्या झिंगुराने असं करणं म्हणजे रस्त्यावरच्या कोपर्यावर दुचाकी दुरुस्ती करणाऱ्याने राजीव बजाज ला काही पल्सर चं टेस्टिंग ची मशीन मागण्या सारखं होतं.

झालं, मिटिंग सुरु झाली. माझ्या समोर जेफ क्लार्क हा प्रेसिडेंट अन डेव्ह नावाचा अगडबंब माणूस बसला होता. मी कंपनीचं प्रझेंटेशन देत होतो. हे पाॅवर पाॅईंट मधे लोकं इतकं भारी प्रेझेंटेशन कसं बनवतात हे एक कोडंच आहे. कधी गोष्टी खालून, कधी बाजूने अन काय काय. त्या मानाने आमचं म्हणजे एकदम साधं वरण, सपक एकदम. मी बोलत असताना जेफ़ त्याच्या डोळ्याच्या कडेतून डेव्ह कडे बघायचा हे मी माझ्या डोळ्याच्या कडेतून बघायचो. माझ्या चाणाक्ष नजरेत हे पण दिसायचं की डेव्ह त्यावेळेला मेन दरवाजाकडे बघायचा. थोडक्यात मिटींग झाल्यावर मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल हे मी ताडलं.

पण घडलं भलतंच. मिटींग झाल्यावर जेफ़ म्हणाला " बाळ राजेश, ते तुझ्या टेस्ट रिगचं नंतर बघू, तूर्तास आम्ही भारतात तुझ्या कंपनीबरोबर एकत्र काम करायचं असं ठरवतोय. जाॅईंट वेंचर. तुझं काय म्हणणं आहे" हे म्हणजे साक्षात माधुरीने मला, हे जरा जास्त होतंय का, बरं जाऊ द्या, आदित्य पांचोली ला "आज संध्याकाळी जुहू चौपाटीला भेळ खायला येतोस का" असं विचारण्यासारखं होतं. (उदाहरण माधुरीचं दिलं तरीही माझी मध्यमवर्गीय भूक हे भेळेपलीकडे जाऊन पाठचं हाॅलीडे इन नाही बघू शकत हो).

जेफ़ मला हे सांगत असताना डेव्ह च्या तोंडावर मात्र " जेफला बहुधा वेड लागलंय" असे भाव होते. आणि खरंतर माझ्याही मनात तेच येत होतं. कारण ते राजा भोज अन आम्ही गंगू तेली.

असो. पुढे दीड वर्ष चर्वण झाल्यावर १४ जुन २०१२ रोजी पुणे स्थित, नांदेड नामक गावी वसलेली आमची छोटीशी कंपनी अचानक बहुराष्ट्रीय कंपनीचा भाग झाली. सगळ्यांनी अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. म्हणजे आमचं अभिनंदन केलं अन जेफला शुभेच्छा़ दिल्या. त्याला त्याची आता नितांत गरज होती.


Tuesday, 12 August 2014

Choice

मी: अहो, नाही जमणार आता माणूस पाठवायला.

कस्टमर: मंडलिक, खूप problem मध्ये आहे मी. मशीन चालू व्हायला पाहिजे आजच्या आज.

मी: माणूस नाही आहे available आज. असला असता तर नक्की पाठवला असता.

कस्टमर: मित्रा, सगळं सुरळीत असेल, resources available असतील तर गोष्टी जमूनही जातील. पण तुमच्यासारख्या कंपनीचा कस तेव्हा लागतो जेव्हा तुम्ही crisis व्यवस्थित हाताळता. आता मी प्रोब्लेम मध्ये आहे, त्यातून मला कशी मदत करणार ते सांग. आणि लक्षात ठेव आयुष्यात सुद्धा तुम्ही problems ला कसे respond करता, त्याला कसे सामोरे जाता, त्यावेळेस तुम्ही स्वत:ला खर्या अर्थाने prove करता. असं मला वाटतं.

मी: ……….

कस्टमर: मग पाठवतोय ना माणसाला.

मी: Am I left with any choice?

हे असं होतं बघा. या कस्टमर सारखे मित्र आहेत. त्यामुळे चांगलं वागावंच लागतं हो. तसं आपण पण फार चालू माणूस आहे, पण आजूबाजूची लोकं  अन परिस्थिती आपल्याला चांगलं वागायला भाग पाडते हो. आपली इच्छा नसताना. छ्या!

२०५०:

आजच्या ठळक बातम्या (ब्रेकिंग न्यूज नव्हे)

आज अनंतचतुर्दशी ची मिरवणूक ठरल्याप्रमाणे ६ तासात संपली. सुमारे दीडशे वर्षापासून चाललेल्या या उत्सवाने ४० वर्षापूर्वी अगदी खालची पातळी गाठली होती. गेल्या दशकात मात्र यात अमुलाग्र बदल होऊन पुणे शहरात केवळ ५ गणपती बसतात आणि त्यांचीच मिरवणूक निघते. ढोल ताशाच्या निनादात, लेझीम खेळत रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांच्या मधून गेलेल्या मिरवणुकीचा आनंद अवर्णनीय होता. नाही म्हणायला गुलाल उधळला गेला, पण कार्पोरेशन ची स्वयंचलित झाडूची गाडी रस्ता लागलीच साफ करत होती. दीड शतकापूर्वी चालू झालेल्या, त्यावेळेस कदाचित संयुक्तिक असलेल्या, या उत्सवाचा फोलपणा लक्षात आल्यामुळे नागरिकांनीच यात बदल घडवून आणला. काही दिवसांपूर्वीच कमिटीची मिटिंग झाली आणि हळूहळू ह्या उत्सवाचे सार्वजनिक स्वरूप काढून हा उत्सव वैयक्तिक स्वरुपात साजरा करावा असे ठरते आहे. विसर्जनाचीही प्रथा बंद होऊन त्याच मुर्तीची पुजा प्रत्येक वर्षी केली जाते.

दही हंडी नावाचा घातक उत्सव साजरा करणार्याची प्रथा बंद केल्यानंतर गणेशोत्सवाचे स्वरूप बदलण्याच्या निर्णयाचे जगभरातून स्वागत होत आहे.

सण, परंपरा, व्रतवैकल्य या सर्व गोष्टींचा इतका अतिरेक होत चालला आहे की या सगळ्या गोष्टी जर आता बंद केल्या नाहीत तर तुम्ही म्हणता तो हिंस्त्रपणा यायला फार वर्ष दूर नाहीत. तुम्ही बघितलं तर या सणांचं स्वरूप तुमच्या लहानपणापासून ते आतापर्यंत कसं बकाल होत चाललंय ते. गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र, माघी, मार्गशीर्ष याचे वाढवलेले स्तोम आणि त्यात होणारा वेळेचा अन पैशाचा अपव्यय हे आपल्या सगळ्यांना जगाच्या तुलनेत मागे ढकलतंय यात माझ्या मनात शंका नाही.

choice 

Sunday, 10 August 2014

मैत्र जीवाचे

या आभासी जगाला आभासी तरी का म्हणावं अशा २-३ घटना गेल्या काही महिन्यात घडल्या. परभणीकर मित्रांनी कडकडून दिलेली भेट असो, कुणी बरेच दिवस दिसलं नाही तर मेसेज पाठवल्यावर मिळालेला मैत्रीपूर्ण प्रतिसाद असो आणि मग गेल्या महिन्यात अमेरिकेत नुसत्या फेसबुकच्या मैत्रीवर मिळालेली कल्पनातीत मदत असो. मानसच्या उपचाराबद्दल मी लिहीलेच होते. बोस्टन मधे Boston Children Hospital मधे treatment होती. झालं मानस त्यांच्या आईवडिलांबरोबर अमेरिकेत पोहोचला. इथे अनिकेत ने मला सांगितलंच होतं की प्रवीण बोस्टनजवळंच राहतो. मग मी प्रवीणला मेसेज केला अन परिस्थिती सांगितली. त्याने सांगितलं की यथाशक्ती मदत करेल, पण तु तर शक्तीमान चं निघालास रे मित्रा. मकरंद ची अन माझी अजून प्रत्यक्ष भेट नाही झाली, पण त्याने जे तुझ्याबद्दल, तुझ्या पत्निबद्दल सांगितलं त्याने माझ्या मनात तुम्हा दोघांबद्दल प्रेमयुक्त आदर दाटून आला आहे. तुझं त्यांच्या अमेरिकेच्या वास्तव्यात इतक्यांदा ४५ किमी ड्राईव्ह करून येणं, आणि नुसतेच येणं नाही तर प्रत्येकवेळी काही ना काही गरजोपयोगी वस्तु आणणं आणि घरापासून १०००० किमी दूर एका अख्ख्या कुटुंबाला घरपण देणं. ते ही या तथाकथित आभासी जगातील मित्राच्या एका हाकेवर.

Virtual world या माध्यमाचे मनात धडकी भरवणारे अनुभव ऐकले पण या पार्श्वभूमीवर मला आलेले अनुभव अगदी आनंददायी आणि प्रवीण, तु या फॅमिली ला केलेली मदत ही आतापर्यंत च्या अशाच अनुभवाची सर्वोच्च पातळी आहे.

आता नुसतं बोलघेवडं आभार तरी कसं मानू. अनंत ऋणांच्या ओझ्याखाली दबलेलो मी हे पण ऋण पण वाहीन म्हणतो. तसंही या ओझ्याचा त्रास होत नाही आणि कुणास ठाव, उतरेवनही कदाचित.

आता काही व्यवहार्य लोकं म्हणतीलही, की हा तुमचा प्रेमालाप पर्सनल मेसेजमधे टाका, आम्हाला कशाला ऐकवताय.  पण मित्रांनो, तासाभरच्या प्रवासात पाच मिनीटासाठी कुणाचं डोकं खांद्यावर आलं तर ते ओझं देखील सहन न होणार्या जगात जर असे अनुभव शेअर करण्यात या माध्यमाचा उपयोग केला तर काय हरकत आहे. 

Friday, 1 August 2014

कैच्या काही

"मराठी माणसाला धंदा येत नाही" टाळ्या
"मराठी माणूस दुसर्या ची घासण्यासाठी साठी जन्माला आला आहे" कचकावून टाळ्या

अरे काय, उठ सुठ आपलं मराठी माणसाला धुवायचं. काय धंदयात नाही आहे. अख्या महाराष्ट्रात इमान ऐतबारे धंदा करतो आहे. शासनाला tax देतो आहे. धंदा करून काय करायचं, पैसेच कमवायचे ना? मग कमावतो कि. आणि पुन्हा employees ची व्यवस्थित बडदास्त ठेवून. आम्ही पण पुष्कळ बिगर मराठी धंदेवाईक बघितले. साला, pf कापताना employee च्या salary तून स्वत:चा हिस्सा पण कापतात. एवढंच नाही तर दिवाळी चा बोनस जो पोरांचा हक्क आहे तो सुद्धा पगारातून कापतात आणि तोच बोनस म्हणून परत देतात. भूकंप ग्रस्ताची मदत म्हणून १०० रु काढून खाल्लेले बघितले आहेत. याच्या पेक्षा बेकार काय असेल.

बघितलं आहे पंजाब मध्ये, जिथल्या लोकांच्या धंद्याच्या स्किल चं कौतुक सांगतात ना. मालक लोकं मर्सिडीज उडवतात आणि वर्कर भणंगा सारखं काम करतो. धड मुतारी मेंटेन नाही करता येत. स्वत: अलिशान जागेत तब्येतीत जेवतात अन खालची लोकं मातीत बसून जेवण करतात.

बदलत्या अर्थव्यवस्थेत शहाणी झाली आहेत सगळी मंडळी. नाहीतर पुण्यातल्या दोन बिगर मराठी अग्रगण्य वाहन समूहाने कशी भांडणं केली माहिती आहे पूर्वीच्या लोकांना. त्यातला एक जण तगला, एकाला तर गाशा गुंडाळावा लागला. 

नाव नाही घेत, यांच्या नावाने पूर्वी जेवणं चालायची म्हणे. आणि आताची पिढी ३ वर्ष suppliers ची payment देत नाहीत, हीच बिगर मराठी व्यावसायिक. आमच्या पैशावर धंदे करतात. अन वरती शहाणपणा शिकवतात finance management कसं करायचं.

हैदराबाद ची कंपनी आहे. पब्लिक लिमिटेड. मालकाचा पोरगा आता MD  आहे. LandRover अन मर्सिडीज उडवतो. आणि suppliers ला रडवतो.

काय शेण खायचं असा धंदा करून.

आणि नोकरी करणं काय वाईट आहे हो. नाही म्हणजे कामात उद्यमशीलता असली म्हणजे झालं. फेसबुकवर आहेत एक जण. त्यांचे पतीराज भारतातल्या १५० top executive मध्ये आहेत ज्यांना महिन्याचा पगार कोटीच्या घरात आहे. L & T चे वाय एम देवस्थळी, एस डी कुलकर्णी, अनेक कंपन्यांना गर्तेतून वर आणलेले अच्युत गोडबोले, बोईंग चे अजित केरकर, सुमो ज्यांच्या स्मरणार्थ आहे ते सुमंत मुळगावकर, thermax चे नलावडे, भारत फोर्ज चे तांदळे यांच्यासमोर येउन म्हणा बरं "काय नोकरी करता राव" तिथं त्यांच्या समोर सर, सर करत पुढं मागं फिरतील हि मंडळी.

थोडक्यात सांगायचं काय तर स्वत:च्या अंगभूत गुणांना वाव देणारा धंदा असो कि नोकरी. खुश रहायला पाहिजे. धंदा करणाऱ्या लोकांचं आणि नोकरी करणाऱ्या लोकांचं स्थान हे आपापल्या ठिकाणी अबाधित आहे. उगाच आपलं धंदा करणारा शहाणा आणि नोकरी करणारा म्हणजे स्वत:ची पत घालवून बसणारा हे असलं काही लोकं पकवतात ते बंडल आहे असं मला, जो बारा वर्षांपासून धंद्यात आहे (पार्ट time पकडून २०), वाटतं.

(अजून बरीच मळमळ बाकी आहे, पण थांबवतो)

कैच्या काहीते शोधणं महत्वाचं